Halloween Costume ideas 2015

कॉम्रेड विलास सोनवणे यांचं असणं का महत्वाचं होतं...?


राष्ट्राच्या संकल्पना प्रस्थापितांच्या दावणीला बांधून, त्याच्या सांस्कृतिक इतिहासाची पांढरपेशी व्याख्या करणाऱ्यांच्या थोबाडीत मारणारी काही मोजकी माणसं महाराष्ट्रात होती. त्यात विलास सोनवणे हे नाव आमच्यासाठी आधिक महत्वाचं होतं. मुसलमानांनी इस्लाम स्विकारण्याची कारणमिमांसा अतिशय वस्तुनिष्ठ रितीने मराठीत करणारा सोनवणेंसारखा अभ्यासक आजही विरळा आहे. त्यांनी मुस्लिमांची अब्राह्मणी नाळ समजून घेतली. त्यातील जातवैशिष्ट्यांची दखल घेऊन, जातनिहाय लादलेल्या उत्पादनाच्या बंधनातून झालेलं शोषण त्यांनी अधोरेखित केले होते. उत्पादनाच्या कॅटेगरीनुसार सामाजिक सन्मान ठरवण्याची आपल्याकडची सांस्कृतिक रित मुस्लिमांना देखील लागू होते, हे त्यांनी प्रकर्षाने मांडले. नुसते मांडून ते थांबले नाहीत. मुस्लिमांना हिंदूंच्या समान पातळीवर जातनिहाय ठरलेल्या प्रवर्गात आरक्षण देऊन त्यांना प्रगतीची समान संधी द्यावी,असा आग्रह त्यांनी धरला होता.

मुसलमानांना प्रस्थापितांनी ठरवलेल्या ज्ञानविश्वाच्या मर्यांदामध्ये समजून घेण्याचा दुराग्रह टाळायला हवा. त्यासाठीचा अब्राह्मणी, डावा परिप्रेक्ष्य काय असायला हवा? हे मराठी मुसलमान समाजाच्या पडझडीच्या काळात त्यांनी मांडायला सुरुवात केली. मराठी मुसलमान साहित्य चळवळीच्या दिशा काय असाव्यात? त्याच्या विचारांचा केंद्रबिंदू काय ठरायला हवा? हे निश्चीत करायची वेळ आली, तेव्हा त्या चर्चेत कॉम्रेड विलास सोनवणे हा माणूस होकायंत्रासारखा दिशादर्शक होता. समाजवादी वर्तुळातून दलवाईकृत सुधारणेचा आग्रह पुढे रेटला जात असताना सोनवणे-बेन्नूर-मुकादम या त्रयींनी मुसमानांना समजून घेण्याच्या पार्श्वभूमीची चर्चा आरंभली. त्यासाठी अरेबीयन रेनेसांसपासून भारतीय इस्लामी समुदायाच्या राष्ट्रवादापर्यंत त्यांनी चर्चा ताणली. त्यातून मुस्लिमांच्या शोषणासाठी नुसत्या राज्याला जबाबदार धरुन चालणार नाही. त्यासाठी मुस्लिमांच्या अंतर्गत असलेली वर्गरचना त्याला असलेली शोषणाच्या वैशिष्ट्यांची सरंजामी अहकारांची किनार त्यांनी विस्कटून दाखवली. दलवाईकृत सुधारणाचर्चेच्या समांतर उभा केलेला हा ज्ञानप्रवाह मराठीत अद्याप तरी अदखलपात्र म्हणावा लागेल. त्याची दखल घेण्यासाठीचे विवेकी आत्मभान मराठी ज्ञानविश्वाच्या  पुढाऱ्यांमध्ये वाढीस लागल्यानंतरच सोनवणेंचे महत्व आधिकाधीक स्पष्ट होत जाईल. 

हे महत्व स्पष्ट होईपर्यंत तरी सोनवणे जगायला हवे होते. लाल सलाम कॉम्रेड. तुमच्याशी माझे व्यक्तीगत संबंध मांडण्याची उठाठेव मी इथे करणार नाही. त्याच्या आठवणी नेहमीच स्मृतींच्या कांडोळ्यात जपत राहू. थँक्स टू विलास सोनवणे...। 

- सरफराज अहमद, सोलापूर

वारकऱ्यांना गोळा करून कुख्यात अमेरिकन कंपनी डाऊशी लढा दिला अन् तिला पळवून लावलं होतं...
तरुणपणात चळवळीत प्रवेश केलेला कॉम्रेड, खिशात पैसे नसल्यामुळे सकाळचा चहा -नाष्टा सोडाच पण एक वेळेचं जेवणही रोज मिळत नसायचं. उपाशी पोटी पक्षनिष्ठापायी, चळवळीसाठी पायीच काम करत फिरावे लागे…अशाच काळात एक कॉम्रेड या चळवळीत उतरला.. तो म्हणजे कॉम्रेड विलास सोनवणे!
व्यक्तिगत आयुष्यातील सर्व भौतिक सुखांवर पाणी फिरवून चळवळीत आलेला एक कॉम्रेड..! दीनदुबळ्या पीडित बहुजन समाजाला बरोबर घेऊन लढा उभारणार आपल्याकडे आहे ते देऊन टाकणारा व कोणत्याही संचयात न अडकणारा विलास सोनवणे यांचासारखा माणूस आजच्या काळात तरी मिळणे म्हणजे दुर्मिळच.
कसलंही भरीव काम न करता स्वतःच्या नावाचा गवगवा करणारे, आयुष्यभर पैशांच्या मागे धावून उत्तरायुष्यात समाजकार्य करू पाहणारे, समाजात आपला मान व प्रतिष्ठा वाढावी म्हणून समाजकार्य करणारे खूप असतात. समाजकार्याच्या नावाने जमीन-जुमला, गाडी असा लवाजमा करणाऱ्या समाजसेवकांची आज चलती आहे पण हे सगळे चमकणारे विजेचे दिवे आहेत. वीज गेली की बंद पडणारे.
मात्र विलास सोनवणे यांच्यासारखे दिवे हे कोणत्याही विजेवर चालणारे नाहीत ते स्वयंप्रकाशी होते. त्यांना स्वयंप्रकाशी म्हणण्यात एक मतितार्थ दडलेला आहे तो म्हणजे ते कोणा भांडवलदारांच्या, शासनाच्या अनुदानावर ही चळवळ-संघटना चालवत नसायचे आणि म्हणूनच ते रोखठोक-स्पष्ट-परखड भूमिका घेऊ शकायचे.
मात्र हा स्वयंप्रकाशी दिवा मालवला!
कॉम्रेड विलास सोनवणे यांचे ४ ऑगस्ट २०२१ रोजी वयाच्या ६८ व्या वर्षी पुणे इथे निधन झालं. कॉ. सोनवणे हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील तामसवाडी गावचे. विद्यार्थी दशेपासूनाच त्यांचा चळवळीत सक्रिय सहभाग होता. एसएफआय संघटनेचे महाराष्ट्राचे संस्थापक सचिव होते. पहिल्यांदा सर्व धर्मातील ओबीसींची संघटना उभी करण्याचं काम त्यांनी केलं. मुस्लिम ओबीसी चळवळीचे ते संस्थापक होते. डाउ आंदोलन, सेझ विरोधी लढा, सर्व धर्मीय-सर्व पंथीय सामाजिक परिषद याचे ते संस्थापक होते. याच कॉम्रेडने देशाच्या इतिहासात अनेक भरीव कामे केलीत, अनेक आंदोलनं गाजवली.
त्यांच्या कारकीर्दवर एक धावती नजर टाकली तर ते लक्षात येते की १९७३ मध्ये “स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया”(S.F.I.) च्या माध्यमातून मार्क्सवादी चळवळीत ते दाखल झाले. कम्युनिस्ट पक्षामध्ये प्रवेश, “स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया”(S.F.I.) च्या महाराष्ट्र शाखेचा संस्थापक सचिव. १९७३-७५  या काळात “सिद्धार्थ कॉलेज” मुंबईच्या विद्यार्थी संघटनेचा पहिला कम्युनिस्ट विद्यार्थी सचिव म्हणून कार्यरत.  १९७८ मध्ये कॉम्रेड शरद पाटील यांच्यासोबत “सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष” स्थापनेत सहभाग घेतला. १९८१ मध्ये बाबा आमटे यांच्या आनंदवन येथील आश्रमाने पारधी समाजाने बळकावलेल्या जमिनी सोडवण्यासाठी त्यांनी लढा दिला. १९९० मध्ये मुस्लीम मराठी साहित्य परिषदेच्या स्थापनेत पुढाकार. १९९२ मध्ये ऍड. जनार्धन पाटील यांच्या सोबतीने मुस्लीम ओबीसी चळवळीची सुरवात केली. २००५-२००८ या काळात न्या.पी.बी.सावंत व न्या.बी.जी.कोळसे-पाटील, ऍड.दत्ता पाटील यांच्या सोबत रायगड येथील रिलायन्स सेझ प्रकल्प हटविण्याची यशस्वी लढा दिला.
पण या सगळ्यात २००८ मध्ये वारकऱ्यांच्या सहकार्याने (ह.भ.प.बंडातात्या कराडकर यांच्या नेतृत्वात) पुण्याजवळील डाऊ केमिकल्स कंपनीच्या प्रकल्पाच्या विरोधात झालेल्या यशस्वी लढ्याचे ते जनक होते. त्यांची हि चळवळ खूप महत्वाची ठरली.
काय होता हे डाऊ कंपनीचा प्रकल्प?
भामचंद्र आणि भंडारा डोंगराच्या मध्ये वसलेल्या शिंदे गाव येथे सरकारने डाऊ कंपनी उभारण्याचे जाहीर केलं होतं. केमिकल कंपनी असल्याने इंद्रायणी नदीसह परिसरात प्रदूषण वाढेल, असा आरोप करून शिंदे ग्रामस्थांनी या प्रकल्पाविरोधात आंदोलन पुकारले.
हे आंदोलन कॉम्रेड विलास सोनवणे आणि बंडातात्या कराडकर यांच्या नेतृत्वात झाले. कालांतराने १६ जानेवारी २००८ रोजी लोकशासन आंदोलनाच्या वतीने डाऊ हटावची घोषणा करण्यात आली. हे आंदोलन वारकऱ्यांचे आहे, असे जाहीर करीत वारकऱ्यांसह या आंदोलनात उडी घेतली. पण, आंदोलकांना वचक बसविण्यासाठी २४ जुलै २००८ रोजी गावात प्रचंड पोलिस बंदोबस्त वाढविला, त्यामुळे संतप्त वारकऱ्यांनी २५ जुलै २००८ रोजी कंपनीच पेटवली होती.
३२ देशांमध्ये व्यापार करणारी अमेरिकेतील मिशीगन राज्यातील ‘डाऊ’ ही बहुराष्ट्रीय कंपनी आहे. मानवी जीवन नष्ट करण्यात ह्या कंपनीचा मोठा हात आहे. या कंपनीचा आजवरचा इतिहास म्हणजे, दूषित केमिकल्स बनवून मानवी जीवन, पाणी, पर्यावरण, नद्या, निसर्गातील असंख्य घटक नष्ट करण्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
थोडक्यात ‘डाऊ’ ही कायदे मोडणारी, अमेरिकेत बंदी असलेली, खोटे संशोधन रिपोर्ट दाखवून विकसनशील जगात विषारी उत्पादने विकणारी कंपनी आहे. यासाठी ती देशातील नोकरशाही, सरकारी संशोधक, राजकारणी यांना भरपूर लाच देते. अशा प्रकारे लोकांच्या जीवनाला, पर्यावरणाला धोकादायक ठरू पाहणाऱ्या डाऊ कंपनीला केंद्र व राज्य सरकारने मान्यता दिली होती आणि याच विरोधात हि चळवळ उभी राहिली होती.
लढता लढता केलेल्या चिंतनातील काही, बहुजन स्रीवाद, मुस्लिम प्रश्नाची गुंतागुंत ही त्यांनी लिहिलेली पुस्तके आहेत. विविध नियकालिकांमधून ही त्यांनी विपुल लेखन केले आहे. आपल्याकडे गेल्या सत्तर-ऐंशी वर्षात या काळात कम्युनिस्ट पक्ष मार्क्‍सवादी असण्याची एक टिपिकल फ्रेम तयार झाली होती, ती म्हणजे दाढी वाढवून, नेहमी गंभीर असायचं, साहित्य – कला – संगीत आदींच वावड असणं. भयंकर शिस्तप्रिय असणं.मात्र कॉम्रेड सोनवणे यांनी ही रुक्ष चौकट मोडीत काढून टिपिकल डावं असण्याला छेद दिला असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget