Halloween Costume ideas 2015

सूरह अल् आअराफ : ईशवाणी (सुबोध कुरआन)


(१९०) पण जेव्हा अल्लाहने त्यांना एक सुखरूप मूल दिले तेव्हा ते त्याच्या बक्षीस व मेहरबानीत इतरांना त्याचा भागीदार ठरवू लागले. अल्लाह फार उच्च व श्रेष्ठ आहे त्या अनेकेश्वरवादी गोष्टीपासून जे हे लोक करतात.१४६ 

(१९१) कसले नादान आहेत हे लोक की त्यांना अल्लाहचा भागीदार ठरवितात जे कोणतीही वस्तू निर्माण करीत नाहीत उलट स्वत: निर्मिले जातात. 

(१९२) जे यांचीही मदत करू शकत नाहीत आणि आपल्या स्वत:चे सहाय्य करण्यासदेखील समर्थ नाहीत. 

(१९३) जर तुम्ही यांना सरळमार्गावर येण्याचे आमंत्रण द्याल तर ते तुमच्या पाठीमागे येणार नाहीत. मग तुम्ही त्यांना हांक द्या अथवा स्तब्ध राहा, दोन्हीही अवस्थेत तुमच्यासाठी ते सारखेच राहतील.१४७ 

(१९४) तुम्ही अल्लाहला सोडून ज्यांचा धावा करता ते तर केवळ दास आहेत ज्याप्रमाणे तुम्ही दास आहात. यांच्याकडे प्रार्थना करून पाहा, यांनी तुमच्या प्रार्थनेचे उत्तर द्यावे जर यांच्याबाबतीत तुमच्या धारणा खऱ्या आहेत. 

(१९५) काय यांना पाय आहेत की त्यांच्या सहाय्याने चालतील? काय यांना हात आहेत की त्यांनी पकडतील? काय यांना डोळे आहेत की ज्यांनी पाहतील? काय यांना कान आहेत की ज्यांनी ऐकतील?१४८ हे पैगंबर (स.), यांना सांगा, ‘‘बोलावून घ्या आपल्या मानलेल्या भागीदारांना, मग तुम्ही सर्वजण मिळून माझ्याविरूद्ध डावपेच रचा आणि मला मुळीच सवड देऊ नका, 

(१९६) माझा संरक्षक व साहाय्यक तो अल्लाह आहे ज्याने हा ग्रंथ अवतरला आहे आणि तो सदाचारी लोकांची मदत करतो.१४९ 

(१९७) याउलट तुम्ही अल्लाहव्यतिरिक्त ज्यांचा धावा करता ते तुम्हाला सहाय्य करू शकत नाहीत आणि स्वत: आपल्याला मदत करण्याचेदेखील सामर्थ्य त्यांच्यात नाही, 

(१९८) इतकेच नव्हे तर जर तुम्ही त्यांना सरळमार्गावर येण्याचे आवाहन कराल तर ते तुमचे म्हणणे ऐकूही शकत नाहीत. सकृतदर्शनी तुम्हाला असे दिसते की ते तुमच्याकडे पाहात आहेत परंतु वस्तुत: ते काहीही पाहात नाहीत.’’ 

(१९९) हे पैगंबर (स.)! मृदूता आणि क्षमाशीलतेच्या मार्गाचा अंगीकार करा. भलेपणाचे उद्बोधन देत राहा आणि अडाण्यांशी विवाद टाळा. 

(२००) जर एखादे वेळी शैतानने तुम्हाला उद्युक्त केले तर अल्लाहचा आश्रय मागा, तो सर्वकाही ऐकणारा व जाणणारा आहे. 

(२०१) वास्तविक पाहता जे लोक अल्लाहचे भय बळगणारे आहेत त्यांची स्थिती तर अशी असते की एखाद्या वेळी शैतानाच्या प्रभावाने एखादा वाईट विचार त्यांना स्पर्श जरी करून जात असेल तरी ते ताबडतोब सावध होतात आणि मग त्यांना स्पष्ट दिसू लागते की त्यांच्यासाठी योग्य कार्यपद्धती कोणती आहे. 



146) येथे अनेकेश्वरवाद्यांची अज्ञानतापूर्ण मार्गभ्रष्टतेची आलोचना केली आहे. भाषणाचा उद्देश हा आहे की मानवजातीला सर्वप्रथम अस्तित्व देणारा सर्वोच्च अल्लाह आहे, त्यानेच मानवाला निर्माण केले आहे यापासून अनेकेश्वरवाद्यानांही इन्कार नाही. स्त्रीच्या गर्भाशयात वीर्याला रोखणे, मग त्या सूक्ष्म गर्भाला पालनपोषण करून एक जिवंत मुलाचे रूप देणे, तसेच त्या मुलात नाना प्रकारची शक्ती आणि क्षमता निर्माण करणे आणि त्याला उत्तम निर्मिती बनवून जन्म देणे हे सर्वकाही अल्लाहच्या अधिकारात आहे. जर अल्लाहने स्त्रीच्या उदरात वानर किंवा साप तसेच इतर विचित्र जीव जन्माला घातले किंवा मुलाला पोटातच आंधळा, लंगडा किंवा बहिरा बनविला किंवा त्याच्या शारीरिक व मानसिक शक्तीमध्ये काही कमतरता ठेवली तर कोण आहे जो अल्लाहच्या या रचनेला बदलून टाकेल? या सत्यतेला अनेकेश्वरवादी लोक त्याचप्रमाणे जाणून आहेत ज्याप्रमाणे एकेश्वरवादी जाणतात. म्हणून तर गर्भधारणेच्या काळात सर्व आशा-आकांक्षा अल्लाहशी लागलेल्या असतात की तोच उत्तमरीतीने बाळाला जन्म देईल. यावरसुद्धा अज्ञानपणा आणि नादानीचा हा कळस आहे की जेव्हा आशा पूर्ण होते आणि चंद्रासारखे सुंदर मूल जन्माला  येते तेव्हा कृतज्ञतेसाठी नजर, नियाज आणि चढावे, नैवेद्य मात्र देवी-देवता, अवतार, वली व पीराच्या नावाने होतात आणि बाळाचे असे नाव ठेवले जाते जसे की तो अल्लाहशिवाय इतरांचाच कृपाप्रसाद आहे. या भाषणाला समजून घेण्यात मोठा भ्रम निर्माण झाला आहे ज्याला कमजोर कथनांनी आणखी बळ दिले आहे. प्रारंभी मानवजीताचा जन्म एका जीवापासून झाला असा उल्लेख आला आहे. याने तात्पर्य पैगंबर आदम (अ.) आहेत आणि त्वरित एक पुरुष आणि स्त्रीचा उल्लेख आला आहे ज्यांनी प्रथमत: अल्लाहशी सुदृढ बालकाच्या जन्मासाठी प्रार्थना केली. जेव्हा त्यांना सुदृढ बाळ मिळाले तेव्हा त्यांनी अल्लाहच्या देणगीत दुसऱ्यानासुद्धा भागीदार ठरविले. म्हणून लोकांनी अर्थ काढला की हे अनेकेश्वरवादी जोडपे निश्चितच आदम (अ.) व हव्वा  असतील. या भ्रमावर कथनांचा एक स्तर चढला आणि एक पूर्ण कथा तयार करण्यात आली. परंतु वास्तविकपणे ही कथने असत्य आहेत आणि कुरआन व्याख्यानाचा अर्थ असा होतच नाही. कुरआन जे सांगत आहे ते केवळ एवढेच की मानवजातीचे पहिले जोडपे ज्याने मानवी वंशावळ सुरू झाली त्यांना निर्माण करणारा अल्लाहचा आहे. या निर्माणकार्यात दुसरा कोणी सामील नव्हता. प्रत्येक जोडप्याच्या मिलाफानंतर अपत्य जन्माला घालणारासुद्धा अल्लाहच आहे. या सत्यतेला तुमच्या सर्वांच्या मनाने स्वीकारले आहे. म्हणून याचमुळे आशा निराशांच्या स्थितीत जेव्हा प्रार्थना करता तेव्हा अल्लाहशीच करता. परंतु नंतर जेव्हा आशा पूर्ण होतात तेव्हा तुम्हाला अनेकेश्वरत्व आठवते. या वर्णनात विशेष पुरुषाचा किंवा विशेष स्त्रीचा उल्लेख आला नाही. अनेकेश्वरवादी प्रत्येक पुरुष आणि स्त्रीच्या मनोदशेचे ते वर्णन आहे. येथे ही गोष्ट ध्यानात  ठेवणे आवश्यक आहे. या आयतीत अल्लाहने ज्या लोकांची निंदा केली आहे ते अरबचे अनेकेश्वरवादी होते आणि त्यांचा दोष हा होता की सुदृढ बाळ जन्माला यावे म्हणून अल्लाहशीच प्रार्थना करीत असत, परंतु जेव्हा सुदृढ बाळ जन्मले तर अल्लाहच्या या देणगीत दुसऱ्याना कृतज्ञतेचा भागीदार ठरविले जात. नि:संदेह ही स्थिती अत्यंत वाईट होती. परंतु आता तर एकेश्वरवादींमध्येसुद्धा आम्ही अनेकेश्वरत्व पाहतो तो तर यापेक्षासुद्धा अत्यंत वाईट आहे. हे अत्याचारी तर संततीसुद्धा इतरांपासून मागतात. गर्भधारणेच्या वेळी नवस दुसऱ्याच्याच नावाचा असतो आणि बाळ जन्मल्यावर नवस त्यांचाच फेडला जातो. अज्ञानताकाळातील अरब तर अनेकेश्वरवादी होते परंतु हे तर एकेश्वरवादी आहेत.

147) म्हणजे या अनेकेश्वरवादींच्या बनावटी उपास्यांची स्थिती अशी आहे की सरळमार्ग दाखविणे आणि आपल्या चाहत्यांचे मार्गदर्शन करणे तर लांबचेच आहे पण हे एखाद्याच्या हाकेला उत्तरसुद्धा देऊ शकत नाहीत.

148) येथे एक गोष्ट स्पष्ट समजून घेतली पाहिजे की अनेकेश्वरवादी धर्मात तीन गोष्टी वेगवेगùया स्वरुपात असतात. 

(1) ती मूर्त, चित्र किंवा प्रतीक ज्यांची पूजा केली जाते.  (2) ते लोक किंवा आत्मे किंवा प्रतीक ज्यांना उपास्य समजले जाते आणि ज्यांचे प्रतिनिधित्व मूर्त किंवा चित्रांच्या रूपात केले जाते.  (3) ती श्रद्धा आणि आस्था जी या अनेकेश्वरवादी कर्म आणि उपासनेच्या केंद्रस्थानी आहे. कुरआन  अनेक  प्रकारे  या  तिन्ही  प्रकारांवर  प्रहार  करतो. येथे  मात्र  आलोचना पहिल्या प्रकाराची आहे. म्हणजेच त्या मूर्तचा धिक्कार केला जात आहे ज्यांच्यासमोर अनेकेश्वरवादी आपल्या उपासनांचे विधी पार पाडतात आणि नैवेद्य दाखवितात आणि प्रार्थना करतात.

149) हे उत्तर आहे अनेकेश्वरवादींच्या त्या धमःयांचे जे ते पैगंबर मुहम्मद (स.) यांना देत होते. ते धमकावित होते की तुम्ही जर आमच्या उपास्यांचा विरोध करण्यापासून थांबले नाहीत आणि त्यांच्याप्रति लोकांच्या आस्था खराब करण्याचे सोडून दिले नाही तर तुमच्यावर त्या देवतांचा प्रकोप होईल व त्यात तुमचा नाश होईल.

150) या आयतीत प्रचार-प्रसार आणि मार्गदर्शन व सुधारकार्याच्या फायद्यांविषयी काही महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत.

1) सत्याचे आवाहन करणाऱ्याचा मृदु स्वभाव, सहनशील आणि उदार öदय असणे आवश्यक आहे. आपल्या साथीदारांशी स्नेही, लोकांसाठी दयाळु आणि आपल्या विरोधकांसाठी सहनशील असणे आवश्यक आहे. त्याला तीव्र उत्तेजनापूर्ण समयीसुद्धा स्वभावाला थंड ठेवणे आवश्यक आहे. अति अप्रिय गोष्टींनासुद्धा उदारतेने दुर्लक्षित केले पाहिजे.

2) सत्याच्या आवाहनाच्या सफलतेचे गमक हे आहे की मनुष्याने तत्त्वज्ञान उगळत बसू नये. तसेच एखाद्या गोष्टीचा कीस काढत बसू नये तर लोकांना साध्यासरळ भलाईकडे बोलवावे ज्यांना सर्वजन भले समजतात. त्या भलाईला समजण्यासाठी सामान्य बुद्धी पर्याप्त असते आणि ही सामान्य बुद्धी सर्वांनाच प्राप्त आहे. अशा भल्या पुकारविरुद्ध जे लोक हंगामा करतात ते स्वत: आपल्या विफलतेचे आणि या सत्य आवाहनाच्या सफलतेचे प्रयोजन करतात.

3) या आवाहनाच्या कामात जेथे हे आवश्यक आहे की भल्याची आवड असणाऱ्याना भलाईचा उपदेश दिला जावा, तसेच याबरोबर हेसुद्धा तितकेच महत्वाचे आहे की अज्ञानी लोकांशी, भांडखोरांशी तोंडी लागण्यात आपला वेळ वाया घालवू नये. हा वेळ आवाहनकार्यात सत्कामी लावावा. आपली शक्ती आणि वेळ अशा निरर्थक कामात वाया घालवू नये, अडाण्यांशी विवाद टाळावा.

4) नंबर 3 मध्ये जो आदेश दिला आहे. त्याच संदर्भात हा आदेश आहे की जेव्हा सत्याचे आवाहन करणारा विरोधकांचा अत्याचार आणि अडथळे आणि आरोपाने आपल्यात उत्तेजना निर्माण होतांना पाहतो, तेव्हा त्याला त्वरित समजून घेतले पाहिजे की ही शैतानी चाल आहे आणि तात्काळ अल्लाहचा आश्रय घेतला पाहिजे की अल्लाहने आपल्या दासाला या उन्मादात वाहून जाण्यापासून वाचवावे. सत्याच्या आवाहनकार्यात त्यामुळे अडथळा निर्माण होऊ नये. सत्याचे आवाहनकार्य थंड मनानेच होऊ शकते. भावनेच्या आहारी न गेलेले आणि परिस्थितीला चांगल्याप्रकारे समजून घेऊन उचललेले पाऊल सत्याकडे नेते, परंतु शैतान या कार्याला उर्जितावस्थेत पाहू शकत नाही. म्हणून शैतान सतत प्रयत्नशील असतो की, आपल्या भाईबंदाद्वारे या सत्याचे आवाहन करणाऱ्यावर अनेकप्रकारे हल्ले करून त्याला उद्दिपित करावे. हा प्रयत्न व अपील शैतान आकर्षक ढंगात करतो. तो नेहमी मोठमोठ्या धोकादायक आश्वासनांना धार्मिक आवरण देतो, परंतु त्याच्या तळात फक्त 'स्व'पूजेशिवाय काहीच नसते. म्हणून शेवटच्या दोन आयतीत सांगितले गेले आहे की जे लोक ईशभय बाळगतात आणि दुष्टतेपासून दूर राहतात, ते आपल्या मनावर शैतानाचा दुष्प्रभाव पडू देणार नाहीत. अशा वेळी ते त्वरित सावध होतात आणि त्यांना सत्याचे आवाहन करण्याचे हित कोणत्या मार्गात आहे ते स्पष्ट कळते की सत्यशीलतेची निकड  काय आहे? परंतु  ते लोक ज्यांच्या कामात वासना कार्यरत आहे आणि जे शैतानाचे भाऊबंद आहेत तर असे लोक शैतानाच्या प्रभावाखाली त्वरित येतात आणि वाममार्गावर चालू लागतात.

या कथनाची एक सामान्य संधी आहे आणि ती म्हणजे ईशपरायण लोकांची जीवनपद्धती ईशभय न पाळणाऱ्यापेक्षा वेगळी असते. त्यांची स्थिती अशी असते की वाईट विचार लेशमात्रसुद्धा त्यांच्या मनाला शिवला तर त्यांना तीच वेदना होते जी बोट कापल्याने होते. त्यांचा आत्मा त्वरित जागृत होतो आणि दुष्टतेला दूर करतो. याविरुद्ध जे ईशभय बाळगत नाहीत ते वाईटापासून स्वत:ला सुरक्षित ठेवू शकत नाहीत, त्यांचे संबंध शैतानाशी असतात. त्यांच्या मनात वाईट विचार, वाईट ध्येय खदखदत असतात आणि त्यांना या वाईटांपासून आपल्या मनात काहीही बेचैनी वाटत नाही.


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget