Halloween Costume ideas 2015

भांडवलशाही साम्राज्य आणि स्त्रिया

Corporate World
भांडवलशाही साम्राज्याच्या अत्याचाराला आणि अन्यायाला सर्व जगातील दुबळे लोकच बळी पडतात. आपल्या फायद्यासाठी दुबळ्या लोकांचे शोषण करणे हाच साम्राज्यवादाचा पाया आहे. भांडवलवादी साम्राज्य हे शोषण आर्थिक लाभ धन-दौलतीसाठी करीत असते. गरीब देश, सर्व जगातील गरीब जनता, आदिवासी, मागासवर्ग, खेडूत इत्यादींबरोबर भांडवलशाही शोषणाचा बळी एक महत्त्वाचा दुर्बळा वर्ग, सर्व जगातील स्त्रियांचा वर्ग आहे. आर्थिक लाभ आणि धनदौलतीच्या हव्यासाप्रित्यर्थ भांडवलशाही साम्राज्य स्त्रियांना तर्‍हे-तर्‍हेच्या जुलूमाला बळी पाडते. त्यांच्यावर दुप्पट तिप्पट कामाचा बोजा टाकला जातो. त्यांच्या शारीरिक आणि भावनात्मक गरजा लक्षात घेतल्याशिवाय त्यांच्याकडून यंत्राप्रमाणे काम करून घेतले जाते. त्यांचे शरीर आणि सौंदर्य विक्रीयोग्य बनविले जाते आणि बाजारात त्याची बोली लावली जाते. त्यांच्या तारूण्यावर अन्याय केला जातो. आपल्या उत्पादनाची विक्री व्हावी म्हणून स्त्रियांचे आर्थिक, भावनात्मक आणि शारीरिक शोषण केले जाते.
    प्राचीन परंपरागत समाजामध्ये स्त्रिया जितक्या पीडित आणि शोषित होत्या त्याहीपेक्षा अधिक अत्याचार आणि शोषणाच्या नव्या भांडवलशाही समाजात बळी पडल्या आहेत. तेथेही त्यांच्या आयुष्याचा कालावधी संकुचित होता. तेथेसुद्धा प्राचीन सामाजिक रीति-रिवाजांमुळे त्या लाचार होत्या आणि निमूटपणे अत्याचाराच्या जात्यात भरडल्या जात होत्या आणि येथेही आधुनिक सुसंस्कृत मापदंडापुढे त्या लाचार आहेत आणि जुलूमांच्या जात्यात भरडल्या जात आहेत.
    समाजाचा दुसरा पीडित आणि शोषित वर्ग खेडूत लोक, गरीब जनता, आदिवासी इत्यादींच्या मदतीसाठी सोशालिस्ट आणि इतर संघटना काम करीत आहेत. परंतु स्त्रियांचा खरा हितचिंतक कोणीही नाही. स्त्रियांचे शोषण करण्यात भांडवलदार आणि समाजवादी दोन्ही सारखेच आहेत. ज्या महिला संघटना त्यांच्या सहानुभूतीचा दावा करतात त्या सर्वात जास्त या अत्याचाराकरिता मार्ग अनुकूल करतात. स्त्रियांना शांती आणि समाधान केवळ इस्लामच्या शीतल छायेत मिळत होते हे सत्य आहे आणि भविष्यातसुद्धा इस्लामच त्यांच्या संकटातून आणि त्रासातून त्यांना मुक्त करू शकतो.

    व्यवसाय, कामाचे ओझे आणि शोषण
    नव्या भांडवलशाही व्यवस्थेस आपल्या सेवेसाठी स्वस्त मजूर आणि कर्मचार्‍यांच्या मोठ्या फौजेची आवश्यकता होती. त्या व्यवस्थेने प्रसारमाध्यमांर्फत व्यवसायी स्त्रिया म्हणजे कामकरी महिलांचा विचार सादर केला. कुटुंब आणि कौटुंबिक जीवनाचे महत्त्व कमी केले. विवाहसंस्थेला सुद्धा निरर्थक ठरवून टाकले. विवाहाशिवाय सहवास (कॅज्युअल सेक्स) विवाहबाह्य लैंगिक जीवन किंवा सहजीवन (लिव्ह इन रिलेशनशिप) सारख्या प्रथांना प्रोत्साहन दिले. महिलांनी कुटुंब आणि मुलांच्या जंजाळात न अडकून पडता त्यांच्या सेवेसाठी सदैव उपलब्ध राहावे हा त्यामागे हेतू होता.
    आय.टी. कंपन्या, कॉल सेंटर्स, बी.पी.ओ.ज् इंडस्ट्री वगैरेमध्ये खालच्या स्तरावरील नोकर्‍यांकरिता स्त्रियांना प्राथमिकता द्यावी अशी ठरलेली नीती अस्तित्वात आहे. स्त्रिया पुरूषांच्या तुलनेत जास्त वेळेपर्यंत ठिय्या मारून बसून काम करू शकतात असे त्याचे कारण या इंडस्ट्रीज सांगतात. स्त्रिया जास्त आज्ञाधारक असतात आणि त्या कमी वेतनावर काम करण्यास तयार होतात. शिवाय त्या सुट्यासुद्धा कमी घेतात. आय.टी.ई.एस. कंपन्यांमध्ये कनिष्ठ पातळीवर एकूण कर्मचार्‍यांच्या निम्म्यापेक्षा जास्त स्त्रिया असण्याची कारणे आहेत, कॉल सेंटरमध्ये तर त्यांची संख्या 35 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. जागतिकीकरणाच्या काळात या कंपन्या स्त्रियांच्या कोणत्याही गरजांची दखल घेत नाहीत. पहिल्यापासूनच कॉल सेंटरमध्ये स्त्रिया रात्रपाळीमध्ये रात्र-रात्र काम करीत होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या सन 2007 च्या निर्णयानंतर आणि फॅक्टरीज अ‍ॅक्टमध्ये केल्या गेलेल्या दुरूस्तीनंतर तर उरलासुरला अडथळासुद्धा संपला. आता तर त्यांच्या विशिष्ट गरजांवर लक्षही दिले जात नाही. गर्भवती असलेल्या काळात त्यांना द्यावयाच्या सुटीसंबंधीचे नियम पाळले जात नाहीत आणि त्यांच्या एकांत वगैरेची व्यवस्थाही केली जात नाही. रात्र-रात्रभर काम केल्यामुळे आरोग्याच्या निरनिराळ्या समस्या उद्भवतात. त्यांच्या मासिक धर्मचक्राची व्यवस्था बिघडते. डब्ल्यूएचओ (जागतिक आरोग्य संघटन)च्या  अहवालानुसार रात्रपाळीमध्ये काम करणार्‍या स्त्रियांच्या स्तनाच्या कॅन्सर (कर्करोग) ची शक्यता वाढते.
    पुरूषांच्या तुलनेत रात्रपाळीमध्ये काम करणार्‍या स्त्रियांमध्ये निद्रानाश, तारूण्यक्षमता कमी होणे, थकणे, हृदयरोग, रासायनिक असंतुलनासंंबंधीचे रोग (मेटाबॉलिक डिसऑर्डर्स) इत्यादीची शक्यता जास्त असते. रात्र-रात्रभर त्या (स्त्रिया) पुरूषांमध्ये राहतात, तर्‍हेतर्‍हेच्या त्रासाच्या बळी पडतात. त्यांना एकाच वेळी आपल्या कामातील उच्चदर्जा सिद्ध करावयाचा असतो आणि पुरूष अधिकार्‍यांना खूश करावयाचे असते. टाईम्स ऑफ इंडियाने यावर भाष्य करताना अगदी बरोबर लिहिले आहे की कंपन्यांमध्ये एका स्त्री-कर्मचार्‍यांकडून अपेक्षा केली जाते की ती अशी एकाच वेळी स्त्रीने मूर्तीमंत सौंदर्यवती व्हावे, प्रसन्न स्त्रीसारखे वागावे, पुरूषासारखा विचार करावा आणि कुत्र्यासारखे काम करावे. - ( Look Like a woman, behave like a
lady, think like a man and work like a dog.)
    जुलूम, पीडितावर अत्याचार म्हणजे या पीडित आणि शोषित महिलांच्या समस्यांच्या निराकरणासाठी आणि अत्याचाराविरूद्ध आवाज उठविण्याची संधी दिली जात नाही. जरी भारतातील मल्टी नॅशनल कंपन्यांमध्ये त्या काम करीत असल्या तरी भारत देशाच्या कायद्यानुसार त्यांना युनियन स्थापन करण्याची आणि सामुदायिक स्वरूपात त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याची संधी त्यांना दिली जात नाही. फॅक्टरीज अ‍ॅक्ट आणि शॉप अँड इस्टॅब्लिशमेंट अ‍ॅक्ट मधील बर्‍याचशा तरतुदींपासून त्यांना दूर ठेवले जाते.
    ज्या मल्टी नॅशनल कंपन्या दिवसा काम करतात त्यासुद्धा रात्री अकरा-अकरा, बारा-बारा वाजेपर्यंत काम करण्यास विवश करतात. त्यांना असे लक्ष्य दिले जाते, जे आठ तासांच्या कायद्याच्या वेळेत पूर्ण करणे शक्य होत नाही. प्रकल्प पूर्ण करण्याच्या दिवसात तर त्यांना कधी-कधी संपूर्ण रात्र ऑफिसमध्ये राहावे लागते. ज्या कंपन्यांमध्ये कायदेशीररित्या रात्रपाळी असते, तेथे स्त्रियांच्या सुरक्षेची किमान व्यवस्था तरी असते. परंतु दिवसा काम करणार्‍या कंपन्यांमध्ये या सवलती नसतात. कधी एकाच मुलीला कित्येक पुरूषांबरोबर ऑफिसमध्ये रात्र-रात्रभर काम करावे लागते. शासन त्या कंपन्यांवर देशाचे कायदे (लेबर लॉ) लागू करत नाही. त्या कंपन्यामध्ये स्त्रियांना अनेकदा आपल्या उच्च अधिकारी आणि सहकार्‍यांकडून होणार्‍या लैंगिक अत्याचाराला बळी पडावे लागते. मागील काही वर्षांमध्ये बी.पी. ओ. सेंटर्स आणि कॉल सेंटर्समध्ये कित्येक काम करणार्‍या स्त्रियांवर बलात्कार आणि हत्यांच्या घडलेल्या घटनांमुळे संपूर्ण देशात हाहाकार माजला होता. सकाळच्या पहिल्या प्रहरी त्याच ऑफिसमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांकडून तानिया बॅनर्जीचा बलात्कार आणि हत्या, एच.पी. कंपनीत काम करणारी प्रतिभा मूर्तीची तिच्या कार ड्रायव्हरने केलेली हत्या आणि दिल्लीमध्ये एकानंतर एक घडलेल्या कित्येक घटनांमुळे जगजाहीर झालेले आहे की वास्तवात परिस्थिती किती वाईट आहे. बलात्कार आणि हत्यांच्या टोकाच्या कृत्यामुळे काही घटना वर्तमानपत्रात येतात, एरवी शांतपणे केले जाणारे लैंगिक अत्याचार आणि शोषण हे अनेक ठिकाणांचे नियमित दुष्कर्म आहेत.
    कॉल सेंटर्स आणि बी.पी.ओ. सेंटर्समध्ये कॉलेजमधून बाहेर पडणार्‍या अगदी तरूण मुलांना आणि मुलींना नोकर्‍या दिल्या जातात. ती तरूण मुले रात्र-रात्रभर शृंगार केलेल्या आणि बहुधा अर्धनग्न असलेल्या मुलींबरोबर बसवलेली असतात. त्या मुलींना कॉल सेंटर्समध्ये सुश्राव्य आवाज आणि मनमोहक शैली आणि हावभाव यांचे खासकरून प्रशिक्षण दिले जाते. काही कॉल सेंटर्समध्ये अमेरिकन ग्राहकांच्या मनोरंजनासाठी त्या मुलींना अश्‍लील संभाषण करण्याचे प्रशिक्षणसुद्धा दिले जाते. नंतर रात्रभर अमेरिकेच्या कानाकोपर्‍यातून येणार्‍या चौकशांची उत्तरे देण्यासाठी फारच तणावग्रस्त कामात अडकून पडावे लागते. या परिस्थितीत लैंगिक भावना निरंकुश होणे (नियंत्रण ठेवणे कठीण होणे) ही मामूली गोष्ट आहे म्हणून फेब्रुवारी 2006 मध्ये केलेल्या एका अभ्यासानुसार नोएडाच्या एका कॉल सेंटरमध्ये 11 टक्के महिलांनी सांगितले होते की, पाचपेक्षा अधिक पुरूषांशी त्यांचे शारीरिक संबंध कायम झाले होते.
    रानटी लोकसमूहांच्या वागणुकीचा आणि वर्तनाचा पगडा सेंटर्सच्या कर्मचार्‍यांमध्ये दिसून आला आहे. त्या लोकांच्या सामुदायिक पार्ट्यामध्ये एका रात्रीत मुले आणि मुली कित्येक मुलींबरोबर किंवा मुलांबरोबर सामुदायिक स्वरूपात अनेक प्रकारच्या लैंगिक क्रियेत लिप्त होतात. याचसाठी मुंबईतील कॉल सेंटर्सच्या कर्मचार्‍यांमध्ये केलेल्या एका सर्व्हेक्षणानुसार 89 टक्के कर्मचारी या प्रकारच्या सामुदायिक पार्ट्यांना नियमित हजेरी लावत असतात. मोठ्या कंपन्यातील सफाई कर्मचारी सांगतात की त्यांना बाथरूमच्या सफाईसाठी वारंवार बोलाविले जाते, कारण बाथरूम कंडोममुळे तुंबलेली असतात.
    कॉल सेंटर्स आणि बी.पी.ओ. सेंटर्स हे एड्स आणि दूसरे घातक रोग पसरविण्याचे माध्यम बनू शकतात, असे वॉल स्ट्रीट जर्नलने सावध केले आहे. या सर्व अश्‍लीलता या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे आणि साम्राज्यवाद आपला स्वार्थ साधण्यासाठी हे सर्व पसरवित आहे. ही सर्व संकटे सोसून स्त्रिया जी कमाई करतात त्यावर बहुतेक सर्व ठिकाणी आणि विशेषकरून आपल्या देशामध्ये त्यांचा काही हक्क नसतो. डॉक्टर प्रमिला कपूर यांच्या सर्व्हेक्षणानुसार मध्यम आणि उच्चमध्यम वर्गामध्ये काम करणार्‍या स्त्रियांच्या आपल्या उत्पन्नावर कोणताही अधिकार नसतो. त्यांना आपली सर्व कमाई आपला नवरा किंवा सासुरवाडीच्या नातेवाईकांच्या हवाली करावी लागते. त्यांना कार्यालयातील समस्या झेलाव्या लागतातच शिवाय घरातील समस्यावी झेलाव्या लागतात. असे असूनसुद्धा बहुधा त्यांच्या चारित्र्याच्या बाबतीत शंका आणि भ्रम त्यांच्या डोक्यावर नाचत असतात.     प्रमिला कपूरने एका लेडी डॉक्टरची हकीगत सांगितली आहे. त्या लेडी डॉक्टरला तिचा पति सर्व उत्पन्न घेऊन त्यातून फक्त दोन रूपये तिच्या खर्चासाठी देत असे.
    कामाचा हा भार आणि चारही बाजूच्या लढाईमुळे शहरी स्त्रिया मानसिक रोगांना बळी पडत आहेत. सन 2009 मध्ये महिला दिवसाची संधी साधून असोचम -  'Associated Chambers of commerce and Industry of india' (जी आपल्या देशाची व्यापारी आणि औद्योगिक संघटनांमधील एक मोठी संघटना आहे.) ने एक खास अहवाल प्रकाशित केला होता. या अहवालानुसार शहरातील कार्पोरेट कंपन्यांमध्ये काम करणार्‍या स्त्रियांपैकी दोन तृतीयांश (2/3) पेक्षा अधिक स्त्रिया जीवनशैली संबंधित ( Life Style related diseases) रोगांना बळी पडल्या आहेत. या अभ्यासानुसार ज्या कंपन्यांमध्ये कामााठी मानसिक तणाव, काम करण्याचा दीर्घ कालावधी, लक्ष्य (Target) आणि कालमर्यादा ( Target and Deadlines) इ. अस्तित्वात असते, तेथील 75 टक्क्यांपेक्षा अधिक स्त्रिया डिप्रेशनला बळी पडलेल्या दिसून आल्या. मीडिया आणि के.पी. ओ. ( K.P.O.) इत्यादींमध्ये काम करणार्‍या स्त्रियांना आजारपणात सहज सुट्या मिळत नाहीत, असे अहवालात म्हटले होते. कामाचा दबाव आणि लक्ष्य (Target) गाठण्याच्या प्रयत्नात 53 टक्के स्त्रियांना दुपारचे भोजनही करता येत नाही.
    या महिला रोग्यांपैकी 77 टक्के महिला डॉक्टरकडेही जाऊ शकत नाहीत. ’असोचम’ च्या अहवालात स्पष्ट शब्दांत पुढीलप्रमाणे टिप्पणी करण्यात आली आहे - ( Corporate female employee's hectic shedule of balancing work place and home along with balancing between.) ‘कॉर्पोरेटमधील महिला कर्मचार्‍यांमध्ये घर आणि काम यांच्या अपेक्षांमधील संतुलनाच्या प्रयत्नांच्या परिणामामुळे खूप मग्न असतात आणि वैयक्तिक आणि सामाजिक गरजांच्या संतुलनाच्या प्रयत्नात त्यांना (स्त्रियांना) आरोग्याकडे दुर्लक्ष करणे भाग पडते.’
    मानसशास्त्रज्ञ शीला दत्ता राय यांच्या एका सर्व्हेक्षणानुसार स्त्रियांमध्ये निद्रानाशाचा रोग वेगात वाढत आहे. आय.टी., कस्टमर केअर, एच.आर. इत्यादीसारख्या तणावग्रस्त व्यवसायांमधील नोकर्‍यांत वाढ झाल्यामुळे पुरूषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये निद्रानाशाचा रोग दिडपट अधिक आहेत. या सर्वेक्षणानुसार कलकत्तामध्ये काम करणार्‍या स्त्रियांमध्ये मागच्या दहा वर्षांमध्ये या रोगात पाचपट वाढ झाली आहे.
    ’टाईम्स ऑफ इंडिया’ ने त्या स्त्रियांच्या अत्यंत दयनीय स्थितीचे वर्णन केलेले आहे.
    दीर्घकाळ आणि थकविणार्‍या कामाच्या दिवसानंतर जेव्हा त्या बिछान्यावर पडतात, तासन्तास छताकडे टक लावून बघत असतात. घड्याळाची टिक-टिक आणि एअरकंडिशनचा हळू आवाजसुद्धा त्यांना खूप त्रासदायक होतो. अर्ध्या रात्रीनंतर नाइलाजाने उठतात आणि झोपेच्या गोळ्या खातात. त्या गोळ्यांमुळे झोप येण्याची जाणीव होऊ लागते तोच अलार्म वाजू लागतो. नंतर तणावाने भरलेल्या आणि थकविणार्‍या दिवसाचा आणि त्यानंतर झोप उडालेल्या रात्रीचा न संपणारा क्रम सुरू होतो.
    या सद्यःस्थितीत मानसिक रोगाशिवाय त्या स्त्रियांना गुंगी आणणारी औषधे घेण्यास भाग पडत आहेत. संयुक्त राष्ट्राच्या एका सर्व्हेक्षणानुसार भारताच्या शहरी क्षेत्रातील स्त्रियांमध्ये गुंगी आणणारी औषधे (ड्रग्स) घेण्यात वृद्धी होत आहे. 20 ते 30 वर्षांच्या वयामध्ये या स्त्रियांना गुंगी आणणारी औषधे घेण्याचे व्यसन लागत आहे आणि अल्कोहोलशिवाय ट्रॅन्क्विलायझर्स हीरोईन आणि प्रॉपोक्सीफॉन सारख्या धोकादायक मादक पदार्थ घेण्याचीसुद्धा सवय लागत आहे. या अहवालात हे सुद्धा सांगितले आहे की स्त्रियांमध्ये नवी दिल्लीत हीरोईनचा वापर सर्वांत जास्त आहे आणि चेन्नईसारख्या परंपरावादी शहरातसुद्धा स्त्रिया या ड्रग्जकडे आकर्षित होत आहेत. अहवालानुसार येथील स्त्रियांमधील ड्रग्जचा वापर विशेषकरून उच्च, आर्थिक आणि सामाजिक स्तरामध्ये आहे. उपरोल्लेखित गुंगी आणणार्‍या पदार्थाशिवाय डायजाफॉम आणि अल्प्रोजोलाम सारख्या औषधांचासुद्धा उच्चशिक्षण घेतलेल्या आणि आर्थिक व सामाजिकदृष्ट्या उच्चवर्गातील स्त्रिया गुंगीसाठी वापर करीत असल्याचे दिसून येत आहे.
    (सदर लेख भांडवलशाही साम्राज्यवाद आणि स्त्रिया या पुस्तकातील असून, लेखकाने पुस्तकातील प्रत्येक पानावर संदर्भ दिले आहेत. सदरच्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद हुसैनखान चांदखान पठाण यांनी केला आहे. सदर पुस्तक 2014 साली प्रकाशित झाले आहे.)

- सय्यद सआदतुल्ला हुसैनी
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget