Halloween Costume ideas 2015

लोकप्रतिनिधींची विश्वासार्हता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रात दोन फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपवल्याबाबतचा खटला चालवण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने  दिले. मुंबई हायकोर्टाने मुख्यमंत्र्याविरोधातील या तक्रारीबाबत दिलासा दिला होता. अ‍ॅड. सतीश उके यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात सुप्रीम कोर्टात याबाबत याचिका दाखल केली होती. प्रतिज्ञापत्रात ही माहिती लपवून फडणवीस यांनी लोकप्रतिनिधी कायदा १९५१चे कलम १२४ अचे उल्लंघन केल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. निवडणुकीला तीन आठवड्यांचा अवकाश  असतानाच सुप्रीम कोर्टाने दिलेला आदेश म्हणजे मुख्यमंत्र्यांना जबरदस्त चपराकच म्हणावी लागेल. आपल्या व्यवस्थेचे ‘नियंत्रण व समतोल' (चेक अँड बॅलन्स) हे वैशिष्ट्य फार  महत्त्वाचे आहे आणि त्यामुळेच कोणतीही सत्ता अनिर्बंध होण्याचा धोका बराच कमी होतो. पण व्यवस्थेत कितीही चांगल्या तरतुदी असल्या तरी त्या राबविणाऱ्या व्यक्ती कसे काम  करतात, देशाच्या कायद्याचे पालन करतात की नाही, हे निर्णायक ठरते. त्यांच्या वेळोवेळीच्या कर्तव्यनिष्ठेमुळेच हे तत्त्व रुजत जाते. आज स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनी आम्हाला  भारताचे नागरिक या नात्याने इच्छाशक्तीने घटनादत्त समता प्रस्थापित करायची आहे. लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष समाजहिताच्या कामासाठी जो वेळ द्यायला हवा, कायदेमंडळात चर्चेला   येणाऱ्या प्रश्नांचा अभ्यास करायला हवा, त्याबद्दल समाजाशी औपचारिक/ अनौपचारिक चर्चा करायला हव्यात. समाजाने पुढाऱ्यांची पात्रता डिजिटल पोस्टर्सचा आकार आणि संख्येवरून ठरवायची, की त्यांनी केलेली सामाजिक कामे, त्यांची जनमानसातली प्रतिमा यावर? राजकारणावर निवडणुकांवर असणारे अवैध संपत्तीचे वर्चस्व संपविता येईल काय? लोकशाहीचा  उद्देशच मुळी सत्तेचे विकेंद्रीकरण आणि लोकसहभाग हे असताना, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी पुढाऱ्यांच्या दावणीला बांधले गेल्याने त्यांचा  प्रत्यक्ष निर्णय प्रक्रियेत सहभाग दिसून येत नाही. सध्या निवडणुकांसाठी होणाऱ्या लक्षावधी रुपयांचा खर्च करून निवडून आल्यावर लाचारी विकत घेणारे असले लोकप्रतिनिधी पाहिले, की  आपली लोकशाही निरर्थक ठरते आहे काय असे वाटण्याइतकी निराशा येते. या दुष्टचक्रातून आम्हाला बाहेर पडायचे आहे. जीवघेण्या महागाईने होरपळणारे सामान्य लोक, रुपयाचे  सातत्याने घसरणारे मूल्य, त्यामुळे आयुष्यभराच्या बचतीची होणारी कवडी/ दमडी किंमत यामुळे जगण्याचा आत्मविश्वास गमावलेले हताश ज्येष्ठ नागरिक, पैसा/ दारू/ गुटखा/  व्यसनांचा समाजाला पडलेला विळखा, त्यात अडकलेले दुर्दैवी/अविवेकी तरुण, त्यांचे निराश आई/बाप, भ्रष्टाचार हाच शिष्टाचार मानणारी उन्मत्त व्यवस्था, प्रचंड अवैध संपत्ती आणि  या मायावी संपत्तीने विकत घेतलेल्या मतांमधून सत्ता अनिर्बंधपणे भोगणारे मोकाट सत्ताधीश, त्यांच्या भोवती कायम घुटमळणारे उडाणटप्पूंचे कंपू, कुठेही न्याय मिळेल याचा विश्वास नसणारे पराभूत करोडो लोक, मायावी अर्थकारण, त्यात बिनदिक्कत करोडोंची लुबाडणूक करणारे दरोडेखोर, गल्ली ते दिल्लीपर्यंत अत्याचारांनी भयभयीत झालेले स्त्रीजीवन, त्यांच्यावर   अत्याचार करणाऱ्या नराधमांना कायद्याच्या पळवाटांमुळे होणाऱ्या शिक्षांचे अत्यल्प प्रमाण, भ्रष्टाचाराच्या खटल्यांमध्ये अपवादात्मकही शिक्षा न होणे, जाती/धर्माच्या डबक्यांमध्येच  पुन:पुन्हा स्वत:ची अस्मिता शोधणारे माणसांचे कळप, स्वत:चे आणि केवळ समान हिताचे रक्षण करण्यासाठी रस्त्यावर हजारोंच्या संख्येने एकत्र येऊन सरकार/ समाजाची अडवणूक  करणारी कळप संस्कृती, त्यापुढे मतांच्या दीड दमडीच्या जोगव्यासाठी गुडघे टोकणारे राजकारणी, दहशतवादाने भयग्रस्त झालेला समाज, धर्मांध दहशतवाद्यांच्या मानवी अधिकारांबाबत   अतिजागृत असलेले स्वयंघोषित सेक्युलर बुद्धिवादी, त्यातून सुरक्षा व्यवस्थांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याची आत्मघातकी प्रवृत्ती, केवळ सत्ता संपत्ती, स्वार्थ, उपभोगाची  राक्षसी लालसा या परिघापलीकडे पाहण्याची दृष्टी नसलेले बरेचसे सुमार कुवतीचे राजकारणी, त्यांच्या बेपर्वाईने प्रतिवर्षी कमी/कमी होत जाणारे विधिमंडळ/ लोकसभेतील चर्चेचे/कामाचे  तास, त्यासाठी बटीक बनवलेली/ प्रचंड खर्च प्रत्येक मिनिटाला निरर्थक पणाने करणारी लोकशाही व्यवस्था या आणि यासारख्या दुर्दैवाच्या दशावतारांनी ग्रासलेले आमचे पराधिन  स्वातंत्र्य, हे सारे बदलायलाच हवे! निवडणुकांच्या हंगामात पैसा, दारू, मटण, फुकटच्या जेवणावळी, घरोघरी मायावी संपत्तीने रात्रीच्या अंधारात होणारे साड्यांचे वाटप, या सारख्या  साऱ्या भानगडींना मतदारांनी ठाम शब्दांत नकार देणे. स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी/ लोकशाहीच्या पावित्र्यासाठी आमच्या पवित्र मताचा अधिकार आम्ही विकणार नाही हा निश्चय करायला  हवा. स्वाभिमानी समाजाच शुद्ध चारित्र्याच्या लोकांच्या सामथ्र्याने समाजाच्या साऱ्या समस्या सोडवू शकतो, याचे भान ठेवायला हवे. ईश्वर त्यांनाच मदत करतो, जे स्वत:ची मदत  करतात.

-शाहजहान मगदुम
मो.:८९७६५३३४०४,
Email: magdumshah@eshodhan.com

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget