Halloween Costume ideas 2015

मोरबी : मृत्यू झाले स्वस्त

141 जणांचा मृत्यू स्मशान, कब्रस्तानमध्ये रांगा


गुजरातच्या मोरबी येथील मच्छू नदीवरील केबल पूल 30 ऑ्नटोबर रोजी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास कोसळल्याने 500 हून अधिक जण नदीच्या पात्रात पडले. या दुर्घटनेत 141 जणांचा मृत्यू झाला. अनेकांनी आपले अख्खे कुटुंब गमावले, तर कोणी आई, बाबांना तर कोणी मुलांना व कोणी नातलगांना गमावले आहे. अशा परिस्थितीत तिथे माणुसकी जिवंत ठेवली ती तेथील स्थानिक रहिवाशांनी. प्रशासन पोहोचण्याआधीच इलियास, आसीफ, बसीर, रमजान, नईमसह अन्य युवकांनी शंभराहून अधिक लोकांना बाहेर काढण्यात यश मिळवलं. यामुळे अनेकांचा जीव वाचला. या घटनेमुळे गुजरात विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापले आहे. राजकारणी एकमेकांविरूद्ध आरोप-प्रत्यारोप करताहेत. मात्र हे सगळे थोड्या अधिक प्रमाणात या घटनेत जबाबदारी आहेत, असं म्हटलं तर चुकीचे ठरणार नाही. या घटनेत कितीजण जबाबदार असतील याचा तपास सुरू आहे. मात्र घटना घडण्याआधीच घेण्यात येणारी काळजी प्रशासन घेत नसल्याने अशा घटना होतात. यावर अंकुश कोण लावणार की असे मृत्यू स्वस्तच होत राहणार. दरम्यान, पार्थिवाच्या अंत्यविधीसाठी स्थानिक स्मशानभूमी आणि कब्रस्तानमध्ये रांगा लागल्याचे हृदयद्रावक दृश्य पहायला मिळाले.

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गृहमंत्री हर्ष सांघवी यांनी घटनास्थळाला भेट देऊन मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रूपये तर जखमींना 50 हजार रूपयांच्या तुटपुंज्या मदतीची घोषणा केली. पूल व्यवस्थापन समितीविरोधात आयपीसी कलम 304, 308 आणि 114 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे म्हटले आहे. 200 हून अधिक कर्मचाऱ्यांनी बचावाचे कार्य केले. या संबंधात ओरेवा उद्योगसमुहाचे नाव समोर येत आहे. पुलाच्या नुतनीकरणासाठी 12 महिन्यांचा वेळ लागणार होता. तो 7 मार्चला कराराच्या सातव्या महिन्यातच सगळं काम पूर्ण करून पूल जनतेसाठी खुला करण्यात आला. यामुळे याचे काम कसे करण्यात आले, हा ही संशोधनाचा भाग आहे. याचीही सखोल चौकशी करणे गरजेचे आहे, असा सूर जनमाणसांतून उमटत आहे.

या पुलाचा सध्या मालक कोण?

इंडियन एक्स्प्रेस या इंग्रजी वृत्तपत्रातील माहितीनुसार, या पुलाचा मालकी हक्क सध्या मोरबी नगरपालिकेकडे आहे. नगरपालिकेनं नुकतेच हा झुलता पूल ओरेवा ग्रुपकडे करारपत्र करून 15 वर्ष मुदतीकरिता देखभाल आणि चालविण्यासाठी सोपविला होता.

ओरेवा ग्रुपच्या प्रव्नत्यानी प्रसारमाध्यमांना सांगितलं की, अनेक लोकांनी पुलाला हलवण्याचा प्रयत्न केला आणि प्राथमिकदृष्ट्या हेच दिसून येतंय की, याच कारणामुळे पूल कोसळला असावा. नुकतेच पुलाची दुरुस्ती करून 26 ऑक्टोबरला पुन्हा सगळ्यांसाठी खुला करण्यात आला होता. मात्र, नगरपालिकेचं म्हणणं आहे की, पूल खुला करत असल्याची माहिती आम्हाला देण्यात आली नव्हती. मोरबी नगरपालिकेचे मुख्याधिकारी संदिप सिंह झाला यांनी सांगितलं की, हा पूल मोरबी नगरपालिकेची संपत्ती आहे. मात्र, आम्ही काही महिन्यांपूर्वीच 15 वर्षांसाठी ओरेवा कंपनीला देखभाली आणि व्यवस्थापनासाठी सोपवलं होतं. मात्र, या खासगी फर्मने आम्हाला काहीही न कळवताच तो लोकांसाठी खुला केला होता. त्यामुळे आम्ही या पुलाचं सुरक्षा ऑडिट करू शकलो नाहीत. ब्रिज वापरण्यासाठी तिकिटांची विक्री ओरेवा ग्रुपच करत होती. 12 वर्षांहून कमी मुलांसाठी 12 रुपये आणि वयस्करांसाठी 17 रुपये तिकीट ठेवण्यात आलं होतं. ओरेवा ग्रुप घड्याळांपासून ई-बाईकपर्यंत अनेक प्रकारच्या इलेक्ट्रिकल प्रॉडक्ट बनवते. कंपनीच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, कंपनी जगातील दुसऱ्या क्रमांकाची घड्याळ निर्माती कंपनी आहे. 

पुलाचा इतिहास

दीडशे वर्षापूर्वी मोरबीचे राजे सर वाघोजी ठाकोर यांनी मोरबी जिल्ह्यातील हा सस्पेन्शन ब्रिज बांधला. त्यावेळी याला कलात्मकतेचं आणि तंत्रज्ञानाचा चमत्कार मानलं गेलं. या पुलाचं उद्घाटन 20 फेब्रुवारी 1879 रोजी मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर रिचर्ड टेम्पल यांनी केलं होतं. पुलाच्या बांधणीसाठी आवश्यक साहित्य इंग्लंडहून आणण्यात आलं होतं आणि पूल बांधण्यासाठी त्यावेळी 3 लाख 50 रूपये इतका खर्च आला होता.

राजकारण, निवडणूक आणि गुत्तेदार...

143 वर्षापूर्वीचा झुलता पूल आता ठेवायचा का? याचा विचार करायला हवा होता. त्याऐवजी सिमेंटचा नवा पूल बांधून वाहतूक व्यवस्था करता आली असती. तरी अलीकडे या झुलत्या पुलावरून वाहनांची वाहतूक बंद केली होती. या दुर्घटनेची चौकशी करण्यावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप रंगत राहतील. गुजरात विधानसभेची निवडणूक या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. आधीच गुजरातचे राजकीय वातावरण तापले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातच आहेत. त्यांनी घटनास्थळी भेट दिली. जखमींची विचारपूसही केली. तत्पूर्वी रूग्णालयाची रंगरंगोटी करण्यात आली. यावरही टिका झाली. राज्य सरकारने चौकशी सुरू केली. पण त्यातून काही ठोस बाहेर येईल, असे वाटत नाही. कारण नगरपालिका चालविणारे राजकारणी आणि अशी कंत्राटे घेणारे यांचे साटेलोटे असते. राज्य सरकारने मृतांच्या नातेवाइकांना मदतही जाहीर केली आहे. या निवडणुकीच्या रणधुमाळीत सारे विसरून जातील. जुन्या इमारती, पूल, धरणे, रेल्वेमार्ग, रस्ते, आदींचे ऑडिट वेळेवर आणि योग्य पद्धतीने झाले पाहिजे, तरच अशा घटना रोखता येतील. देशात अनेक धरणे आता शंभर वर्षांची झाली आहेत. त्यांची देखभाल दुरुस्ती वेळेवर करणे, प्रसंगी ती पाडून नवी बांधकामे करणे आवश्यक असते. अशी कामे करण्यासाठी तज्ज्ञांची मदत घ्यायला हवी.   

क्षमतेपेक्षा जास्त लोकांना जाण्याची परवानगी का दिली?

ओरेवा ग्रुपची या पुलासंबंधी सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. 125 लोकांनाच पुलावर जाण्याची परवानगी असताना 500 लोक कसे काय सोडण्यात आले. ओरेवा ग्रुपकडून पुलावर जाण्यासाठी तिकीट देण्यात येत होते. मग या कंपनीने पैसा काढण्यासाठी असे केले आहे काय? हा प्रश्न उपस्थित होतो. प्रशासनाने या ग्रुपवर कडक कारवाई करायला हवी. मात्र प्रशासनच जर कमीशन घेऊन मिंधे झाले असेल तर ते काहीच करणार नाही. चार दिवस कारवाईचा बडघा दाखवील. खरे तर या कंपनीचे लायसन्य रद्द करून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हवा. जेणेकरून पुढील काळात देखभाल दुरूस्ती करणाऱ्या कंपन्या इमानदारीने लक्ष ठेवतील आणि अशा घटना वारंवार घडणार नाहीत, असे जनसामान्यांना वाटते. मुळात घड्याळ तयार करणाऱ्या कंपनीला पुलाच्या देखरेखीचे कंत्राट दिलेच कसे याबद्दल कोणी उघडपणे बोलताना दिसत नाही. यावरून हा प्रकार स्थानिक लेवलवर झालेला असून, राज्य शासनापर्यंत याचे धागेदोरे पोहोचतात. 

जीवाची पर्वा न करता युवकांनी ठोकल्या नदीत उड्या...

मृत्यूची भीती कोणाला वाटत नाही, जगणे कोणाला प्रिय नसते. मात्र किंचाळण्याचा आवाज आणि मृतदेह समोर दिसत असतानाही मोरबीच्या स्थानिक युवकांनी जीवाची बाजी लावत नदीपात्रात उड्या घेतल्या. लल्लनटॉप या न्यूज पोर्टलशी बोलताना  इलियास, आसीफ, बसीर, रमजान आदींनी आपला अनुभव कथन केला. ते म्हणाले, आम्हाला फोनद्वारे ही घटना कळताच दुचाकीद्वारे घटनास्थळ गाठले. जीवांचा आकांत थरकाप उडवून देणारा होता. आम्ही नदीपात्रात उड्या घेतल्या. आम्ही प्रशिक्षित पोहणारे नव्हतो वा आम्हाला लोकांना वाचविण्याचा अनुभवही नव्हता. मात्र बुडणारे लोक व वाचविण्याच्या आर्त आवाजाने आमचे हृदय पिळवटून निघाले. एकेक करीत शेकडो लोकांना आम्ही सगळ्यांनी बाहेर काढले. नईम शेख या एकट्या युवकाने 60 जणांचा जीव वाचविल्याचे वृत्त लोकमत ऑनलाईनने दिले आहे. असे अनेक विविध समाजातील लोक असतील ज्यांनी आपल्या जीवाची बाजी लावून परधर्मीय, परजातीय लोकांना वाचविले. खरे तर गुजरातमध्ये कितीही धार्मिक धु्रवीकरण राजकीय पक्ष आणि धर्मांध शक्ती करत असल्या तरी इलियास, आसीफ, बसीर, नईम, रमजान यांनी त्या सर्वांना चपराक दिली आहे की, आम्ही मानवतेचे रक्षक आहोत. जरी तुम्ही राजकारणासाठी माणसं मारत असला तरी आम्ही फरिश्ते बनवून आमच्या परीने, शक्तींने वाचविण्याचा प्रयत्न करू. गुजरातच्या त्या धर्मांध राजकारणी आणि लोकांनी वेळ आहे तोपर्यंत आपल्या आचरणात, विचारात बदल करून घ्यावा आणि गुजरातमध्ये समता, न्याय, बंधुभावाचे वारे वाहू द्यावे. अन्यथा तुमची ईश्वराशी एक दिवस गाठ होणारच आहे. गुजरातेत लाखोंच्या संख्येने सर्व समाजघटकात न्यायप्रिय लोक आहेत. मात्र काही संघटना आणि राजकीय पक्षांमुळे गुजरातचा एकात्मतेचा पॅटर्न ढासळला आहे. ज्या लोकांनी मोरबीच्या घटनेत जीवाची बाजी लावून लोकांचे प्राण वाचविले त्यांना गौरविले पाहिजे. ओवेरा ग्रुप व तत्सम पुल ढासळण्यास जबाबदार असलेल्या लोकांना शासनाने कठोर दंड केला पाहिजे. 

मोरबी पूल दुर्घटनेवर  14 नोव्हेंबरला सुनावणी

मोरबी पूल कोसळण्याच्या घटनेच्या चौकशीसाठी आयोग स्थापन करण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेतवर 14 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सांगितले. जनहित याचिकेत म्हटले आहे की, अपघातामुळे पूल कोसळला, यात 141 हून अधिक बळी गेले. यातून सरकारी अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा आणि त्यांचे पूर्ण अपयश दिसून येते. 

- बशीर शेख

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget