हजरत आयशा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी अगोदर एक काम करण्यास मनाई केली होती, मग त्यांनी ते काम केले जेणेकरून लोकांना माहीत व्हावे की आता पैगंबर (स.) ते काम करण्याची परवानगी देत आहेत. तरीही काही लोक ते काम करण्यास तयार झाले नाहीत. जेव्हा पैगंबरांना त्यांच्या या धारणेबाबत माहीत झाले तेव्हा त्यांनी भाषण दिले आणि अल्लाहच्या स्तुती व गुणगान केल्यानंतर म्हणाले, ''मी करीत असलेले काम करण्यापासून काही लोक का धजावत नाहीत. अल्लाह शपथ! मला त्या सर्वांपेक्षा अधिक ज्ञान आहे आणि त्या सर्वांपेक्षा अधिक अल्लाहचे भय बाळगतो.'' (हदीस : बुखारी व मुस्लिम)
माननीय जाबिर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे माननीय उमर (रजि.) आले आणि म्हणाले, ''आम्हाला यहुद्यांच्या (ज्यूंच्या) काही गोष्टी योग्य वाटतात, यावर आपले काय मत आहे? त्यापैकी काही गोष्टी आम्ही लिहून घ्याव्यात काय?'' पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ''जसे ज्यू आणि ख्रिश्चन लोक आपले ग्रंथ सोडून खड्ड्यात पडले तसे तुम्हीदेखील मार्गभ्रष्टतेच्या खड्ड्यात पडू इच्छिता? मी तुमच्याजवळ तो धार्मिक कायदा आणला आहे जो सूर्यासम प्रकाशमान आणि आरशासम स्पष्ट आहे आणि जर आज मूसा (अ.) जिवंत असते तर त्यांनादेखील माझे आज्ञापालन करावे लागले असते.'' (हदीस : मुस्लिम)
स्पष्टीकरण : ज्यूंनी आपला ग्रंथ 'तौरात'च्या शिकवणींमध्ये फेरफार केला होता, परंतु त्यामध्ये काही सत्य गोष्टीदेखील होत्या ज्या मुस्लिम लोक ऐकत होते आणि पसंतही करीत होते. जर पैगंबर मुहम्मद (स.) यांनी परवनागी दिली असती तर 'दीन' (जीवनधर्म) ला हानी पोहोचली असती. कोणत्या धर्मात काही सत्य व चांगल्या गोष्टी आढळत नाहीत? आदरणीय पैगंबरांनी जे उत्तर माननीय उमर (रजि.) यांना दिले त्यावरून ही गोष्ट स्पष्ट होते की ज्याच्या घरात स्वच्छ व निर्मळ पाण्याचा झरा असेल त्याने खडकाळ जमिनीकडे जाण्याची इच्छा बाळगू नये.
माननीय अब्दुल्लाह बिन उमर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ''जोपर्यंत एखाद्या मनुष्याची इच्छा आणि त्याच्या कामवासनांचे आकर्षण मी आणलेल्या (ग्रंथ, कुरआन) च्या अधीन असत नाही तोपर्यंत तो मनुष्य (संपूर्ण) मोमिन (ईमानधारक) होऊ शकत नाही.'' (हदीस : मिश्कात)
स्पष्टीकरण : पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यावर ईमान बाळगल्यानंतर आवश्यक आहे की मनुष्याने आपली इच्छा, आपली आकांक्षा आणि आपल्या मनोकामनांना पैगंबरांनी आणलेल्या उपदेशाच्या अधीन करावी, पवित्र कुरआनच्या हातात आपल्या इच्छेची लगाम द्यावी, असे न केल्यास पैगंबरांवर ईमान बाळगण्यास काहीही अर्थ उरत नाही.
माननीय अनस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ''तुमच्यापैकी कोणताही मनुष्य मोमिन (ईमानधारक) होऊ शकत नाही जोपर्यंत मी त्याच्या दृष्टीने त्याचा पिता, त्याचा पुत्र आणि सर्व मानवांपेक्षा अधिक प्रिय होत नाही.'' (हदीस : बुखारी व मुस्लिम)
स्पष्टीकरण : पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या वक्तव्याचा अर्थ असा आहे की मनुष्य मोमिन तेव्हाच बनतो जेव्हा पैगंबर आणि त्यांनी आणलेल्या 'दीन' (जीवनधर्म) वरील आस्था इतर सर्व आस्थांपेक्षा अधिक असेल. पुत्राचे प्रेम वेगळयाच मार्गावर जाण्यास सांगते, पित्याचे प्रेम वेगळया मार्गावर जाण्यास सांगते आणि पैगंबर मुहम्मद (स.) दुसऱ्या मार्गावर चालण्यास सांगतात. मग जेव्हा मनुष्य सर्व आस्थांना अमान्य करून फक्त पैगंबरांनी सांगितलेल्या मार्गावर चालण्यास तयार होतो तेव्हा समजा की तो सच्चा मोमिन (ईमानधारक) आहे, पैगंबरांवर प्रेम करणारा आहे. असाच मनुष्य इस्लामला हवा आहे आणि असेच लोक जगाचा इतिहास घडवितात. अपूर्ण ईमान पत्नी व मुले आणि पिता व भावाच्या प्रेमांवर कात्री कशी चालवू शकेल!
संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment