Halloween Costume ideas 2015

ग्रंथालयाकडे दुर्लक्ष तर कसा होणार सुशिक्षित समाजाचा विकास


ग्रंथालय हा वाचकांसाठी ज्ञानाचा महासागर आहे, आज ग्रंथालयाशिवाय शिक्षण व सुसंस्कृत समाजाची कल्पनाच करता येत नाही. आपल्या सर्वांच्या जीवनात ग्रंथालयाचे अमूल्य योगदान आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, प्रत्येक अडचणीत पुस्तकं माणसाशी खऱ्या मित्रासारखी सोबतीला असतात. हे तेव्हाही सोबत असतात जेव्हा आपल्याला कोणी साथ देत नाही. ज्याने जीवनात ग्रंथालयाचे मूल्य समजले नाही, त्याने उत्कृष्ट जीवन जगलेच नाही. ग्रंथालये वाचकांना त्यांचे जीवन सोपे, सुलभ, उज्ज्वल आणि प्रगतीच्या मार्गावर जाण्यासाठी सतत प्रेरित करून एक चांगला मार्ग तयार करतात. ग्रंथालयांचे जाळे जगभर पसरलेले आहे, ग्रंथालयांच्या विकासासाठी सर्वात आवश्यक म्हणजे तज्ञ कर्मचारी, योग्य वाचन साहित्य आणि पुरेसा निधीसह उत्कृष्ट व्यवस्थापन. विकसित ग्रंथालये वाचकांना उत्तम सेवा देऊन देशाच्या विकासात मोलाचे योगदान देतात. ग्रंथालय हे शिक्षण केंद्रात ज्ञानाचे मुख्य स्त्रोत म्हणून ओळखले जाते. देशात दरवर्षी १४ ते २० नोव्हेंबर रोजी "राष्ट्रीय ग्रंथालय आठवडा" मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आज अत्याधुनिक लायब्ररी आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा समाविष्ट झाल्या आहेत, एका क्लिकवर, आपल्याला जगभरातील ग्रंथालयांमध्ये सहज प्रवेश मिळतो.

देशातील ग्रंथालयांच्या स्थितीचे वास्तव :-

परदेशाप्रमाणे आपल्या देशातील ग्रंथालयांचे चित्र बरेच बदलले आहे. देशातील आयआयटी, आयआयएम, एम्स यांसारख्या मोठ्या शैक्षणिक संस्थांची ग्रंथालये जागतिक दर्जाची आहेत. अनेक खासगी शैक्षणिक संस्थाही ग्रंथालयांच्या विकासाकडे विशेष लक्ष देतात, पण सर्वत्र असे नाही. आजच्या युगात पैशाला अधिक महत्त्व दिले जाते आणि ग्रंथालय हे पैसे कमविण्याचे केंद्र नाही, त्यामुळे कदाचित त्याचे महत्त्व कमी मोजले जात आहे. आज देशात मोठ्या प्रमाणात ग्रंथालये आपल्या अस्तित्वाची लढाई लढत आहेत. आर्थिक चणचण आणि कुशल कर्मचाऱ्यांची कमतरता यामुळे अनेक ग्रंथालये नाममात्र राहिली आहेत. अनेक ग्रंथालयांमध्ये सेवेच्या नावाखाली फक्त मोजकी वर्तमानपत्रे उपलब्ध असतात, तर अनेक ग्रंथालयांमध्ये चांगल्या देखभालीअभावी मौल्यवान वाचनसाहित्य खराब होत आहे. अनेक ग्रंथालयांच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत, तर अनेक ग्रंथालये कुशल कर्मचाऱ्यांअभावी वाईट अवस्थेत आहेत. अनेक ग्रंथालयांमध्ये खुर्ची, टेबल, कपाट, खिडकी, दरवाजाही तुटलेल्या अवस्थेत पाहायला मिळतात. अनेक ग्रंथालयांच्या भिंतींना भेगा पडल्या आहेत, तर अनेक ग्रंथालयांमध्ये पावसाळ्यात छतावरून पाणी टपकते. अशा समस्यांमुळे जगाला दिशा दाखविणारा ग्रंथालय आज दिशाहीन होत आहे. अनेक मोठी ग्रंथालये केवळ चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या भरोस्यावर चालत आहेत. अनेक राज्यांच्या सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये, शाळा-महाविद्यालयांमध्ये, महानगरपालिका किंवा इतर सरकारी क्षेत्रातील ग्रंथालयांमध्ये तज्ञ कुशल कर्मचाऱ्यांची भरती होऊन काही वर्षे नाही, तर अनेक दशके उलटून गेली आहेत. जबाबदार विभाग किंवा प्रशासनाला ग्रंथालयांचे महत्त्व कळत नाही, असे नाही. ग्रंथालयांचे महत्त्व समजून निधीची उपलब्धता आणि तज्ञ कर्मचारी भरती लवकरच केली जाईल, असे आश्वासन त्यांचा कडून सातत्याने मिळत असते. दिवस, महिने, वर्षे उलटतात, ग्रंथालयांची अवस्था आणखी बिकट होत जाते, कर्मचारी निवृत्त झाले तरी नवीन कर्मचारी भरती होत नाहीत. देशातील अनेक ग्रंथालयांची इतकी वाईट अवस्था असताना तेथील वाचकांची ज्ञानाची तहान कशी भागणार, हा अतिशय गंभीर प्रश्न आहे. 

जीवनात ग्रंथालयाची भूमिका अनमोल :-

जगात असेच देश विकसित झाले आहेत ज्यांनी शिक्षण क्रांतीचे महत्त्व समजून शिक्षणासोबतच त्यांना वाव देण्याकरिता ग्रंथालयांची उन्नती केली, कारण ग्रंथालये शिक्षणाचे आधारस्तंभ आहेत, वेळेची बचत करून मनुष्याला योग्य दिशा देऊन ज्ञानी बनवतात. जगातील महान व्यक्तिमत्त्वांचे सोबती म्हणून पुस्तके ओळखली जातात. जे पुस्तकांशी मैत्री करतात, ते आयुष्यात कधीच एकटे नसतात. शालेय शिक्षणाच्या पहिल्या टप्प्यापासून ते आयुष्याच्या शेवटपर्यंत ग्रंथालये मानवाला मार्गदर्शन करतात. जिथे शिक्षकालाही ज्ञानाची तळमळ असते, ते केंद्र म्हणजे ग्रंथालय. जीवनाचा अविभाज्य घटक असलेले ग्रंथालय आज उपेक्षेचे केंद्र बनले आहे. देशातील अनेक राज्यांतील सार्वजनिक व शैक्षणिक ग्रंथालयांमध्ये मूलभूत सुविधाही नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनाचे प्रचंड नुकसान होत आहे. ज्या वयात मुलं आपल्या आयुष्याला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न करत असतात, त्याच वयात ग्रंथालयाच्या ज्ञानाच्या रूपाने महत्त्वाच्या मार्गदर्शनापासून ते वंचित राहतात, अशाने शिक्षणाचा पाया कसा बळकट होणार.

ग्रंथालयांकडे दुर्लक्ष म्हणजे सुशिक्षित समाजाचा विकास थांबवणे :-

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जबाबदार विभागाने ग्रंथालयांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणे आहे. ग्रंथालयांमध्ये कुशल कर्मचाऱ्यांच्या भरतीकडे विशेष लक्ष देण्याची नितांत गरज आहे. ग्रंथालयातील सेवा-सुविधा आणि उपयुक्तता टिकवून ठेवण्यासाठी जबाबदार अधिकारी विभाग, व्यवस्थापन आणि प्रशासन यांनी भर देणे गरजेचे आहे.

योग्य अर्थसंकल्पाअभावी अनेक ग्रंथालये नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, त्यामुळे ग्रंथालयांचे योग्य व्यवस्थापन आणि विकास करण्यासाठी योग्य निधीची सतत उपलब्धता असायला हवी, विशेषत ग्रामीण भागात जास्त लक्ष देण्याची गरज आहे. सर्व प्रकारचे स्थानिक प्रशासन महानगरपालिका, राज्य सरकार आणि केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या सर्व शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालये, अनुदानित सार्वजनिक आणि इतर ग्रंथालये यांनी दरवर्षी आवश्यकतेनुसार ग्रंथालयीन कर्मचारी भरती करावी. ग्रंथालयाच्या पातळीनुसार व योग्यतेनुसार दरवर्षी ग्रंथालय वाचन साहित्य खरेदी केले जावे. आपल्या प्रत्येक जिल्ह्यात जागतिक दर्जाची अत्याधुनिक ग्रंथालये निर्माण करणे ही काळाची गरज आहे, देशाचे शैक्षणिक धोरण बळकट करण्यासाठी ग्रंथालये विकसित करायलाच हवी. सुशिक्षित समाजात ग्रंथालयांना योग्य स्थान देण्यासाठी सरकारने शिक्षणाबरोबरच ग्रंथालयासाठी विशेष बजेट करण्याचा विचार करायला हवा. प्रत्येक गाव, शहर, वर्ग, प्रत्येक विद्यार्थी, शेतकरी, गृहिणी, व्यापारी, नोकरदार आणि देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत ग्रंथालयाचा लाभ पोहोचल्यास देशातील विकासाचे खरे चित्र दिसून येईल.


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget