राष्ट्रवादाच्या नावाखाली गोर्यांच्या मनातील सुप्त वंश श्रेष्ठत्वाच्या भावनेला गोंजारून काळ्यांसह इतर नागरिकांच्या राष्ट्रनिष्ठेवर प्रश्नचिन्ह उभा करून ट्रम्प यांनी देशामध्ये उभी फूट पाडून आपली दुसरी टर्म निश्चित करण्याचा प्रयत्न केला. मात्र अमेरिकेच्या सुजान जनतेने त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. त्यात त्यांना मोलाची साथ दिली ती मीडिया,पोलीस आणि कोर्टाने. हे सर्व सांगण्याचे कारण असे की, गेल्या चार वर्षे अमेरिकेमध्ये ज्या राष्ट्रवादाचे नाव घेऊन ट्रम्प यांनी देश चालविला त्याच राष्ट्रवादाचे तेवढ्याची ताकदीने नाव घेऊन आपल्या देशात केंद्र सरकार गेल्या सहा वर्षे सत्तेत आहे. ट्रम्पना दूसरी टर्म मिळाली नाही पण भाजपला ती मिळाली. अमेरिका आणि भारत यांच्यामधील राजकीय परिस्थिती जरी एकसारखी असली तरी लोकतांत्रिक मुल्यांच्याबाबतीत अमेरिकेच्या प्रशासकीय संस्थांनी ज्या जबाबदारीचा परिचय जगाला करून दिला, त्याबाबतीत आपल्या देशातील प्रशासकीय संस्था या तशीच कामगिरी करतील काय? आक्रमक राष्ट्रवादातून निर्माण झालेल्या उन्मादित ऊजेर्र्मुळे भारतात 2024 साली अशीच परिस्थिती निर्माण झाली तर आपल्या लोकतांत्रिक संस्था अमेरिकन लोकतांत्रिक संस्थेसारखेच धाडस दाखवून लोकशाही मुल्यांच्या रक्षणासाठी धर्मनिरपेक्षतेची बाजू घेतील काय? याबद्दल संशय समाजमाध्यमावर आतापासूनच व्यक्त केला जात आहे.
अमेरिकेमध्ये फॉक्स न्यूज वाहिनी वगळता बाकी सर्व वाहिन्यांनी राष्ट्रपती ट्रम्प हे पदावर असतांना त्यांचा जोरदार विरोध केला. अनेकवेळा पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांची आणि राष्ट्राध्यक्षांची शाब्दीक चकमक सुद्धा उडाली. एका वर्तमानपत्राने तर रोज राष्ट्रपती कितीवेळेस खोटं बोलतात याची गिनतीच सुरू केली. 3 नोव्हेंबरची राष्ट्रपतीपदाची निवडणूक प्रक्रिया पारदर्शी असतांनासुद्धा त्यावर अनाठायी प्रश्नचिन्ह उभे करण्याच्या सर्व प्रयत्नांना मीडिया आणि सर्व संस्थांनी दाद दिली नाही. फॉक्स न्यूजने सुद्धा शेवटी-शेवटी आपल्या ट्रम्प समर्थनाच्या धोरणामध्ये बदल केला. कोर्टानी ट्रम्प समर्थकांद्वारे दाखल केलेल्या सर्व याचिका कठोरपणे खारीज केल्या. सुरक्षा संस्थांनीही सत्याची साथ दिली. 6 जानेवारीच्या कॅपिटल हॉलवरील हल्ल्यानंतर देशाचे वातावरण एकदमच बदलले आणि 37 टक्के एवढ्या कमी लोकप्रियतेसह ट्रम्प यांना व्हाईट हाऊस सोडावे लागले.
याउलट आपल्या देशात गेल्या अनेक वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या सोयीने निर्णय देण्यास सुरूवात केली. एका राज्यसभेच्या जागेसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी आपल्या पदावर असतांना सरळ-सरळ सरकार धार्जीनी भूमिका घेतली. सीबीआयच्या पहिल्या दोन क्रमांकाच्या दोन अधिकार्यांनी एकमेकाविरूद्ध भ्रष्टाचाराचे आरोप लावून गदारोळ उडवून दिला. दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेल्या शेतकरी आंदोलनातील नेते बधत नाहीत हे पाहून एनआयएने त्यांना नोटिसा पाठविण्यास सुरूवात केली. सरकारने आंदोलकांशी एकीकडे वार्ता चालू ठेवत दुसरीकडे त्यांना आतंकवादाशी जोडणार्या वाहिन्यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले.
या सर्वावर कडीकेली ती अर्णब गोस्वामीच्या व्हॉटस्अॅप संदेशाच्या सार्वजनिक झाल्याच्या घटनेने. मुंबई पोलिसांनी अर्णब गोस्वामीविरूद्ध दाखल केलेल्या पुरवणी दोषारोपपत्रामध्ये 500 पानाची व्हॉटस्अॅप देवाण-घेेवाणीचा लेखाजोखा कोर्टात पुरावा म्हणून सादर केला. त्यात अर्णब गोस्वामी आणि बार्क (ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल)चे पूर्व कार्यकारी अधिकारी पार्थोदास गुप्ता यांच्यातील संवाद नमूद केलेला आहे. या संवादामध्ये अनेक गोष्टी आक्षेपार्ह आहेत. सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे अर्णब गोस्वामीला 26 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या बालाकोट सर्जिकल स्ट्राईकची पूर्व सूचना होती. हे त्या चॅटमधून स्पष्ट झालेले आहे. शिवाय, 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या 40 सैनिकांच्या घटनेचा उल्लेखही दोघांच्या व्हॉटस्अॅप संवादामध्ये अशा पद्धतीने आलेला आहे की, त्या घटनेमुळे दोघांनाही हर्षोल्हास झाल्याचे स्पष्ट होते. याशिवाय, अर्णब गोस्वामी प्रधानमंत्री कार्यालयसहीत सर्व मंत्री आपले आहेत, असा दावा करतांना त्यात दिसतो. बालाकोटच्या घटनेची माहिती फक्त 5 लोकांना होती. त्यात स्वतः पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षणमंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे सामिल होते. यांच्यापैकीच कोणीतरी ही माहिती अर्णबला पुरविली असावी. त्यासाठी अर्णब आणि माहिती पुरविणारी व्यक्ती दोघांनाही राष्ट्रदोहाच्या खटल्याखाली अटक करून तुरूंगात टाकणे आवश्यक आहे. परंतु सरकार असे करणार नाही, असा घणाघाती आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी केलेला आहे.
या सर्व घडामोडींवरून आपल्या देशातील मीडिया सहीत इतर सर्व प्रशासकीय संस्था ह्या कशा सरकारधार्जिन्या आहेत हे स्पष्ट होते. एकतर्फी राष्ट्रवादाने त्यांना आंधळे करून टाकले असून, कोणत्याही परिस्थितीत ते भाजपची साथ सोडणार नाहीत. मग त्यासाठी राष्ट्रीय सुरक्षेशीही तडजोड करावी लागली तरी हरकत नाही, हे स्पष्ट होते. लोकशाहीच्या दृष्टीने ही फार चिंताजनक बाब आहे.
भौतिकता आणि नैतिकता
अमेरिका असो का आपला देश, दोघांनीही नेत्रदिपक अशी भौतिक प्रगती केलेली आहे. परंतु नैतिक प्रगतीच्या बाबतीत दोन्ही देशातील नागरिक हे मागे पडलेले आहेत. भारतीय नागरिकांना तर महान प्राचीन भारतीय संस्कृतीचा समृद्ध वारसा असतांनासुद्धा त्यांच्यामध्ये नैतिक व अध्यात्मिक शक्ती आश्चर्यकारकरित्या लयाला जात असल्याचे चित्र एव्हाना स्पष्ट झालेले आहे. प्रगतीच्या नावाखाली सर्वच क्षेत्रामध्ये अधोगती होत आहे. चित्रपट, मालिका, संगीत, इंटरनेटवरील अश्लिल सामुग्रीसह ओटीटी प्लेटफॉर्मवर दाखविल्या जाणार्या कार्यक्रमांनी लोकांच्या लैंगिक भावनांना गैर मार्गाने प्रोत्साहन देण्याचे काम सुरू केलेले आहे. लॉकडाऊनमुळे रिकाम्या बसलेल्या लोकांना या कार्यक्रमांनी इतके उत्तेजित केले की त्यातील काही लोक लैंगिकदृष्ट्या विकृत झाले आणि महिलांवर सामुहिक बलात्कार करून त्यांच्या गुप्तांगामध्ये रॉड घालून आतडे बाहेर काढण्यापर्यंत काहींची मजल गेली. केरळमध्ये तर एका 17 वर्षीय मुलीवर तब्बल 44 लोकांनी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली.
एकंदरित ही सर्व परिस्थिती, लोकांची नैतिकता रसातळाला गेल्यामुळे निर्माण झालेली आहे यात वाद नाही. या उद्भवलेल्या मानवनिर्मित आपत्तीला पोलीस, वकील, कोर्ट, दोषारोप पत्राने नियंत्रित करता येत नाही, हे सुद्धा सिद्ध झालेले आहे. या सर्व परिस्थितीला आटोक्यात आणण्यासाठी जनतेमध्ये नैतिक मुल्य रूजविण्याची गरज आहे. हे सत्य लक्षात आल्याने जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रने 22 जानेवारीपासून ’अंधारातून प्रकाशाकडे’ या शिर्षकाखाली एक मोहिम सुरू केलेली आहे जिच्याद्वारे 6 कोटी लोकांपर्यंत नैतिकतेचा संदेश देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
कुरआनमध्ये ईश्वराने म्हटलेले आहे की, ‘’तुमच्यात एक गट असा असणे आवश्यक आहे जो लोकांना सद्वर्तनाचे आवाहन करून चांगुलपणाचा आदेश देईल. तसेच दुराचाराला प्रतिबंध करेल, असेच लोक यशस्वी होतील” (सुरे आले इम्रान आयत नं. 104).
या आयातीमध्ये दिलेल्या आदेशाचे पालन करत जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्राने आपल्या राज्यातील लोकांना सद्वर्तनाचे आवाहन करत दुराचारापासून लांब राहण्याचा सल्ला देण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या स्थापनेपासूनच म्हणजे 1948 पासून जमाअते इस्लामी हिंद ने देशहितामध्ये जनकल्याणाची अनेक कामे केेलेली आहेत. मग ते नैसर्गिक आपत्तीमध्ये लोकांची मदत करणे असो की जातीय दंगलीमध्ये होरपळलेल्या सर्वधर्मियांची मदत करणे असो. याशिवाय जमाअते इस्लामीने वेळोवेळी अनेक मोहिमा राबवून लोकांना शांती आणि सद्भावनेने राहून देशाची प्रगती करण्याचे आवाहन केलेले आहे. नुकतेच ऑस्ट्रेलियाच्या गाबा स्टेडियमवर झालेल्या भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी क्रिकेट सामन्यामध्ये ऋषभ पंत (हिंदू) याने 89 तर शुभमन गिल (शिख) याने 91 धावा काढल्या व त्यांना मुहम्मद सिराज (मुस्लिम) याने ऑस्ट्रेलियाचे पाच विकेट काढून मोलाची साथ दिली. आणि हिंदू, मुस्लिम व शिख खेळाडूंच्या या युतीने भारताला या सामन्यामध्ये विजय प्राप्त करून दिला. एकतेचे हे सुत्र फक्त खेळापुरतेच मर्यादित नसून, हे सुत्र सर्वच क्षेत्रात भारताला महासत्ता बनविण्यासाठी आवश्यक आहे, हे जरी आपल्या देशाच्या नीतिनिर्मात्यांच्या लक्षात आले तरी पुरेसे आहे.
सध्याची परिस्थिती आणि मुसलमान
समुद्रामध्ये जहाजाची जी स्थिती असते तीच समाजामध्ये मुस्लिमांची असते. ज्याप्रमाणे जहाज शेकडो टन सामानाचे ओझे घेऊन आरामशीर तरंगत हजारो किलोमीटर चालतो, त्याचप्रमाणे जगात मुस्लिम सुद्धा आपल्या नैतिक शक्तीरूपी जहाजाचा वापर करून जगातील इतर समुदायांचे शेकडो टन ओझे घेउन सुखरूप मार्गक्रमण करू शकतात. मात्र जहाज आणि मुसलमान यांच्यामध्ये दूसरे साम्य असे आहे की, जहाज तोपर्यंत यशस्वी प्रवास करू शकतो जोपर्यंत त्याच्या आत समुद्राचे पाणी येत नाही. जर का ते पाणी आत आले तर जहाजही बुडते आणि मालही बुडतो. ठीक याच पद्धतीने जमीनीवर पसरलेल्या अनैतिक कृत्यरूपी पाणी मुसलमान जोपर्यंत आपल्या चारित्र्यामध्ये येऊ देत नाही, तोपर्यंत तो यशस्वीपणे नैतिकमुल्यांची जपणूक करत जीवन जगू शकतो व इतरांना नीतिमान जीवन जगण्यासाठी प्रेरित करू शकतो. मात्र जमिनीवर पसरलेल्या अनैतिक कृत्याचे पाणी त्याच्या जीवनामध्ये आले तर तोही बुडतो आणि सोबत इतर समाजांनाही घेऊन बुडतो. मुस्लिम समाजामध्ये जशी-जशी वाईट प्रवृत्ती शिरकाव करत जाईल तशी-तशी त्याची नेतृत्व क्षमता कमी होत जाते. म्हणून इतर समाजांच्या नैतिक प्रशिक्षणाची जबाबदारी आपली आहे हे ओळखून जमाअते इस्लामी हिंदने अनेक वेळेस अनेक सकारात्मक पावले उचललेली आहेत, असे करण्याची क्षमता मुस्लिम समाजामध्ये कुरआन आणि हदीसमुळे निर्माण झालेली आहे, एवढे निश्चित.
- एम.आय. शेख
Post a Comment