(८१) तुम्ही जाऊन आपल्या वडिलांना सांगा, ‘‘हे पिता! आपल्या सुपुत्राने चोरी केली आहे. आम्ही त्याला चोरी करताना पाहिले नाही, जे काही आम्हाला माहीत झाले आहे केवळ तेच आम्ही सांगत आहोत आणि परोक्षावर तर आम्ही नियंत्रण ठेवू शकत नाही.
(८२) आपण त्या वस्तीतील लोकांना विचारून घ्यावे जेथे आम्ही होतो. त्या काफिल्याला विचारा ज्यांच्यासमवेत आम्ही आलो आहोत. आम्ही आमच्या निवेदनात अगदी खरे आहोत.’’
(८३) पित्याने ही कथा ऐकून सांगितले, ‘‘वस्तुत: तुमच्या वासनेने तुमच्यासाठी आणखी एका मोठ्या गोष्टीला सोपे बनविले.६४ बरे, तर मी याच्यावरदेखील संयम ठेवीन आणि उत्तम प्रकारे ठेवीन. काय अशक्य आहे की अल्लाहने त्या सर्वांना आणून मला भेटवावे, तो सर्वकाही जाणतो आणि त्याची सर्व कामे विवेकावर आधारित आहेत.’’
(८४) मग तो त्यांच्याकडून तोंड फिरवून बसला आणि सांगू लागला, ‘‘हाय यूसुफ (अ.)!’’ मनातल्या मनात त्याला दाटून येत होते आणि त्याचे डोळे पांढरे झाले होते.
(८५) मुलांनी सांगितले, ‘‘अल्लाहची शपथ, आपण तर केवळ यूसुफ (अ.) चीच आठवण करीत असता, आता पाळी अशी आली आहे की त्याच्या दु:खात आपण स्वत:ला क्षीण करून टाकाल अथवा आपला प्राणच गमवाल.’’
(८६) त्याने सांगितले, ‘‘मी आपल्या त्रासाची आणि दु:खाची फिर्याद अल्लाहशिवाय इतर कोणाकडेच करीत नाही आणि अल्लाहशी जसा मी परिचित आहे तसे तुम्ही नाही.
(८७) माझ्या मुलांनो, जाऊन यूसुफ (अ.) आणि त्याच्या भावाचा काही सुगावा घ्या, अल्लाहच्या कृपेपासून निराश होऊ नका, त्याच्या कृपेपासून तर केवळ अधर्मीच निराश होत असतात.’’
(८८) जेव्हा हे लोक मिस्रला जाऊन यूसुफ (अ.) च्या समोर दाखल झाले तेव्हा त्यांनी विनंती केली, ‘‘हे सत्ताधीश सरदारा! आम्ही आणि आमचे कुटुंबजन भयंकर संकटात आहोत, आणि आम्ही काही क्षुल्लक पुंजी घेऊन आलो आहोत, आपण आम्हाला भरपूर धान्य देण्याची मेहरबानी करावी. आणि आम्हाला दान द्यावे,६५ अल्लाह दान देणाऱ्याला मोबदला देतो.’’
(८९) (हे ऐकून यूसुफ (अ.) ला राहवले नाही) त्याने सांगितले, ‘‘तुम्हाला हे तरी माहीत आहे का की तुम्ही यूसुफ (अ.) आणि त्याच्या भावाशी काय केले होते, जेव्हा तुम्ही नादान होता?’
६४) म्हणजे तुमच्याजवळ हे समजून घेणे फार सोपे आहे. माझ्या मुलाच्या चांगल्या आचरणाला मी चांगले जाणतो. काय तो एक प्याला चोरी करु शकतो? अगोदर तुम्ही तुमच्या एका भावाला हेतुपुरस्पर हरवून टाकले. त्याच्या सदऱ्यावर खोटे रक्ताचे डाग लावून आणणे सोपे काम होते. आता एका भावाला चोर मानणे आणि मला येऊन त्याची खबर देणे अत्यंत सोपे काम आहे.
६५) म्हणजे माझ्या या विनंतीवरून जे काही आपण द्याल ते आपले दान असेल. या धान्याच्या किमतीत जो माल आम्ही देत आहोत, तो या योग्य मुळीच नाही की आम्हाला आमच्या गरजेपुरते धान्य दिले जावे.
Post a Comment