एखाद्या खोल समुद्रातील काळ्याकुट्ट अंधारावर एक लाट आच्छादली आहे. त्या वर आणखी एक लाट, आणि तिच्या वर ढग, अंधारावर अंधकार आच्छादित आहे. माणसाने हात काढले तर ते ही त्याला पाहता येऊ नये. ज्याला अल्लाहनेच प्रकाश प्रदान केला नाही त्याच्या साठी मग कोणताही प्रकाश नाही.” (सुरे नूर आयत नं. 40)
दैनंदिन जीवनात कित्येकदा अशी परिस्थिती निर्माण होते की निर्णय घेणे फार अवघड जाते. दोन पर्याय समोर असतात आणि त्यांचे परिणाम हि आपल्या नजरे समोर दिसू लागतात. तरी सुद्धा आपल्या मनात प्रश्न पडतो की हे करावे की ते करावे. माणसाच्या निर्माणकर्त्याने बरे वाईट ओळखण्यासाठी बुद्धि दिली. ज्याच्या जोरावर आज भौतिक प्रगती जास्त प्रमाणात दिसून येते ती आश्चर्यकारक आणि कौतुकास्पद पण आहे. तरी सुद्धा आपण अपयशी ठरले आहोत? अशी अडचणीची वेळ फक्त व्यक्ती पुरती मर्यादित नसून सामाजिक स्तरावर ही सर्वत्र दिसून येते. सामाजिक जीवनातील प्रश्नांवर, समस्यांवर असंतोषाचा भडका उडताना जगभर दिसून येतो. व्यक्ती स्वातंत्र्य आणि समाजहित यातून निर्माण होणारे वाद ! नवरा बायकोचे अधिकार व कर्तव्ये या मध्ये समतोल साधता न आल्यामुळे होणारे भांडणे तंटे, मालकवर्ग आणि कामगार यांच्यामध्ये होणारे संघर्ष ईत्यादी बोलकी उदाहरणे आहेत.
या जगामध्ये आजपर्यंत जितके वाद,तंटे उद्भवले आणि आजही जे बघायला मिळतात त्याचे कारण हेच आहे की तथाकथित बुद्धी जिवींनी समस्यांकडे एकतर्फी नजरेने बघीतले तोडगा म्हणून असमतोल उपाय राबविण्याचा प्रयत्न केला. व्यक्तीगत असो की सामाजिक प्रत्येक स्तरावर शांतता भंग होण्याचे मुळ कारण हेच आहे की माणूस हा स्वतःला खूप ताकदवान समजून राहीला आणि तो नेमका अंधाराकडे चालला आहे. अहंकार, गर्विष्ठपणा, स्वार्थीपणा, विषमता, उच-नीच, अश्लीलता, अंधश्रध्दा, भ्रष्टाचार, नग्नता, फॅशन, जुन्या रूढी परंपरा, निरक्षरता, याकडे जर आपण लक्ष केंद्रित केले तर आपल्याला क्षणभर आनंद होतो. परंतु या सर्व प्रकारच्या गोष्टींकडे विचारविनिमय केले तर आपल्या लक्षात येईल की ह्या सर्व गोष्टी आपल्याला अंधाराकडे नेत आहे. मागील 10 महिन्याच्या कालावधीत जर आपण आपले मन वळविले तर आपल्या मनात काय विचार येईल? कोवीड19 चा कार्यकाळ काय होता, या 10 महीन्यात किती कंपन्या बंद पडल्या, किती माणसे बेरोजगार झाली, हातावरचे काम करणार्या लोकांचे किती हाल झाले. छोट्या मोठ्या उद्योगधंदे संपूर्ण क्षेत्रात अंधार पसरलेला पाहीला. या अपार अंधारात कोणीच कोणाला पाहात नव्हते. कोणाला ही येऊ देत नव्हते. परंतु या अंधाराच्या काळात फक्त तेच लोकं मदतीला धावून आले ज्याच्या मनात ईशभय होते.
अशा वेळी बहुतेक पुरूष व स्त्रिया ज्यानां कुठल्याही प्रकारची माहिती, ज्ञान नाही ते लोक फक्त चंगळवादी होते त्या लोकांनी वाईट सवयी, मार्गभ्रमता, मार्गभ्रष्टता यांच्या वाममार्गी लागून भिती, निराशेच्या काळोखात आपली जागा निवडली आणि ते अंधाराकडे निघून गेले.
त्यामुळे ते काम, क्रोध, लोभ, मद, मोह,मत्सर यासारख्या अनेक विकारांना बळकट करून समाजात त्यांनी अत्याचार, बेईमानी, भ्रष्टाचार, व्याजखोरी, विषमता, असहिष्णुता, आत्महत्या, अस्पृश्यता, दारू, अश्लीलता, नग्नता, बलात्कार, स्त्रीभ्रूणहत्या या सारखे महापाप आणि गुन्हे यांना बळकट बनविले. यामुळेच समाजात वाईट नितीमत्तेचे लोकं वाढतात. त्याच्या मते हेच कार्य सर्व काही आहे. या जगात जीवन जगायचं असेल तर त्यांच्या मते या सर्व गोष्टी कराव्याच लागतात. कारण त्याच्या मते मृत्यूनंतर काहीच नाही मृत्यू झाला तर जाळून टाकले मातीत पुरून दिले तर नंतर काही नाही. सर्व समाप्त झाले. कोण विचारणारे नाही. परंतु प्रकाश या शब्दामध्ये किती यशस्वी पणा आहे उज्ज्वलता आहे, पवित्रता आहे, प्रगती आहे. ज्ञान, ऊमेद ,मार्गदर्शन व यशाचा स्तोत्र आहे
मानवी जीवनाचा उद्देश काय आहे फक्त रोटी कपडा और मकान. या गोष्टी तर मानवाच्या जीवनातील अत्यावश्यक वस्तू आहे परंतु या तीन वस्तूसाठी माणसाला किती कष्ट करावे लागतात.
वाममार्गी लागून या वस्तू हस्तगत केल्या तर अंधारावर अंधकार निर्माण होईल. जर वैधरितीने याच गोष्टी हस्तगत केल्या तर आपण प्रकाशाकडे जाऊ प्रकाश सर्व प्रथम आपल्या मनात निर्माण करावा लागतो मनात स्वच्छता असेल तर प्रकाश आपोआप आपल्या मनात, घरात, येईल महात्मा गांधी यांनी सुद्धा सांगितले की त्या काळी जेव्हा पाश्चिमात्य विश्व अंधारात बुडालेले होते. पुर्व क्षितिजावर एक तेजस्वी तारा चमकला, ज्या द्वारे सकल विश्वाला प्रकाश आणि शांती लाभली . हीच वास्तविकता आहे. आपण जेंव्हा अल्लाह च्या आदेशानुसार आपले जीवन व्यतीत करतो, तेंव्हा जीवनात तणाव, संघर्ष निर्माणच होत नाही आणि आपल्या जीवनात यशाचा प्रकाश येतो.
अल्लाह ने जे नियम ठरवून दिले आहेत त्या नियमांचे काटेकोर पणे पालन केले तर आपल्या घरात, कुटुंबात, कॉलनीत, शहरात, राज्यात, देशात प्रकाश पसरेल. संपूर्ण विश्वामध्ये सुव्यवस्था, शिस्तबद्धता स्थापन येईल.
या जगातील सर्व सजीव-निर्जीव, लहान- मोठ्या, वस्तू आणि प्राणी तोपर्यंतच शांततामय आणि सुव्यवस्थित राहु शकतो जोपर्यंत तो ईशनियमांचे पालन करीत असतो.
प्रेषित मुहम्मद (सल्ल.) शिकवणी नुसार जीवन जगले तरच आपण अंधारातून प्रकाशाकडे जाऊ शकतो. पवित्र कुराण आणि प्रेषितांच्या नियमांनुसार वागणे आवश्यक आहे. कारण त्यांच्याच शिकवणीत प्रकाश, शांती, सुरक्षा निहित आहे.
- शाईस्ता कादरी
औरंगाबाद
Post a Comment