Halloween Costume ideas 2015

लैंगिकता : समज कमी गैरसमज जास्त

एम.आर.शेख,  9764000737

    आजकाल बीबीसी वर  #me too नावाने एक लैंगितेसंबंधी मोहिम सुरू आहे. त्यात जागतिक पातळीवरील नावाजलेल्या स्त्री-पुरूषांनी आपला सहभाग नोंदविलेला आहे. प्रख्यात हॉलीवुड अभिनेत्री अँजेलिना ज्युली पासून ते मोनिका लेवेन्स्की पर्यंतच्या महिलांनी यात आपला सहभाग नोंदविलेला आहे. यात अनेक पुरूषांनी सुद्धा आपल्या जीवनात महिलांवर आपण कसे लैंगिक अत्याचार केले? याची पश्‍चातापदग्ध स्विकारोक्ती केलेली आहे. अनेक विख्यात स्त्रीयांनी आपल्यावर कोणत्या परिस्थितीत व कसे लैंगिक अत्याचार झाले याचे वर्णन केलेले आहे.
शिवाय अतीलैंगिक सक्रीयतेमुळे लोक कसे आजारी पडत आहेत व त्यांच्या इलाजासाठी कशी नव नवीन रूग्णालये व नव नवीन उपचार पद्धती उपयोगात आणल्या जात आहेत यासंबंधी ही एक विस्तृत रिपोर्ताज नुकताच प्रकाशित केलेला आहे. त्यात एरीजोना येथील ’सेक्स अ‍ॅडिक्शन रिहॅबिलीटेशन सेंटर’ मध्ये प्रख्यात हॉलीवुड अभिनेता मायकल डग्लस, आंतरराष्ट्रीय किर्तीचा गोल्फ खेळाडू टायगर वुड्स आणि हॉलीवुडचे प्रख्यात दिग्दर्शक हार्वी वाईन्सटाईन सारख्या सेलेब्रिटीजनी कसे उपचार घेतलेले आहेत? याचीही माहिती देण्यात आलेली आहे. या पार्श्‍वभूमीवर कथित पुढारलेल्या युरोपीयन समाजाची अशी लैंगिक दुरवस्था का झाली? या विषयी चर्चा अप्रस्तुत होणार नाही.

पार्श्‍वभूमी
    ज्या समाजात वेगवेगळ्या मार्गाने अवतीभोवती 24ु7 कामुक वातावरण जाणून बुजून निर्माण केले जाते त्या समाजात लैंगिक संबंधाचा अतिरेक आपोआपच होतो. यात आश्‍चर्य वाटण्यासारखे काही नाही. लैंगिक संबंधामध्ये जो अवर्णनीय आनंद अल्लाहने ठेवलेला आहे तो जोडप्यांना मुलांना जन्माला घालतांना व नंतर संगोपन करतांना ज्या यातना सहन कराव्या लागतात त्या सुसह्य व्हाव्यात म्हणून ठेवलेला आहे. मात्र मुक्त लैंगिक संबंधामुळे प्रजोत्पादनाच्या या इश्‍वरीय तरतुदीलाच हरताळ फासला जातो व लैंगिक संबंधाचे रूपांतर मनोरंजनामध्ये केले जाते. त्यामुळे समाजामध्ये  हा लैंगिक अतिरेक होतो. अशा समाजात राहणार्‍या महिला ह्या सातत्याने पुरूषांच्या वासनेच्या बळी पडतात. महिलांच्या लक्षातच येत नाही की ’महिला स्वातंत्र्याच्या’ नावाखाली चतुर पुरूष त्यांना पारंपारिक नैतिकतेच्या चौकटीतून बाहेर काढून त्यांचा स्वतःच्या लैंगिक मनोरंजनासाठी वापर करून घेऊ इच्छितात. हे सत्य फार कमी महिलांच्या लक्षात येते. उदाहरणार्थ एका सुज्ञ महिलेचे हे वाक्य मी आपल्या समोर ठेवीत आहे. ”फ्री सेक्स असल में स्त्रीमुक्ती नहीं है. वास्तव में ये सेक्स के भूखे, शातीर पुरूषोंद्वारा हमारे लिए बिछाया गया एक जाल है. हमें लगता है की वे हमें मुक्त होने के लिए प्रोत्साहित कर रहे हैं. वास्तव में वे हमें शोषण के लिए तयार कर रहे होते हैं.” - अनुजा चौहान, इंग्रजी लेखिका (संदर्भ ः आऊटलूक - फेब्रुवारी 2011) 
    मुक्त लैंगिक वातावरण असलेल्या समाजामध्ये साधारणपणे महिलांना अनेक पुरूष आपापल्या कुव्वतीप्रमाणे वश करण्याचा प्रयत्न करत असतात. पुरूषांच्या ससतच्या ससेमिर्‍यामुळे बहुतेक महिला त्रस्त होऊन जातात. या ससेमिर्‍यापासून फक्त त्याच महिला सुरक्षित राहू शकतात ज्या शरियतच्या चौकटीत राहून जीवन जगत असतात. कुठलाही अतिरेक हा विकृतीत रूपांतरीत होण्यासाठी जास्त काळ लागत नाही. म्हणून लवकरच प्रत्येक मुक्त समाजातील मोठा वर्ग लैंगिक विकृत्तीमध्ये गुरफटून जातो. त्याचे वाईट परिणाम मग सगळ्यांनाच भोगावे लागतात. एक तर अशा संबंधामुळे मोठ्या प्रमाणात कुटूंब व्यवस्था उध्वस्त होऊन जाते किंवा पती-पत्नीमध्ये कायम अविश्‍वासाची भावना घर करून राहते.

लैंगिक शक्तीची ताकद
    लैंगिक शक्ती ही बंद जलायशासारखी असते. अशा महाप्रचंड जलाशयाचा वापर जर कालवे करून नियंत्रित पद्धतीने केला गेला तर हजारो हेक्टर शेती सुजलाम व सुफलाम होते. मात्र तोच जलाशय दुर्देवाने फुटला, म्हणजे अनियंत्रित झाला तर हजारो हेक्टर शेती नुसती उध्वस्तच होत नाही तर  गावचे गाव वाहून जातात. लैंगिक संबंधानाही जर विवाहरूपी कालव्यांद्वारे नियंत्रितपणे वाट मोकळी करून दिली तर आदर्श समाज तयार होतो वे जर ते अनियंत्रित जलाशयासारखे मुक्त झाले तर समाजाचा मोठा भाग उध्वस्त होऊन जातो.
    बहुतेक पुढारलेल्या देशात याच सामाजिक उध्वस्ततेची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याचे एक उदाहरण असे की अफगानिस्तान, इराकच्या युद्धात जायबंदी होऊन मायदेशी परतलेल्या बहुतेक अमेरिकन सैनिकांच्या बायकांनी त्यांची सुश्रुशा करण्यास नकार देऊन स्वतःचे जीवन जगण्याचा पर्याय निवडला. त्यामुळे अनेक सैनिकांनी भरपूर पेन्शन व उपचाराच्या सरकारी सोयी उपलब्ध असतांनासुद्धा मानसीक आधार गमावल्यामुळे आत्महत्या केल्याचे विदारक चित्र दिसत आहे. लैंगिकता ही एकदा का अनियंत्रित झाली की माणसांना मुके पशु देखील कमी पडतात. अशा समाजात लैंगिकतेचा बाजार मांडला जातो. वेश्‍वाव्यवसायासारख्या स्त्रीत्वाचा अपमान करणार्‍या व्यावसायाचे बेशर्मपणे पॉर्न उद्योगात रूपांतर केले जाते.
    अल्लाह रब्बुल इज्जतने स्त्री- पुरूषांमध्ये चुंबकीय आकर्षण ठेवलेले आहे. त्यात त्याला जर का उद्योग /व्यवसायाचे स्वरूप दिले गेले तर कुटुंबाचा आधार असलेल्या महिलांचीच सर्वार्थाने हानी होते. महिलांची हानी म्हणजे कुटुंबाची हानी. कारण पुरूष कितीही कर्तृत्वान असला तरी कुटुंबाच्या पाठिचा कणा ही महिलाच असते. पितृसत्ताक कुटुंब व्यवस्थेला बदलून टाकण्याचे अनेक प्रयोग, अनेक देशात, अनेक वेळा झालेले आहेत. अशा प्रयोगातही अंतिम नुकसान हे महिलांचेच झालेले आहे. एनसीआरबी (नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो)च्या आकडेवारीनुसार सन 2014-15 साली आपल्या देशात महिलांच्या विरूद्ध लैंगिक अत्याचारांच्या 34 हजार 651 घटना घडल्या.  
    यावरून आपला देश कोणत्या दिशेने जात आहे याची सहज कल्पना येते. जगात महिला विरोधी अपराध त्यांच्या लैंगिक उपयोगितेच्या कारणामुळेच होत असतात. भारत ही यास अपवाद नाही.
    पाश्‍चिमात्य (अ)सभ्यतेच्या नादी लागून आपल्या देशानेही स्त्री स्वातंत्र्याच्या चुकीच्या व्याख्येला मान्यता दिल्याने आज समाज नासत चाललेला आहे. विद्यापीठे शिक्षणाचे नव्हे तर शिक्षणाच्या नावाखाली लैंगिक संबंधाची संधी उपलब्ध करून देण्याची केंद्रे झालेली आहेत. जेएनयूमध्ये रोज उपयोग करून फेकून दिलेल्या कंडोमची संख्या 3000 आहे. या संंबंधी प्रशासनाने प्रा. बुद्धसींह यांच्या नेतृत्वाखाली मुलींच्या वसतिगृहावर 10 ऑक्टोबर 2017 ला पहाटे 5 वाजता अचानक छापेमारी केल्यावर हे सत्य उघडकिस आलेले आहे. यासंबंधीचे सविस्तर वृत्त लोकसत्ताच्या 11 आक्टोबरच्या पान क्रमांक 11 वर प्रकाशित झालेले आहे. आक्टोबरच्या दूसर्‍या आठवड्यात कोलकत्याहून अशीच एक बातमी आलेली आहे. ज्यात म्हटलेले आहे की, तेथील एका महाविद्यालयात मुलींच्या हॉस्टेलच्या निर्मितीचे काम सुरू असल्याने मुलींना तात्पुरत्या स्वरूपात मुलांच्या वसतिगृहात स्थलांतरीत करण्यात आले होते. मागच्या महिन्यात मुलींच्या वसतिगृहाचे काम संपले व त्यांना त्यांच्या वसतिगृहात स्थलांतरीत होण्याचा आदेश दिला असता मुलींनी मुलींच्या वसतिगृहात जाण्यास नकार दिला. प्रशासन आणि मुलींच्या मध्ये झालेल्या वादानंतर 14 मुलींवर कारवाई करून महाविद्यालयामधून काढून टाकण्यात आले. जशी शितावरून भाताची परीक्षा होते तशी या दोन घटनांवरून आपला विद्यार्थी वर्ग कुठल्या दिशेने जात आहे व भविष्यात हे लोक काय दिवे लावणार आहेत? याची परीक्षा होते. देशातील अन्य विद्यापीठांची परिस्थिती यापेक्षा वेगळी असण्याचे कारण नाही. बनारस हिंदू विद्यापीठासारख्या संघ शिस्तीच्या विद्यापीठामध्ये अलिकडेच झालेल्या एका विद्यार्थीनीच्या विनयभंगानंतर झालेल्या आंदोलनावरून सुज्ञांना अंदाज आलेलाच असेल की अन्य विद्यापीठांची काय अवस्था आहे?

लैंगिक भावनांचे नियंत्रण आणि इस्लाम
    लैंगिकतेसंबंधी इस्लामी व्यवस्थेचा दृष्टीकोण जगातील इतर सर्व व्यवस्थांच्या दृष्टीकोणापेक्षा वेगळा आहे. इस्लाममध्ये मुक्त लैंगिक संबंध तर सोडा विवाहपूर्व प्रेम करण्यालासुद्धा मान्य नाही. इतर व्यवस्थांमध्ये असे संबंध प्रस्थापित करण्याला मनाई नाही. उलट दोन प्रौढ व्यक्तीमधील परस्पर संमतीने प्रस्थापित झालेल्या संबंधांना मग ते विवाहबाह्य का असेनात आपल्या देशाच्या न्याय संस्थेला मान्य आहेत. लिव्ह इन रिलेशनशिप नावाच्या गोंडस शिर्षकाखाली अनैतिक संबंधांना जागतिक स्तरावर प्रोत्साहित करण्यात येते. विवाहबाह्य संबंध आपल्या देशात फौजदारी अपराध नाही. उलट आपल्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने लिव्ह इन रिलेशनशिपला मान्यता दिलेली आहे. या उलट इस्लाममध्ये अशा संबंधांना सर्वाधिक कठोर शिक्षा प्रस्तावित केलेली आहे. असे संबंध स्थापित करणारे अविवाहित असतील तर 100 फटके व विवाहित असतील तर दगडाने ठेचून मारण्याच्या शिक्षेची तरतूद शरियतने केलेली आहे. शरियतने खुनासारख्या गुन्ह्याला कंपाऊंडेबल (तडजोड करण्याजोगा) गुन्हा म्हटलेले आहे. मात्र विवाहबाह्य संबंधांना कंपाऊंडेबल केलेले नाही. कारण इस्लामच्या नजरेमध्ये अनैतिक संबंध हे हत्येपेक्षाही जास्त गंभीर अपराध आहे.  
    सकृतदर्शनी ही शिक्षा अतिशय कठोर वाटते. मात्र जरा गांभीर्याने विचार केला तर ही शिक्षा किती आवश्यक आहे, याचा सुज्ञास अंदाज येतो. कारण समाज नासविणार्‍या कृत्यास तेवढीच कठोर शिक्षा असल्याखेरीज हे प्रकार थांबणार नाहीत.
    इस्लाम एवढी कठोर शिक्षा अचानक देत नाही त्यापूर्वी अशी शिक्षा लोकांना होणार नाही याची पुरेशी खबरदारी घेतो. ही शिक्षा अंतिम उपाय आहे. यापूर्वी अनैतिक संबंधापासून समाजाचे रक्षण व्हावे यासाठी इस्लामने एक परीपूर्ण आचारसंहिता दिलेली आहे. पर्दा, सहशिक्षेला प्रतिबंध आणि महेरमच्या माध्यमातून इस्लामने स्त्री पुरूष संबंधांमध्ये संतुलन साधलेले आहे. दिवसातून पाच वेळा अदा केली जाणारी नमाज त्यांना अश्‍लीलतेविरूद्ध लढण्यासाठी आवश्यक तेवढे बळ देते. वर्षातून एकदा येणारा रमजान रोजाच्या माध्यमातून मुस्लिमांचे अध्यात्मिक प्रशिक्षण करण्यासाठी पुरेसा असल्याचे अनुभवातून सिद्ध झालेले आहे. शिवाय, पुरूषाची चंचल लैंगिक प्रवृत्ती लक्षात घेवून त्यांना एकापेक्षा जास्त विवाह करण्याची सशस्त्र परवानगी दिलेली आहे. एवढ्या सार्‍या खबरदार्‍या घेवूनसुद्धा जे स्त्री-पुरूष शेण खातील त्यांच्यासाठी मग दगडाने ठेचून मारण्यासारख्या कडक शिक्षेची तरतूद केलेली आहे.
    परम दयाळू अल्लाहने कुणालाच ही शिक्षा भोगण्याची पाळी येवू नये यासाठी सर्वती उपाययोजना अगोदरच घोषित करून ठेवलेली आहे. लोकांची मानसिक तयारी व्हावी यासाठी कुरआनमध्ये म्हटलेले आहे, ”व्याभिचाराच्या जवळसुद्धा जावू नका. यात शंका नाही तो अश्‍लील आणि वाईट मार्ग आहे.”   शिवाय, प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी अनेकवेळा आपल्या अनुयायांना या कृत्यापासून दूर राहण्याची सूचना दिलेली आहे. इस्लामची मान्यता आहे की, सर्वांच्या घरात आई, बहिण, मुली, सुना असतात. तुम्ही जर दुसर्‍याच्या घरात वाकून पहाल तर तुमचेही घर सुरक्षित राहणार नाही. इमाम अबु हनीफा रहे. यांचे म्हणणे तर इतपत आहे की, व्याभीचार एक कर्ज आहे तुम्ही जर तो घेतले तर तुमच्या महिलांकडून ते वसूल केले जाईल, यात शंका नाही. शेवटी एवढेच म्हणून थांबतो की, व्याभीचार ही एकच  कृती जर सार्वजनिक झाली तर ती कुठल्याही महान सभ्यतेला नष्ट करण्यासाठी पुरेशी आहे. म्हणून आपले, आपल्या कुटुंबाचे आणि आपल्या समाजाचे रक्षण करावयाचे असल्यास मुक्त लैंगिक संबंधाना उत्तेजना देणार्‍या सर्व गोष्टींवर आपण जाणून बुजून व्यक्तीगत बहिष्कार टाकला पाहिजे. कारण सरकार तर त्याच्यावर प्रतिबंध टाकणार नाही. अल्लाहकडे प्रार्थना करूया की, ” ऐ अल्लाह! आमच्यावर कृपा कर, आम्हाला या वाईट कृत्यापासून परावृत्त राहण्याची शक्ती प्रदान कर” (आमीन.)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget