Halloween Costume ideas 2015

‘‘माझे जीवन ईथपर्यंतच आहे...’’

ayesha

‘‘माझी आयेशा तर गेली. तिच्या नवऱ्याला फाशी झाली तरी ती परत येणार नाही. माझी देशाला विनंती आहे, हिंदू-मुस्लिम सोडा, अशाच अनेक मनिषा आणि आएशांना वाचवून घ्या.’’ 

- लियाकत मकरानी. (आयेशाचे वडील)

फेब्रुवारी रोजी आयेशा नावाच्या तरूणीने साबरमती रिव्हर फ्रंटवरून बसून जो व्हीडीओ तयार केला तो सुरूवातीला माझ्या लक्षातच आला नाही. पण जेव्हा लक्षात आला तेव्हा मी स्तब्ध झाले. त्या तरूणीने मृत्यूपूर्वी ज्या पद्धतीने तो व्हिडीओ तयार केला तो आश्चर्य चकीत करणारा होता. तिच्याकडे पाहून ती काही सेकंदात आत्महत्या करेल असे चुकूनसुद्धा वाटत नव्हते. ती म्हणाली, ’’ हॅलो! अस्सलामुअलैकुम! माझे नाव आयेशा आरीफ खान. मी तेच करणार आहे जे मला करावयाचे आहे. माझ्यावर कोणाचा दबाव नाही. जर त्याला माझ्यापासून स्वातंत्र्य हवे असेल तर ते त्याला मिळाले पाहिजे. माझे जीवन येथपर्यंतच आहे. मी आनंदी आहे की मी माझ्या अल्लाहला भेटणार आहे. मी अल्लाहला विचारणार आहे की मी कुठे चुकले? मला चांगले आई-वडिल मिळाले,  चांगल्या मैत्रीणी मिळाल्या. असेही असू शकेल की कदाचित माझे नशीबच वेगळे असेल. असो ! मी आनंदी आहे. मी अतिशय संतुष्ट मनाने सगळ्यांना गुडबाय म्हणत आहे. मी प्रार्थना करते की ही प्रेमळ नदी मला आपल्या प्रवाहासोबत गळाभेट घेईल. मी अल्लाहकडे प्रार्थना करेन की पुन्हा मला कधीही मानवाचा चेहरासुद्धा दाखवू नको.’’ 

वरील शब्द हे कुठल्याही संवेदनशील माणसाचे काळीज कापण्यासाठी पुरेसे आहेत. मी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कित्येक तास अस्वस्थ होते. ज्या पद्धतीने आणि ज्या कारणाने तीने आत्महत्या केली ती पद्धत आणि ते कारण मला सारखे बेचैन करत आहे. साबरमती रिव्हर फ्रंट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व्ही.एम. देसाई यांनी या संदर्भात म्हटले आहे की, ’’आम्हाला आएशाचा फोन मिळाला आहे. ती 25 फेब्रुवारी रोजी 70 मिनिटे आपल्या पतीशी बोलत होती. तिचे बोलणे तिने रेकॉर्ड करून ठेवले आहे. बोलताना तिच्या पतीने तिला सांगितले आहे की, मी तुला घेवून जाणार नाही. तुला नक्कीच मरायला पाहिजे. आणि मरतानाचा व्हिडीओ तयार करून मला पाठव. तो व्हिडीओ पाहिल्यानंतर मला तुझ्या मृत्यूचा विश्वास होईल. आयेशाने सासरवाडीच्या लोकांकडून झालेल्या असह्य त्रासामुळे आत्महत्या केलेली आहे.’’ 

मी कितीही भावनिक झाली असली तरी ही गोष्ट विसरू शकत नाही की आयेशाने चूक केली. आत्महत्या ही कुठल्याही समस्येचा उपाय असू शकत नाही. इस्लामने तर आत्महत्येला हराम केलेले आहे. तिचे निकाह आणि तलाक संबंधीचे ज्ञान शुन्य होते. असाच माझा अंदाज आहे. कारण सासुरवाडीकडून असहनीय छळ होत असेल तर ती सरळ खुला घेऊन मोकळी होवू शकली असती. ती उच्चशिक्षित होती. नोकरीही करत होती. तरूण होती. मूलबाळ नव्हते म्हणून तिला दुसरे लग्न करण्यामध्ये फारशी अडचण आली नसती. आत्महत्या करून तिने चुकीचे उदाहरण समाजासमोर ठेवले आहे आणि ज्या पद्धतीने तिला मृत्यूनंतर सहानुभूती मिळत आहे त्यामुळे मला भीती आहे की, याच अवस्थेत असलेल्या इतर मुलीसुद्धा असेच टोकाचे पाऊल उचलण्याचे धाडस करतील. ईश्वर करो माझी ही भीती खोटी ठरो.

जीवन हे अनंत शक्यतांनी ओतप्रोत भरलेले आहे. कुठलेही एक नाते अयशस्वी झाले तर सर्वकाही संपलं असं होत नाही. मुस्लिम समाजामध्ये तलाक झालेल्या महिलांचे पुनर्विवाह होणे कठीण झालेले आहे हे मान्य करावे लागेल. कदाचित आपलाही पुनर्विवाह होणार नाही. झाला तरी असाच पती पुन्हा मिळाला तर काय होईल? कदाचित अशा प्रश्नांनी तिच्या मनामध्ये काहूर माजवले असेल. म्हणून तीने हे टोकाचे पाऊल उचललेले असावे. आयेशाचे पती आरीफ खान यांना अटक करण्यात आलेली आहे. लवकरच त्याच्या आई-वडिलांनाही अटक होईल. म्हणजे आयेशा जीवानीशी गेली आणि आरीफचे कुटुंब आपल्या उद्धट आणि अज्ञानी स्वभावामुळे देशोधडीला लागणार, ही फार मोठी सामाजिक हानी आहे.  

आरीफ एक उच्चशिक्षित तरूण असून, राजस्थानच्या जालोरमध्ये एका ग्रेनाईट मॅन्युफॅ्नचरिंग कंपनीमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करत होता. शिवाय तो स्वतःही ग्रेनाईट विकत होता. महिना 60 हजारांपेक्षा जास्त त्याची कमाई होती. एवढे असूनही त्याला आणि त्याच्या आई-वडिलांना समाधान नव्हते. या उलट आयेशाचे वडील राजस्थानमधून रोजगारासाठी म्हणून गुजरातमध्ये आले. ते टेलरिंगचा व्यवसाय करायचे. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे दोन्ही मुलं शिकू शकली नाहीत. परंतु आपल्या अंगभूत गुणांमुळे आयेशाने पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले होते व पीएचडीची तयारी करत होती. ती अतिशय समजदार होती, सुंदर होती, सुशील होती म्हणूनच आरीफ खानच्या कुटुंबांनी सून म्हणून तिला निवडले होते. आयेशाच्या आईने प्रेसला सांगितले की, आरीफने लग्नाच्या वेळेस बोलणी सुरू असताना सांगितले होते की, ते आयेशाचे शिक्षण पुढे चालू ठेवतील. तिला नोकरी करायची इच्छा झाल्यास तीही करू देतील. मुलगा उच्चशिक्षित असल्याने आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला. ते लोक आमच्यापेक्षा संपन्न होते. म्हणून कर्ज घेऊन आम्ही आयेशाचे लग्न केले. ते कर्ज फेडण्यासाठी आयेशाच्या छोट्या भावाला शाळा सोडून खाजगी बँकेत लोन एजंट म्हणून काम करावे लागले. 

वास्तविक पाहता आत्महत्येच्या अशा अनेक घटना अलिकडे होत आहेत. अनेकजण फेसबुक लाईव्ह करत जीव देत आहेत. खरे तर अशा घटनांची मुळीच दखल घ्यायला नको, असे मानसशास्त्रज्ञांचे मत आहे. परंतु आयेशाची आत्महत्या दोन कारणांमुळे दखलपात्र झाली आहे. एक तर तिने हसत-हसत मृत्युला कवटाळले. दूसरे तिने आत्महत्या करून भारतीय मुस्लिम समाज व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह लावले.

या प्रश्नचिन्हाचा विचार भारतीय समाजाला विशेषतः मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, उलेमा, बुद्धिजीवी आणि इतर सामाजिक संघटनावाल्यांना करावा लागेल. एक सभ्य समाज म्हणून आपल्या तरूण पिढिला इस्लामी संस्कार देण्यामध्ये कमी पडत आहोत, हे या आत्महत्येवरून सिद्ध झालेले आहे. या सत्याचा स्विकार करून आपली चूक दुरूस्त करावी लागेल. एवढे जरी केले तरी आयेशाची आत्महत्या वाया जाणार नाही. ईश्वर तिच्या आत्म्याला शांती देओ. (आमीन.)

- मिनाज शेख, पुणे

लेखिकेचा संपर्क :  98902 45550

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget