सध्याचं जग हे धावत जग आहे़ अनेक प्रश्न डोक्यात कल्लोळ माजवत आहेत़ बोलणं सोपं झालं आहे परंतु प्रत्यक्षात उतरविणे अवघड झाले आहे़ जिथे तिथे गोड शब्द ऐकायला मिळतात परंतु व्यवहारातून मात्र कडवट अनुभव मिळत आहेत़ मग ते घर असो की गल्ली, गाव असो की शहर, राज्य असो की देश चोहिकडे मोठ्या प्रमाणात भरकटलेली मने दिसून येत आहे़ भौतिकतेच्या आहारी आणि व्यावसायिक शिक्षणाच्या नादी लागून उच्चशिक्षित पिढीही अशिक्षितापेक्षा वाईट वागू लागली आहे़ लोक क्षणाच्या सुखासाठी अनंतकालीन दु:ख पदरात पाडून घेत आहेत़ मग या वर्तमानरूपी अंधारात भरटकलेल्या मनांना ईश्वरीय अनंतकालीन सुखाचा अनुभव देणार्या व्यवस्थेतील प्रकाशाची वाट दाखविणे प्रत्येक ईमानधारकांचे कर्तव्य आहे़
त्यासाठी स्वत:पासून सुरूवात करावी लागेल़ स्वत:शी जिहाद (आत्मसंघर्ष) करावा लागेल़ स्वैर मनाला लगाम लावावा लागेल़ त्यागाची भावना अंगी बाळगावी लागेल, संयमाची पातळी आणि सत्कर्माची गती वाढवावी लागेल़ जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रच्या ’अंधारातून प्रकाशाकडे’ या मोहिमेच्या निमित्ताने आज आपणांसर्वांना निश्चय करावा लागेल की, पुढील आयुष्यात ईश्वरीय व्यवस्थेचा अंगीकार करून ऐहिक आणि पारलौकिक जीवन यशस्वी करण्यासाठी सर्व लोकांपर्यंत प्रेषित मुहम्मद सल्ल़ यांचा संदेश पोहोचवू.
आज व्यवहारातील देवाण-घेवाण किचकट बनली आहे़ साठेबाजारीला तर कायद्याने मान्यताच मिळाली आहे़ खोट बोल पण रिटून बोलाची प्रवृत्ती सामान्यांपासून ते शासनकर्त्यांपर्यंत बळावत चालली आहे़ असत्य मनावर बिंबविण्याच्या नवनवी क्लृप्त्या शोधून त्याचा मारा केला जात आहे़ जगण्याची ओढ अनैतिकमार्गाकडे घेऊन जात आहे़ गावच्या सरपंचापासून ते देशाच्या पंतप्रधानापर्यंत खोट्या आश्वासनांची खैरात वाटताना कोणालाही दुःख वाटत नाही. प्रत्येक क्षेत्रात काम कमी आणि मार्केटिंग जास्त झाली आहे़ अशात सामान्य माणूस आपले जगणे हरवत चालला आहे़ त्याने कोणापाशी आपले मन हलकं करावे त्याला कळेनासे झाले आहे़ तरीपण आलेला दिवस तो जड अंत:करणाने ढकलत आहे़ तो सुखाच्या शोधात भरकटत आहे़ फक्त गरीबच नव्हे तर मध्यवर्गीय आणि श्रीमंतही भरकटू लागले आहेत़ या सर्व अंधःकारमय परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी कुरआनला अभिप्रेत असलेला प्रकाशच कामी येऊ शकेल, याची खात्री आहे.
जीवनाचा भरपूर लाभ घेणे, यथायोग्य आनंद प्राप्त करणे आणि खर्या अर्थाने यशस्वी जीवन पार पाडणे खात्रीने आपला हक्क आहे़ मात्र त्याच वेळी जेव्हा जीवनयापनाची कुशलता आपण जाणत असाल, यशस्वी जीवनाच्या नियमांशी व शिष्टाचारांशी परिचित असाल, एवढेच नव्हे तर त्या नीतीनियमांना व शिष्टाचारांना आचरणात आणून आपल्या जीवनाला सुशोभित बनविण्याच्या प्रयत्नात राहता़
सुसंस्कार आणि चांगली आचरणशैली, प्रतिष्ठा, शुद्धता आणि शुचिर्भूतता, अभिरूची आणि चांगली निवड, क्रमबद्धता आणि व्यवस्थापन, अनुभूतीची सुक्ष्मता आणि चांगली आवड, उच्च नीतिमत्ता आणि सभ्यता, सहानुभूती आणि शुभचिंतन, मृदू संभाषण आणि वाक् मधूरता, आदर आणि विनम्रता, त्याग आणि बलिदान, नि:स्पृहता आणि सचोटी, धैर्यशील स्वभाव आणि पुरूषार्थ, कर्तव्याची जाण आणि तत्परता, ईशभीरूता आणि सचोटी, दुराचापारापासून अलिप्तता, ईश्वरावर निष्ठा, पूर्ण कृतीशिलता ही इस्लामी जीवनाची ती नीतीमूल्ये होत़ ज्यांच्यामुळे ईमान राखणार्या माणसाच्या सुशोभित जीवनात ती असाधारण आकर्षण आणि अथांग ओढ निर्माण करतात़ केवळ इस्लामचे अनुयायीच नव्हे तर इस्लामशी अनभिज्ञ असलेले इतर लोकदेखील आकर्षित होऊन त्याच्याकडे खेचले जातात़ हा इतिहास तसेच वर्तमान आहे. इस्लाम हा निश्चितच हवा आणि प्रकाशाप्रमाणे समस्त मानवांचा संयुक्त वारसा आहे़ इस्लामी जीवन पद्धती नि:संशय या योग्यतेची आहे की संपूर्ण मानवजातीने तिचा स्वीकार करून तिच्या आधारावर आपल्या व्यक्तीगत व सामूहिक जीवनाची यशस्वी उभारणी करावी़ जेणेकरून ऐहिक आणि पारलौकिक दोन्ही जगामध्ये यशस्वी होता येईल.
पवित्र कुरआनमध्ये अल्लाहने ही पद्धत मोठ्या महत्तेसह वर्णिली आहे की, जो मनुष्य ईश मार्गदर्शनासाठी तहानलेला असतो त्याला अल्लाह मार्गदर्शनाच्या पथावर चालवतो़ ज्याच्या मनात ईश मार्गदर्शनाची तृष्णा नसते त्याला तो मुळीच मार्गदर्शन करीत नाही़ अल्लाह असे कदापि करीत नाही की मासे मागणार्याला साप द्यावा आणि सापाची मागणी करणार्याला मासे प्रदान करावेत़ जो मनुष्य ईश मार्गदर्शनाची अभिलाषा बाळगतो, त्याच्याशी अल्लाह तर त्याच प्रकारचा व्यवहार करतो, जसा व्यवहार मनुष्य आपल्या प्रिय बालकाशी आणि प्रेमळ शिक्षक आपल्या होतकरू आणि खूप मेहनत करणार्या विद्यार्थ्यांशी करतो़ अल्लाह त्याला आपला मार्ग दाखवतो आणि सन्मार्गी लावून सोडून देत नाही तर त्याला सातत्याने आपल्याकडे खेचत राहातो व पुढे जाण्याची प्रेरणा देत राहतो़
ह्या उलट, ज्याच्या मनात ईश मार्गदर्शन प्राप्त करण्याची इच्छा नसते, अशा माणसासोबत अल्लाह बेपर्वा होतो़ त्याला मोकळे सोडून देतो की त्याने वाटेल त्या मार्गावर आणि वाटेल त्या पद्धतीकडे जावे. पवित्र कुरआन समस्त मानवांच्या मार्गदर्शनासाठी अवतरले आहे़ याच्या प्रकाशाचा लाभ तोच घेऊ शकतो ज्याच्या मनात ईश-मार्गदर्शनाची तृष्णा आहे़ प्रत्येक आस्थेवाईक मनुष्याने प्रथम ईश्वराकडे प्रार्थना करावी के, ”ऐे अल्लाह! तू अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे़ स्तवन फक्त तुझ्यासाठीच आहे तू सर्व सृष्टीचा पालनकर्ता आहे़ एकमात्र कृपावंत आणि दयावंत, निर्णयाच्या दिवसाचा स्वामी आहेस आम्ही तुझीच भक्ती करतो आणि तुझीच मदत मागतो़ आम्हाला सरळ मार्ग दाखव, त्या लोकांचा मार्ग ज्यांना तू अनुग्रहित केलेस आणि जे कोपग्रस्त झाले नाहीत व जे मार्गभ्रष्ट नाहीत़ ”
- बशीर शेख
विशेषांक संपादक
मो. 9923715373
Post a Comment