Halloween Costume ideas 2015

चला कोरोनाकाळातील अंधारातून प्रकाशाकडे


महामारी झाली तर मस्जिदीत आल्यावर ती बरी होते किंवा माझ्या समाधीजवळ आले तर ती महामारी दूर होऊन जाते अथवा मक्का-मदिना याबाबतीत चमत्कार करत असतात, असा दावा किंवा तशी शिकवण प्रेषितांनी कधीही दिलेली नाही. (स्वत:ला ‘बाबा’ असल्याचे सांगून भोंदूगीरी करणारे काही लोकं तसा दावा करत असतील, त्याचा प्रेषितांच्या शिकवणीशी काहीएक संबंध नाही.) प्रेषितांची शिकवण तर इतकी पुरोगामी होती की, जगाचा निरोप घेतांना प्रेषित मुहम्मद सल्लम प्रार्थना करतात की, “हे अल्लाह! माझ्या कबरीचा देव (दैवतीकरण) होऊ देऊ नको, जसं पूर्वीच्या प्रेषितांच्या समुदायांनी त्यांच्या कबरींचा देव (दैवतीकरण) करून टाकलं होतं.” कित्ती कित्ती पुरोगामी भुमिका ही! अशा पुरोगामी प्रेषितांची शिकवण न अभ्यासता निसर्गकर्त्याला डॉक्टरशी अन् मस्जिदीला दवाखान्याशी तुलना करणे विवेकशील बुद्धीमत्तेला धरून नाही.

कोरोना काळात ज्या महान अस्तित्वावर आरोप होतोय, तो आहे तरी कोण? नास्तिकलोक ज्याला ‘निसर्ग’ म्हणून संबोधतात तो निसर्ग नेमका आहे तरी कोण? एखादं झाड म्हणजे निसर्ग असतो का? की एखादी नदी म्हणजे निसर्ग असते का? खरं म्हणजे हा सगळा निसर्ग आणि नैसर्गिक क्रियाकलाप चालविणार्‍या ज्या शक्तीला लेखक ‘गूढ शक्ती’ संबोधित आहेत, तोच तर क़ुरआनातला सृष्टीकर्ता अल्लाह आहे. निसर्गात त्या सृष्टीकर्त्याच्या अस्तित्वाच्या पुराव्यांविषयी स्वत: सृष्टीकर्ताच क़ुरआनात सांगतो -

“आणि तोच आहे ज्याने आकाशातून पाण्याचा वर्षाव केला मग त्याद्वारे सर्व प्रकारच्या वनस्पती उगविल्या, मग त्याद्वारे हिरवीगार शेते व झाडे उगविली, मग त्याच्यापासून थरावर थर असलेले दाणे काढले आणि खजुराच्या फुलोर्‍यांतून फळांचे भरघोस उत्पन्न केले जे ओझ्यापायी झुकले जात आहेत आणि द्राक्षे, जैतून (ऑलिव्ह) व डाळिंबाच्या बागा, ज्यांची फळे एकमेकांंशी साम्य तर ठेवतात तरीसुद्धा त्यांची वैशिष्ट्ये वेगवेगळी आहेत. या झाडांना जेव्हा फळे येतात तेव्हा फळे येण्याची व मग ती पिकण्याची प्रक्रिया जरा विचारपूर्वक पाहा (चिकित्सा करा), या गोष्टीत संकेत आहेत त्या लोकांसाठी जे श्रद्धा ठेवतात” (संदर्भ: क़ुरआन, अध्याय - 6, श्‍लोक - 99)

हा ईश्‍वर, अल्लाह, निसर्गकर्ता किंवा रब वगैरे नावं वेगळी असली तरीही ते एकच अस्तित्व आहे. त्या निसर्गकर्त्याविषयी चर्चा करण्याअगोदर सर्वप्रथम कोरोना रोगाविषयी समजून घेऊ या. हा विषाणु सृष्टीकर्त्यावर नव्हे तर ज्या मानवी समाजाची बहुसंख्या मस्तवाल झाली होती, त्या मानवी समाजावर भारी पडला आहे. हा हल्ला धर्मावर नसून अधर्मी होत चाललेल्या लोकांवर आहे. आता गव्हासोबत किडेही रगडले जातात, तसं या हल्ल्यापासून वाईटांसोबत चांंगलेही भरडले जात आहेत. त्या चांगल्या लोकांचा दोष हा की, ते वाईट लोकांविरूद्ध एक जागतिक चळवळ म्हणून उभी करू शकले नाहीत. जगभरात असहाय समाजावर धनदांडगे देश अत्याचार करत असतांना राष्ट्रवाद, प्रांतवाद, जातीयवादामुळे त्यांची मदत करण्याऐवजी हात आखडता घेतला. आपल्या देशातही धनदांडगे राज्यकर्ते एकानंतर एक अत्याचाराचे निर्णय घेतांना, न्यायव्यवस्थेच्या धुरीणांकडूनच संविधानाच्या मूलतत्त्वांची नालस्ती होत असतांना, देशाच्या मुलभूत समस्यांकडे दुर्लक्षित करण्यासाठी भावनिक मुद्यांना हात घालतांना, अन् काळे कायदे करत असतांना आजही देशातला एक फार मोठा वर्ग बघ्याची भुमिका घेतोय. अन् या अन्यायाविरूद्ध काही थोडेफार लोकं रस्त्यावर उतरून आंदोलन करत असतांना त्यांच्यावर लाठीचार्ज करणे, त्यांना अटक करणे, त्यांच्यावर गोळीबार करणे अन् याला देशभक्ती म्हणून त्यांचं समर्थन करणे हे सगळे प्रकार तो सृष्टीकर्ता कसा काय सहन करून घेईल?

सृष्टिकर्त्याने त्याच्या प्रेषितांद्वारे तीक्ष्ण दात असलेले, तीक्ष्ण पंजे असलेले जंगली हिंस्र प्राणी खायचे नाही, असं स्पष्ट सांगितलेले असतांना अनेक जण वटवाघळे, साप व असेच काहीही भलते सलते प्राणी खात आहेत. अशाप्रकारे त्या निसर्गनिर्मात्याच्या नैसर्गिक नियमांची खुलेआम पायमल्ली झाल्यावर मग त्याने अतिशय सुक्ष्म असे किडे सोडून जगभरातील मोठ-मोठ्या धनदांडग्या देशांना हलवून सोडलंय तर त्यात त्या सृष्टीकर्त्याचा दोष काय?

जबाबदार कोण? 

या निसर्गनियमांची पायमल्ली करणारे, अन्याय करणारे, अन्याय होऊ देणारे, अन् हो! अन्याय सहन करणारेही जबाबदार आहेत. कारण सुज्ञ लोकांनी मानवी समाज व निसर्गावरही होणार्‍या या सगळ्या अत्याचाराविरूद्ध चळवळ राबविली पाहिजे. काही लोकांच्या संकल्पनेत असा कडक न्याय करणारा अन् शिक्षा देणारा उपास्य नसतो. भक्ताच्या हो ला हो करणार्‍या, त्याचं प्रत्येक काम करून देणार्‍या पण न्याय न करणार्‍या अशा असहाय उपास्यांची संकल्पनाच मूळात चुकीची आहे. त्यामुळे काही लौकिक फायदा झाला तर तो चांगला अन् नुकसान झालं तर वाईट, अशी काहींची व्यावहारिक धारणा असते. ती मानवी स्वभावाच्या अनुकूल असली तरी वरकरणी दिसणार्‍या नुकसानामागे त्या निसर्गकर्त्याची काय योजना आहे अन् त्या योजनेने पारलौकिक जीवनाच्या दृष्टीने कसा फायदा होऊ शकतो, तेही अभ्यासणे महत्त्वाचे आहे.

अशी संकटं म्हणजे एक परिक्षाच

आता इथे पारलौकिक जीवन हे शब्द आल्यावर अनेकांच्या भुवया उंचावतील. पण पुढे येणार्‍या काही गोष्टींचा उलगडा करण्यासाठी हे पारलौकिक जीवन समजून घेणे गरजेचे आहे. ज्यांचा सृष्टीकर्त्यावर विश्‍वासच नाही, त्यांच्याशी याबाबतीत पुढे चर्चाच शक्य नाही. पण ज्यांचा त्याच्याशी इमान आहे, त्यांना मृत्यु पलिकडच्या जीवनावरही विश्‍वास ठेवणे अपरिहार्य ठरते. कारण तो सृष्टीकर्ता जर अस्तित्वात आहे तर मग तो न्यायीदेखील असलाच पाहिजे. सगळा न्याय इथे पूर्ण होऊ शकत नाही. इथे एक खून करणार्‍याला एकदाच फाशी मिळते, दहा खून करणार्‍यालाही एकदाच फाशी मिळते. कधी-कधी तर दुसर्‍यांचे धर्मस्थळ तोडणार्‍यालाच ते धर्मस्थळ देऊन टाकले जाते, अन् पिडीत समाजाला पाच एकर जमीन देऊन टाकली जाते. मग हा परिपूर्ण न्याय आहे का? नाही! मग परिपूर्ण न्याय केंव्हा होईल? मग यावरही विश्‍वास ठेवावाच लागेल की, तो सृष्टीकर्ता जर अस्तित्वात आहे, तर मग मृत्युनंतर तो सगळ्यांना पुन्हा जीवंत करून केलेल्या कृत्यांचा जाब घेणार आहे. त्या सृष्टीकर्त्याशी इमान राखून त्याने जे प्रेषित पाठवले त्यांच्या शिकवणीनुसार जर सत्कर्मे केली तर आनंदायी, चिरसुख देणारी शाश्‍वत अशी जन्नत मिळेल नेहमीसाठी. अन्यथा अन्यायी, अत्यचारी, बेइमान लोकांसाठी नरकाग्नी भडकावला जाईल अन् तिथे त्यांना मृत्यु येणार नाही, पण वेदना होत राहतील. सुजलाम सुफलाम सर्वसुखसंपन्न असलेल्या जन्नतसाठी तो सृष्टीकर्ता या लौकिक जीवनात परिक्षा घेऊन जन्नतचे नागरिक निवडतोय. हे जग एक परीक्षागृह आहे. कधी संकटं आणून तर कधी नैसर्गिक आपत्ती तर कधी महामारी आणून परीक्षा घेतोय.

आपण नीतीमत्तेवर राहतो की नाही त्याची परीक्षा, लॉकडाऊन झाल्यावर वस्तुंची साठेबाज़ी करतो की नाही त्याची परिक्षा. जर अत्याचारी अन्याय करतच चालला असेल अन् पीडित तसेच इतर बघ्यांचीच भुमिका घेत असतील तर मग निसर्गकर्त्याला महामारी आणून किंवा नैसर्गिक आपत्ती आणून असा हस्तक्षेप करावा लागतोच. इतिहास साक्षी आहे की, इजिप्तचा फिरऔन व इराकच्या नमरूदसारखे अत्याचारी सत्ताधारी आणि आद व समुदसारखी बलाढ्य राष्ट्रे त्यांनी केलेल्या अन्यायामुळे  किंवा बघ्याची भुमिका घेतल्याने निसर्गकर्त्याने पाठविलेल्या नैसर्गिक आपत्तीत गारद झालीत. क़ुरआनात जागोजागी त्यांचा उल्लेख करून लोकांना चेतावणीचे इशारे दिलेले आहेत, तसेच अनेक ठिकाणी चेतावणीही दिलेली आहे की, निसर्गकर्त्याच्या प्रकोपापासून भिऊन रहा अन् चांगले वागा.

तो कधी कधी संकटात त्वरीत मदत का करत नाही? -

लौकिक जीवनातली ही परीक्षा तो निसर्गकर्ता साक्षात समोर येऊन घेत नसतो, तर लौकिक जीवनाच्या साधनांच्याचद्वारे तो ही परीक्षा घेतो. हे एका उदाहरणानं आपण समजून घेऊ शकतो की, समजा काही विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा सुरू आहे अन् काही विद्यार्थी चुकीची उत्तरे लिहित आहेत. तेंव्हा त्यांच्यावर लक्ष ठेवणारे पर्यवेक्षक किंवा मुख्य परीक्षकांंच्या हे लक्षात आले की, अमुक-अमुक विद्यार्थी चुकीची उत्तरे देत आहेत, तरीही ते विद्यार्थ्याचा हात पकडून त्याला योग्य उत्तर सांगत नाही. ते त्यांची मदत करतील तर मग परीक्षेला अन् त्यानंतरच्या निकालाला तसेच पर्यायाने उत्कृष्ट निकालप्राप्त करणार्‍यांच्या कौशल्याला काहीएक अर्थच उरणार नाही, नव्हे मानवी गुणांनाच अर्थ उरणार नाही. त्यामुळे ते त्याला चुका करू देतात. पण परीक्षा संपल्याचे टोल वाचताच परीक्षार्थीच्या हातातून पेपर हिसकाऊन घेतला जातो अन् मग निकालाच्या दिवशी त्याच्या हातात निकाल दिला जातो. ज्यांनी जास्त योग्य उत्तरे दिलीत, त्यांना एकप्रकारे बक्षिस म्हणून पुढील आयुष्यासाठी यशप्राप्तीची संधी मिळते तर ज्यांनी चुकीची उत्तरे जास्त दिलीत, त्यांना आणखी काही वर्षे गचके खाण्याची शिक्षा मिळते.

पण या लौकिक जीवनाच्या परीक्षेत निसर्गकर्त्याने प्रेषितांमार्फत ग्रंथ रूपाने मार्गदर्शन करून एकाप्रकारे परीक्षा सुरू असतांनाच समोर ‘गाईड’ ठेऊन दिली आहे अन् त्या गाईडमध्ये बघून जीवनाच्या एका एका समस्येरूपी प्रश्‍नाचं उत्तर देण्याची खुली सूट देऊन टाकली आहे. तरीही काही माणसं इतके गाफील की, ती ‘गाईड’ वाचण्याची अन् मानवी जीवनाच्या समस्या सोडविण्याचीही तसदी ते घेत नाही. जर निसर्गकर्त्याने प्रेषितांमार्फत निश्‍चित केलेल्या नैसर्गिक नियमाप्रमाणे हे जीवन व्यतीत केले नाही, तर मरणोत्तर जीवनात आपला निकाल तो निसर्गकर्ता आपल्या हाती देणार आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. 

या लौकिक जीवनात काही लोकं प्रामाणिक वागतात, ते लोकांचं प्रबोधन करण्याचा आणि जगात न्याय व समतेवर आधारित एक व्यवस्था कायम करण्याचा प्रयत्न करत असतात. तेंव्हा दुसरे काही स्वार्थी लोकं त्यांना त्रास देतात, अत्याचार करतात. त्यामुळे निसर्गकर्ता अशा महामारीचा प्रकोप आणून वाईट लोकांसोबतच त्या प्रामाणिक लोकांनाही त्रास देतो, पण मरणोत्तर जीवनात त्या प्राणाणिक लोकांना त्यांच्या सत्कर्माचा योग्य मोबदला तो देणारच आहे. असं हे निसर्गकर्त्याचं गणित आहे. ते समजून घेतलं पाहिजे. अशाप्रकारे निसर्गकर्त्याने आपल्या नैसर्गिक मदतीला लौकिक साधन सामुग्री व मानवाच्या प्रयत्नाशी जोडून टाकलेले आहे.

सृष्टिकर्त्याची मदत, प्रयत्न व खबरदारी -  

ही गोष्ट आणखी एका उदाहरणावरून स्पष्ट होईल की, एखाद्या पशुला एका दोरीने एका खुंट्याला बांधुन टाकलेले आहे. तर ती दोरी जीतकी लांब असेल, तितक्याच दूर तो जाऊ शकतो. म्हणजे त्याच्या दोरीच्या लांबीची त्रीज्या करून त्या पशुच्या भोवती एक वर्तुळ रेखाटलं आणि त्या वर्तुळाच्या बाहेर जर त्या पशुचं खाद्य ठेवलं, तर त्या पशुनं कित्तीही प्रयत्न केला तरीही ते खाद्य त्याला मिळणारच नाही, कारण त्याला बांधलेली दोरी तितकी लांब नाही. पण तेच खाद्य त्या वर्तुळात ठेवलं तर मात्र तो त्या खाद्यापर्यंत चालत जाऊन ते खाद्य खाऊ शकतो. पण एखादा आळशी पशु एकाच जाग्यावर बसुन राहिला आणि त्याची इच्छा असेल की, ते वर्तुळात असलेलं खाद्य निसर्गकर्त्याने त्याच्या तोंडात टाकावं, तर असं घडत नाही. कारण ‘प्रयत्नांती कर्मफळ’ असतं. ते वर्तुळ हेच त्याचं नशिब आहे. पण त्यात असलेलं खाद्य मिळविण्याकरिता त्याला जागेवरून उठावं लागेल, चालावं लागेल अन् ते चाऊन खावं लागेल. म्हणजे प्रयत्न करावे लागतील. तसेच ते खाद्य जर विषारी असेल किंवा पचन होणारे नसेल तर प्रत्येक पशुमध्ये निसर्गकर्त्याने याचं ज्ञान दिलंय की, तो नाकाद्वारे वास घेऊन काय खावं अन् काय खाऊ नये, याचा निर्णय घेऊ शकतो. उदाहरणार्थ गाढ़वासमोर तंबाखु टाकलं तर तो खात नाही. कारण तो स्वत:ची काळजी घेतो, खबरदारी घेतो. अशाप्रकारे प्रयत्न आणि खबरदारी या दोनच गोष्टी निसर्गकर्त्याने प्रत्येक जीवाच्या अख्त्यारित दिल्या आहेत. बाकी त्या प्रयत्नांना अन् खबरदारीचा काय परिणाम होतो, ते निसर्गकर्त्याच्या हातात आहे. तरीही सर्व सजिवांमध्ये फक्त काही मानवप्राणीच आहेत की, ते प्रयत्नही करत नाही अन् खबरदारीही घेत नाही. आता कुणी स्वत:च खबरदारी न घेता चिनी लोकांसारखं वटवाघळं खात असेल किंवा संपुर्ण देश लॉकडाऊन झालेला असतांनाही विनाकारण बाहेर घोळक्यानं हिंडत असेल अन् त्याला कोरोना झाला तर त्यात निसर्गकर्त्याचा काय दोष?

सृष्टिकर्त्याची मदत आणि नैसर्गिक साधनं -  

अशाप्रकारे निसर्गकर्ता स्वत: प्रत्यक्ष हस्तक्षेप करून मदत किंवा शिक्षा करत नाही, तर नैसर्गिक साधनांद्वारे तो हे कार्य करत असतो. याचं आणखी एक उदाहरण म्हणजे कोणतंही औषध थेट माणसाला बरं करत नाही, तर मानवी शरिरातील रोगप्रतिकार करणार्‍या या शक्तीचे घटक (अँटी बॉडीज़) आहेत, त्यांना या औषधी मजबूत करतात अन् ते घटक या रोगजंतूशी संघर्ष करून त्यांचा खातमा करत असतात. आता या अँटी बॉडीज़ शरीरात कोण बनविल्या? सृष्टिकर्त्यानेच. कोरोनावर जेव्हा औषध किंवा लस निघालेली नसतांना जगात हजारो रूग्ण बरे होत होते, ते कसे? त्यांच्या शरिरातील याच रोग प्रतिकारशक्तीच्या घटकांद्वारे जी सृष्टिकर्त्याने निर्माण केलेली आहेत.

उपासनेचा परिणाम -

रोगावर उपचारासाठी औषधाव्यतिरीक्त आणखी एक घटक परिणामकारक असतो, तो म्हणजे तुमची इच्छाशक्ती. त्यामुळेच सर्व नागरिकांना खुश राहून सकारात्मक विचार करण्याचे आवाहन तज्ञ करत आहेत. कारण त्यामुळे तुमची इच्छाशक्ती वाढते. अशाप्रकारे शारीरिक उपचारासोबतच मानसिक उपचाराचीही गरज भासते. ही इच्छाशक्ती, हा मानसकि उपचार त्या सृष्टिकर्त्याची उपासना केल्यानेही होतो. अन्यथा महामारी राहीली एकीकडं पण बीपीचे पेशंट भीतीनेच दगावल्याची अनेक उदाहरणं आहेत. तसेच भयगंड (पॅनिक) निर्माण होऊन बरेच लोकं गरज नसतांना मास्क व सॅनिटायजर्सचा साठा करत बसतात. त्यामुळे या साधनांचा कृत्रिम तुटवडा पडतो. त्यामुळे उपचार करणार्‍या या डॉक्टरांना या साधनांची सर्वात जास्त गरज असतांना त्यांच्या अभावामुळे ते डॉक्टर वेळेवर उपचार करू शकत नाहीत अन् ही महामारी वेगाने वाढत जाते. म्हणून हा भयगंड (पॅनिक) घालविणे औषधाइतकेच अनिवार्य आहे. हा भयगंड अल्लाहवर नितांत विश्‍वास अन् त्याची उपासना केल्याने हमखास दुर होतो. पण ही उपासना फक्त मस्जिदीतच करायची असते, असे नाही. बिकट परीस्थितीत ती घरीही केली जाऊ शकते. खबरदारी म्हणून अल्लाहची इबादत घरीही केली जाऊ शकते.

उपाय योजना -      

खबरदारी म्हणून या संकटसमयी वैद्यकीय उपाययोजना तर कराव्याच लागतील, पण सृष्टिकर्त्याचा रोष ओढवून घेऊ नये म्हणून प्रत्येकाला आत्मचिंतनही करावच लागेल आणि नीतीमत्तेच्या मार्गाने चालावं लागेल. नीतीमत्ता नेमकी कोणती? याच्या मार्गदर्शनासाठी त्या सृष्टिकर्त्यानेच माणसांमधुनच काही माणसं निवडली आणि त्यांना मानवांच्या प्रबोधनाची जबाबदारी दिली. त्या महापुरूषांनाच ‘प्रेषित’ म्हणतात. असे प्रेषित जगभरात प्रत्येक देशात, प्रत्येक युगात आलेले आहेत. त्यांची मूळ शिकवण सारखीच होती. पण अनेक प्रेषित जग सोडून गेल्यानंतर काही स्वार्थी लोकं त्यांच्या माघारी त्यांच्या शिकवणीत भेसळ करून मूळ शिकवणीला भ्रष्ट करून टाकत गेले. त्याचंच सृजन करण्यासाठी दुसरे प्रेषित येत गेले. असे जगभरात जवळपास एक लाख चोवीस हजार प्रेषित होऊन गेले. सर्वात शेवटी प्रेषित मुहम्मद सल्लम हे समस्त जगवासीयांकरिता मार्गदर्शक म्हणून निसर्गकर्त्याने नियुक्त केले. त्यांच्या शिकवणीत जीवनाच्या प्रत्येक ़क्षेत्राविषयी मार्गदर्शन मिळते. हो महामारीच्या संकटसमयी काय उपाय योजना कराव्यात? याचंही मार्गदर्शन मिळते.

महामारीवर पैगंबरी उपाय -    

प्रेषित मुहम्मद सल्लम यांच्या जीवनातही दोन वेगवेगळ्या बिकट प्रसंगी दोन वेगवेगळ्या भुमिका आपल्याला दिसतात. एका प्रसंगी प्रेषित मुहम्मद (सल्लम.) हे अत्यंत आजारी असतांना आणि त्यांना आपल्या पायावर व्यवस्थित उभेही राहता येत नव्हतं इतके थकलेले असतांनाही त्यांनी इतर सहकार्‍यांचा आधार घेत मस्जिदीत येऊन नमाज अदा केली. त्यांच्या सहकार्‍यांनीही अशा अवस्थेत नमाज अदा केल्याची उदाहरणं इतिहासात सापडतात. परंतु मुसळधार पाऊस पडून अतिवृष्टीचं संकट ओढवलेलं असतांना किंवा भरमसाठ थंडी पडून लोकं आजारी पडण्याची शक्यता असतांना प्रेषित मुहम्मद सल्लम यांनी त्यांच्या एका सहकार्‍यांमार्फत लोकांना मस्जिदीत न येता आपल्या घरीच नमाज अदा करण्याच्या सूचना दिल्या. इतकंच नव्हे तर या सुचना देण्यासाठी दररोज दिली जाणार्‍या अजानच्या ओवींमध्ये एक ओळ अतिरीक्त म्हणण्यास सांगितले. ती ओळ अशी होती -

“सल्लु फी बुयुती़कूम (घरातच नमाज पढा)”

अशाप्रकारे स्वत: प्रेषित मुहम्मद सल्लम यांनी नैसर्गिक आपत्तीच्यावेळी खबरदारी घेतलेली इतिहासात आढळते. पुढे जाऊन त्यांच्या सहकार्‍यांनीही महामारीची साथ आलेली असतांना रोगींना वेगळं केलं असण्याचे उल्लेख इतिहासात आपल्याला मिळतात.

कोरोना संंकटासंबंधीमुस्लिम समाजाची भुमिका 

प्रेषितांच्या जीवनचरित्रातून स्पष्ट होते की, संकट किती मोठे आहे, त्याची व्याप्ती किती आणि ते सहन करण्याची लोकांमध्ये क्षमता किती याचा अंदाज लाऊनच परिस्थितीनुरूप प्रेषित सल्लम व त्यांच्या सहकार्‍यांनी किती खबरदारी घ्यायची याविषयी निर्णय घेतलेले आहे. काही मस्जिदींना तर कुलुप लाऊन लोकांना गेटवरूनच परत पाठविण्यात आले. काही ठिकाणी तर मौलवी व मुफ्ती लोकांनी रस्त्यावर येऊन लोकांना आपापल्या घरी जाण्याची अन् रस्त्यावर न फिरण्याची विनंती केली. काही मस्जिदींच्या लाऊड स्पीकर्सवरून सरकारने लावलेल्या जमावबंदीच्या आदेशासंबंधी  माहीतीही देण्यात आली. (यावरून मस्जिदीवरील लाऊड स्पीकर्सचे महत्त्वही लक्षात येते.) या दरम्यान अपवादानेच काही मस्जिदींमध्ये मोठ-मोठ्या धार्मिक सभा झाल्या. तेंव्हा मस्जिदीत मोठ्या संख्येने जमा होऊन खबरदारी घेतली नाही म्हणून त्यांच्यावर अनेक पुरोगाम्यांनी टिका केली. अन् आता मस्जिदी रिकाम्या केल्या जात आहेत, तेंव्हाही जर कुणी ‘देव मैदान सोडून गेला’ अशी टिप्पणी करत असेल तर हा दुटप्पीपणा आहे. पण आता सरकारने धर्मस्थळ उघडण्याची आणि काही खबरदारी घेऊन मर्यादित संख्येत उपासना करण्याची परवानगी दिली असता,मस्जिदीदेखील उघडण्यात आल्या आहेत, पण अर्थातच शासनाच्या अटिशर्थीसह. अशाप्रकारे निसर्गकर्ता महामारीही देतो अन् त्यापासून बचाव करण्याची खबरदारी कशी घ्यावी यासंबंधी प्रेषितांमार्फत मार्गदर्शनही करतो तसेच त्याविरूद्ध लढण्याकरिता प्रतिकारशक्तीही तोच प्रदान करतो. त्याच्याशी इमान राखणारे लोक हे त्या मार्गदर्शनावर आणि शासकीय निर्देशांवरही अंमलबजावणी करत आहेत. 

मस्जिद दवाखाना नव्हे

महामारी झाली तर मस्जिदीत आल्यावर ती बरी होते किंवा माझ्या समाधीजवळ आले तर ती महामारी दूर होऊन जाते अथवा मक्का-मदिना याबाबतीत चमत्कार करत असतात, असा दावा किंवा तशी शिकवण प्रेषितांनी कधीही दिलेली नाही. (स्वत:ला ‘बाबा’ असल्याचे सांगून भोंदूगीरी करणारे काही लोकं तसा दावा करत असतील, त्याचा प्रेषितांच्या शिकवणीशी काहीएक संबंध नाही.) प्रेषितांची शिकवण तर इतकी पुरोगामी होती की, जगाचा निरोप घेतांना प्रेषित मुहम्मद सल्लम प्रार्थना करतात की, “हे अल्लाह, माझ्या कबरीचा देव (दैवतीकरण) होऊ देऊ नको, जसं पूर्वीच्या प्रेषितांच्या समुदायांनी त्यांच्या कबरींचा देव (दैवतीकरण) करून टाकलं होतं). कित्ती कित्ती पुरोगामी भुमिका ही! अशा पुरोगामी प्रेषितांची शिकवण न अभ्यासता निसर्गकर्त्याला डॉक्टरशी अन् मस्जिदीला दवाखान्याशी तुलना करणे विवेकशील बुद्धीमत्तेला धरून नाही. निष्ठूर अशी नास्तिकता आणि भाबडा असा दैववादाच्या अंधारापेक्षा व्यावहारिक व संतुलित असा प्रकाश आपल्याला अल्लाहचा संदेश आणि प्रेषित मुहम्मद सल्लम यांच्या जीवनात आणि त्यांच्या शिकवणीत पाहायला मिळतो. बुद्धीजीवी, विचारवंत, पुरोगामींनीही टिका करण्यापूर्वी ही पुरोगामी शिकवण अभ्यासण्याची अन् पटली तर ती स्वीकारण्याची गरज आहे. तेंव्हा चला तर कोरोनामुळे काही लोकांनी हेतुपुरस्पर पसरविलेल्या नास्तिकता , ईशद्रोह व दांभिकतेच्या अंधारातून इमानच्या प्रकाशाकडे!



- नौशाद उस्मान 

(लेखक : पत्रकार तथा साहित्यिक आहेत. संपर्क : 9029429489)


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget