जे लोक तिमिराकडून तेजाकडे येण्यास इन्कार करतात त्यांचा समर्थक व साहाय्यक सैतान आहे जो नेहमी मनुष्यापुढे नवनवीन मनोहारी गोष्टींना प्रस्तुत करतो. मनुष्याचे मनदेखील त्याला मनोकामनांचा दास बनवून जीवनाच्या वाममार्गांवर भरकटत नेते. तसेच असंख्य लोक मुलं-बाळं, पत्नी, नातेवाईक, खानदान, ओळखीचे लोक, समाज, राष्ट्र, नेता, मार्गदर्शक, शासन व शासक इ. सर्व मनुष्यासाठी तागूत बनतात. कारण आहे तिमिराकडून तेजाकडे येण्यास इन्कार! ज्यांचे समर्थक व मदतगार तागूत असतात जे त्यांना ज्ञान-प्रकाशातून अज्ञानाकडे म्हणजेच प्रकाशाकडून अंधाराकडे ओढत नेतात आणि हेच लोक नरकाग्नीमध्ये जाणारे आहेत, जेथे हे सदैव राहातील.
जगभर जे सर्व दुष्टव्य पसरलेले आहेत आणि क्षुब्धतेच्या सावल्या दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. गुन्हेगारीला प्रतिष्ठा मिळू लागली आहे. पर्यावरणाचा नाश, कष्टकर्यांचे विस्थापन आणि सामान्यांचे आक्रंदन वाढतच आहे. चहुबाजूच्या अहर्निश तिमिर वर्षावात अख्खे विश्व होरपळतेय. काळोखाने घेरलेल्या लोकांनो! अशा कठीण समयी तरी तुम्ही प्रकाश का शोधत नाहीत? अखिल मानवजातीला ही विचारणा केली जात आहे, कारण दुराचार, अत्याचार, अन्याय व हिंसाचारामुळे जगभरात अंधकाराच्या कक्षा व्यापक होत आहेत आणि मानवी जीव गुदमरतोय! अशा वेळी लोक परलोक कल्याणावर श्रद्धा असलेल्या प्रकाशपथिकांनी विवेकरुपी तेजाचे पलिते हाती घ्यावेत आणि सामूहिक सामर्थ्याला तेजोमय करावे. महाविक्राळ तिमिराकडे वास्तवाचा स्वीकार भावना दूर सारण्याखेरीज शक्य नसतो.
विखारी वाटेवर चालणाळया, धर्म, पंथ, वर्ण, लिंग, वंश, जात, प्रदेशाच्या नावावर कळपनिर्मितीच्या मागे लागलेला समाज आज जिथे तिथे दिसतो. अशा वेळी समाजाला ताळ्यावर आणण्यासाठी काही लोक झटत आहेत. ही त्यातल्या त्यात सुखावह बाब आहे. अर्थपूर्ण जगणारा समूह म्हणजे ताळ्यावर असलेला समाज. भौतिक भरभराटीच्या मृगजळामागे धावत त्यातच रुतून बसलेला दुसळया प्रकाशाचा समाज ताळ्यावर नसलेल्यांचा असतो. अन्य समाजाशी भेदाभेदांची दरी निर्माण करणारे लोक सर्वत्र आहेत. समाजातील सहअस्तित्वासाठी आत्मदुःखाचा मार्ग निवडणारे तुलनेने कमी आहेत. भिनलेल्या परंपरांना छेद देण्याचा प्रयत्न झाला, की भावना भडकतात. राज्यसत्ता आणि धर्मसत्ता सुधारकांच्या विरोधात जातात. जगाच्या प्रत्येक काळात हेच होत आले आहे. सुधारकांना ‘प्राणवायू’ मिळू नये म्हणून याची तजवीज प्रत्येक समाजव्यवस्था करत असते. आजही ती सुरू आहे. घुसमटीचे ढग हाकणार्या हातांना आत्मबोध होईस्तोवर उशीर झालेला असतो.
आज जगात मानवाचे जीवनमान आणि समस्या वेगाने वाढतच चाललेल्या आहेत. त्याचे हे जगणे समृद्ध आहे का? याचे उत्तर मात्र नकारार्थी आहे. विश्वातील सर्वांत मोठा धोका विषाणूंचा नाही. आपण विषाणूंचा निःपात करू शकतो. माणसाच्या आत दडलेल्या द्वेष, लालसा व अज्ञान या राक्षसांचा नायनाट करणे, हे आपल्या पुढील मोठे आव्हान आहे. गुलामगिरीला, स्त्रीभ्रूणहत्येला विरोध हा रिवाज पैगंबर मुहम्मद (स.) यांनी प्रस्थापित केला होता. लोकशाहीची स्थापना ही त्यांचीच एक महत्त्वाची शिकवण. धर्मप्रसार करताना सलग तेरा वर्षे अत्यंतिक विरोध झाल्याने पैगंबर (स.) यांना मक्का सोडून मदीनेत आश्रय घ्यावा लागला होता. कुरैशचे कुटुंबिय त्यांचे कडवे विरोधक होते. त्यांनी मदीनेवरही हल्ले केले. एका संघर्षात पैगंबरांचे चुलते मारले गेल्यावर कुरैश कुटुंबाने मृतदेहाचे अक्षरशः धिंडवडे काढले. पुढे मक्केवर विजय मिळविल्यानंतर पैगंबर (स.) यांनी शत्रुत्वाचे पीळ लगेच पुसले. आत्यंतिक वैरत्व बाळगलेल्या कुरैश लोकांना त्यांनी उदार अंतःकरणाने क्षमा केली आणि माणुसकीचा पंथ प्रशस्त केला. पैगंबर (स.) आणि इस्लामला समजून घेण्यासाठी कोंडीचे नव्हे तर संवादाचे दालन खुले झाले, तर कोलाहल कमी होईल आणि विश्वगुरुला समजणे सोपे जाईल.
मानवी समस्यांचा, दुराचारांचा व अत्याचारांचा जो अंधार जगात पसरलेला आहे तो सदाचाराच्या प्रकाशानेच दूर होऊ शकतो. यासाठी सदाचारामागे मनुष्याचा कोणता भाव कार्यरत आहे, हे देखील महत्त्वाचं आहे. उदात्त भावनेने केलेल्या सदाचाराच्या प्रकाशानेच मानवी समस्यांचा अंधकार कायमचा दूर होऊ शकतो.
आजपासून चौदाशे वर्षांपूर्वी पैगंबर (स.) यांनी समाज प्रबोधनाचा प्रकाश पसरवून जगाचा अंधकार दूर केला होता. एकेश्वरत्व, पैगंबरत्व व परलोकत्व या तत्त्वांची शिकवण देणारा अंतिम ईशग्रंथ कुरआनचं दिव्य अवतरण पैगंबर (स.) यांच्यावर सृष्टीनिर्मात्याकडून झाले. याच ग्रंथाचा प्रकाश पैगंबर (स.) व त्यांच्या अनुयायींनी घराघरांत देऊन एका आदर्श समाजाची निर्मिती केली होती. तीच क्रांती आजही जगात होणे शक्य आहे. आजही तीच शिकवण प्रत्येकाच्या अंधारलेल्या जीवनात पुन्हा प्रकाश आणू शकते. प्रेम, दया, करुणासागर पैगंबर (स.) यांच्या पवित्र जीवनाचे अध्ययन करून त्यांच्या शिकवणीनुसार जीवन साकारणे हाच एकमेव मार्ग त्यासाठी आहे.
समस्त मानवजातीला तेजाकडे आणणे म्हणजे निर्मिकाच्या निर्देशाकडे, जगात मनुष्याच्या वैयक्तिक व सामाजिक भल्यासाठी व परलोकात मुक्तीसाठी आवाहन करणे आहे. ही जीवनव्यवस्था आहे जिचे नाव कुरआनमध्ये इस्लाम ठेवण्यात आले आहे. जगात इस्लामच ती एकमेव जीवनव्यवस्था आहे जी मानवतेच्या अंतापर्यंत मानवतेला निर्देशित व मार्गदर्शन करणारी व जीवन सफलतेसाठी प्रकाश आहे. समस्त मानवतेला अज्ञानाच्या तिमिराकडून इस्लामच्या तेजाकडे येण्याचे आवाहन करणे आहे. तिमिराकडून तेजाकडे प्रवास करण्यासाठी मार्गस्थ होण्यासाठी आपल्याला अधिक माणूस व्हावे लागेल. खरोखरच आपण दिवसेंदिवस सुसंस्कृत होत चाललो आहोत का? अमानुष हिंसाचाराने सुबुद्ध, सचेत विश्वाला आतून छळण्याचे काम सुरू असताना सुसंस्काराचा दावा फोल तर ठरत नाही ना, ही शंका यायला लागली आहे, कारण वर्तमान तसे आहे. तिमिराकडून तेजाकडे प्रवास करण्यासाठी माणसांना माणसाने माणसासारखेच वागवावे लागेल. तिमिरातून तेजाकडेच्या प्रवासाला कोविड-19 मुळे एका अर्थाने आपण सर्वांनीच सुरूवात केली आहे.
तुमच्यापाशी अल्लाहकडून प्रकाश आणि एक असा सत्यदर्शी ग्रंथ आला आहे, ज्याच्याद्वारे सर्वश्रेष्ठ अल्लाह त्या लोकांना जे त्याच्या प्रसन्नतेचे इच्छुक आहेत, शांती व सुरक्षिततेच्या पद्धती दाखवितो आणि आपल्या आदेशाने त्यांना अंधारातून बाहेर काढून प्रकाशाकडे आणतो आणि सरळमार्गाकडे त्यांचे मार्गदर्शन करतो. (कुरआन, 5:16)
अल्लाह पृथ्वीचा व आकाशांचा प्रकाश आहे. काळोखाने घेरलेल्या लोकांनो! धाव घ्या त्या अल्लाहकडे जो सर्व विश्वांचा निर्मिक, मालक, पालक व शासक आहे.
-
प्रा. अब्दुर रहेमान शेख
मो. 8888834519
लेखक कुरआनचे अभ्यासक व अनुवादक आहेत.
Post a Comment