Halloween Costume ideas 2015

सोशल मीडियाशी संबंधित शिष्टाचार

सोशल मीडिया हे माध्यम आधुनिक काळातील एक फार प्रभावी माध्यम ठरले आहे. आज आधुनिक तंत्रज्ञान एवढे प्रगत झाले आहे की प्रत्येकाला हे माध्यम हाताळणे एकदम सोपे आणि सूलभ झाले आहे. विशेष करून आजच्या काळात जे प्रींट मिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचा भला मोठा विभाग आपली जबाबदारी पार पाडण्याच्या बाबतीत अयशस्वी ठरला आहे. अशा परिस्थितीत या माध्यमाचे महत्व अधीकच वाढून जाते.  आणि हेच कारण आहे की  आधुनिक काळात सोशल मीडिया हे माध्यम फार प्रसिद्ध आणि लोकप्रिय देखील झाले आहे. सोशल मीडियाच्या विविध स्तरावर आज प्रत्येक जन व्यस्त असल्याचे आपणास दिसून येते. असे म्हटले जाते की भारतातील जवळपास सत्तर टक्के जनता ही सोशल मीडियाचा वापर करते आणि या माध्यमाची शौकीन असून सोशल मीडियाने फार प्रभावित असल्याचे आपण पाहतो आणि आपण स्वतः देखील या माध्यमाने प्रभावित असून त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करतो. परंतु या माध्यमाचा वापर करीत असताना अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींचं भान ठेवावा लागतो. कारण सोशल मीडियाला देखील काही मर्यादा असतात. कही नियम व अटी असतात. सोशल मीडियातील शिष्टाचार देखील डोळ्यांसमोर ठेवण्याची गरज आहे. वास्तविक पाहता ही एक मोठी देणगी आपल्याला लाभलेली आहे. इतर मंडळी जी माध्यमाचा वापर चूकीच्या मार्गासाठी, चूकीच्या गोष्टींचा प्रचार व प्रसार करण्यासाठी करीत आहेत. अशा परिस्थितीत जी सूज्ञ व बूध्दिजीवी मंडळी आहे त्यांची ही जबाबदारी आहे की सत्य आणि सकारात्मक विचार आणि गोष्टींना पुढे नेण्यासाठी तसेच एखाद्या समस्येवर खरा तोडगा काढण्यासाठी आवश्यक बाबी लोकांसमोर मांडण्यासाठी या माध्यमाचा वापर करण्याची आज नितांत गरज आहे. या माध्यमाचा वापर एका नियोजनबद्ध पद्धतीने केला गेला पाहिजे. परंतु आज सोशल मीडिया मध्ये कही अशा प्रकारच्या क्लिप्स, अशा प्रकारचे विडियो असतात जे नकारात्मक दृष्टिकोनाला खतपाणी घालतात. गुन्हेगारी प्रवृत्तीला चालना देतात. विध्वंसात्मक कृत्यांना प्रोत्साहन देतात. तसेच व्यसनाधीनता व नग्नतेचं समर्थन करतात किंवा काही घटना व विडिओ तर असे असतात की जे मनुष्याच्या मनाला विचलित करतात. अशा प्रकारच्या क्लिप्स आणि विडियोला बरीच मंडळी फॉरवर्ड करीत असतात. यातील बर्याच प्रमाणात क्लिप्स आणि विडियो हे खोटे आणि असत्य असतात. जुने असतात. त्यामध्ये कुठलीही सत्यता नसते. वस्तुस्थितीशी त्यांचा काहीएक संबंध नसतो. त्यांना एडीट केले जाते. फोटोशॉप आणि इतर पध्दतीने त्यामध्ये अशा प्रकारे मिक्सिंग केली जाते आणि तोडून मोडून सादर केले जाते की जनू ती घटना नुकतीच घडली आहे. नंतर त्याला हेडींग आणि कॅप्शन देऊन प्रसारीत केले जाते. ज्यामुळे लोकांच्या मनात तिरस्काराच्या भावनेची वाढ होते. नकारात्मक संदेशाचा प्रसार केला जातो. जूलुम आणि अत्याचाराचे हिडीस प्रदर्शन होते आणि बरीच मंडळी अशा प्रकारच्या सामग्रीला मोठ्या प्रमाणात फॉरवर्ड करीत असतात व असे समजले जाते की ते फार मोठं धार्मिक आणि नैतिक कर्तव्य पार पाडत आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे काही संघटना आणि काही ग्रूप असे आहेत की जे सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षपात पसरवण्याचे काम करीत आहे. आणि वातावरणाला तापवण्याचा व वातावरणात ढवळाढवळ करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असतात. काही लोकं आणि काही शक्तींचे हे एक प्रकारचे नियोजनबद्ध षडयंत्र असते आणि विशेषकरून आज जी आपल्या देशाची अवस्था आहे की काही समाज विघातक शक्ती सोशल मीडियाच्या माध्यमातून जातीय सलोखा संपवून जातीय द्वेष पसरवून आपापसात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला जात आहे जेणेकरून त्यावर आपली राजकीय पोळी भाजून घेण्यास मदत मिळू शकेल. अशा या काळोखमय वातावरणात आपल्याला या सर्व कट- कारस्थानाला ओळखण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत आपण त्यांच्या या कारस्थानाला बळी पडून त्यांच्याच भाषेत त्यांना प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न करीत असतो. परीणाम स्वरूप त्या समाजविघातक शक्ती त्यांच्या उद्देशात सफल होतात. या दृष्टीकोनातून फार गंभीर पणे विचार करण्याची गरज आहे. प्रत्येक मूद्यांवर प्रतिक्रिया देण्याची गरज नसते. कोणत्या मूद्यांवर प्रतिक्रिया द्यायची, किती प्रमाणात द्यायची, कोणत्या भाषेत द्यायची हा एक शिष्टाचार असतो संभाषण करण्याचा. सबळ पूराव्यानीशी,  शांतचित्ताने आणि सुमधुर वाणीने सदर क्लिप्स किंवा विडियो आणि घटनेवर प्रतिसाद व प्रतिक्रिया दिली पाहिजे. जर आपल्याला कोणाच्या विरोधात बोलायचे, कोणावर कटाक्ष जरी करायचा असल्यास किंवा शासनाच्या एखाद्या धोरणास आपल्याला विरोध करायचा असल्यास तसेच सरकारला एखादी सूचना करायची असले तरी त्याला एक शिष्टाचार असला पाहिजे. अशा वेळी सुद्धा इतमामाने व सन्मानाने बोलले पाहिजे. अशा काही समाजविघातक घटना घडविल्या जातात आणि नंतर त्या तेल मिठ लावून प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारीत केल्या जातात अशा वेळी एकदम भावनेच्या आहारी जाऊन त्यात उडी घेऊन त्यांना त्याच भाषेत उत्तर देण्याची काहीच गरज नाही. यातून स्वतः ला अलिप्त ठेवण्याची फार गरज आहे. ही आपल्यासाठी एक अग्नी परीक्षा सूध्दा आहे. सोशल मीडियावर आज ही संस्कृती बघायला मिळते की आपल्यापैकी बरेचजण आशा संभाषणांना, अशा भाषणांना, अशा प्रवचनांना, मग ती राजकीय असो किंवा अराजकीय त्यांना फॉरवर्ड करण्यात मोठी आवड दाखवितात . अशी भाषणे जी वास्तविकते पासून मैलो दूर असतात. भडकाऊ भाषणं, घोषणाबाजी करून व्यक्त केलेल्या भाषणांना, निराधार गोष्टींना, निराधार आश्वासनांना, निराधार वक्तव्यांना मोठ्या प्रमाणावर फॉरवर्ड केले जाते व अशा साहित्य आणि सामग्रीला फॉरवर्ड करून फॉरवर्ड करणारा आपल्या शहाणपणाचा टेंभा मिरवित स्वतः ला फार समाधानी समजत असतो. आणि तो हे समजत असतो की त्याने जे काही केले ते योग्यच होते. वास्तविक पाहता सोशल मीडियाच्या शिष्टाचारात हे बसत नाही की कुठल्याही घटनेची सत्यता पडताळून न पाहता तिला फॉरवर्ड केले जावे. कोणतीही गोष्ट किंवा घटना पूढे फॉरवर्ड करण्या आधी त्याची सत्यता पडताळून बघीतली पाहिजे. ती तथ्यावर आधारित आहे की नाही हे तपासून बघितल्यावरच ती पूढे फॉरवर्ड करावी. आता सोशल मीडियामध्ये ही जी छानबीन करण्याची पद्धत आहे ती फार किचकट आणि क्लिष्ट आहे. पहिले तर लोकांची ही मानसिकताच नाही राहायली छानबीन करण्याची. त्यामुळे त्यांना आलेल्या घटना व विडियोंना तात्काळ फॉरवर्ड करण्यातच धन्यता मानली जाते व अशा क्लिप्स आणि विडियो की ज्यांचा संबंध आपल्या शहराशी, आपल्या जिल्ह्याशी किंवा आपल्या राज्य आणि राष्ट्राशी देखील नसतो ताबडतोब प्रसारीत केल्या जातात. त्यांना अशा प्रकारे एडीट केले जाते की जनू ती घटना नुकतीच व आपल्या शेजारीच घडली. अशा प्रकारांना वेळीच ओळखण्याची गरज आहे. त्यासाठी आजकाल व्हेरीफिकेशनची व शहानिशा करून घेण्याची जी साधनं आहेत त्यांची पण खूप मदत घेतली जाऊ शकते. प्रत्येक व्यक्तीचे हे कर्तव्य आहे की एखादी गोष्ट त्यांच्या जवळ आल्यावर तिची सत्यता तपासल्या शिवाय व शाहनिशा करून घेतल्या शिवाय ती पूढे पाठवू नये. दूसरी गोष्ट ही पण आहे की काही अशा घटना घडतात की ज्यामध्ये एका व्यक्तीवर अन्याय व अत्याचार होत असतो आणि तो अत्याचार सहन करीत असतो व हिंसात्मक घटना घडत असते अशा प्रकारच्या क्लिप्स किंवा विडियोला बातमीच्या उद्देशाने किंवा लोकांना सजग करण्यापर्यंत तर ठीक आहे परंतु त्याचा जास्त प्रमाणावर प्रचार व प्रसार करण्याचा आपण प्रयत्न केला तर त्या लोकांचा उद्देश पूर्ण होईल की ज्यांनी सदर घटना घडवून त्याचा विडियो बनविला व व्हायरल केला. कारण त्यांचा प्रयत्नच हा असतो की तुमच्या मनामध्ये भीती निर्माण व्हावी व तुम्ही नैराश्याला बळी पडावे.   त्यामुळे अशा प्रसंगी फार सावधानता बाळगण्याची नित्तांत गरज आहे. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करताना त्यातील शिष्टाचार डोळ्यासमोर ठेवूनच करायला पाहिजे जेणेकरून सामान्य जनतेच्या मनात भीती व नैराश्याने ग्रस्त होऊ नये. प्रत्येक गोष्ट ही सत्याच्या कसोटीवर पारखूनच पूढे फॉरवर्ड करावी अन्यथा तिला तिथेच तिचा प्रचार व प्रसार थांबविला पाहिजे व सदर घटना डिलीट करून टाकावी.

-सलीम पठाण, अंबड, जि. जालना


Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget