Halloween Costume ideas 2015

याचना ईशमार्गदर्शनाची

दैनंदिन जीवनात कित्येकदा अशी परिस्थिती निर्माण होते की निर्णय घेणे फार अवघड जाते. दोन पर्याय समोर असतात आणि त्यांचे दोन परिणामही डोळ्यांसमोर दिसू लागतात. हे  करावे की ते करावे? असा प्रश्न पडतो. अशा वेळी इतरांशीही सल्लामसलत करावी लागते. यातून कितीतरी पर्याय सुचवले जातात. पण प्रश्न नेमका सुटेल याची शाश्वती नसते.
माणसाच्या निर्माणकर्त्याने बरे-वाईट पारखण्याकरिता बुद्धी दिली आहे, जिच्या जोरावर आज झालेली भौतिक प्रगती आश्चर्यजनक आणि कौतुकास्पद आहे. तरीही आपण आपल्या  प्रश्नांवर नेमका तोडगा काढण्यात का अपयशी ठरतो?
अशी अडचणीची वेळ फक्त व्यक्तीपुरती मर्यादित नसून सामाजिक स्तरावरही सर्वत्र दिसून येते. सामाजिक जीवनातीलही कित्येक प्रश्नांवर असंतोषाचा भडका उडताना जगभर दिसून  येतो. नवरा-बायकोचे अधिकार व कर्तव्ये यामध्ये समतोल साधता न आल्यामुळे उडणारे खटके, मालकवर्ग आणि कामगारबंधू यांच्या दरम्यान होणारे संघर्ष, व्यक्तीस्वातंत्र्य आणि  समाजहीत यातून निर्माण होणारे वाद इत्यादी बोलकी उदाहरणे आहेत.
जगामध्ये आजपर्यंत जितके वाद, तंटे उद्भवले आणि आजही बघायला मिळतात, त्याचे कारण हेच आहे की तथाकथित बुद्धिजीवींनी अशा समस्यांकडे एकतर्फी नजरेने बघितले आणि  तोडगा म्हणून असमतोल उपाय राबविण्याचा प्रयत्न केला. व्यक्तिगत असो वा सामाजिक प्रत्येक स्तरावर शांतता भंग होण्याचे मूळ कारण हेच आहे.
निर्मळ स्वभाव आणि सद्सद्विवेकबुद्धीची माणसे या जगामध्ये पूर्वीही होती आणि आजही आहेत. अशा लोकांनी नेहमीच हे मान्य केले की जीवनरूपी प्रवासात फक्त आपली बुद्धीच आपल्याला मार्गदर्शन करू शकत नाही तर ज्याने आपल्याला प्रवासाला धाडले आहे त्याची मार्गदर्शिका आपल्या सोबत असणे अत्यंत जरुरी आहे नाही तर प्रवासात खूप अडचणी निर्माण  होतील. विचाराअंती ही माणसे दोन निर्णयांप्रत पोहोचली, एक हा की, ही सृष्टी काही आपोआप निर्माण झालेली नाही तर या सृष्टीचा एक निर्माणकर्ता आहे. दुसरा असा की माणसाचे  जीवन हे फक्त या जगापुरतेच मर्यादित नाही तर पुढे आणखी एक जीवन आहे, ज्यामध्ये जीवनभर केलेल्या बऱ्या-वाईट कर्मांचे परिणाम प्रत्येकासमोर येतील. त्यांनी निरीक्षण केले की  या जगामध्ये कर्मांचे परिणाम साधारणत: निघत नाहीत. येथे तर सदाचारी लोकांच्या नशिबी दु:ख, यातना, कष्ट येतात आणि दुराचारी लोक ऐश व आरामाचे जीवन व्यतीत करतात.  पण सृष्टीचा निर्माणकर्ता न्यायी आहे. तो जरूर प्रत्येकाचा हिशोब घेईल.
निर्मळ स्वभाव आणि सद्सद्विवेकबुद्धी असल्यामुळे या विचारांप्रत पोहोचल्यावर त्याच्या अंतर्मनाची हीच प्रार्थना होती की हे पालनकर्ता आम्हांस थेट तुझ्यापर्यंत पोहोचणारा मार्ग दाखव  आणि आम्हाला सरळमार्गी बनव. आम्हाला भीती वाटते की सरळमार्गावरून प्रवास करता करता एखाद्या आडवाटेवर आम्ही वळलो तर कदाचित ती वाट आम्हाला भटकवणारी किंवा विनाशाच्या खाईत लोटणारी ठरू शकते.
याच मार्गदर्शनासाठी म्हणजे लोकांचा जीवनप्रवास सुखाचा व्हावा आणि मरणोत्तर जीवनातही ते सफल व्हावेत म्हणून अल्लाहाने जवळपास आपले सव्वा लाख पैगंबर या जगामध्ये  पाठविले आणि त्यांच्यामार्फत आपला संदेश, आपले मार्गदर्शन पोहोचविले. जगामध्ये आलेल्या अनेक पैगंबरांपैकी अंतिम पैगंबर हजरत मुहम्मद (त्यांच्यावर अल्लाहची कृपा असो)  आहेत आणि अवतरित झालेल्या अनेक संदेशांपैकी अंतिम संदेश कुरआन आहे.
कुरआनच्या सुरुवातीला सूरह फातिहा हा अध्याय आहे. हा अध्याय एक प्रार्थना आहे, याचना आहे. ही प्रार्थना कुरआनच्या सुरुवातीला निश्चित करण्याचा अर्थ हा आहे की जर तुम्ही या  ग्रंथापासून लाभ घेऊ इच्छिता तर प्रथम अल्लाहकडे अशा प्रकारे प्रार्थना करा. म्हणजे प्रार्थना कशी करावी? हेही मार्गदर्शन केले गेले आहे.

‘अल्लाहच्या नावाने जो अत्यंत कृपाळू, सदासर्वदा दयाळू आहे.’
कोणत्याही चांगल्या कामाची सुरूवात करण्यासाठी यापेक्षा अधिक योग्य व चांगल्या शब्दांची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. या शब्दांमध्ये अल्लाहचा परिचय करून देण्यात आला   आहे आणि त्याच्या गुणांचा उल्लेख आहे. ‘रहमान’, ‘रहीम’ हे शब्द ‘र ह म’ या धातूपासून बनलेले आहेत. ‘रहमान’ ही शब्दरचना जोरदार आणि जोशपूर्ण कैफियत दर्शवणारी आहे तर  ‘रहीम’ या शब्दरचनेत निरंतरता, सदैवपणाची कैफियत आहे; म्हणजे अल्लाहची दया, कृपा बरसणारी आहे आणि ही जोरदार कृपावृष्टी कधीही थांबणारी नाही तर निरंतर होत राहणारी  आहे. कोणत्याही काळापुरती मर्यादित नाही तर ही कृपावृष्टी पूर्वीही होती, आजही होत आहे आणि पुढेही होत राहणार. जसे समुद्रात उसळणाऱ्या जोरदार लाटा आणि निरंतर वाहणाऱ्या  नदीचा प्रवाह यांची एकत्र कल्पना करणे अवघड आहे तसेच अल्लाहाच्या या गुणवैशिष्ट्यांची एकत्र कल्पना करणे आपल्याला शक्य नाही.

‘सर्व स्तुती, कृतज्ञता अल्लाहसाठी आहे जो साऱ्या विश्वांचा स्वामी, पालनकर्ता आहे.’
जगात कुठेही व कोणत्याही स्वरूपात जे सौंदर्य दिसून येते, वैभव-समृद्धी दिसून येते, ज्या ज्या सामथ्र्यांचा आपणास अनुभव होतो त्या सर्वांचा मूळ स्रोत अल्लाह आहे. म्हणूनच प्रत्येक  स्तुती, प्रशंसा याला पात्रही फक्त तोच निर्माणकर्ता आहे. तोच साऱ्या विश्वांचा स्वामी आहे आणि तोच अल्लाह साऱ्या विश्वांचा पालनकर्ताही आहे. त्याने माणसाला असंख्य देणग्यांनी उपकृत केले आहे, हे मान्य करून फक्त त्याचेच कृतज्ञ व आभारी बनून जगले पाहिजे. भूक लागल्यावर आपण जेवण करतो जेवणानंतर त्याचे आभार प्रकट करताना म्हणावे की,
‘‘हे पालनकर्ता! आम्ही तुझे आभारी आहोत, आमच्या
पोटाची आग विझवण्यासाठी तू काय काय निर्माण केले!’’
दिवसभर काम केल्यानंतर माणूस पार थकून जातो व त्याला आपोआप झोप लागते. सकाळी उठल्यावर जेव्हा सारा थकवा निघून जातो तेव्हा माणसाने हे बोलले पाहिजे की, ‘‘हे   अल्लाह काय छान व्यवस्था आहे तुझी! रात्री अंधार झाला म्हणून सर्वत्र शांतता पसरली आणि मला सुखाची झोप लागली ज्यामुळे सारा थकवा दूर झाला, मी तर मेल्यागत झालो होतो.’’
सकाळी उठल्याबरोबर शौचालयाकडे जाणे हा जीवनाचा भाग आहे. तेथून आल्यानंतरही माणसाने हेच म्हणावे की प्रत्येक आभार, धन्यवाद अल्लाहसाठीच आहे, ज्याने शरीरव्यवस्था  अशी बनवली की त्रासदायक वस्तू दूर होऊन तब्येत फ्रेश झाली. यासारख्या आंतरिक व बाह्य कितीतरी देणग्या माणसाला मिळालेल्या आहेत म्हणून ज्याने दिल्या त्याचाच कृतज्ञ व  आभारी बनून राहिले पाहिजे.

‘अत्यंत कृपाळू, सदासर्वदा दयाळू आहे.’
त्याची, दया, कृपा अनंत आहे. त्याला सीमा नाही. त्याचा दयाळूपणा कायमचा आहे, निरंतर, सदैव आहे. ‘निर्णयाच्या दिवसाचा सर्वेसर्वा आहे.’ तो फक्त दयाळू व कृपाळूच नाही तर तो  न्यायीसुद्धा आहे. कयामत म्हणजे न्यायनिवाड्याच्या दिवशी जेव्हा संपूर्ण मानवजातीला पुन्हा जिवंत केले जाईल आणि प्रत्येकाच्या जीवनकार्याचा तपास होईल. सदाचारी लोकांना  त्यांच्या सदाचाराचे भरपूर फळ मिळेल आणि दुराचारी लोकांना त्यांच्या कर्माची योग्य ती शिक्षा भोगावी लागेल. जीवनाच्या परीक्षेत कोण सफल झाला आणि कोण असफल ठरला या  निकालाचा तो दिवस असेल. त्या निर्णयाच्या दिवसाचा सर्वेसर्वा फक्त अल्लाह आहे. न्यायनिवड्याचे सर्वाधिकार फक्त त्याच्याच हातात असतील. शिक्षेपासून सुटण्यासाठी तेथे कसलीही  धनसंपत्ती कामी येणार नाही. नातेवाईक, मित्रमंडळी कोणीही मदतीला येणार नाहीत. राजा असो वा रंक कोणीही कुणासाठीही काहीच करू शकणार नाही, कारण प्रत्येकाला फक्त  स्वत:ची चिंता लागलेली असेल. त्या दिवशी सर्वांना ऐकू येईल की, ‘‘आज सत्ता कुणाची आहे?’’ म्हणजे आज राजाधिराज कोण आहे, वास्तविक साम्राज्य कुणाचं आहे? उत्तर दिले  जाईल, ‘‘एकमेव सामथ्र्यशाली अल्लाहचं.’’ ‘आम्ही फक्त तुझीच भक्ती करतो.’
हे अल्लाह आमच्यावर तुझी अनंत कृपा आहे. तू अत्यंत कृपाळू, दयाळू आहेस आणि तू न्यायीसुद्धा आहेस. तूच आमचा निर्माणकर्ता, पालनकर्ता, मालक आहेस. म्हणूनच आम्ही हे  मान्य करतो की आम्ही फक्त तुझेच भक्त, गुलाम, दास आहोत. आम्ही फक्त तुझीच भक्ती, उपासना करतो आणि करत राहणार. फक्त तुझीच आज्ञापालन करतो आणि करत  राहणार.

‘आणि आम्ही फक्त तुझ्याकडेच मदतीची याचना करतो.’
खरा साहाय्यक तूच आहेस. फक्त तुझ्याच मदतीवर आमचा विश्वास आहे. तुझ्याशिवाय आम्ही कोणत्याही पैगंबरांची, संताची, देवदूतांची किंवा तू निर्माण केलेल्या सृष्टीतील कोणत्याही  वस्तूची आम्ही भक्तीही करत नाही व त्यांच्याकडे मदतीची याचनाही करत नाही. तू दिलेल्या सद्सद्विवेकबुद्धीमुळे आम्ही तुला ओळखू शकलो. आम्ही न मागताही तू आम्हांला भरपूर  दिले. आता आमची गरज एवढीच आहे की,

‘आम्हाला सन्मार्गी चालव.’
आम्हाला तो सन्मार्ग, सरळमार्ग दाखव आणि त्यावर चालण्याची शक्ती दे जो मार्ग थेट तुझ्यापर्यंत पोहोचतो. जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आचारविचार, वागणुकीमध्ये आम्हाला तो मार्ग  दाखव जो सत्य आहे, जो या जीवनातही खऱ्या उन्नतीचा, प्रगतीचा जामीन आहे आणि ज्यामध्ये मरणोत्तर जीवनातही कल्याणाची शाश्वती आहे.

‘त्या लोकांचा मार्ग ज्यांच्यावर तू कृपा केलीस.’
तो सन्मार्ग, सरळमार्ग जो तुझ्या प्रियजनांनी अंगीकारला. जगात आलेल्या सर्व पैगंबरांचा मार्ग, त्यांच्या सर्व सत्यनिष्ठ अनुयायींचा मार्ग, अशा मार्गावर चालताना जे शहीद झाले आणि  या सर्वांच्या पावलांवर पावले टाकीत जगणाऱ्या सदाचारी व चारित्र्यवान लोकांचा मार्ग, जे सर्व तुझ्या प्रसन्नतेचे पात्र ठरले.

‘जे कोपग्रस्त झाले नाहीत व जे मार्गभ्रष्ट नाहीत.’
अल्लाहचा प्रकोप त्या लोकांवर प्रकटला ज्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाचा, जीवनपद्धतीचा मनापासून स्वीकार केला नाही. फक्त काही रूढी-परंपरांचा त्यांनी स्वीकार केला. ईशआदेशाच्या  विरुद्ध आपली मनमानी केली, अन्याय अत्याचाराचा मार्ग धरला, अशा सर्व लोकांना सुधरण्यासाठी भरपूर वेळ दिली गेली पण एका ठराविक वेळेनंतर त्यांना या जगातही शिक्षा मिळाली  आणि मरणोत्तर जीवनात अजून हिशोब व्हायचा बाकी आहे.
मार्गभ्रष्ट ते लोक आहेत ज्यांना उत्तम मार्गदर्शन केले गेले पण भावनेच्या भरात त्यांनी धर्मशास्त्रात सांगितलेल्या गोष्टींविरुद्ध अवास्तव श्रद्धा बाळगल्या. पैगंबराला अल्लाहचा पुत्र  मानण्याचे महापाप केले. धर्मशास्त्रात निर्देश नसतानाही संसारत्याग करण्यासारख्या नवीन प्रथा सुरू केल्या आणि प्रकृतीच्या विरुद्ध जीवन जगण्याच्या प्रयत्नात सरळ मार्गापासून ते खूप  दूर निघून गेले.

‘हे अल्लाह आमची प्रार्थना स्वीकार कर!’
सूरह फातिहा भक्तांनी मार्गदर्शनासाठी केलेली एक याचना आहे. अल्लाह त्यांच्या प्रार्थनेचा स्वीकार करून संपूर्ण कुरआन त्यांच्या समोर ठेवता आणि सांगतो की हाच तो सरळमार्ग आहे  ज्याची तुम्हास तळमळ लागली आहे. हा ग्रंथ तुम्हाला माझ्यापर्यंत पोहोचण्याचा सरळ मार्ग दाखवेल आणि तुमच्या जीवनातील असंख्य गुंतागुंतीच्या प्रश्नांमध्ये योग्य दृष्टिकोन   ठेवण्यास मदत करेल. या अध्यायाद्वारे आपणास काही गोष्टींचा बोध होतो. एक हा की, आपल्या जीवनात व्यक्तिगत स्तरावर जेव्हा जेव्हा गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण होते त्या त्या  वेळी आपण आपल्या निर्माणकर्त्याला, पालनकर्त्याला हाक मारावी आणि फक्त त्याच्याचकडे मदतीची याचना करावी. संबंधित विषयावर त्याने काय मार्गदर्शन केले हे जाणून घेण्याचा  प्रयत्न करावा. कारण माणसाला जीवनातील टप्प्या टप्प्यावर, पावला पावलावर याची गरज भासते.
दुसरा हा की बुद्धिमत्ता ही माणसाला मिळालेली फार मोठी देणगी आहे आणि त्याचा वापर केव्हा व कसा करावा याबाबतीत ही कुरआनमध्ये भरपूर मार्गदर्शन आहे, पण सामाजिक  स्तरावरील काही मुख्य प्रश्नांवर आपण हे मान्य केलेच पाहिजे की फक्त बुद्धिमत्तेच्या जोरावर आपण त्यांना सोडवू शकत नाही.
कौटुंबिक वाद निर्माण होण्यास कारणीभूत असणारी समस्या ही आहे की, पती-पत्नीमध्ये अधिकार आणि कर्तव्याबाबतीत कोणते संतुलित नियम असावेत? हे निश्चित करणे मानवाला  शक्य नाही. कारण मानव एक तर स्त्री आहे किंवा पुरुष. या विषयावर जेव्हा स्त्री विचार करेल तेव्हा ती आपली भावना, आपल्या संवेदना यावर लक्ष देईल. पुरुषांच्या भावना, त्यांच्या   जाणिवांची कल्पनाही करणे तिला शक्य होणार नाही. अधिकार व कर्तव्यासंबंधी जेव्हा पुरुष विचार करेल तेव्हा त्याला स्वत:च्या जाणिवा तर माहीतच असणार पण स्त्रीच्या भावना,  संवेदना त्याला काय कळणार? शेवटी तो जे काही नियम बनवेल त्यामध्ये नक्कीच आपले वर्चस्व ठेवणार. फक्त एकच अस्तित्व असे आहे जो दोघांचा निर्माणकर्ता आहे. तो अल्लाह  आहे, जो दोघांवरही प्रेम करतो. तो दोघांचा शुभचिंतक आहे म्हणून या बाबतीत त्याचे मार्गदर्शन घेणे अत्यंत जरुरी आहे.
दुसरे; व्यक्ती आणि सामाजिक संबंधांमध्ये संतुलन कसे राखता येईल? पालकांना, वडीलधाऱ्या माणसांना वाटते की आम्ही जो हुकूम देऊ मुलांनी तो नेहमी मुकाटपणे मान्य करायलाच  हवा. मुलं म्हणतात, आम्हाला स्वतंत्र निर्णय घेऊ द्या. शासन व्यवस्था सांभाळणाऱ्या लोकांना वाटते की आम्ही जे जे निर्णय घेऊ जनतेने त्यांचा स्वीकार केलाच पाहिजे. नागरिक  म्हणतात आमच्या स्वातंत्र्यावर का गदा आणता? जगभरात स्वातंत्र्य, फ्रीडम हा नारा किती लोकप्रिय आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. होय! व्यक्तीस्वातंत्र्याचे महत्त्व मान्य, पण  आईवडिलांना वाऱ्यावर सोडून देण्याइतपत व्यक्तीस्वातंत्र्य दिले जावे का? सार्वजनिक ठिकाणी कसलेही चाळे करण्याची खुली मुभा असावी का? कायदेकानू आणि नैतिकतेचा विचार  व्हायला नको? हजारो लोकांचे नुकसान करून एखाद्याने स्वत:चा फायदा करून घेणे हे कसले व्यक्तीस्वातंत्र्य? याच प्रश्नांवर गरज भासते अशा संतुलित नियमांची ज्यामध्ये व्यक्तीही  मोकाट होऊन समाज विघातक बनू नये आणि समाजव्यवस्थाही बेछूट होऊन इतकी सशक्त होऊ नये की व्यक्ती स्वातंत्र्य हिरावले जाईल. म्हणूनच या प्रश्नावरही आपण आपल्या  निर्माणकर्त्याच्या मार्गदर्शनानुसार जीवन जगणे जरुरी आहे.
तिसरी मोठी समस्या भांडवलदार आणि श्रमिक वर्गाची आहे. एकीकडे भांडवलदारांचे उत्पन्न अवाढव्य वाढतच आहे तर दुसरीकडे श्रमिकांची अवस्था ‘इकडे आड तिकडे विहीर' अशी होत  असल्याचे सामाजिक चित्र आपणासमोर आहे. एकीकडे पैशाची उधळपट्टी तर दुसरीकडे एक वेळच्या जेवणाची गैरसोय. ही विषमता असलेल्या समाजामध्ये भौतिक प्रगतीच्या आणि  विकासाच्या गप्पा मारणे योग्य नाही.
दुसरी बाजू अशी की श्रमिकांना त्यांच्या हक्कांपेक्षा जास्त दिल्यास भांडवल नुकसानीत येण्याचा धोका असतो. ही भीती असेल तर भांडवल व भांडवलदार मैदानात का व कसे टिकेल?  असे कित्येक प्रश्न व समस्या आहेत ज्यामुळे आज जगभरात अशांतता पसरलेली दिसून येते. म्हणूनच जीवन प्रवास सुखात, शांततेत पूर्ण व्हावा आणि या जगातही आणि मरणोत्तर  जीवनातही संपूर्ण मानवजात सफल व्हावी याकरिता सर्वांनी ईशमार्गदर्शनानुसार जीवन व्यतीत करणे हे सर्वांच्या भलाईचे आहे.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget