Halloween Costume ideas 2015

आमचा मराठी बाणा !


मुळातच आम्ही मराठी. मराठी म्हणजे पक्के मराठी ! इतके पक्के की आम्ही मराठी मराठीतच बोलतो आणि मराठीतच लिहितो.( काहींना तर आपलं हिंदी भाषण इंग्रजीत लिहून घ्यावं लागतं तेव्हा कुठे ते हिंदीतून वाचता येतं ! जाऊ द्या, आता दोस्ताना आहे. जास्त बोलता येत नाही.) शाळेत असतांना तर आम्ही काही वर्षांपर्यंत इंग्रजी विषयाची उत्तर पत्रिकाही मराठीतूनच लिहीत होतो, पण आमचे मास्तर बहुदा मराठी द्वेष्टे असावेत, आमचं मराठी प्रेम त्यांना आमचा मुर्खपणा वाटायचा आणि ते दरवर्षी आम्हाला त्याच वर्गात ठेवत असत. शेवटी हेडमास्तरांनी आम्हाला शाळेतून काढून टाकण्याची धमकी दिल्यामुळे मग आम्ही इंग्रजीची उत्तर पत्रिका इंग्रजीतच लिहिण्याचा कटू निर्णय आपल्या मर्जी विरुद्ध घेतला. (आपल्या मर्जी विरुद्ध दुसऱ्याच्या मर्जीने निर्णय घेण्याची ती सवय आता चांगलीच कामाला येतेय.) आम्हाला मराठी सोडून दुसऱ्या भाषांची इतकी चीड होती की एखाद्या दुकानावर गुजराथी पाटी दिसली की आमचे अंटरपंटर ती ताबडतोब फोडून टाकत असत. तसे आम्ही आमच्या बाळराजेंना इंग्रजी माध्यमात शिकविले, (सौभाग्यवतींच्या मर्जीने घेतलेला निर्णय ! मागे लागलेली सवय आली की नाही कामाला ?) पण त्यांना कडक समज दिली होती, की आमच्या समोर घरचा अभ्यास करायचा नाही. किंबहुना तुमची ती इंग्रजी भाषेतली वह्यापुस्तकंसुद्धा आमच्या नजरेसमोर नको यायला. मुळातच आम्ही मराठी असल्यामुळे आमचा स्वभाव तसा कडकच आहे, पण सत्तेसाठी कोणासोबत राहायचं किंवा कोणाला सोबत घ्यायचं असलं की स्वभावाला थोडी मुरड घालावीच लागते ना ? मागची पाच वर्षे आम्ही अशीच आमच्या मराठी बाण्याला मुरड घातली होती. आता गेल्या वर्षभरापासून परत तेच करतोय. मित्र चांगले नसले की असंच होतं ! असो.

मुळातच आम्ही मराठी. मराठी म्हणजे पक्के मराठी. इतके पक्के की आमच्या घरात फक्त मराठी पदार्थच बनवले जायचे, आणले जायचे आणि अर्थातच खाल्ले- खिलवलेही जायचे. पण मागे एक गुजराथी गृहस्थ आमच्या पिताश्रींशी त्यांंचे घरोब्याचे संबंध होते असं सांगून आमच्या घरी येऊ जाऊ लागले. त्यांच्या आदरातिथ्यासाठी मागवलेला खमण ढोकळा आम्हालाही आवडू लागला. किंबहुना मी तर म्हणेन की, तो हळूहळू आमच्या घरात स्थिरावला ते थेट पाच वर्षे ! आता  कुठे वर्षभरापूर्वी त्याला ( म्हणजे खमण ढोकळ्याला !) घराबाहेर काढला तर आता 'जलेबी ने फाफडा' घरात घुसू पाहतोय. काय करावं काही कळत नाहीये. आता मला सांगा आपण कोणाला 'आपडा' वाटू लागलो तर त्याचा ' जलेबी ने फाफडा' खायला काय हरकत आहे ?  मी तर म्हणेन की त्याचा 'जलेबी ने फाफडा' आपण खायलाच हवा ! का खाऊ नये ? किंबहुना मी तर म्हणेन की आजच्या तारखेला वारंवार हात धुणे आणि मुखपट्टी वापरणे हे जीव वाचविण्यासाठी जितकं गरजेचं आहे त्याहूनही जास्त गरजेचं आहे (मुंबई महानगरपालिका ताब्यात ठेवण्यासाठी) ' जलेबी ने फाफडा' खाणं ! पुढे मागे मुंबई महानगरपालिकेपुढे 'जलेबी ने फाफडा'चे स्टॉल टाकण्यासाठी प्रोत्साहनपर योजना सुरू करण्याचा विचार आहे. हे ही असो.

जाता जाता -  नेहमीप्रमाणेच जर  आपल्या मर्जी विरुद्ध दुसऱ्याच्या मर्जीने निर्णय घ्यावा लागला आणि औरंगाबादचं संभाजीनगर करता आलं नाही, (मित्र चांगले नसले की असंच होतं !) तर औरंगाबाद फक्त मराठीतच (किंवा सद्य परिस्थिती पाहता फार फारतर गुजराथीत) लिहावं, इंग्रजी अजिबात लिहू नये असा अध्यादेश काढावा असा विचार करतोय. मराठी बाण्याला किती दिवस मुरड घालणार ? आपण का सत्तेसाठी लाचार आहोत की काय ? पुन्हा हे ही असो.

- मुकुंद परदेशी

मुक्त लेखक, 

संपर्क-७८७५०७७७२८

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget