एक अलौकिक प्रतिभेचा आविष्कार
पैगंबराच्या जन्माच्या वेळी मक्का हे शहर व्यापाराचे केंद्र म्हणून भरभराटीला आले होते, परंतु मक्केत प्रचलित असलेल्या सामाजिक दुराचाराने पैगंबर अत्यंत व्यथित झाले, कारण मोठ्या प्रमाणात नीतिमत्ता मक्केमध्ये खालावली होती. प्रतिष्ठित कुटुंबातील तरुण हे मद्यपान, जुगार आणि दुर्गुणांनी युक्त झाले होते. त्यामुळे पैगंबर मुहम्मद (स.) सांसारिक व्यवहारापासून दूर जाऊ लागले व आपला वेळ मक्केपासून तीन किलोमीटर दूर असलेल्या हिरा नावाच्या गुहेत घालवू लागले. सामाजिक संपर्क टाळून उपवास व ईश्वराची प्रार्थना याकडे त्यांचा कल वाढू लागला व एके दिवशी विश्वाचा निर्माता असलेल्या ईश्वराचे पठण, मनन, चिंतन करत असताना त्यांना ईश्वराचा संदेश देवदूतामार्फत प्राप्त झाला तो संदेश पैगंबर यांनी लोकांपर्यंत पोहोचवला.
तत्कालीन अरब समाज हा अयोग्य कृतीने बरबटलेला होता. अन्याय अत्याचार यांचे स्तोम माजले होते. अशा समाजास नियमबद्ध करणे आवश्यक होते. त्यासाठी पैगंबर मुहम्मद (स.) हे हिरा गुहेत या सामाजिक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी ध्यानस्थ बसले होते, जेणेकरून समाज सन्मार्गावर येईल. त्यांनी एकेश्वरवादी स्वरूपाचा इस्लाम धर्म पुन्हा प्रस्थापित केला.
तत्कालीन समाजव्यवस्थेत केवळ अन्याय अत्याचाराचे स्तोम माजले होते, असे नाही तर त्यापेक्षाही भयानक समस्या समाजामध्ये अस्तित्वात होत्या. त्यात स्त्रियांची स्थिती खूप दयनीय होती. स्त्रिया केवळ गुलाम उपभोग्य वस्तू आहेत असा समज समाजाचा झाला होता. तत्कालीन अरब समाजामध्ये मुलींना बऱ्याच वेळेस जन्मानंतर जिवंतपणे दफन केले जात असल्याचे प्रकार घडत होते. अशा या रानटी व क्रूरतेने बरबटलेल्या परिस्थितीत पैगंबर मुहम्मद (स.) हे स्त्रियांचे मुक्तिदाते म्हणून पुढे आल्याचे दिसून येतात. त्यांनी स्त्रीभ्रूणहत्या यास विरोध केला. त्याचबरोबर विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार केला. स्वतः त्यांनी 40 वर्षीय विधवेशी विवाह केला. याचाच अर्थ ते केवळ तत्त्वज्ञान सांगणारे तत्त्ववेत्ते होते असे नाही तर कृती करणारे सुधारक होते. इस्लाम धर्मामध्ये स्त्रीजातीला खूप महत्त्वाचा दर्जा दिला आहे. ते म्हणतात, "स्त्रियांसोबत चांगला व्यवहार करा आणि त्यांच्या प्रती दयाळू राहा, कारण त्या तुमच्या सहयोगी आहेत. जर तुम्ही स्त्रीचा आदर करत नसाल तर तुम्ही मुसलमान नाहीत." त्याचबरोबर त्यांनी स्त्री शिक्षणाला महत्त्व दिले स्त्री-शिक्षण हक्काचा पुरस्कार लक्षात घेतल्यानंतर ते उदारमतवादी विचाराचे आहेत, हे लक्षात येते.
त्यांच्या जन्मापूर्वी आणि अत्याचार तर होतेच, त्याचबरोबर अज्ञानापायी अरबलोक मुलगी जन्माला आली की तिला जिवंत दफन करत असत. स्त्रियांचा व विधवांचा छळ करत. त्यांच्यावर अत्याचार केले जात असत. त्यांनी स्वतः वयाच्या पंचविसाव्या वर्षी खदीजा या विधवा महिलेशी लग्न केले. ते केवळ मार्गदर्शन, उपदेश व आदेश देतात असे नाही तर हे सर्व करण्यापूर्वी सर्वप्रथम स्वतः आचरण करणे हा त्यांचा विशेष स्वभावगुण होता. विनम्रता, मनमिळाऊपणा, सभ्यता, प्रेमळ स्वभाव, शत्रूंना माफ करणे, द्वेशभावना न बाळगणे हे गुण त्यांच्या अंगी होते. कितीही कठीण प्रसंग आला तरी सत्याचा मार्ग न सोडणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते. आणि इतरांनाही सत्याच्या मार्गावर आचरण करणे आणि सत्यमार्गाचा अवलंब करण्याचा उपदेश संपूर्ण जीवनभर त्यांनी दिला.
रमजान महिन्यात असेच एके दिवशी हिरा नावाच्या गुहेत जिब्राईल नावाच्या देवदूताने त्यांना अल्लाहने प्रेषित म्हणून निवडले आहे, हा संदेश दिला आणि पैगंबर मुहम्मद (स.) यांनी कुरआन म्हणजेच अल्लाहचा संदेश आपले नातेवाईक व इतर लोकांना देण्याचे कार्य सुरू केले आणि त्या माध्यमातून इस्लाम धर्माचा प्रचार प्रसार करताना त्यांचे अनेक विरोधक निर्माण झाले. पण न डगमगता न विचलित होता त्यांनी आपले हे कार्य नेटाने पुढे नेले. मूर्तिपूजा सोडून एकमेव ईश्वर मानण्याचा संदेश त्यांनी दिला. काही लोकांनी ही आज्ञा पाळली तर काही लोकांनी पाळली नाही आणि एकमेव ईश्वर म्हणजे अल्लाह अशी आज्ञा पाळणारे त्यांना पैगंबर यांनी मुसलमान म्हटले आहे व ज्यांनी आज्ञा पाळली नाही त्यांना गाफील किंवा काफीर म्हंटले आहे. काफीर म्हणजे इन्कार करणारा. अशा प्रकारे गाफील आणि मुसलमान संघर्षही तिथे सुरू झाला. हा संघर्ष जरी निर्माण झाला असला तरी पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आपले कार्य सोडले नाही. हे कार्य करत असताना पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार घालण्यात आला. परंतु तरीही त्यांनी आपले इस्लाम धर्म प्रचार प्रसार कार्य सुरूच ठेवले.
पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या कार्यामुळे अरबस्तानात परिवर्तन घडून आले. लूटमार व अनिश्चित जीवन जगत असणाऱ्या अरब समाजाला त्यांनी जीवन जगण्याचा मार्ग उपलब्ध करून दिला. त्याचबरोबर अरबलोक एकेश्वरवाद मानू लागले आणि समाजातील मूर्तिपूजेचा बोलबाला नष्ट झाला, अनावश्यक असलेले थोतांड नष्ट झाले, अरबांचे साम्राज्य प्रस्थापित झाले, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाला कारण अन्याय-अत्याचार होत होता त्या वेळेस अरबलोक आत्मविश्वासाअभावी मुकाट्याने इतरांची गुलामी स्वीकारणे एवढेच काम त्यांनी आतापर्यंत केले होते. पण पैगंबराच्या शिकवणीनंतर त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाला आणि अरबांचेसुद्धा साम्राज्य प्रस्थापित झाले आणि या आत्मविश्वासाच्या बळावर आपापसात लढणारे अरब जग जिंकण्यास पुढे आले. याचा परिणाम म्हणजे अरबांचे साम्राज्य पश्चिमेस फ्रान्स व स्पेनपासून संपूर्ण उत्तर आफ्रिका ज्यात सुयेजपर्यंत अरबस्तान व फारस यापासून मध्य आशियापर्यंत म्हणजेच आशिया, मंगोलिया इथपर्यंत त्यांची साम्राज्ये निर्माण झाली.
पैगंबर मुहम्मद (स.) यांना ऐश्वर्या, ऐषआराम व बडेजाव यांचा मनापासून तिटकारा असे. त्यांची वृत्ती शांत, लीन व साधी होती. आपल्या आयुष्यात त्यांना निरनिराळ्या दिव्यातून जावे लागले. तथापि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही एकेश्वरवादाचा पुरस्कार, मूर्तिपूजेचा निषेध, गुलामगिरीविरुद्ध जागृती, स्त्रियांच्या उद्धाराचे प्रयत्न आणि अंधश्रद्धा दूर करून ज्ञानाची उपासना करण्याची शिकवण इत्यादी गोष्टीवर आयुष्यभर निष्ठेने कार्य केले.
- डॉ. सत्यभामा सतिशकुमार जाधव
उपाध्यक्षा, जिजाऊ ब्रिगेड, नांदेड
Post a Comment