प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, ''एखाद्या गरीब निराधारास सदका (दान) देण्याने फक्त एक दान करण्याचा मोबदला मिळतो आणि तुमच्या गरीब नातेवाईकाला दान दिल्यास दान देण्याच्या मोबदल्यासहित आपल्या नातलगांचे हक्काधिकार दिल्याचाही मोबदला मिळतो.''
(ह. सलमान बिन आरिज (र.), संदर्भ- निसाई, तिर्मिजी)
दुसऱ्या ठिकाणी प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले, ''असे दान जे माणसाने आपल्या नातेवाईकाला दिले असेल ज्याच्याशी त्याचे संबंध विघडले असतील तर अशा दानाचा मोबदला अधिक आहे.''
(ह. हकीम बिन हजम, तरगीब व तरहीब)
हजरत अबु हुरैरा (र.) यांनी प्रेषित मुहम्मद (स.) यांना विचारले, 'हे अल्लाहचे प्रेषित, कोणत्या दानधर्माचा अधिक मोबदला दिला जाईल?'
प्रेषितांनी उत्तर दिले, ''अशा व्यक्तीचे दान ज्याचा खर्च त्याच्या कमाईपेक्षा जास्त असेल. तो आपला आणि आपल्या मुलाबाळांचे पोट अत्यंत टंचाईने भरतो. ''ते पुढे म्हणाले, ''दानधर्माची सुरुवात तुम्ही अशा व्यक्तीपासून करा, ज्यांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी तुमच्यावर आहे.'' (अबु दाऊद)
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले, ''सात गोष्टी (कर्मे) अशा आहेत ज्यांचा मोबदला माणसाला त्याच्या मृत्युनंतर मिळत असतो.
(१) धर्माचे शिक्षण दिले, (२) एखादा कालवा काढला, (३) एखादी विहीर खोदली, (४) एखादी बाग लावली असेल, (५) मस्जिद बांधली असेल, (६) पवित्र कुरआनच्या प्रती वाटल्या असतील आणि (७) अशी नेक संतान आपल्या पश्चात सोडली असेल जी त्याच्या मृत्युनंतर त्याच्यासाठी प्रार्थना करत राहतात.''
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले, ''दोन मुस्लिमांनी तीन दिवसांपेक्षा जास्त काळ एकमेकांशी संबंध तोडू नये. जर तीन दिवसांपेक्षा जास्त दोन व्यक्ती एकमेकांशी वैर करत राहतील तर ते स्वर्गात जाणार नाहीत. दोघांपैकी जाने पहिला सलाम केला त्याची पापं माफ केली जातील. आणि जर त्यांच्यातील एका माणसाने दुसऱ्याला सलाम केला पण दुसऱ्याने उत्तर दिले नाही तर फरिश्ते त्याचे उत्तर देतील आणि तो दुसरा माणूस सैतानांशी जाऊन मिळेल.''
(तरगीब व तरहीब)
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, ''एक मुस्लिम दुसऱ्या मुस्लिमाचा भाऊ आहे. त्याच्यावर अन्यया करत नाही की त्याचा तिरस्कार करत नाही. त्याच्याशी खोटं बोलत नाही, त्याची निंदा करत नाही. आपल्या बंधुची मदत करा, त्यांच्यावर अत्याचार होत असताना किंवा तो स्वतः अत्याचार करत असेल तरीही. ''
लोकांनी विचारले, 'हे अल्लाहचे प्रेषित, अत्याचारपीडित असणं समजू शकतो, पण तोच जर स्वतः अत्याचार करत असेल तर त्याची मदत कशी करावी?'
प्रेषित म्हणाले, ''त्याला अत्याचार करण्यापासून रोखा. ''
प्रेषित म्हणाले, ''जर एखादा मुस्लिम दुसऱ्या मुस्लिमाची अशा वेळी साथ सोडली असेल जिथे त्याची निंदानालस्ती होत असेल तर अल्लाह त्याला अशा ठिकाणी एकटे सोडून देईल जिथे त्याला अल्लाहची मदत हवी असेल. जर कुणी एका मुस्लिमाची अशा वेळी साथ दिली जिथे त्याचा तिरस्कार केला जात असेल तर अल्लाह त्याला अशा वेळी मदत करेल जिथे त्याला अल्लाहच्या मदतीची गरज असेल.''
(ल. जाबिर. (र.))
संकलन :
सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment