Halloween Costume ideas 2015

मुस्लिम मराठी साहित्य एकात्मतेसह बहुभाषिक व बहुसांस्कृतिक संवादाचा ध्येयवाद जपते - डॉ. सबनीस

मुस्लिम मराठी साहित्य एकात्मतेसह बहुभाषिक व बहुसांस्कृतिक संवादाचा ध्येयवाद जपते, याची साक्ष म्हणजे या पूर्वीच्या संमेलनापासून आजपर्यंत चालत आलेली मुस्लिमेत्तर लेखकांच्या सहभागाची श्रेष्ठ परंपरा! सहजीवन व सहअस्तित्व अर्थपूर्ण करण्यासाठी सर्वधर्मीय संवाद आवश्यकच असतो. हे सांस्कृतिक सूत्र डॉ. शेख इक्बाल मिन्ने व त्यांच्या सर्व सहकारी मित्रांनी जाणीवपूर्वक जोपासले आहे.
मुस्लिम मराठी साहित्याची निर्मिती प्रक्रिया समजून घ्यायची असेल तर इस्लामची श्रद्धा जपणारी व पूजणारी मानसिकता समजून घ्यावी लागेल. आणि मुस्लिम मनाची स्पंदने जाणून घेताना इस्लाम धर्माचे केंद्र अल्लाह, मुहम्मद पैगंबर सल्ल. आणि कुरआनचा किमान अभ्यासही आवश्यक ठरतो. इस्लाम धर्माबाबतच्या अभ्यासात व आकलनात अनेक बाधा आहेत. त्यामुळे प्रचंड प्रमाणात गैरसमज रूजले. इस्लामचे शुद्ध स्वरूप मुस्लिमांसह इतर धर्मियांपर्यंत अद्याप पोहोचले नाही. परिणामतः मुस्लिमांना अनेक आरोपांना तोंड द्यावे लागते. इस्लामचा मानवतावाद खरे तर इतर धर्माप्रमाणेच सर्वांसाठी वंदनीय आहे. आणि तोच मुस्लिम लेखकांचा ध्येयवाद असला पाहिजे, असे संमेलनाचे उद्घाटक डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले.
    पनवेल येथे 3 ते 5 नोव्हेंबर दरम्यान बदीउज्जमा ‘खावर’ साहित्यनगरी, वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळाच्या वतीने 11 वे अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी डॉ. सबनीस उद्घाटनपर भाषणात बोलत होते. मंचावर संमेलनाध्यक्ष बीबी फातेमा बालेखाँ मुजावर, कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष रामशेठ ठाकूर, पनवेलच्या महापौर कविता चौतमल, आमदार इम्तियाज जलील यांच्यासह संमेलनाचे सर्व माजी अध्यक्ष उपस्थित होते. डॉ. सबनीस यांनी मुस्लिम समाजातील अनेक ज्वलंत प्रश्‍नांकडे लक्ष वेधले. दहशतवाद, सामाजिक सुरक्षा व आयसिस यावर सबनीस यांनी चिंता व्यक्त केली. 
यावेळी संमेलनाध्यक्ष बीबी फातेमा यांनी मुख्य प्रवाहात होत असलेली मुस्लीम मराठी साहित्यिकांची फरफट आधोरेखित केली. मराठी मुस्लीम साहित्य परिषद मान्य करण्यास अनेक वर्षाचा कालावधी लावला याबद्दल यांनी खंत व्यक्त केली. तसेच त्यांनी इस्लामच्या वारंवार चर्चिला जाणाऱ्या विषयांवर परखड मते व्यक्त केली. विनाकारण बुरख्याचा विषय ताणून धरणाऱ्यांना तर त्यांनी आपल्या भाषणात एक प्रकारची चपराकच लगावली. त्या म्हणतात, महिलांच्या प्रगतीत बुरखा कधीच अडथळा बनत नाही. बुरख्याचा पहिला उद्देश असा की, पुरूष व स्त्रियांच्या चारित्र्यांचे रक्षण करण्यात यावे व अशा दुवर्तनांपासून त्यांना अलिप्त ठेवावे जे स्त्री-पुरूषांच्या स्वैर सहजीवनामुळे निर्माण होतात. दूसरा उद्देश असा की स्त्री पुरूषांचे कार्यक्षेत्र निश्ति करण्यात यावे. नैसर्गिकरित्या जी कर्तव्ये स्त्रीयांनी पार पाडावयाची आहेत ती त्यांनी निश्‍चितपणे पार पाडावीत व ज्या जबाबदाऱ्या पुरूषांच्या वाट्यास येतात त्या त्यांनी व्यवस्थितपणे पूर्ण कराव्यात. तीसरा उद्देश कुटूंब व्यवस्था मजबूत व सुरक्षित करावी हा आहे. कुटुंबव्यवस्था जीवनाच्या इतर व्यवस्थांपेक्षा अधिक महत्वाची बाब आहे. इस्लाम स्त्रियांना सर्व अधिकार देतो, त्याच बरोबर घरातील व्यवस्थाही सुरक्षित ठेवू इच्छितो. हे केवळ बुरखा पद्धतीचा अवलंब केल्यानेच शक्य होवू शकते, असेही अध्यक्षा मुजावर म्हणाल्या. मुस्लीम मराठी साहित्य संमेलनात पहिल्यांदा उद्घाटनाचं भाषण प्रकाशित करून वितरीत करण्यात आले.
    तीन दिवस चाललेल्या या संमेलनात अनेक विषयावर चर्चा झाली. ’महाराष्ट्रील समतेच्या चळवळी आणि मुस्लीम’ या परिसंवादात राज्यातील सामाजिक चळवळीतील मुस्लीम समुदायाचं योगदान यावर समतोल चर्चा झाली. यात हभप शामसुंदर सोन्नर, मराठा सेवा संघाचे गंगाधर बनवरे व नागपूरचे प्रा. जावेद पाशा कुरेशी यांनी सहभाग घेतला होता. महाराष्ट्रातील सांस्कृतिक व प्रबोधनाच्या चळवळीत मुस्लीम समुदायाच्या योगदानावर चर्चा झाली. इतिहासाचं विकृतीकरण, संत-साहित्यात मुस्लीम संतांचं स्थान याची उजळणी परिसंवादात करण्यात आली. भारतात मुस्लीम मूलनिवासी असून त्यांनी इथल्या स्थानिक परंपरा व संस्कृतीचा स्वीकार केला. लाखो मुस्लिमांनी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात सक्रिय सहभाग घेतला होता. 1857 सालच्या उठावात एकट्या दिल्लीत 25 हजारांपेक्षा जास्त मुस्लिमांना फासावर चढवण्यात आलं होतं. आज सत्ताधारी पक्ष मुस्लिमांना परके ठरवतोय, यापेक्षा वेदनादायी गोष्ट दुसरी कुठली नाहीये, अशी खंत जावेद पाशा कुरेशी यांनी व्यक्त केली. स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती दिलेल्या समूहाकडून देशभक्तीचं प्रमाणपत्र मागणं, लोकशाही राष्ट्राचं दु:ख आहे, असा सूर एकूण परिसंवादात उमटला.
    मुस्लीम समाजाबाबत समज व गैरसमज हा दुसरा महत्त्वाचा परिसंवाद या संमेलनात झाला. यात माजी आयजी एसएफ मुश्रीफ, ’द वीक’चे प्रिन्सिपल करसपाँडंट निरंजन टकले, इतिहास संशोधक सरफराज शेख, डॉ. सय्यद रफीक पारनेरकर, धनराज वंजारी, मेहबूब काझी व मोहसीन खान यांनी मुस्लिमांच्या दानवीकरणाच्या सादरीकणावर भाष्य केलं. ’मोहम्मद अली जिना यांनी द्वी-राष्ट्राचा सिद्धान्त सावरकरांकडून घेतला होता. त्यामुळे फाळणीचे ते पहिले गुन्हेगार आहेत’ अशी भूमिका निरंजन टकले यांनी मांडली. गौमांस बंदीवरील त्यांच्या एका स्पेशल स्टोरीचा उल्लेख करत ते म्हणाले की, ’बीफ बॅनच्या आड बजरंग दल खंडणीचा व्यवसाय करत आहे, यांचे व्हिडिओ पुरावे माझ्याकडे आहेत. एका कार्यकर्त्याचा उल्लेख करत ते म्हणाले की, ’माझ्याकडे असलेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये एक गोरक्षक म्हणतोय की ’डर फैलाने में इतना समय लगा, अब बिझनेस का टाईम हैं’. मुस्लीम विरोधात सुरू असलेल्या षडयंत्राबाबत टकले यांनी अनेक खुलासे केले.
    इतिहासाचे अभ्यासक सरफराज शेख यांनी टिपू सुलतानच्या सुरू असलेल्या कथित दानवीकरण करण्याच्या प्रयत्नांवर भाष्य केलं. तब्बल सात वर्षं त्यांनी टिपूवर केलेल्या संशोधनाचा लेखाजोखा आपल्या व्याख्यानात मांडला. टिपू सुलतानच्या नैतिकतेचे पुरावे देत, ते कसे ब्राह्मण्यावाद्यांच्या डोळ्यांना खुपत आहेत, याबद्दल त्यांनी विचार मांडले. तर माजी पोलीस अधिकारी वंजारी यांनी भारतात आयबी म्हणजे गुप्तचर यंत्रणा सत्ता चालवत असल्याचा धक्कादायक खुलासा केला. तर सय्यद रफीक यांनी दहशहवादाच्या आरोपाच्या षडयंत्रावर भाष्य केलं. भारतीय मुस्लीम हा शांतीप्रिय असून तो दहशतवादी कारवाया करु शकत नाही हे निर्दोष सुटत असलेल्या तरुणांवरून सिद्ध होतं, असं मत मांडलं. सर्व बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास नव्यानं करावा व खऱ्या आरोपींना शोधावं अशी मागणी डॉ. रफीक सय्यद यांनी केली. तर अध्यक्षीय समारोप करताना एसएम मुश्रीफ म्हणाले की, दलित व बहुजन शिक्षित होण्यानं ब्राह्मण्यावाद्यांचं धाबं दणाणलं होतं. त्यामुळे त्यांना मुस्लिमांच्या पाठीमागे लावलं, असा आरोप केला. ’जेव्हापासून स्फोटाच्या तपासात ब्राह्मण्यवादी संघटनांचा हस्तक्षेप आढळला, तेव्हापासून स्फोटाच्या घटना कमी झाल्या’ असा आरोपही मुश्रीफ यांनी केला.
    शनिवारी मुस्लीम महिलांनी आपल्या भावविश्‍व व साहित्यातील अवकाशावर भाष्य केलं. मस्जिदमध्ये नमाजला न जाता येणं ही आम्हाला सूट असल्याचं मत नागपूरच्या जुल्फी शेख यांनी मांडलं. घरातली मुलंबाळं, स्वंयपाक-पाणी सोडून दर तासा-दोन तासाला मस्जिदमध्ये नमाजला जाणं महिलांना प्रॅक्टिकली शक्य नाही, पण पुरुषांना व्यवसायाच्या ठिकाणी ते शक्य असतं असंही मत जुल्फी शेख यांनी मांडलं. तलाक, मस्जिद व दर्गा प्रवेश यापेक्षाही गंभीर विषय मुस्लीम महिलांचे आहेत, याकडे सामाजिक संघटना कधी लक्ष देणार असा प्रश्‍नही त्यांनी विचारला. विद्युत भागवत यांनी महिला सुरक्षेवर सरकारला घेरलं. तर ऐनुल अतार यांनी मुस्लीम महिलांच्या बदलत्या प्रश्‍नांकडे लक्ष वेधलं. हसिना मुल्ला यांनी ग्रामीण भागातील महिलांची होत असलेली फरफट मांडली. मुस्लीम महिलांचं संघर्ष करणारे चित्रण साहित्यात येत नसल्याची खंत त्यांनी मांडली.    शनिवारच्या दुसऱ्या परिसंवादात मुस्लीमेत्तर लेखकांच्या नजरेतून मुस्लीम साहित्य या विषयावर चर्चा झाली. यात हिंदू आणि मुस्लिमांमधली गंगा-जमनी संस्कृती साहित्यात प्रकर्षानं मांडावी असा ठराव मान्यवरांनी मांडला. पांडुरंग कंद व फारुख तांबोळी यांनी मुस्लीम विषयातील साहित्यिक संशोधनात येत असलेल्या अडचणींवर भाष्य केलं. संशोधनासाठी मराठी मुस्लीम साहित्याचं संग्रह करावा अशी मागणी या दोघांनी केली. अनिलकुमार साळवे यांनी सिनेमातील प्रातिनिधिक मुस्लीम चित्रणावर भाष्य केलं. मुस्लीम साहित्य संशोधक मेळावा व 25 वर्षांतील मराठी मुस्लीम साहित्याचा लेखाजोखा हे दोन प्रमुख परिसंवाद शनिवारचं मुख्य आकर्षण ठरली. डॉ. बशारत अहमद यांनी 25 वर्षांतील मुस्लीम मराठी साहित्याच्या होत असलेल्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केलं. 1990 पासून मराठी मुस्लीम संघटनेच्या स्थापनेपासून आज मुस्लीम मराठी साहित्याची काय स्थिती आहे, यावर संमेलनाच्या सर्व अध्यक्षांनी विवेचन केलं. फ.म. शाहजिंदे यांनी मराठी मुस्लीम साहित्यिकांच्या लेखन प्रसारासाठी त्रैमासिक पत्रिकेची गरज व्यक्त केली, तर जावेद पाशा कुरेशी यांनी मुस्लीम प्रश्‍नांवर दर्जेदार साहित्य निर्मितीवर भर द्यावा असा प्रस्ताव मांडला. डॉ. इकबाल मिन्ने यांनी मुस्लीम मराठी साहित्य चळवळ पुढे नेण्यासाठी सहकार्य करण्याचं आव्हान केलं. शनिवार एकांकिका व नवोदित कवी संमेलनामुळेही चांगलाच गाजला. मुख्य परिसंवादानंतर दोन कवी संमेलनं झाली. पहिल्या कवी संमेलनात महिला कवींनी दर्जेदार कविता सादर केल्या. महिला प्रश्‍न, कुटुंब, नातेसंबंध, सामाजिक मान्यता, आदर अशा विविध आशयांना घेऊन कविता सादर झाल्या. यात फरजाना डांगे, जुल्फी शेख, मोहसिना शेख, शमा बरडे, समीना शेख, सायराबानू चौगुले इत्यादी कवयित्रींनी आपल्या रचना सादर केल्या. यानंतर डॉ. इक्बाल मिन्ने लिखित व आरेफ अन्सारी दिग्दर्शित ‘एक रात्र वादळी’ या एकांकिकेचं अभिजित भातलवंडे व विदुला बाविस्कर यांनी सादरीकण केलं.
    मिलाजुला मुशायऱ्यात 30 कवींनी सहभाग घेतला होता. कलीम खान, ए.के. शेख, मुबारक शेख, मसूद पटेल, खलील मोमीन, बशारत अहमद, बदीउज्मा बिराजदार, सय्यद आसीफ, आबीद शेख, राज पठाण, कैलास गायकवाड, आबीद मुन्शी, छाया गोवारी यांच्यासह सुमारे 30 कवींनी संमेलनात रचना सादर केल्या. रविवारी पहिल्या सत्रात नवोदित कवींचा मुशायरा झाला. यात शफी बोल्डेकर, सुनिती साठे, मोहसीन सय्यद, समाधान दहिवाल, परवेज शेख, जावेद अली यांच्यासह सुमारे 20 पेक्षा जास्त कवींनी सहभाग घेतला. यानंतर सोशल मीडिया व आजचा तरुण यात नौशाद उस्मान, खालीद मुल्ला, शशी सोनवणे व साजिद पठाण यांनी सोशल मीडियातील लेखनशैली, ट्रोलिंग व बिझनेस मॉडेलवर चर्चामंथन केलं. बेगुनाह कैदी पुस्तकाचे लेखक अब्दुल वाहिद शेख यांनी मुंबईतील 2006 पश्‍चिम रेल्वे ब्लास्टमधील निर्दोष आरोपींच्या शिक्षेत सूट मिळावी, यासाठी सोशल मीडिया कॅम्पेन चालवण्याचं आवाहन केलं.
    मंडळाच्या सर्वसाधारण सभेत मंडळाची आगामी भूमिका ठरविण्यात आली. यात त्रैमासिक पत्रिका व वेबसाईट सुरू करणं, मंडळाच्या विभागीय शाखा सुरू करणं, निधी व जागेसाठी प्रयत्न करणे आदी विषयाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. संमेलनाच्या समारोपाआधी कोकणी मुस्लिमांच्या साहित्य व सांस्कृतिक योगदानावर मंथन झालं.
    प्रसिद्ध साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांच्या प्रमुख उपस्थित समारापोचा सोहळा पार पडला. समारोपात एकूण 16 ठराव मांडण्यात आले. यात मराठी भाषेचं विद्यापीठ अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूरला व्हावं, मुस्लीम मराठी साहित्य व सांस्कृतिक मंडळासाठी विभागीय साहित्य मंडळाप्रमाणे अनुदान मिळावं, जेलमधील दलित-आदिवासी व मुस्लीम विचाराधिन कैद्यांची सुटका करावी इत्यादी विषय मांडण्यात आले. या संमेलनाला राज्यभरातून अनेक मराठी मुस्लीम व मुस्लीमेत्तर लेखकांनी हजेरी लावली होती. आयोजकांनी बाहेरगावाहून आलेले सर्व साहित्यीक, श्रोत्यांसाठी राहणे, जेवणाचीही उत्तम व्यवस्था केली होती. संमेलन यशस्वी करण्यासाठी संमेलनाध्यक्ष प्राचार्या बीबी आतिमा बालेखाँ मुजावर, संमेलन प्रमुख  डॉ. शेख इक्बाल व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. साहित्य संमेलना दरम्यान पुस्तकांचे स्टॉलही लावले होते.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget