निश्चितच 21 व्या शतकात मानवाने अभूतपूर्व प्रगती केली. मानव पृथ्वीच्या कक्षा ओलांडून अगदी मंगळ गृहापर्यंत पोहचला आहे. माहीती आणि तंत्रज्ञानाचे युगात संपुर्ण जग जणू एक छोटेसे खेडेच झाले आहे. या क्रांतीमुळे जीवन अत्यंत गतीमान झाले. भौतिक स्तरावर एकीकडे जगाने दैदिप्यमान आर्थिक प्रगती केली परंतु नैतिक पातळीवर माणूस सर्रास अपयशी ठरल्याचे प्रत्यय येतो. संपूर्ण जगात गुन्हेगारीचे वाढलेले प्रमाण हे मानवाच्या नैतीक आणि वैचारीक दिवाळखोरीचा पुरावा आहे. किंबहुना जो देश जितका प्रगतीशील गुन्हेगारीचे प्रमाण तेवढेच जास्त असल्याचे दिसून येते. मानवाचे सर्वात मोठे वैशिष्ट्ये त्याची माणुसकी आहे. तसे पाहता आधुनिक जगात माणसाच्या या वैशिष्ट्याची देखील प्रगती अपेक्षित होती. परंतु दुर्दैवाने असे झाले नाही. आर्थिक प्रगतीच्या प्रचंड झगमगीत माणुसकी दुर्मीळ झाली. वाढलेल्या प्रचंड जनसागारात माणूस शोधायला मिळेनासा झाला.
माहिती आणि तंत्रज्ञाने या जगाला एक छोट्याशा खेड्यात परीवर्तीत केले खरे पण माणूस स्वत:पासूनच दूर गेला यामुळे या वर्दळीत एकटा पडत चालला. या एकट्यापणामुळे तो नैराश्याच्या गर्तेत जाऊ लागला. यामुळे मानवी समाजाला व्यसनाने घेरले. तो स्वत:पासून दूर पळू लागला. मनःशांतीसाठी वेगवेगळ्या अनैतिक कृत्यांच्या आहारी जाऊ लागला. इतकेच काय या सर्व उपायाने देखील शांती मिळत नाही म्हणून तो आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलण्यास बाध्य झाला. आज आपला देश आत्महत्यांच्या बाबतीत जगात प्रथम क्रमांकावर पोहचला आहे. याचा स्पष्ट अर्थ असा होतो की, आपण मानसिक स्तरावर अपयशी ठरत आहोत.
यंत्रयुगाने निश्चितच उत्पादन भरघोस वाढविले. परंतु यंत्रासोबत राहत असताना माणूस सुध्दा मशीन झाला की काय अशी शंका निर्माण होते. कारण जशी-जशी या जगाची प्रगती झाली तसा तसा माणूस संवेदनाहीन होत आहे. कधी नव्हे एवढ्या नीच थराला माणूस पोहोचला. पूर्वी देखील बलात्कार व्हायचे परंतु आज ज्या अमानुष पद्धतीने बलात्कार होत आहेत; इतिहासात त्याचे दुसरे उदाहरण नाही. लोक एवढे पिसाळले की चार-चार वर्षाच्या चिमुकली सोबत देखील तोंड काळे करण्यास त्यांना लाज वाटत नाही. एवढ्यावरही न थांबता त्या पीडितेचे तुकडे-तुकडे केले जातात किंवा जाळून खाक केले जाते. हाच का माणूस? आणि हिच माणूसकी? आणि हिच का त्याची प्रगती? जर ही प्रगती असेल तर आम्हाला यापेक्षा पूर्वीचेच मागासलेपण हवंय, कारण त्याकाळी एवढी अमानवीयता तरी नव्हती?
या प्रगतीचे आणखी एक विदारक सत्य म्हणजे मानव कधी नव्हे एवढा स्वार्थी झाला. प्रत्येक गोष्टीत तो फक्त स्वार्थ शोधू लागला. त्याच्या या अप्पलपोटीपणामुळे हळूहळू त्याने आपल्या सामाजिक दायित्वाला तिलांजली दिली. मानसिक संकुचनाची सीमा म्हणजे तो आपल्या जन्मदात्यांना देखील विसरला. तो वस्तुप्रमाणे आपल्या वृद्ध आई-वडिलांना देखील अनुपयोगी समजून वृद्धाश्रमाची वाट दाखवू लागला. त्याच्यापायी प्रत्येक निरोपयोगी गोष्ट ही टाकावू झाली. नाते प्रासंगिक झाले. संवदेनांची जागा व्यवहाराने घेतली आणि माणूस संवेदनहीन झाला. रस्त्यावर अपघातात जबर जखमी झालेल्या माणसाच्या मदतीसाठी किंकाळ्याकडे लक्ष न देता व्हिडीओ करुन व्हायरल करण्यात तो स्वत:ला धन्य समजू लागला. एवढी अमानुषता बाळगणार्या या जगाने खरंच प्रगती केली का असा यक्ष प्रश्न आपल्या समोर उभा राहतो.
आपल्याला या अंधारात माणसाचा शोध घ्यायचा आहे. त्याला प्रकाशाकडे न्यायचे आहे. यासाठी सर्वात प्रथम मानवाने स्वत:ला ओळखण्याची आवश्यकता आहे. भूतलावरील सर्वश्रेष्ठ निर्मिती म्हणजे माणूस संपूर्ण जग आणि येथील प्रत्येक वस्तू ही मानवासाठी कार्यरत आहे. किती हा श्रेष्ठ प्राणी? एवढा श्रेष्ठ प्राणी असताना त्यानी स्वत:ला एवढे छोटे का करुन घेतले? कारण त्यांनी स्वत:ला खर्या अर्थाने ओळखले नाही. स्वत:ची महानता त्याला माहीत नाही. स्वत:ची क्षमता देखील तो ओळखत नाही. जो माणूस स्वत:लाच ओळखत नसेल तो दुसर्याला आणि जगाला तरी कसे ओळखणार? त्यानंतर तो जीवनाच्या महान उद्दिष्टांबद्दल देखील अनभिज्ञ झाला. श्रेष्ठ निर्मितीलाच श्रेष्ठ उद्देश्य असतो किंबहूना जीवनाचा उद्देश्य श्रेष्ठ असल्यामुळेच तो श्रेष्ठ ठरतो. मानवाला त्याच्या जीवनाचे उद्देश्य कोण सांगणार? निश्चितच तोच सांगणार ज्याने त्याला जीवन प्रदान केले. कोण तो निर्माता? आणि त्याला माझ्याकडून काय अपेक्षित आहे? मी जर हा उद्देश्य पूर्ण केला तर मला काय मोबदला मिळणार? आणि जर मी असफल राहिलो तर काय शिक्षा होणार? कारण श्रेष्ठ व्यक्तीकडून श्रेष्ठ प्रदर्शनच अनिवार्य असते आणि हे सर्व बरोबर असेल तर मला कोणती जीवनपध्दती अवलंबावी लागेल जेणे करुन मी या जगात आणि त्यानंतरही यशस्वी होईल?
या सर्व प्रश्नांची यथायोग्य उत्तर इस्लामने दिली. कारण इस्लाम ही नैसर्गीक जीवनपध्दत आहे. अगदी तार्कीक आणि सामान्यातील सामान्याला देखिल पटणारे उत्तर. इस्लामने सांगीतले की या सृष्टीचा एकच निर्माता आहे. तो अत्यंत दयाळु आणि कृपावंत आहे. सर्व सृष्टीचा तो एकमात्र रचियता आहे. माणूस हा जगातील सर्वश्रेष्ठ प्राणी आहे आणि संपूर्ण सृष्टी त्यासाठी कार्यरत आहे. त्याला एक महान उद्देशासाठी निर्माण करण्यात आले आहे. हे जग त्याचे परिक्षागृह आहे. निर्माणकर्त्याने मानवाला निवडीचे स्वातंत्र्य दिले आहे. त्याला बुद्धी दिली आहे. चांगले आणि वाईट त्याच्यासमोर प्रेषितांमार्फत विशद केले आहे. निवडीचे पूर्ण स्वातंत्र्य असतांना माणूस कोणती निवड करतो हिच त्याची परिक्षा. चांगल्यांची निवड करणार्याला निश्चितच चांगला मोबदला मिळायला हवा आणि वाईटाची निवड करणार्याला वाईट परिणाम भोगणे आवश्यक आहे.
निर्मात्याने प्रत्येक मानवाला युनिक बनविले. त्याला अफाट क्षमता दिल्या. या क्षमतांचा वापर करून शिखरापर्यंत तो तेव्हाच पोहचू शकतो जेव्हा तो कुरआनच्या मागदर्शनाचा अवलंब करेल. कुरआन ही सफल जीवनाची गुरुकिल्ली आहेे. कुरआन मानवाला माणूस बनविण्याचा अभ्यासक्रम आहे. जोपर्यंत माणूस, माणूस बनत नाही तो पर्यंत त्याची सर्व प्रगती व्यर्थ आहे. आज जगात कोट्यावधी लोकसंख्या असली तरी त्यात माणंस किती हाच प्रश्न आहे? आणि मानवाच्या संपुर्ण समस्येचे मूळ त्याची हरवलेली माणूसकी! त्यामुळे सगळंकाही असून देखील त्याच्या जीवनात एक पोकळी आहे. मन:शांती नाही, समाधान नाही, पुर्णत्वाची भावना नाही की स्थिरता नाही, हेच सर्व समस्यांचे मूळ आहे.
इस्लामने मानवाला जीवनाचा महान उद्देश देत असताना शांती, समाधान, स्थिरता आणि पुर्णत्वाचे मूलमंत्र दिले. नैतिक मार्गाने भौतीक जीवनाच्या यशाचे सुत्र देत असताना अध्यात्मीक जीवनातून शांती आणि समाधानाची सुत्रे दिली, त्याचे जीवन अर्थपूर्ण केले. महान उद्देशासाठी त्याला प्रशिक्षित केले. निश्चितच जीवन एक कठीण परिक्षा आहे. कुरआन ही कठीण परीक्षा सोपे करण्याचे मार्गदर्शन आहे. जीवनातील अनेक मार्गांपैकी सर्वात सोपे, सफल आणि आधुनिक जीवनपध्दत जीवनातील सर्व अंधारातून मुक्त करून प्रकाशाची वाट सर्व अंधश्रध्दा, सर्व पुर्वाग्रह यातुन मुक्त अशी आधुनिक जीवनपध्दत अध्यात्मिकता आणि आधुनिकतेचे अद्वितीय संगम.
असीम दयावंत आणि कृपावान निर्मात्याने मानवाला सफल जीवनाचे मार्गदर्शन केले.त्याच्या सर्व समस्येचे यथोचित समाधान दिले. त्याला असे श्रेष्ठत्व प्रदान केले की जीवनातील सर्व समस्या त्याच्यापुढे तोडक्या झाल्या. त्याला फक्त स्वत:च्याच यशाचे सिध्दांत दिले नाही तर त्याला समाजउपयोगी माणूस बनवून संपूर्ण समाजाला आणि देशाला घडविण्याचे महान कार्य केले. कुरआनने माणसाच्या नैराश्यावर विजय मिळवून त्याला नवचैतन्याचा मार्ग दाखविला. जीवनाच्या प्रत्येक परिक्षेत त्याला पर्वतासारखे उभे केले. प्रत्येक क्षणात त्याच्या महान निर्मात्याची साथ असल्याचे आश्वासन दिले. जेव्हा हा माणूस महान उद्देशासाठी कार्यरत असतो तेव्हा त्याला आत्मिक शांती आणि समाधान लाभते. अल्लाहने माणसाला कुरआनच्या माध्यमातून अंधारातून प्रकाशाकडे नेले. हा प्रकाश बाहेर झगमगणारा कृत्रिम प्रकाश नाही तर हा अख्खे विश्वही प्रकाशित करणारा प्रकाश आहे. जीवनाला अर्थपुर्ण करणारा. खर्या अर्थाने मानवाला सफल आणि शांतीपुर्ण जीवन देणारा प्रकाश. कारण ही जीवनपध्दत त्या निर्मात्याने दिली ज्याने सृष्टीच्या प्रत्येक गोष्टीला अचूक नियम दिले. जो चुकुन देखिल चुक करीत नाही, असा विश्वाचा निर्माता जो आपल्या मानवजातीवर असीम प्रेम करतो, जो अत्यंत दयाळू आणि कृपाळू आहे, आपल्या सर्वात प्रिय निर्मितीला अर्थात मानवजातीला अचूक मार्गदर्शन करणार नाही का? निश्चित करणार व केलेलेच आहे. केवळ कुरआनशी दूर राहिल्याने त्या प्रकाशाची जाणीव आपल्याला राहिलेली नाही. जमाअते इस्लामी हिंदच्या अंधारातून प्रकाशाकडे या मोहिमेतून तो दाखविण्याचा प्रयत्न.
- अर्शद शेख
आर्किटेक्ट
(लेखक आर्किटेक्ट असून, समाजसेवेत अग्रेसर असतात.)
Post a Comment