Halloween Costume ideas 2015

मुहम्मद (सल्ल.) के शहर में

ये किसकी दुआओंने सरपर हाथ रख्खा है
हजारों मुश्किलें है फिर भी थाम रख्खा है
20 ऑक्टोबर 2019 रोजी दुपारी इंडिगोच्या विमानाने सऊदी अरबच्या जद्दाह विमानतळावर उतरताच माझे लक्ष इमिग्रेशन डेस्कच्या पाठीमागे बसलेल्या दहा तरूण सऊदी महिलांकडे गेले. त्यांच्यापैकी आठ नखशिकांत बुरख्यात होत्या तर दोघींनी चेहरे उघडे ठेवले होते. एमबीएस नावाने आंतरराष्ट्रीय जगतात प्रसिद्ध असलेले सऊदी अरबचे राजपुत्र, मुहम्मद बिन सलमान यांच्या हातात प्रत्यक्ष देशाची सुत्रे आल्यापासून महिला सुधारणांच्या नावाखाली त्यांनी जे काही निर्णय घेतले आहेत त्याचा परिणाम म्हणून चेहरा उघडा असलेल्या अनेक अरेबियन वंशाच्या तरूणी माझ्या पुढील 15 दिवसांच्या प्रवासामध्ये ठिकठिकाणी आढळून आल्या.
    काही वर्षांपूर्वी सऊदी अरबमध्ये चेहरा उघडे ठेवून वावरत असलेली एकही महिला दिसने अशक्य होते. आज मक्का आणि मदीना सारख्या तीर्थ क्षेत्रामध्ये सुद्धा हॉटेल, मॉलच्या काऊंटरवर तरूण स्त्रिया बसलेल्या दिसून येतात. रियाज या राजधानीच्या शहरात तर फॅशन शो व अनेक स्त्री-पुरूषांचे संयुक्त मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. एवढेच नाही तर अरबी वृत्तवाहिन्यांवर केस मोकळे सोडून, मेकअप करून अनेक तरूण निवेदिका बातम्या देत असतांना आढळून आल्या. महेरमच्या शरई व्यवस्थेच्या विरूद्ध जाऊन राजपूत्र मुहम्मद बिन सलमान यांनी अनेक निर्णय घेतल्याचे दिसून आलेले आहे. अरबी महिलांना ड्रायव्हिंगचा अधिकार देणे, त्यांना फुटबॉल स्टेडियमच्या गर्दीमध्ये एकटीला प्रवेश देणे, एकट्या महिलेला परदेशी विमान प्रवासाची परवानगी देणे, अरबेत्तर अविवाहित जोडप्यांना सऊदी अरबच्या हॉटेलमध्ये राहण्याची परवानगी देणे यासारखे अनेक निर्णय एमबीएसनी सुधारणांच्या नावाखाली घेतलेले आहेत. ह्या घडामोडीमुळे सऊदी अरबच्या ’शरीयत -पसंद’ समाजामध्ये खळबळ माजलेली आहे. स्पष्टपणे कोणी या निर्णयांचा जरी विरोध करतांना दिसत नसला तरी सुप्तरित्या अनेक लोक राजपुत्राच्या या निर्णयाच्या विरोधात असल्याची जाणीव होते.
    मदिना शहरात पोहोचता-पोहोचता आम्हाला उशीर झाला. जद्दा ते मदिना या पाच तासाच्या प्रवासामध्ये एक गोष्ट लक्षात आली की सऊदी अरब अतिशय विरळ वस्तीचा देश आहे. एकही मोठे शहर या दरम्यान मला आढळले नाही. ज्या काही छोट्या-छोट्या वस्त्या आढळल्या त्याही महामार्गावरून दूर असल्यामुळे त्यांचा स्पष्ट अंदाज घेता आला नाही. अलबत्ता थोड्या-थोड्या अंतरावर एक पेट्रोलपंपाच्या बाजूला एक मस्जिद आणि चारदोन धाबे सदृश्य हॉटेल्स मोठ्या प्रमाणात आढळून आले. त्यावर मदिन्याकडे जाणारे प्रवाशी थांबवून चहा, पाणी करत आणि नमाज अदा करत होते. लातूरच्या हुसैन हज कॉर्पोरेशन तर्फे ’अमजद-अल-गर्रा’ नावाच्या हॉटेलमध्ये आमची थांबण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती.
    जेवण करून झोपण्याचा प्रयत्न केला, परंतु इस्लामचे अंतिम प्रेषित मुहम्मद मुस्तफा सल्ललाहु अलैहि व सल्लम यांच्या रोजा (कबर) च्या इतक्या जवळ येऊन पोहोचल्याने त्यांच्या दर्शनाची ओढ लागल्यामुळे झोप येत नव्हती. त्यात परत भारत आणि सऊदी अरब यात साडेतीन हजार किलोमीटरचे भौगोलिक अंतर असल्यामुळे अडीच तासाची वेळ कमी झाली होती. मी जागाच होतो की, थोड्याच वेळात तेथील वेळेप्रमाणे पहाटे 4.00 वाजता मस्जिद-ए-नबवीमधून अजानची अतिशय सुरेल आवाज ऐकू आली. मी लगबगीने उठून वजू करून मस्जिद-ए-नबवीकडे निघालो. मनात विचारांचा काहूर माजलेला होता. प्रेषित सल्ल. यांनी याच भूमीवर केलेल्या संघर्षाची आठवण येऊन मन भरून आलेले होते. जशी-जशी मस्जिदे नबवी नजरेच्या टप्प्यात येत होती, तशी-तशी मनाची कैफियत बदलत होती. पाच सातशे पावलं चालल्यानंतर सात नंबर गेट (बाबुस्सलाम) मधून आत प्रवेश केला आणि एकदाची मस्जिद-ए-नबवी नजरेच्या टप्प्यात आली. प्रेषित सल्ल. यांचा रोजा आणि मस्जिद एवढी भव्य आहे की एका नजरेमध्ये ती सामावू शकत नाही.
    एकूण 48 प्रवेशद्वार असलेल्या या मस्जिद-ए-नबवीच्या प्रचंड परिसरामध्ये तेवढ्या पहाटेसुद्धा जवळ-जवळ 1 लाख जायेरीन (यात्रेकरूं)चा जमाव जमलेला पाहून आश्‍चर्य वाटले. तहाज्जुदची नमाज कशीबशी अदा करून प्रत्यक्ष प्रेषितांच्या कबरीच्या दर्शनासाठी रांगेमध्ये उभा राहिलो. जगातल्या वेगवेगळ्या देशातून आलेल्या वेगवेगळ्या वर्ण, उंची आणि भाषा बोलणार्‍या लोकांच्या सोबत उभा राहून अंतरराष्ट्रीय एकात्मतेची अनुभूती झाली. प्रचंड मोठी रांग शिस्तबद्धपणे हळूहळू पुढे सरकत होती. रांगेतील प्रत्येक व्यक्ती रडत होता. प्रत्येकाच्या डोळ्यातून आश्रू ओघळत होते. माझीही मानसिक अवस्था अतिशय भावनिक झाली होती. काही क्षणातच मी जगातील सर्वश्रेष्ठ व्यक्तीच्या कबरीसमोर उभा होतो. स्वतःच्या डोळ्यावर विश्‍वास बसत नव्हता की मी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या कबरीच्या समोर सदेह उभा आहे. अगोदर सलाम पेश करून मग एका बाजूला निमुटपणे उभा राहून स्वतःसाठी, कुटुंबातील व्यक्तींसाठी, मित्र परिवार आणि आपल्या प्रिय भारत देशाच्या उन्नतीसाठी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या वशील्याने अल्लाहकडे दुआ मागितली. लोकांची गर्दी इतकी होती की फार वेळ कबरीसमोर थांबता आले नाही. पण पुढील दहा दिवसाच्या मुक्कामामध्ये रोज पहाटे याच वेळी येवून नित्य नियमाने कबरीचे मनसोक्त दर्शन घेण्याचे भाग्य मला लाभले. ज्यामुळे मी स्वतःला भाग्यशाली समजतो.
    काही वेळेतच फजरची अजान झाली, नमाज झाली आणि लख्ख सूर्यप्रकाश पडला. त्या कोवळ्या प्रकाशात मस्जिद-ए-नबवीचे सौंदर्य इतके खुलून दिसत होते की, प्रत्येकजण ते सौंदर्य डोळ्याने टिपून अध्यात्मिक आनंदाच्या सर्वोच्च पातळीवर असल्याचा अनुभव घेत होता. प्रेषितांच्या कबरीवरील हिरवेजर्द गोल घुमट लक्ष वेधून घेत होते. मस्जिद-ए-नबवीची श्रीमंती नजरेत साठवत होतो. सगळीकडे संगमरवरी दगडाने केलेले बांधकाम, शेकडो लोक रात्रंदिवस मस्जिदीच्या साफसफाईसाठी तैनात केलेले आहेत. ते इतक्या मनोभावे सेवा करतात की, लाखो लोकांच्या उपस्थितीत होणारा कचरा एका क्षणात टिपून घेण्यासाठी ते सदैव सज्ज असतात. स्वच्छतेची 24 तास काळजी घेतली जात होती. मी जेव्हा-जेव्हा मस्जिदे नबवीमध्ये प्रवेश केला तेव्हा-तेव्हा स्वच्छता सेवक तत्परतेने स्वच्छतेचे काम करत असल्याचे मी प्रत्यक्ष पाहिले. हलक्याश्या पिवळ्या आणि हिरव्या रंगातील मस्जिदे नबवीचे खांब डोळ्यांना अतिशय अल्लाददायक वाटत होते. मस्जिदे नबवीच्या विस्तीर्ण परिसरात लाल रंगाचे उंची गालीचे मस्जिदीची शोभा वाढवित होते. मस्जिदीमधील दहाव्या क्रमांकाच्या गेटवर असलेल्या वाचनालयाच्या पाटीकडे माझे लक्ष गेले आणि अनाहुतपणे मी वाचनालयात प्रवेश करता झालो. 10 हजारांपेक्षा जास्त पुस्तकांच्या या विशाल वाचनालयाच्या श्रीमंतीचे वर्णन शब्दात करणे केवळ अशक्य आहे. अरबी, इंग्रजी, हिंदी, उर्दू एवढेच नव्हे तर तमीळ, मळ्यालम, तेलगू, फारसी भाषेमधील अनेक पुस्तकांची मांदियाळी येथे आढळून आली. माझा इबादतीनंतरचा पुढील मुक्काम बहुतकरून याच वाचनालयात राहिला.
    अनेक अरबी लोकांच्या संपर्कात केवळ इशार्‍याने आणि थोड्याफार लोकांना येणार्‍या इंग्रजी भाषेने माझ्या दहा दिवसाच्या काळामध्ये अनेक अरबी लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला व अरबी समाज जीवन समजून घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यानच्या काळात एक दिवस वातानुकुलित बसने मदिनादर्शन या कार्यक्रमांतर्गत शहर पाहण्याचा योग आला.
मक्का-मदिनेची वैशिष्टये
    जुलै 2017 च्या जनगणनेप्रमाणे सऊदी अरबची लोकसंख्या 27,136,977 एवढी आहे. ज्यात 22,808,576 सऊदी नागरिक आहेत, बाकीचे सर्व विदेशी लोक त्या ठिकाणी कामधंद्यासाठी म्हणून आलेले आहेत. नागरिक सुविधांच्या दृष्टीने हा देश अतिशय संपन्न आहे. नागरिकांना सर्व प्रकारच्या सोयी आणि सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. याचा अनुभव मलाही आला. सातत्याने जम-जमचे थंड पाणी पिल्याने माझ्या पत्नीला सर्दी झाली. पाच नंबर गेटच्या बाजूलाच असलेल्या ’अल शिफा सरकारी रूग्णालया’मध्ये गेल्यावर मोफत तपासणीसह महागडी औषधे सुद्धा मोफत देण्यात आली.
    मदिनाचा दहा दिवसाचा प्रवास संपवून मक्कामध्ये प्रवेश करता झालो. ’अल-किसवा-टॉवर’ नावाच्या मोठ्या हॉटेलमध्ये आमची थांबण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मदिना येथूनच एहराम (पांढर्‍या रंगाचे दोन कपडे) धारण करून निघालो होतो. हॉटेलमध्ये जेवण केल्याकेल्या काबा दर्शनासाठी रवाना झालो. काब्याच्या प्राथमिक दर्शनाने त्याच मनोदशेची पुनरावृत्ती झाली, जी की प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या कबरीसमोर उभे असताना झाली होती. तवाफ (काबागृहाला सात चक्कर मारणे) व सई (सफा आणि मरवाह नावाच्या दोन टेकड्यांच्या मध्ये सात चकरा मारणे.) पूर्ण करून थोडावेळ काबागृहात थांबून दुआ मागून परत हॉटेलमध्ये गेलो. दुसर्‍या दिवशी बदरचे युद्ध ज्या ठिकाणी झाले ते मैदान पाहण्यासाठी बसने जाण्याची संधी मिळाली. बदर हे ठिकाण मक्कापासून 160 कि.मी. अंतरावर आहे. जाता-येताना दिवसाच्या प्रकाशात सऊदी अरबचा ग्रामीण इलाका पाहण्याची संधी मिळाली. प्रगत देशाची सर्व लक्षणे सऊदी अरबमध्ये आढळून आली.
मक्का शहराचे दर्शनही करता आले. मक्का आणि मदिना दोन्ही शहरांच्या बाबतीत जी एक गोष्ट नजरेत भरण्यासारखी होती ती म्हणजे स्वच्छता. प्रचंड रूंद आणि चकचकीत रस्ते, मोठ-मोठ्या टोलेजंग इमारतींबरोबर छोटी-छोटी टुमदार घरे, प्रत्येक घरासमोर दोन-तीन चार चाकी गाड्या, माझा तर असा विश्‍वास झालाय की, सऊदी अरबमध्ये लोकसंख्येपेक्षा किमान तीन पटीने जास्त चारचाकी वाहन असावीत. शहराच्या बाजूला एकर-दोन एकरची जमीन घेऊन तेथील नागरिकांना त्या ठिकाणी त्यांची जुनी वाहन डम्प करावी लागतात. अशी हजारो चारचाकी वाहने शहराच्या बाहेर डम्प केलेली मी पाहिलेली आहेत. शहरामध्ये एकही वाहन डम्प केलेले आढळून येत नाही. मक्का आणि मदिनाच्या रस्त्यांवर एकही भटका कुत्रा किंवा इतर भटकी जनावरे मला आढळून आलेली नाहीत. चौका-चौकात निरूद्देश्य उभी  असलेली लोकं, वाहनांचा जाम आढळून आले नाही. तीन तास शहरात फिरून 25 सुद्धा माणसं नजरेस आढळलेली नाहीत. तेथील लोक एकतर घरात असतात, गाडीत असतात किंवा कामाच्या ठिकाणी असतात. अरबी लोकांच्या आदरातीथ्याचा अनुभवही मिळाला. रोज असर आणि मगरीबच्या नमाजच्या दरम्यान मक्का आणि मदिनामध्ये बाजाप्ता दस्तरखान अंथरून त्यावर अनेक प्रकारचे खजूर, क्रीम, दही आणि अन्य रूचकर खाद्यपदार्थ मोफत अगदी आग्रहाने दिली जातात. अनेक अरबी लोक टेम्पोमध्ये थंड पाण्याच्या बाटल्या, बंद डब्यातील गरमा गरम चिकन बिर्याणी आणून यात्रेकरूंना मोफत देत असतात. कहवा नावाचे चहा सदृश्य पेय अगदी आग्रहाने पाजविले जाते. कुठल्याही ठिकाणी दानपेटी नाही. एक रूपया खर्च करावा लागत नाही. उलट तेच लोक आपल्यावर खर्च करत असतात. शरीयतची कट्टरपणे अमलबजावणी करणार्‍या या देशातील नागरिकांवर पाश्‍चिमात्य (अ) सभ्यतेचे परिणाम होत असल्याचे स्पष्टपणे जाणवू लागले आहेत. अरबी लोकांचा डीएनए जगातील उत्कृष्ट डीएनए असलेल्या लोकांपैकी एक मानला जातो. उंट आणि बकरीचे दूध पिऊन, पौष्टीक खारीक खाऊन, उंट राखण्यासाठी शेकडो किलोमीटर चालण्याची सवय असल्याने उंच व काटक शरीरयष्टीच्या अरबी लोकांची नवीन पिढी मात्र मैद्याचा पिझ्झा आणि बरगर खाउन तसेच पेप्सी पिऊन भद्दी (स्थूल) होत असल्याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.असो एकूणच 15 दिवसाचे मक्का आणि मदिना शहरातील माझे धार्मिक पर्यटन अत्युच्च अध्यात्मिक आनंद देऊन गेले. त्यासाठी मी अल्लाहचा ऋणी आहे.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget