Halloween Costume ideas 2015

शिवजन्मोत्सव सोहळ्यात कोरोना योद्ध्यांचा सन्मान

कोन-कल्याण खाडीवरील पुलाला ‘छत्रपती शिवाजी महाराज पूल' असे नाव देण्याची प्रा.विनोद पाटील यांची मागणी

'साप्ताहिक शोधन'चे कार्यकारी संपादक व ज्येष्ठ पत्रकार शाहजहान मगदुम यांचा कलानिकेतन मंडळ कोनगाव व ओबीसी एकता समता परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९१ व्या जयंती उत्सवानिमित्त कोनगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे, कोनगावच्या सरपंच डॉ. रुपाली अमोल कराळे, उपसरपंच सौ. कृतिका प्रमोद पाटील व प्रा. विनोद हनुमान पाटील यांच्या हस्ते 'कोरोना योद्धा' म्हणून सन्मान करण्यात आला.


कोनगाव (ता. भिवंडी)

शुक्रवार दि.१९ फेब्रुवारी २०२१ रोजी कलानिकेतन व्यायामशाळा कोनगांव येथे राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित कोनगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपतराव पिंगळे यांच्या शुभहस्ते संत जगतगुरु तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन सरपंच डॉ. रुपाली अमोल कराळे, उपसरपंच सौ कृतिका प्रमोद पाटील, पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

कोविड-१९, कोरोनाकाळामध्ये कर्तव्यनिष्ठ, सामाजिक बांधिलकी, समाजहिताची, देशहितासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता  उदात्त हेतूने जनसेवा केल्याबद्दल मान्यवरांच्या शुभहस्ते ६० कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला.

कोरोनाकाळात जमाअत-ए-इस्लामी हिंद या सामाजिक संघटनेच्या वतीने कोनगाव परिसरात संघटनेचे स्थानिक अध्यक्ष इन्तखाब आलम यांच्यासह शोधनचे कार्यकारी संपादक शाहजहान मगदुम, अफसर खान, डॉ. दानिश खान, डॉ. अन्सार शेख, नूर मॅ डम, मजहर हक इत्यादींनी गरीब कुटुंबांना धान्य, जीवनोपयोगी साहित्याचे वाटप, मेडिकल कॅम्पचे आयोजन, होमियोपॅथिक औषध अर्सेनिक अल्बम-३० चे मोफत वाटप इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यापैकी अनेकांचा या कार्यक्रमात कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.

सदर कार्यक्रमास कोनगाव  ग्रामपंचायत सदस्य, भिवंडी पंचायत समिती सदस्य आणि प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.

२४ ऑक्टोबर१६५७ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांनी ऐतिहासिक कोन-कल्याण खाडीवर स्वराज्याचे पहिले आरमार स्थापन केले. याचा आम्हा कोनगांव वासीयांना सार्थ अभिमान आहे. कोन-कल्याण खाडीवरील पुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्याच्या मागणीचे निवेदन कोनगावच्या सरपंच डॉ.रुपाली अमोल कराळे, उपसरपंच कृतिका प्रमोद पाटील, ग्रामविकास अधिकारी जीवन ठाकरे यांना पोलीस निरीक्षक गणपतराव पिंगळे यांच्या उपस्थितीत देण्यात आले.

सरपंच डॉ. रुपाली कराळे यांनी आपल्या मनोगतात, कोनगांवच्या हद्दीतील कोन-कल्याण खाडीवरील पुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करून पाठपुरावा केला जाईल असे सांगितले.

गणपतराव पिंगळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेल्या कार्याची माहिती सांगून कोनगांव व परिसरातील जनतेला उद्देशून 'आपले कुटुंब, आपली जबाबदारी ' या शासनाच्या कार्यक्रमाची माहिती देऊन कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून सावध होऊन आपले आणि आपल्या कुटुंबाचे कोरोनापासून रक्षण करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचाल न अफसर खान सर यांनी केले. शिवव्याख्याते शिवश्री राज पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या कार्याची, त्यागाची आठवण करून विस्तृत माहिती दिली.

 कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कलानिकेतन मंडळ आणि ओबीसी एकता समता परिषदेचे अध्यक्ष प्रा.विनोद हनुमान पाटील कोनकर, किरण म्हात्रे (संघटक), कौशल कराळे (खजिनदार), अनंता म्हात्रे (सहचिटणीस), प्रमोद हनुमान पाटील, उपाध्यक्ष हरेश कराळे, शाम पाटील, सतीश म्हात्रे (चिटणीस), मुकेश पाटील (सहखजिनदार), कार्यकारी सदस्य यांनी विशेष मेहनत घेतली.

प्रा. विनोद पाटील यांनी कोरोना योद्ध्यांचा आणि गावातील समाजरत्नांचा सन्मान करणे आणि शिवजयंती साजरी करून छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेल्या  कार्याची माहिती जनतेपर्यंत पोहचविणे  हे कलानिकेतन मंडळ आणि ओबीसी एकता समता परिषदेचे कर्तव्य आहे, असे सांगून सर्व उपस्थितांचे आभार मानले.


Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget