(१००) (शहरात प्रवेश केल्यानंतर) त्याने आपल्या मातापित्याला उठवून आपल्यापाशी सिंहासनावर बसविले आणि सर्वजण त्याच्यापुढे झुकले.७० यूसुफ (अ.) ने सांगितले, ‘‘हे पिता, हे फळ आहे माझ्या त्या स्वप्नाचे जे मी पूर्वी पाहिले होते, माझ्या पालनकत्र्याने ते स्वप्न साकार केले. त्याचे उपकार आहेत की त्याने मला तुरुंगातून बाहेर काढले, आणि तुम्हा लोकांना ओसाड भागातून आणून मला भेटविले, वस्तुत: शैतानाने माझ्या आणि माझ्या भावांच्या दरम्यान बिघाड निर्माण केले होते. वस्तुस्थिती अशी आहे की माझा पालनकर्ता नकळत उपाययोजनेद्वारे आपले मनोरथ साकार करतो, नि:संशय तो सर्वज्ञ व बुद्धिमान आहे.
(१०१) हे माझ्या पालनकत्र्या, तू मला राज्य प्रदान केले आणि मला गोष्टीच्या तळापर्यंत पोहचण्याचे शिकविले. पृथ्वी व आकाश बनविणारा तूच इहलोकात व परलोकात माझा वाली आहेस, माझा शेवट इस्लामवर कर आणि परिणामांती मला सदाचारी लोकांबरोबर मिळव.’’७१
(१०२) हे पैगंबर (स.)! ही सत्य कथा परोक्षाच्या वार्तांपैकी आहे जी आम्ही तुमच्याकडे दिव्य प्रकटन म्हणून पाठवीत आहोत. एरव्ही तुम्ही त्यावेळी हजर नव्हता जेव्हा यूसुफ (अ.) च्या भावांनी आपापसांत संगनमत करून कट केला होता.
(१०३) परंतु तुम्ही मग कितीही इच्छा केलीत तरी, यांच्यातून बहुतेक लोक मान्य करून घेणारे नाहीत.७२
७०) `सज्दा' या शब्दामुळे अनेकांना भ्रम झाला आहे. एका गटाने तर यालाच प्रमाण मानून बादशाह आणि पीर व संतसाठी अभिवादन आणि आदराने ``सज्दे'' (नतमस्तक) यांचे वैध होणे सिद्ध केले आहे. दुसऱ्या लोकांना या परेशानीपासून वाचण्यासाठी याचे स्पष्टीकरण करावे लागले की नंतरच्या शरियतमध्ये अल्लाहशिवाय इतरांना सजदा करणे हराम (अवैध) होते. जो सजदा (नतमस्तक) उपासनेच्या भावनेपासून रिक्त असेल तर तो अल्लाहशिवाय दुसऱ्यांनासुद्धा केला जाऊ शकत होता. परंतु पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या शरियतमध्ये (धर्मशास्त्रात) प्रत्येक प्रकारचे सजदे अल्लाहशिवाय इतर दुसऱ्यांसाठी हराम (अवैध) ठरविले गेले. हे सर्व भ्रम खरे तर यामुळे निर्माण झाले की शब्द `सजदा' ला वर्तमान इस्लामी परिभाषेचे समानार्थी समजले गेले. म्हणजे हात, गुडघे आणि माथा जमिनीवर टेकणे. परंतु `सजदा' चा मूळ अर्थ झुकणे आहे आणि येथे हा शब्द याच अर्थाने आला आहे. प्राचीन सभ्यतेत ही प्रथा रुढ होती (आणि आजसुद्धा काही देशात ही रूढी चालू आहे) एखाद्याच्या उपकाराबद्दल आभार प्रदर्शित करण्यासाठी, स्वागत करण्यासाठी किंवा नमस्कार करण्यासाठी, छातीवर हात ठेवून पुढे ओणवे होत असत. याच झुकण्यासाठी अरबीमध्ये `सुजुद' आणि इंग्रजीत इुि हा शब्द आला आहे. बायबलमध्ये याची अनेक उदाहरणे सापडतात. प्राचीन काळात ही पद्धत शिष्टाचार आणि सभ्यता समजली जात होती. पैगंबर इब्राहीमविषयी एकाजागी लिहिले आहे की त्यांनी आपल्या तंबूकडे तीन माणसांना येताना पाहिले. ते त्यांच्या स्वागतासाठी गेले आणि जमिनीपर्यंत झुकले. यासाठी अरबी बायबलमध्ये दोन शब्द आले आहेत (तक्वीन १८ : ३) याव्यतिरिक्त आणि अनेक उदाहरणे बायबलमध्ये अशी सापडतात ज्यांनी स्पष्ट माहीत होते की या `सजदे' चा अर्थ तो नाहीच जो आज इस्लामी परिभाषेत वापरला जातो.
ज्यांनी परिस्थितीच्या वास्तविकतेला जाणून न घेता त्याचे स्पष्टीकरण वरीलप्रमाणे केले आहे. त्यांनी अंदाजे लिहिले की नंतरच्या धर्मशास्त्रात (शरियत) अल्लाहव्यतिरिक्त दुसऱ्याला आदराचा सजदा किंवा अभिवादनाचा `सजदा' करणे वैध होते; ही त्यांची टिपणी अगदीच निराधार आहे. इस्लामी परिभाषेतील सजदा येथे अभिप्रेत असेल तर अल्लाहने पाठविलेल्या कोणत्याच शरियतमध्ये `सजदा' अल्लाहशिवाय दुसऱ्यासाठी कधीच वैध राहिला नाही. बायबलमध्ये उल्लेख आहे की बाबिलच्या कैदेच्या वेळी अखसवेरीस बादशाहने हामान याला सर्वात श्रेष्ठ अधिकारी बनविला आणि आदेश दिला की सर्व लोकांनी त्याला आदरपूर्वक अर्थाने सजदा करावा. तेव्हा बनीइस्राईलचे संत मुर्दकी यांनी हा आदेश अमान्य केला (अस्तर ३ : १-२) तलमूदमध्ये या घटनेची व्याख्या करताना याचे विवरण दिले गेले आहे,
``बादशाहच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले, `शेवटी तू हामानला सजदा करण्यास का नकार देतोस? आम्हीसुद्धा माणूसच आहोत. परंतु शाही आदेशांचे आम्ही पालन करतो. त्याने उत्तर दिले, `तुम्हाला माहीत नाही. काय एक मत्र्य मनुष्य जो उद्या मातीत मिसळणार आहे. यायोग्य बनतो की त्याचे श्रेष्ठत्व मानले जावे? काय मी त्याला सजदा करू जो एका स्त्रीच्या उदरातून आला. काल मुलगा होता, आज तरीण बनला. उद्या म्हातारा होईल आणि परवा मरून जाईल? मी तर त्या शाश्वत अनादि ईश्वर (अल्लाह) च्याच पुढे झुकेन जो जिवंत सत्ता आहे, सर्वांना सांभाळणारा आणि कायम राहणारा आहे. तोच सृष्टीनिर्माणकर्ता आणि सृष्टीशासक आहे. मी तर फक्त त्याच्याच पुढे झुकेल आणि दुसऱ्या कुणाच्याही पुढे झुकणार नाही.'
७१) ही काही वाक्ये याप्रसंगी पैगंबर यूसुफ (अ.) यांच्या मुखातून निघाली आहेत. आमच्या समोर एका सच्चा ईमानधारकाच्या आचरणाचे अनोखे मनमोहक चित्र उभे करतात. (यूसुफ (अ.) जीवनाचे चढ-उतार पार करत) जागतिक प्रगतीच्या सर्वांत उंच पदापर्यंत पोहचले. ते ईर्षा करणारे भाऊ जे त्यांना ठार करू पाहात होते, यूसुफ (अ.) यांच्या शाही िंसहासनासमोर नतमस्तक होऊन उभे आहेत. ही संधी तर जगरहाटीनुसार व्यंग करण्याची आणि निंदानालस्ती करण्याची होती परंतु यूसुफ (अ.) यांचे एक दुसरे चरित्र येथे प्रकट होते. ते आपल्या प्रगतीवर गर्व करण्याऐवजी अल्लाहचे आभारी बनतात. यूसुफ (अ.) ईर्षा करणाऱ्या भावांविरुद्ध एक शब्दसुद्धा तक्रारीचा उच्चरीत नाही. ते त्यांचा शिष्टाचार अशा प्रकारे करतात की शैतानाने त्यांच्या आणि माझ्यामध्ये दुष्टव्य टाकले. आणखी काही उल्लेख करून ते आपल्या अल्लाहपुढे नतमस्तक होतात आणि अल्लाहप्रती आभार व्यक्त करतात. यूसुफ (अ.) यावेळी अल्लाहशी प्रार्थना करतात की जगात मी जोपर्यंत जीवंत राहीन तोवर तुझ्या उपासना आणि गुलामीत कायम दृढ राहीन आणि जेव्हा या जगाचा निरोप घेईन तेव्हा मला सदाचारी लोकात सामील कर. किती उंच व श्रेष्ठ तसेच पवित्र असे हे आदर्श चरित्र आहे.
७२) म्हणजे या लोकांच्या दुराग्रहाची विचित्र स्थिती आहे तुमच्या पैगंबरत्वाची परीक्षा घेण्यासाठी त्यांनी विचारांति जी मागणी केली तिला तुम्ही भर सभेत त्वरित पूर्ण केली. आता तुम्ही आशा करीत असाल की यानंतर त्यांना जाणून घेण्यास संकोच वाटत नसेल की हा कुरआन तुम्ही स्वत: रचलेला नाही तर तुमच्यावर हे दिव्य प्रकटनाद्वारे अवतरित होत आहे. परंतु विश्वास करा की ते आतासुद्धा मान्य करणार नाहीत आणि आपल्या नकार देण्यावर कायम राहाण्यासाठी दुसरे बहाणे पुढे करतील. येथे संबोधन जरी पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याशी आहे तरी त्याचा मूळ उद्देश पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या पैगंबरत्वाला नाकारणाऱ्यांना त्यांच्या दुराग्रहावर सचेत करणे आहे.
Post a Comment