Halloween Costume ideas 2015

मानवजातीच्या कल्याणाचा धर्म अंधारातून प्रकाशाकडे नेणारा

Madina

जगात अनेक सभ्यता संस्कृती आहेत. असंख्य समाज-समूह आहेत, राष्ट्रे आहेत, कबिले-टोळ्या आहेत. प्रत्येक सभ्यता जनसमूह एक किंवा अनेक धार्मिक श्रद्धा आणि त्यानुसार शिकवणींचा अवलंब करतात. काही समाज-राष्ट्रे अशीदेखील अहेत जी कुठलाही धर्म मानित नाहीत. त्यांच्या मते या जगाला एखाद्या ईश्‍वराने निर्माण केलेले नाही.

मानवी सभ्यतेची सुरुवात स्त्री-पुरुषाच्या एका जोडप्याने झाली. त्यांच्यापासून संतती होऊन एक कुटुंब बनले, अनेक कुटुंबांपासून मग एक जनसमूह आणि शेवटी एक सभ्यता बनली. माणूस किंवा कोणताही जीव जसे एका सूक्ष्म जीवापासून (उशश्रश्र) जन्म घेतो त्या जीवाची विभागणी होऊन इतर सूक्ष्म जीव निर्माण होतात. ही प्रक्रिया चालूच असते. एक सूक्ष्म जीव धडधाकड माणूस होतो. अर्थातच लहान बाळापासून प्रगती होत होत मोठा माणूस (स्त्री/पुरुष) जन्माला येतो. पशुंचेही तसेच आणि वनस्पती जगताचेही तसेच होते. ही प्रक्रिया फक्त माणसात म्हणजेच सजीवांतच होत नसते, तर सृष्टीलाही तोच नियम लागू होतो. आधी फक्त एक गोळा (वशर्लीश्रर) होता. एकदम मोठा विस्फोट होऊन त्यापासून पुन्हा ही सृष्टी आणि यातील गृह आणि तारे वेगळे झाले. जशी माणसाची एका जीवापासून उत्पत्ती तशीच सृष्टीचीही उत्पत्ती. जशा माणसाच्या वेगवेगळ्या जाती, कबिले, राष्ट्रे इत्यादी निर्माण झाले त्याचप्रमाणे निरनिराळ्या आकाशगंगा, सूर्य, सौरमंडल निर्माण झाले आणि जसे माणसांच्या संख्येत वाढ होऊन राष्ट्रे जनसमूह विस्तारित झाली अगदी तसेच या सृष्टीचाही विस्तार चालूच आहे. एकदा ईश्‍वराने निर्माण करून त्यांची संख्या थांबवली नाही, तसेच ईश्‍वराने आपल्या क्षमतेने ही सृष्टी निर्माण केली आणि तोच त्या सृष्टीला विस्तारत आहे. त्याचनुसार माणूस, पशू, पक्षी, वनस्पतीचाही विस्तार होत आहे. याचा अर्थ एकच की माणूस या सृष्टीपासून वेगळा नाही तर तो या सृष्टीचाच एक भाग आहे. म्हणून जे कोणते नियम कायदे सृष्टीला लागू आहेत तसेच नियम कायदे मानवी जीवनालाही लागू आहेत. एकच नियम सृष्टीचा मानवी जीवनाचा म्हणजेच एकाच ईश्‍वराने या सर्वांना निर्माण केले आहे. जो नियम त्या ईश्‍वराने सगळ्या सृष्टी आणि मानवी जीवनाला लागू केला तो म्हणजे इस्लाम! ह्या धरतीवरील सर्व निर्मिती आणि सृष्टी जसे त्यांना लागू केलेल्या नियमांचे म्हणजेच इस्लामचे पालन करते आहे तसेच मानवांनीही त्याच नियमांचे पालन करावे, यांनाच इस्लामच्या शिकवणी म्हणतात. एकच निर्माता, एकच धर्म, एक नियमावली जशी सारी सृष्टी समान तसेच मानवजातीदेखील समान कारण सर्वांचा निर्माता एकच.

इस्लाम काय आणि त्याच्या शिकवणी कोणत्या ज्यांचे आचरण करून मानवांनी ईश्‍वराच्या नियमांचे-आज्ञांचे पालन करावे, याची माहिती देण्यासाठी ईश्‍वराने पैंगबरांची योजना केली. सर्वांत पहिले मानव म्हणजे आदम (अ.) हे धरतीवरील पहिले पैगंबर. त्यानंतर 1 लाख 24 हजार पैगंबर हे धरतीच्या प्रत्येक भूभागात, मानवसमाजात, राष्ट्रात पाठवले गेले, भारतातही आले. गौतम बुद्ध, श्रीकृष्ण आणि राम यांच्या बाबतीत इस्लामी विद्वान आणि धर्मपंडितांचे असे म्हणणे आहे की तेदेखील भारतात आलेले पैगंबर असतील कदाचित. धरतीवर लाख-दीड लाख प्रेषित आलेले आहेत पण पवित्र कुरआनात फक्त त्या पैगंबरांची - प्रेषितांची नावं दिलेली आहेत जे अरबस्थानात आले होते. कारण तेथील लोक त्यांच्या नावांशी परिचित होते. पैगंबर मुहम्मद (स.) याच श्रंखलेतील शेवटचे पैगंबर होते.

वर सांगितल्याप्रमाणे एका पुरुष-स्त्रीपासून या धरतीवर असंख्य पुरुष-स्त्री जन्माला आले. त्यांचे निरनिराळे जनसमूह बनले. काही टोळ्या-कबिल्यांपर्यंत सीमित झाले तर काही भौगोलिक राष्ट्रे बनली. अशा प्रकारे सभ्यता-संस्कृतीचा जन्म होत गेला. टोळी सभ्यतेपासून राष्ट्र सभ्यता उदयास आली. शेवटी जसजसे माणसाच्या ज्ञानात भर पडत गेली ज्ञान-तंत्रज्ञानाचा विकास झाला. नवनवीन विचार, आविष्कार, ज्ञानांची भर पडत गेली. त्या विचारंद्वारे माणसाने विचारधारा निर्माण केल्या. निरनिराळ्या जीवनव्यवस्था राजकीय व्यवस्था आणि इतर व्यवस्थांच्या आधारावर सभ्यतांचे संवर्धन केले, मानवी जीवन अशा प्रकारे वृद्धिंगत होत गेले.

ज्या लोकांनी पैगंबरांच्या शिकवणींचे आचरण केले त्यांनी त्यांच्यासाठी ईश्‍वराने निवडलेल्या नियमांचा म्हणजेच इस्लामचा स्वीकार करून स्वतःला ईश्‍वराला म्हणजेच अल्लाहला समर्पित केले. त्यांना अल्लाहने पवित्र कुरआनात मुस्लिम हे नाव दिले आहे.

ईश्‍वराने पशू, पक्षी आणि इतर सजीवांना प्राण दिले पण त्यांना आत्मा आणि आपल्या विचार-आचार स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला नाही. निर्जीव निर्मितीला प्राणही दिले नाहीत की आत्माही नाही. तेव्हा त्यांच्या आचारविचारांचा संबंधच नाही. त्यांना जे विहित केले आहे तसेच ते वागतात, म्हणजेच ते सुद्धा ईश्‍वरानं घालून दिलेल्या नियमांचे पालन करत असतात. जसे वारा धरती व आकाश यांच्या मध्येच वाहत असतो. पाणी पाषाणासारखे होत नाही की दगड-माती पाण्यासारखे वागत नाहीत. त्यांना जसे बनवले आहे तोच त्यांचा धर्म. त्यानुसारच त्यांना राहावे लागते. त्याचबरोबर माणूस वगळता सजीव निर्मिती, पशु-पक्षी, वनस्पती इत्यादींनीही त्यांना विहीत केलेल्या सेवा कराव्या लागतात. निर्जीव आणी सजीव तसेच सृष्टीतील सकल निर्मिती सूर्य, चंद्र, तारे, विविध ग्रह माणसाच्या अधीन केले आहेत. माणूस आपल्या गरजांप्रमाणे त्यांचा वापर करू शकतो. ईश्‍वराने माणसासाठीच हे सारे विश्‍व निर्माण केले आहे.

पशु-पक्षी, वनस्पती, हवा, पाणी इत्यादी जसे ईश्‍वरी आज्ञांचे पालन करतात. तसेच माणसानेही करावे ही ईश्‍वराची योजना. माणूस सजीव असून त्याचा आत्मासुद्धा आहे. म्हणून ईश्‍वरी आदेशांचे लक्ष त्याचा आत्मा असते. आत्म्याला संबोधून ईश्‍वर मानवजातीला आज्ञा देतो. आज्ञांच्या या वर्तुळाची सुरुवात माणसाच्या वैयक्तिक जीवनापासून होते. अर्थातच माणसाला जे आदेश दिले जातात, ते त्यांनी आपले वैयक्तिक जीवन कसे व्यतीत करावे, यावर आधारित असतात. नंतर माणसाचे माता-पिता, त्यांची मुलंबाळं, त्यांचे नातलग आणि समाज मग राष्ट्र या सर्वांशी माणसाने कसे वागायचे यावर आधारित असतात. म्हणजे सुरुवातीला माणसांनी कसे जगावे, काय करावे, कशा गोष्टींपासून लांब राहावे, कोणती कार्ये अजिबात करू नयेत याचा तपशील आपण खालीलप्रमाणे पाहू या.

सर्वप्रथम माणसाने अल्लाह (ईश्‍वरा)वर श्रद्धा ठेवायला हवी. म्हणजे तोच त्याचा आणि सार्‍या सृष्टीचा निर्माता आहे. तो एकटाच ईश्‍वर आहे. त्याच्याशिवाय अन्य कुणीही ईश्‍वर नाही. त्याच्यासारखा कुणी नाही. त्याच्या तोडीचा कुणी नाही. म्हणजेच माणसांना त्याच एका ईश्‍वराला आपले जीवन समर्पित करावे, केवळ त्याचेच आणि त्याच्या प्रेषितांचे आज्ञापालन करावे.

ईश्‍वरावर श्रद्धा ठेवत असताना ईश्‍वरानं या जगात माणसाच्या मार्गदर्शनासाठी पाठवूनव दिलेल्या सर्व पैगंबरांवर श्रद्धा ठेवावी. त्याचबरोबर ज्या प्रेषितांसोबत अल्लाहनं माणसाच्या मार्गदर्शनासाठी जे ग्रंथ काही पैगंबरांसोबत पाठवून दिलेत, त्यांच्यावर श्रद्धा ठेवावी आणि माणसाला मरणोपरांत पुन्हा अल्लाह त्यांना जीवित करणार आहे आणि त्यांनी ईश्‍वराचे आणि त्याच्या पैगंबरांच्या शिकवणींचे काटेकोरपणे पालन केले, पाठवून दिलेल्या शिकवणींनुसार आचरण केले. त्यात काही कसर केली जावी, चुका केल्या, पापं केली असतील म्हणजेच माणसाला अल्लाहकडे जाब द्यावा लागेल. अंतिम निवाड्याच्या दिवशी अल्लाहसमोर जगात सुरुवातीपासून प्रलयाच्या दिवसापर्यंत जेवढी माणसे जन्माला आली त्या सर्वांना ईश्‍वरासमोर हजर राहावयाचे आहे. त्या दिवशी माणसांचा हिशोब घेऊ, त्यांना चांगल्या, कर्मांचा मोबदला दिला जाईल आणि वाईट कर्मांसाठी शिक्षा केली जाईल, यावर श्रद्धा ठेवायला हवी.

त्या शिकवणी कोणत्या?

अल्लाहची आराधना करा, त्याचा कुणी भागीदार बनवू नका. मातापित्याशी सद्वर्तन करा. त्याचबरोबर आपल्या नातलगांशी, अनाथांशी, गोरगरीबांशी, आपल्या शेजार्‍यांशी आणि वाटसरूंशी चांगले वर्तन करा. शेजार्‍यांविषयी पैगंबर मुहम्मद (स.) यांनी म्हटले आहे की, अशी व्यक्ती श्रद्धावंत - मुस्लिम होऊच शकत नाही, जेे स्वतः आपल्या घरी पोटभर जेवतात आणि त्यांचा शेजारी उपाशी असेल. एकदा पैगंबरांच्या पत्नी ह. आयेशा (र.) यांनी पैगंबराना विचारलं की, मी माझे दोन शेजारी आहेत, मी कुणाला भेट (ॠळषीं) देऊ? पैगंबरांनी उत्तर दिले की ज्याच्या घराचे दार तुमच्या घरापासून जास्त जवळ असेल. राग येऊ देऊ नका. मुस्लिम असे असतात जे आपल्या रागावर नियंत्रण ठेवतात. दुसर्‍यांच्या चुका माफ करतात. - (उर्वरित पान 8 वर)

(पान 7 वरून) अशाच लोकांशी अल्लाह प्रेम करतो. अल्लाहने प्रत्येक माणसाच्या प्राणास आदरणीय ठरवलं आहे. रागाच्या भरात कुणाची हत्या करू नका. जर कुणी नाहक कुणाची हत्या केली तर त्याने खर्‍या अर्थानं माणुसकीची हत्या केली. अल्लाहच्या मर्जीखातर अपल्याला सर्वांत प्रिय असलेली संपत्ती नातलगांसाठी, अनाथांसाठी, गोरगरीबांसाठी खर्च करणारे वास्तवात नेक लोक असतात.

आपल्या साथीदारांच्या वा इतरांच्या चुकांकडे दुर्लक्ष करा. लोकांच्या मदतीला धावून जाण्यासाठी इस्लामच्या शिकवणींत खूप महत्त्व दिले गेले आहे. जोपर्यंत माणूस दुसर्‍या माणसांची मदत करत असतो तोपर्यंत अल्लाह त्याची मदत करत असतो. जे ज्ञानाच्या शोधात राहातात, अल्लाह त्यांच्यासाठी स्वर्गाची दारे खुली करतो.

मुस्लिम लोक एकमेकांचे भाऊबंध आहेत. मुस्लिमांनी शत्रूराष्ट्राची सुद्धा थट्टा करू नये. त्यांची अवहेलना करू नये. ते तुमच्यापेक्षा कदाचित चांगले असतील. एकमेकांची टिंगलटवाळी करू नका. वाईट नावांनी कुणाला हाक मारू नका. एकमेकांची चहाडी करू नका. चहाडी करणे म्हणजे मृत माणसाचे मांस खाण्यासारखे आहे. वायफळ खर्च करू नका. अल्लाह कुणाला विपुल साधनसंपत्ती देतो तर कोणाला मोजक्या प्रमाणात देतो. आपल्या संततीला उपजीविकेच्या भीतीने ठार करू नका. तुम्हाला आणि त्यांना उपजीविका देणारा अल्लाह आहे. व्याभिचाराच्या जवळदेखील फिरकू नका. कोणास वचन दिल्यास ते पाळा.

ज्या चुका अल्लाहच्या अधिकारात असतील म्हणजे त्याची आराधना, नमाज, रोजा वगैरे त्यात काही कमीजास्त झाले तर अशा चुकांना अल्लाह माफ करू शकतो. पण सजीव, माणूस आणि पशुपक्षी वगैरे यांच्या हक्कामध्ये काटकसर केली, त्यांच्यावर अन्याय-अत्याचार केले असतील तर अल्लाह क्षमा करणार नाही, जोपर्यंत ती पीडित व्यक्ती क्षमा करत नाही. पवित्र कुरआनमध्ये अल्लाह म्हणतो की मद्यपान करू नका, जुगार खेळू नका ही सैतानी कृत्यं आहेत. सैतानाचा बेत आहे की त्याने तुमच्यात शत्रुत्व निर्माण करावे.

ह. लुकमान (अ.) अल्लाहचे पैगंबर होते. त्यांनी आपल्या मुलाला खालीलप्रमाणे उपदेश दिला होता- माझ्या मुला, नमाज कायम कर. न्यायाने वाग, अन्याय करू नकोस. काही आपत्ती कोसळल्यास संयमाने वाग. निश्‍चितच ही कामं मोठ्या हिंमतीची आहेत. लोकांशी बोलताना तोंड वाकडं करू नकोस. धरतीवर अहंकारानं चालू नकोस. अल्लाहला उद्धटपणा करणारे आवडत नाहीत. मध्यम गतीनं चालत जा. आपला आवाज धीमा ठेव. सर्वांत वाईट गाढवाचा आवाज असतो.आणखीन दुसर्‍या ठिकाणी असे म्हटले आहे की-

जमिनीवर अहंकारानं वागू नकोस. तू जमिनीला दुभंगू शकणार नाहीस की पर्वताएवढी उंची गाठू शकणार नाहीस. अल्लाहबरोबर इतर कोणासही भागीदार बनवू नकोस. निष्कलंक महिलांवर खोटे आरोप करू नको.

शेवटचे पैगंबर मुहम्मद (स.) यांनी जगातील सार्‍या मानवजातीला संबोधून जे आपल्या आयुष्यातील अंतिम प्रवचन दिले ते असे- “अल्लाहशिवाय कोणी ईश्‍वर नाही. तो एकमेव असून त्याचा कोणी भागीदार नाही. अल्लाहनं आपलं वचन पूर्ण केलं. त्यानं आपल्या भक्तास मदत केली आणि एकट्यानं एकत्रित आलेल्या सगळ्या खोट्या शक्तींना पराभूत केलं.” 

“मानवांनो! मी सांगतो ते ऐका. मला नाही वाटत आपण पुन्हा एकत्रित येऊ. मला एक वर्ष लाभेल असेही मला वाटत नाही.

“आजचा हा दिवस, हा महिना, हे ठिकाण पवित्र आहे. तसंच लोकहो! सर्वांचं जीवन (रक्त) आणि मालमत्तेचा आदर करा, ते पवित्र आहेत. लक्षात ठेवा, तुम्हा सर्वांना अल्लाहच्या हुजुरात हजर व्हायचंय. तुमच्या कर्मांची मग तिथं विचारपूस होईल. कुणाचं नाहक रक्त सांडू नका. घराघरांचा नाश करू नका. तिथं सर्व कर्मांची झडती द्यावी लागेल. 

“अज्ञानकाळात झालेल्या खुनांचा सूड घेणं आता रद्द होतंय. सर्वप्रथम मी आपल्या परिवाराच्या खुनाचा बदला माफ करून टाकतो. हारिसचा मुलगा रबीआच्या खुनाचा सूड घेतला जाणार नाही.

“मानवांनो! अल्लाहनं तुम्हाला एकच पुरुष आणि एकाच स्त्रीपासून जन्म दिलाय. तुमच्या जमाती आणि टोळ्या बनवल्या एकमेकांच्या ओळखीसाठी. पण अल्लाहपाशी तुमच्यापैकी तोच प्रतिष्ठित जो सदाचारी असेल जो ईशपरायणतेमध्ये पुढे असेल.” 

सारे मानव आदमची संतती आहेत. आदम यांना चिखलमातीपासून निर्माण केलंय. कुणा अरबास अरबेतरावर प्रभुत्व नाही की अरबेतर अरब माणसापेक्षा प्रतिष्ठित नाही. तसंच काळ्या माणसाला गोर्‍या माणसावर आणि गोर्‍या माणसाला काळ्या माणसावर प्रतिष्ठा नाही. अज्ञानकाळातल्या सगळ्या प्रतिष्ठा मी माझ्या पायाखाली तुडवित आहे. कुरैशच्या लोकांनो! अल्लाहनं तुमच्या खोट्या अहंकारास नष्ट करून टाकलं. तुमच्या बापजाद्यांच्या पराक्रमांवर घमेंड करण्याला काही अर्थ नाही.

“सावकारी निषिद्ध झाली. व्याजबट्ट्याचा व्यवहार निषिद्ध झाला. सर्वप्रथम मी माझे चुलते अब्बास यांचं व्याज रद्दबातल करतो.

‘लोकहो! तुमच्या पत्नींचे तुमच्यावर काही अधिकार आहेत, तसंच तुमचे त्यांच्यावर हक्क आहेत. आपल्या पत्नीबाबत अल्लाहचं भय बाळगा. अल्लाहस वचन देऊन तुम्ही त्यांना आपल्या भार्‍या स्वीकारल्या आहेत. त्यांच्याशी सहानुभूतीनं, नरमाईनं, दयेनं वागा. कठोरपणे नका वागू.

“कुणा स्त्रीनं आपल्या पतीच्या संपत्तीतून त्याच्या अनुमतीशिवाय काही घेणं हे वैध नाही. तुमच्या पत्नीवर तुमचा हा अधिकार आहे की त्यांनी अशा कुणा व्यक्तीस घरी बोलवू नये ज्यास तुम्ही पसंत करीत नाही. त्यांनी आपल्या शीलांचं रक्षण करावं. जर त्यांनी तसं केलं नाही तर तुम्ही त्यांना शिक्षा करू शकता; पण सौम्य प्रकारची. त्यांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था करा.

“कोणी विश्‍वास करून तुमच्याकडे अमानत ठेवली तर विश्‍वासघात करू नका. दिलेलं वचन पाळा. सारे मुस्लिम एकमेकांचे भाऊबंद आहेत. दुसर्‍यानं तुम्हाला काही राजीखुशीनं दिलं तर ते घ्या. त्याच्या मर्जीशिवाय त्याच्या मालाला हात लावू नका. अन्याय करू नका.

“अल्लाहनं ज्याचे त्याला हक्क दिलेत. आता कोणी कुणाच्या बाबतीत मृत्युपत्र करू नये.

“ज्याच्या बिछान्यावर बाळानं जन्म घेतला असेल ते बाळ त्याचंच. ज्यानं व्याभिचार केला त्यास दगडानं ठेचून मृत्युदंड दिला जाईल. त्यांचा हिशेब अल्लाहपाशी होईल.” “कोणी आपलं कुळ बदलू नये, दुसर्‍यास आपला पिता मानू नये. कोणी असं केल्यास त्याचा अल्लाह धिक्कार करील. “कर्ज घेतल्यास ते परत करा. कोणी भेटवस्तू दिल्यास तुम्हीही द्या. 

“मी तुमच्या दरम्यान एक वस्तू सोडून जातोय. तिला घट्ट धरल्यास तुम्ही कधी मार्गभ्रष्ट होणार नाही. ती ‘कुरआन’ आहे! धर्माच्या बाबतीत अतिरेक करू नका. तुमच्या पूर्वीच्या लोकांचा यामुळेच विनाश झाला.

“लोकहो! ऐका. आकाश आणि पृथ्वीची निर्मिती झाली, त्याच ठिकाणी आता काळ लोटून आलाय. अल्लाहनं ज्या वेळी आकाश आणि पृथ्वी निर्माण केली त्यावेळी वर्षाचे बारा महिने ठरविले आहेत. यात चार महिने आदरणीय आहेत. हा (इस्लाम) धर्म कायमस्वरूपी आहे. लक्षात ठेवा. माझ्यानंतर नाकारणारे होऊ नका. एकमेकांचं रक्त सांडू नका. सैतान आता निराश झालाय. प्रार्थना करणारे (नमाज अदा करणारे) त्याची पूजा करणार नाहीत; पण तो तुम्हाला एकमेकांविरूद्ध उभं करील.”

प्रेषितांनी त्या लोकांना विचारलं, “मी तुम्हाला अल्लाहचा संदेश पोचता केला?” सगळे लोक एका सुरात म्हणाले, “होय, अल्लाहचे प्रेषित!” त्यावर प्रेषित म्हणाले, “अल्लाह! मी तुझा संदेश पोचता केला, माझं कार्य पूर्ण केलं. तू साक्षी आहेस.” आणि मग म्हणाले,

“जे आज इथं हजर आहेत त्यांनी हा संदेश जे इथं हजर नाहीत त्यांना पोचवावा. जे इथं आहेत, कदाचित त्यांच्यापेक्षा जे इथं नाहीत ते हा संदेश चांगल्या रीतीनं ओळखतील आणि लक्षात ठेवतील.

“तुमचे जे गुलाम, सेवक आहेत त्यांच्याशी चांगलं वागा. तुम्ही खाता तेच त्यांना द्या. तुम्ही घालता तसेच कपडे त्यांना द्या. त्यांनी चूक केल्यास माफ करा. “मी अल्लाहचा संदेश पोचवला. अल्लाह! तू साक्षी आहेस.

“ऐका! तुमच्यावर जर एखाद्या काळ्या अ‍ॅबिसीनियन (निग्रो) गुलामाला जरी प्रमुख नेमलं गेलं तर त्याच्या आज्ञांच पालन करा. जर तो अल्लाहच्या ग्रंथानुसार निर्णय घेत असेल तर !

“मानवानो! आपल्या विधात्याची उपासना करा. पाच वेळा नमाज अदा करा. महिनाभर रोजे ठेवा. आपल्या संपत्तीतून जकात अदा करा, खूश दिलानं. आपल्या अल्लाहच्या घराची हजयात्रा करा. आपल्या प्रमुखाचं पालन करा. तुम्ही स्वर्गात प्रवेश कराल. “आणि पाहा, एकानं केलेल्या अपराधापायी दुसर्‍याला जबाबदार धरलं जाणार नाही. बापानं केलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्याच्या मुलाला की मुलानं केलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्याच्या बापाला दिली जाणार नाही. “लोकहो, माझ्याविषयी तुम्हाला विचारलं जाईल (अल्लाहपाशी) तेव्हा तुम्ही काय उत्तर द्याल?”

लोक म्हणाले, “तुम्ही अल्लाहचा धर्म आम्हास पोचता केला याची आम्ही साक्ष देऊ. आपण प्रेषित्वाची जबाबदारी पार पाडली, आमचं भलं केलं.” लोकांचं हे बोलणं ऐकून प्रेषितांनी आपलं बोट आकाशाकडे उंच केलं आणि तीन वेळा उच्चारलं, “अल्लाह! तू साक्षी आहेस. अल्लाह! तू साक्षी आहेस. अल्लाह! तू साक्षी आहेस.”

कोण होते हे प्रेषित मुहम्मद (स.)? अल्लाहने त्यांना निवडले होते जगावरील आजवर जन्माला आलेले आणि यापुढे जन्माला येणारे सर्व मानवांत सर्वोत्तम. त्यांचे नाव होते मुहम्मद मुस्तफा. म्हणजे त्यांनी सर्वोत्तमांतील सर्वोत्तम होते.

साधा आणि सोपा, एका निरक्षर माणसापासून विद्वानापर्यंत सर्वांना समजण्यासारखा, त्यानुसार आचरण करण्यासारखा- इस्लाम! फक्त एक धर्म नसून ती विचारधारा आहे, सभ्यता आहे. मानवी जीवनातील सर्व क्षेत्रं, मग ती सामाजिक असोत की राजकीय, कौटुंबिक असोत की आंतरराष्ट्रीय; समस्या, प्रश्‍न, विज्ञानाविषयी, कायदे, संविधान अशा सर्व बाबी ज्या मानवी समूहाला अत्यावश्यक आहेत अशा सर्वच क्षेत्रांत मार्गदर्शनांनी संपन्न. (इतिहासकार मोशे शेरॉन, बेन गोरिऑन विद्यापीठ, इस्राईल)

आपल्या प्रेषित्वकाळात लोकांना इस्लाम धर्म सांगताना त्यांना ईश्‍वराकडे बोलविताना प्रेषितांना अमाप यातनांना सामोरे जावे लागले. ते कधी डगमगले नाहीत. कधी भयभीत झाले नाहीत. कुणाकडे दयेची विनंती केली नाही, मग तो मक्केत असतानाचा काळ असो की मक्का सोडून ताईफकडे इस्लाम प्रचारास जाण्याचा प्रसंग असो. ताईफच्या लोकांनी त्यांच्यावर दगडांचा वर्षाव केला. रक्ताने त्यांची वस्त्रं भिजून गेली. तरीदेखील त्यांनी त्यांच्यावर इतके अत्याचार करणार्‍यांना श्राप दिला नाही. त्यांनी आशेची कास सोडली नाही. ते म्हणत असत की यांना नाही तर यांच्या संततीला समज येईल. आपल्या ध्येयासाठी संकटांना सामोरे जावे लागते तेच प्रेषितांबाबतही घडले. समोर डोंगराएवढे संकट होते. बद्रच्या युद्धावेळी, विरोधकांचे 3000 सैनिक घोडे, शस्त्रे. प्रेषित ते पाहून चलविचल झाले नाहीत. घाबरून गेले नाहीत. त्यांच्याकडे 300 पेक्षा कमी लोक होते. गंजलेल्या दोन तीन तलवारी. त्यांना घेऊन ते शत्रूसैन्याशी भिडले आणि विजयी झाले. त्यांनी दाखवून दिले की अफाट संख्या आधुनिक शस्त्रास्त्रे, दारूगोळा आपल्या धैर्यासमोर कवडीमोल असतो.

काबादर्शनासाठी निघाले असता त्यांनी कोणतेही हत्यार बाळगले नव्हते. जिथे जायचे आहे तिथे सारेच शत्रू आहेत हे त्यांना माहीत होते. तरीदेखील ते निघाले. तेच मक्केतील विरोधक त्यांच्या आगमनाच्या नुसत्या बातमीने भयभीत झाले. रस्त्यात येऊन त्यांना अडवले. या वेळी त्यांना काबादर्शनासाठी येऊ नये म्हणून साकडे घातले. आपसात करार करण्याचा प्रस्ताव पुढे केला. प्रेषितांनी मान्य केले. त्या करारातील सगळ्या अटी प्रेषितांच्या विरोधात असल्या तरीदेखील त्या मान्य करून करारावर सही केली. पण त्याच कराराचा असा परिणाम झाला की गेली दहा वर्षे जितक्या लोकांनी इस्लाम स्वीकार केला नव्हता ते एकाच वर्षांत त्यांची संख्या 10,000 वर गेली. आपल्या निर्णयात सृजनशीलता कशी असावी हे प्रेषितांनी दाखवून दिले. अल्लाहने त्या करारास अधिक स्पष्ट विजय घोषित केले होते.

मनुष्य सामाजिक प्राणी असल्याचे म्हटले जाते. ते स्वतः निर्णय घेऊ शकत नाहीत की विकास करू शकत नाहीत. त्यांना एकमेकांची साथ हवी असते. अचानकपणे कोणत्याही जनसमूहाला जगातील कोणत्याही नेत्याने, विचारवंताने, बलाढ्य शक्ती असलेल्या सत्ताधार्‍याने रातोरात त्यांच्यात बदल घडवला नाही, हा आजवरचा इतिहास आहे. पण जगाला जे शक्य झाले नाही, ते प्रेषितांनी एका क्षणात करून दाखविले. मद्यपान आतापासून निषिद्ध असल्याची कुरआनने घोषणा करताच ज्यांच्या हातात मद्याचे प्याले होते ते त्यांनी भिरकावून दिले. ज्यांनी मद्याचा घोट घेतला होता त्यांनी थुंकून दिले. दारूने भरून ठेवलेली भांडी रस्त्यावर रिकामी करण्यात आली.

आपल्या ध्येयप्राप्तीसाठी ते नेहमी ठाम होते. मक्केच्या लोकांनी कंटाळून एकदा प्रेषितांसमोर प्रस्ताव मांडला की तुम्हाला जे काही करायचे तुम्ही करा, तुम्हाला संपत्ती हवी असेल तर आम्ही उदंड संपत्ती गोळा करून देतो. सत्ता हवी असेल तर तुम्हाला आम्ही आपला सत्ताधारी बनवतो. जर एखाद्या संपन्न आणि सुंदर स्त्रीशी लग्न करायचे असेल तर आम्ही तेही करू. पण आमच्या देवीदेवतांना तुम्ही वाईट म्हणू नका. प्रेषित म्हणाले की, मला यातलं काहीही नको. उलट मी तुम्हाला ज्या ईश्‍वरावर श्रद्धा ठेवायला सांगतो ते जर तुम्ही मान्य कराल तर सकल जगावर तुम्ही राज्य कराल.

हा होता प्रेषितांचा दृढसंकल्प. कोणत्याही लोभाला, मोहाला ते कधीच बळी पडले नाहीत. उलट अत्याचाराला, छळाला बळी जात असताना ते कधी घाबरले नाहीत. ही त्यांची सृजनशील शक्ती होती, ज्यामुळे 23 वर्षांच्या काळात सार्‍या अरबस्थानास इस्लामच्या प्रभावाखाली आणलं.

मानवी समूहामध्ये बहुसंख्य लोक साधे-सरळ असतात. अल्पसंख्यांक लोकांमध्ये क्षमता, सृजनशीलता, बौद्धिक शक्ती असते, साधनांनी संपन्न असतात, असे लोक बहुसंख्य लोकांवर राज्य करतात. प्रेषितांनी जो समाज निर्माण केला त्यात वरिष्ठ-कनिष्ठ, उच्च-नीच असे काहीच नव्हते. त्या सगळ्यांचे श्रद्धास्थान अल्लाह आणि त्याचे प्रेषित होते. समाजातील अभिजनवर्गाचे ते कधीच गुलाम बनले नाहीत. आजही नाही. विषमतेचा नाश करण्यासाठी तर इस्लाम आलेला आहे. मानवांच्या कल्याणासाठी अल्लाहने मुस्लिमांना या जगात उभं केलं आहे. हीच इस्लामची शिकवण अंधारातून प्रकाशाकडेचा मार्ग आहे. हा इस्लामच्या शिकवणींचा फक्त ओझरता परिचय.



- सय्यद इफ्तिखार अहमद

( लेखक : शोधनचे संपादक आहेत.  मो. 9820121207)


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget