समाज व्यवस्थेत राजकीय पक्षात लोकशाही मतभेद आणि आदर्शवाद गृहीत धरण्यात आलेले असले, तरी या लोकशाहीच्या राजकारणाला जेव्हा कुरघोड्यांच्या राजकारणाचा वास येऊ लागतो तेव्हा मात्र ज्या सर्वसामान्य नागरिकांसाठी राजकारण करायचे त्या नागरिकांचे हित बाजूला पडते की काय, अशी शंका आल्याशिवाय राहत नाही. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात घडणार्या राजकीय विविध घटनांवर नजर टाकली तर अशा प्रकारच्या राजकारणाची अनेक उदाहरणे देता येऊ शकतील.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौर्याच्या निमित्ताने या अहितकारी राजकारणाला अधिकच वेग आल्याचे दिसते. केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपाला महाराष्ट्रात मात्र आपली सत्ता टिकवता आली नसल्याने गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये महाविकास आघाडी सरकारला काम करता येऊ नये, यासाठी भाजपच्या पातळीवर सतत प्रयत्न करण्यात येत होते. महाविकास आघाडी सरकारच्या प्रत्येक निर्णयाची तुलना भाजप सरकारच्या निर्णयांशी केली जात होती. या सर्व कालावधीमध्ये एखादा मुद्दा जरी बरोबर असला तरी तो मुद्दा कोणी मांडला आहे, या विषयाला प्राधान्य देऊन त्या बरोबर आणि योग्य मुद्याला बगल देण्याचे काम सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष या दोघांनीही केले. या कालावधीमध्ये महाराष्ट्रात ईडी आणि एनसीबी या दोन संस्थांनी सक्रिय होऊन मोठ्या प्रमाणावर कारवाई केल्याने या कारवाईमागे केंद्रातील भाजप सरकार असल्याची टीका महाराष्ट्रातील सत्ताधार्यांनी केली. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रताप सरनाईक यांच्या मालमत्तांची ईडीने केलेली चौकशी आणि सरनाईक यांच्या पुत्रांना चौकशीसाठी पाठवण्यात आलेले समन्स हे या कुरघोडीच्या राजकारणातील ताजे उदाहरण मानावे लागेल. प्रताप सरनाईक यांच्या विषयावरील हा धुरळा खाली बसतो न बसतो तोच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील जलयुक्त शिवार योजनेची चौकशी करण्यासाठी एका समितीची नियुक्ती केली आहे. ही समिती सहा महिन्यांमध्ये आपले अहवाल सादर करणार आहे. सरकारवर सतत टीका करणारे देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी यांना शांत करण्यासाठी ठाकरे सरकारने टाकलेले हे पाऊल आहे, असेच मानावे लागेल. दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारवर विशेषत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत बोचरी आणि वैयक्तिक टीका करणारे भाजपचे नेते नारायण राणे यांचीही काही जुनी प्रकरणे उकरून काढण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील असल्याच्या बातम्या माध्यमात प्रसिद्ध होत आहेत. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा संबंध असलेल्या एका बँकेच्या चौकशीचाही विषय मध्यंतरी समोर आला होता. म्हणजेच एखाद्या पक्षाने केलेल्या क्रियेला दुस्या पक्षाने दिलेली प्रतिक्रिया अशा प्रकारचे हे कुरघोडीचे राजकारण आता जास्तच वेगाने पुढे चालले आहे. याच कुरघोडीच्या राजकारणाचा एक भाग म्हणून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौराकडे पाहावे लागेल. मुंबईतील चित्रनगरीच्या धर्तीवर उत्तर प्रदेशात चित्रनगरी निर्माण करण्यासाठी आदित्यनाथ यांनी हा दौरा केला आणि त्यासाठी बॉलीवूडमधील लोकांशी चर्चा केली. गेली शंभर वर्षे हिंदी चित्रपटसृष्टीचे केंद्रस्थान असलेले मुंबईचे महत्त्व कमी करण्यासाठी भाजपने योगी आदित्यनाथ यांच्या माध्यमातून हे पाऊल टाकले आहे, अशी ही कुजबुज आता सुरू झाली आहे. अर्थात, उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यांमध्ये योगी आदित्यनाथ यांनी चित्रनगरीची उभारणी केली तरी त्याचा परिणाम मुंबईसारख्या जगातील एक नंबरच्या चित्रपटसृष्टीवर होईल, असे मानणे बालिशपणाचे ठरेल. जर बिहारमध्ये भोजपुरी चित्रपटसृष्टी हिंदी चित्रपटसृष्टी पेक्षाही लोकप्रिय आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली असेल तर उत्तर प्रदेशासारख्या मोठ्या राज्यांमध्ये अशाप्रकारे चित्रीकरणाची सोय करणारी चित्रनगरीची उभारणी म्हणजे मुंबईला स्पर्धा आहे, असे मानता येणार नाही. जर चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू आणि बिहारमधील भोजपुरी प्रदेश आपल्या भाषेतील चित्रपटसृष्टी विकसित करण्यासाठी प्रयत्नशील असतील, तर महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईने मराठी चित्रपटसृष्टी विकसित करण्यासाठी जास्त लक्ष केंद्रित केले तर ते जास्त योग्य ठरेल, असे वाटते.साहजिकच केवळ कुरघोडीच्या राजकारणाचा एक भाग म्हणूनच योगी आदित्यनाथ यांच्या दौ्याकडे पाहून काहीही साध्य होणार नाही. या कुरघोडीच्या राजकारणात सत्ताधारी पक्ष किंवा विरोधी पक्ष यांच्यानिमित्ताने जे विषय समोर येत आहेत त्यापैकी कोणताही विषय सामान्य नागरिकांच्या हिताचा नाही याची जाणीव या राजकीय पक्षांनी करून घेण्याची गरज आहे
- सुनीलकुमार सरनाईक
(भ्रमणध्वनी - 7028151352)
(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय युवा पुरस्काराने व आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार साहित्यिक पुरस्काराने सन्मानित असून पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते आहेत.)
Post a Comment