Halloween Costume ideas 2015

कर्नाटकात सत्तेसाठी काहीपण!

 


येत्या 10 मे रोजी कर्नाटकमधील निवडणुका पार पडतील. सरकार कोणाचे येईल हा प्रश्न साऱ्या देशाला पडलेला आहे. कारण या निवडणुकीची पार्श्वभूमीही तशीच आहे. कर्नाटकात आळीपाळीने काँग्रेस आणि इतर पक्षांना तेथील जनता निवडून देत असते. 

या पद्धतीनुसार ही काँग्रेसची पाळी पण भाजपा पक्षाला या निवडणुका 2024 मधील होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने इतक्या महत्त्वाच्या आहेत की या विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी तो पक्ष काहीही करू शकतो. आणि भाजपाकडे कोणकोणते तंत्र आणि मंत्र आहेत हे सर्वांना माहित आहे. अंतिम क्षणी तो पक्ष कोणता तंत्र उपयोगात आणेल हे कुणीही सांगू शकत नाही. समाज माध्यमांनी तर आताच निवडणुकीचा निकाल लावलेला आहे. कर्नाटकात काँग्रेसच जिंकणार असे चित्र उभे केलेले आहे. पण त्यांचे हे चित्र कसे बदलून जावू शकते हे त्यांचे त्यांनाही माहित नसणार. 

सध्या प्रचारात कर्नाटकामध्ये काँग्रेसने आघाडी घेतलेली आहे. हे सर्व मान्यकरतील पण 10 मे पर्यंत काँग्रेसची ही हवा कायम राहणार की नाही सांगता येत नाही. काँग्रेसच्या जमेची बाजू अशी की त्या पक्षात पहिल्यांदाच मतदारांना आणि सामान्य जनतेला आपल्या प्रचारात सामील करून घेतले आहे. आजवर काँग्रेसपक्ष उच्चवर्णीय नेत्यांच्या आधीन राहिलेला आहे. मल्लिकार्जुन खरगे यांना काँग्रेसचे राष्ट्राध्यक्ष करण्याने काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मानसिकतेवर मोठा प्रभाव पडलेला आहे. त्याचबरोबर काँग्रेसने ज्या इतर मागासवर्गाला कधीच महत्त्व दिले नव्हते ती त्रुटी त्या पक्षाने दूर सारली आहे. आता जिसकी जितनी आबादी तितकी त्यांची भागीदरीच्या तत्त्वावर निवडणुका लढत आहेत. 

भाजपाने आजवर मंडल आयोगाच्या घोषणेनंतर ओबीसींना आपल्याकडे असेल तरी त्यांची मते घेतल्यानंतर त्यांना सत्तेपासून दूरच ठेवले आहे. महाराष्ट्रातील शिवसेनेचा आधार असलेल्या ओबीसीला भाजपाने आपल्याकडे कधी वळविले याची खबर शिवसेनेला लागलीच नव्हती आणि त्यांच्या बळावर भाजपाने आधी महाराष्ट्राच्या सत्तेत आपले पाय रोवले आणि आता सबंध सत्ता स्थानांवर अबाधित कब्जा केला याची माहितीसुद्धा सेनेला लागली नव्हती. याच्या जोरावर भाजपाने शिवसेनेत खिंडार पाडले आणि महाराष्ट्रातील सेनेच्या राजकीय वर्चस्वाला खिंडार पाडले. राहुल गांधी यांना जेव्हा मानहानी प्रकरणात शिक्षा झाली तेव्हा त्यांना ओबीसीचे महत्त्व कळले आणि म्हणून आता ते जातीनिहाय जनगणनेची गोष्ट करत आहेत. काँग्रेसची सत्ता असताना जर त्यांना ओबीसीचे तसेच जातनिहाय जनगणनांचे महत्त्व कळाले असते तर काँग्रेसची ही दुर्दशा झाली नसती. 

राहुल गांधी यांनी काही इतर उद्दिष्टांनी भारत जोडो यात्रा काढली असली तरी त्यांना ह्याच यात्रेचे भलेमोठे राजकीय लाभ झालेला आहे. या यात्रेनिमित्त हे ही तथ्य समोर आले की काँग्रेस पक्षात नेतृत्वाचा अभाव आहे आणि जी काही नेतेमंडळी पक्षात आतापर्यंत शिल्लक आहे ते पक्षात असले तरी ते तिथे राहून भाजपासाठी हेरगिरी करतात हे काँग्रेसचे दुर्दैव आहे. राहुल गांधी यांना जनसामान्यांचा भलामोठा पाठिंबा असला तरी ते व्यावहारिक राजकारणात तितके मुरब्बी राजकारणी नाहीत हे सर्वांना माहित आहे.

कर्नाटकात काँग्रेस पक्षाची मदार इतर पक्षातून आलेल्याभ्रष्ट नेत्यांवर असल्याचे पहावयास मिळत आहे. या भ्रष्टाचाराने आता राजकीय शिष्टाचाराचे रूप धारण केले असल्याने काँग्रेस पक्षाला याचा कितपत फायदा होणार हे सांगता येत नाही. तसेही कर्नाटकात सध्याच्या भाजप सरकारवरही भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत. एक प्रकारे कर्नार्टकाचा राजकीय बाणाच भ्रष्टाचाराचा आहे, असे म्हटले तरी आश्चर्य नको. भ्रष्टाचाराचा भलामोठा इतिहास कर्नाटकाला लाभलेला आहे. म्हणून या निवडणुकीत भ्रष्टाचाऱ्या मुद्यावर  काँग्रेसला किती फायदा होणार हे सांगता येत नाही. पण मातब्बर जगदीश शेट्टार आणि इतर भाजपा नेत्यांच्या काँग्रेस प्रवेशाने पक्षाला बराच फायदा होईल, असे वाटते. सिद्रामैय्या सारखा इतर नेता काँग्रेस पक्ष असो की भाजपा कोणाकडेही नाही. म्हणून या निवडणुकीत राहुल गांधी यांचा करिश्मा मल्लीकार्जुन खरगे यांच्यावर अवलंबून आहे. खरगे यांना काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा सन्मान आणि काही प्रमाणात सत्ताविरोधी लहर यामुळे काँग्रेसची सत्ता कर्नाटकात येऊ शकते पण जर जेडीएसने काँग्रेसची साथ मोडली किंवा दिली नाही तर निवडणुका जिंकूनही काँग्रेसने सत्ता मिळेल की नाही याची खात्री नाही. शेवटी लोटस ऑपरेशन आहेच. भाजपाला दर 30 मिनिटात 15 लाख रूपये निधी मिळत असतो तेव्हा त्याला पैशाची कमी नाही आणि काँग्रेसकडे पैशांचा तुटवडा आहे. शेवटी खेळ पैशांचा असतो बाकी विश्लेेषण लिहिणे वाचण्यापुरतेच. 

- सय्यद इफ्तेखार अहमद


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget