Halloween Costume ideas 2015

नांदेड निवडणुकीचा संदेश

नांदेड महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला भव्य यश मिळत असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगाने हिमाचल प्रदेशातील  विधानसभा निवडणुकांच्या वेळापत्रकाची घोषणा केली. अनेकांनी भाजपची सोय पाहून निवडणूक आयोग गुजरातच्या निवडणूक  वेळापत्रकाची घोषणा करणार का असा सवाल उपस्थित केला आहे. ज्या हाताच्या बोटावर मोजता येतील अशा राज्यांत काँग्रेसची  सत्ता आहे त्यापैकी हिमाचल हे एक राज्य. तेंव्हा तेथील सत्ता कायम राखणे काँग्रेसला आपले आव्हान आगामी काळात कायम  राखण्यासाठी नितांत गरजेचे आहे.
नांदेड महानगरपालिका निवडणूक आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक यांची तुलना करणे  गैर असले तरीही काँग्रेसला त्या निवडणुकीच्या निकालातून काही तात्पर्य अवश्य काढता येईल आणि भाजपलादेखील काही धडा घेता  येईल. नांदेड निवडणुकीत भाजपने काँग्रेसमध्ये फोडाफोड केली आणि निवडणुकीच्या तोंडावर काही काँग्रेस नगरसेवक भाजपमध्ये  आले एवढेच नाही तर त्यांना भाजपने उमेदवारीही दिली. परंतु ते सर्व पराभूत झाले. गुजरातमधून झालेल्या राज्यसभा निवडणुकीत  देखील काँग्रेसमधून आयात उमेदवाराला भाजपने उमेदवारी दिली होती आणि तो पराभूत झाला होता. तेंव्हा भाजपने कितीही फोड़फोड करण्याचा प्रयत्न केला तरीही त्याचे नुकसान काँग्रेसला होईलच असे नाही हे काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांनी लक्षात  घ्यावयास हवे. नांदेडमध्ये मतदारांना केवळ व्यक्तिकेंद्रित विखारी प्रचार भावत नाही; किंबहुना त्याने प्रतिपक्षाविषयी सहानुभूती निर्माण व्हायचा  संभव असतो. एके काळी मोदी यांच्यावर अशीच चौफेर टीका होई आणि त्यामुळे मोदी यांना सहानुभूती मिळाली होती हे नाकारता  येणार नाही. तेच आता काँग्रेसच्या बाबतीत घडत असेल तर भाजपला तक्रारीस जागा नाही. अशा वेळी मतदार अन्य सर्व कळीच्या  मुद्द्यांना कमी महत्व देतात हाही नांदेड निवडणुकीचा अन्वयार्थ आहे. भाजपला सध्या अनेक आघाड्यांवर बचावात्मक पवित्रा घ्यावा  लागला आहे. त्या सगळ्याचा परिणाम म्हणजे भाजपमध्ये एकीकडे काहीसे नकारात्मक वातावरण आहे; तर दुसरीकडे काहीही झाले  तरी आपणच जिंकणार अशा फाजील आत्मविश्वासातून आलेला गाफीलपणा आहे. अशा दोन टोकाच्या परिस्थितीतून भाजपला मार्ग काढावा लागणार आहे. गुजरात, नांदेड अशा मालिकेत हिमाचल काँग्रेसला हात देणारे ठरले तर काँग्रेससाठी ती मोठी आश्वासक  घटना ठरेलच; परंतु मोदी- शहा यांच्या ‘जादूच्या समाप्तीची सुरुवात झाली हे अधोरेखित होऊ लागेल. पुढच्या वर्षी होणाऱ्या काही  विधानसभा निवडणुका आणि नंतर वर्षभरात होणारी लोकसभा निवडणूक यासाठी सज्ज होण्यासाठी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांसाठी आता प्रत्येक निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. प्रत्येक विजय काँग्रेसला आत्मविश्वास मिळवून देईल तर प्रत्येक पराभव  मोदी-शहा यांच्या नेतृत्वाला पक्षातून वाढते आव्हान निर्माण करेल हाच नांदेडचा संदेश आहे. खरे पाहता नांदेडच्या निकालांमध्ये एक  मोठा संदेश दडलेला आहे. हा संदेश लोकशाहीसाठी नांदेडच्या मुस्लिमांनी दिलेला आहे. नांदेडमनपामध्ये एकूण ८१ जागा आहेत. सन  २०१२ मध्ये पार पडलेल्या मनपा निवडणुकीत काँग्रेसला ४१, शिवसेनेला १४ तर असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयएमआयएम ला ११  जागा मिळाल्या होत्या आणि एनसीपीला १० व भाजपला फक्त २ जागा मिळाल्या होत्या. हे निकाल पाहून शिवसेनेने तर राज्यातील  मुस्लिमांवर सांप्रदायिक व मुस्लिमधार्जिणे होण्याचा आरोप केला होता. मात्र आता १३ ऑक्टोबर रोजी जाहीर झालेल्या नांदेड मनपा  निवडणुकीत एआयएमआयएमच्या पदरात एकही जागा पडली नाही, हादेखील एक मोठा संदेशच म्हणावा लागेल. सन २०१२ मध्ये १२ जागा जिंकल्या म्हणून मु्स्लिम समाजावर मुस्लिमधार्जिणे असल्याचा पुरावा मिळाला होता, मात्र यावेळी मुस्लिमांनी लोकशाहीला अनुसरून दिलेला संदेश हा महत्त्वाचा ठरतो. यावेळी ८१ पैकी काँग्रेसला ७३, भाजपला सहा, शिवसेनेला एक जागा मिळाली आहे  आणि एका जागेवर अपक्ष निवडून आला आहे. राष्ट्रवादी व एआयएमआयएम ला शून्यावर समाधान मानावे लागले. भारतीय मुस्लिम समाज आपल्या लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी फक्त मुस्लिम उमेदवाराकडे पाहात नाही, हेच यावरून स्पष्ट होते.  लोकशाहीच्या अनुषंगाने भारतीय मुस्लिम समाज हिंदूंपेक्षा अधिक प्रगतीशील व देशप्रेमी आहे. कारण बहुसंख्य हिंदू लोकप्रतिनिधी  निवडतना जातीपातीपासून ते सवर्णअवर्णापर्यंत विचारात गुरफटलेले असल्याचे दिसतात. नांदेड शहराच्या लोकसंख्येपैकी २९ टक्के  मुस्लिम समाज आहे. मनपातील जवळपास ४२ जागांवर त्यांच्या प्रभाव जाणवतो. म्हणूनच नांदेडच्या निकालांनी मुस्लिमांबाबत  असलेला गैरसमज दूर करून संपूर्ण देशाला आपली विचारसरणी बदलण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे.
-शाहजहान मगदुम
(मो.:८९७६५३३४०४, Email: magdumshah@gmail.com)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget