एक मशाल, दूसरी ढाल-तलवार : काँग्रेस-राष्ट्रवादी शांत
शिवसैनिकांना आपले घर फुटले याची चिंता वाटते. मूळ मराठी माणसांच्या कल्याणासाठी स्थापन झालेल्या शिवसेनेचे दोन तुकडे झाले. हिंदुत्वाचा विचार नेत्यांच्या स्वार्थापोटी विभागला गेला. सत्ता, स्वार्थ, मानापमान, शासकीय संस्थांची भीती आणि भाजपाच्या कुटनितीने शिवसेनेचे तुकडे झाले.
महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपाच्या ऐतिहासिक एका घावाने शिवसेनेसारख्या प्रादेशिक पक्षाचे दोन तुकडे केले. फक्त तुकडेच केले नाहीत तर ते पुन्हा एकत्र येणार नाहीत यासाठी नियोजनबद्ध आखणीही करण्यात आल्याची राज्यात चर्चा आहे. त्याचाच परिपाक म्हणजे उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाकडे धनुष्यबाण सोपविला होता. निवडणूक आयोगाने अंधेरीमधील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह गोठविले. त्यामुळे शिवसेनेची पंचायत झाली. दोघांना आयोगाने आपल्या कोर्टात म्हणणे मांडण्यास सांगितले. चिन्ह मागवून घेतले. उद्धव ठाकरे गटाला ’शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ चिन्ह मशाल तर शिंदे गटाला ’बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव देत ढाल-तलवारीचे चिन्ह दिले. आता खरी लढाई होईल आणि त्यातून शिंदे गटाला ’गुवाहाटी’ला पाठविल्याचा फायदा भाजपाला मुंबई पालिकेत होईल की नुकसान हा येणारा काळच ठरवेल. मात्र, सत्तेची खेळी भाजपाने जिंकली आहे, एवढे मात्र खरे.
ऐतिहासिक घटनांची चाचपणी केली तर पहायला मिळते की, चिन्ह गोठविल्यानंतर पुन्हा ते चिन्ह मूळ पक्षाकडे गेले. जनतेने आपल्या मूळ पक्षाशी गद्दारी करणाऱ्या नेत्यांना निवडून दिले नाही अथवा सत्तेत बसविले नाही. शिवसेना मुळात कामगारांचा पक्ष. पुढे चालून हिंदुत्वाशी नाळ जोडली. यात दोनदा फूट पडली. आणि तिसऱ्या वेळेस मात्र फूट पाडली गेली. त्यामुळे उद्धव ठाकरेंना शिवसेनेची एकत्रित मूठ बांधायला अनेक वर्षे जातील, असे वाटते. कारण अगोदर बाळासाहेब ठाकरेंचा दरारा होता आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसारखे पक्ष विरोधात होते. शिवसेनेच्या सोबत भाजपा होती. मात्र आता मित्र शत्रू झाला आणि तो ही कट्टर हाडवैरी झाला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाला एकत्रित आणणे शक्य नाही, असा सूर जनतेतून उमटत आहे. मात्र समाज माध्यमे आणि लोकांशी संवाद साधल्यानंतर त्यांच्यात उद्धव ठाकरेंबद्दल आदर दिसून येत आहे. अर्थात सहानुभूतीची लाट उद्धव ठाकरेंसोबत असल्याने येणाऱ्या काळात मशाल धगधगती राहील, असे वाटते.
एकनाथ शिंदे गटाची बाजू (बाळासाहेबांची शिवसेना) : एकनाथ शिंदेंना दीर्घकाळ पक्ष संघटना आणि प्रशासकीय कामांचा अनुभव आहे. शिवसेनेच्या दोन्ही सत्ता काळात ते मंत्रीपदी विराजमान होते. तसेच त्यांच्याकडे 40 आमदार व खासदारांचा पाठिंबा आहे. सध्या त्यांनी मी लोकसेवक म्हणून काम करेन असे एका मुलाखतीदरम्यान सांगितली आहे. स्वच्छ आणि पारदर्शक कारभार करणार असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्यात प्रचंड इच्छाशक्ती दिसून येते. त्यांची जडणघडण पूर्णतः शिवसेनेत झाल्याने त्यांना सेनेतील सर्व खाचखळगे माहित आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे अनुभवी, मातब्बर आणि कुटुनितीतज्ञ मित्राची साथ त्यांना आहे. शिवाय, भाजपा समर्थक त्यांना मदत करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करतील. शिवाय, सध्या ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे निवडणुकीपर्यंतचे सर्व गणिते जुळविण्यात त्यांना प्रशासनाचीही मदत होणार आहे. सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे भाजपाच्या आलाकमनाशी त्यांचे चांगले संबंध आहेत.
उद्धव ठाकरे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ) गटाची बाजू : उद्धव ठाकरेंना संघटनेसोबत बाळासाहेब ठाकरे यांचा पुत्र होण्याचा फार मोठा फायदा राहील. त्यांच्याकडे आमदारांची संख्या कमी असली तरी शिवसेनेला मानणाऱ्या तळागाळातील कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. याला जर त्यांनी पुन्हा लयबद्धतेत बांधले तर उद्धव ठाकरे गट महाराष्ट्राच्या राजकारणात चमत्कार घडवू शकतो. तसेच उद्धव ठाकरे यांची खऱ्या हिंदुत्वाकडे वाटचाल सुरू असल्याने पुरोगामी विचारसरणीचे लोकही त्यांच्यासोबत जोडले जात आहेत. आज समाजमाध्यमे आणि शिवसेनेचे कट्टर विरोधकही उद्धव ठाकरेंच्या भूमीकेबद्दल त्यांच्या बाजूने आहेत. शिवाय, कोरोना काळात उद्धव ठाकरेंचे नियोजन, त्यांची घराघरात पोहोचलेली आपुलकीची साद आणि साथ यामुळे एक टर्म तरी उद्धव ठाकरेंना पूरक वातावरण सध्या महाराष्ट्रात आहे. शिवाय, ते निवडणुकीत कसे उमेदवार निवडतात यावरही बरेच अवलंबून असेल.
शिवसैनिकांच्या मनातील खद्खद्
शिवसैनिकांना आपले घर फुटले याची चिंता वाटते. मूळ मराठी माणसांच्या कल्याणासाठी स्थापन झालेली शिवसेना दोन भागात विभागली गेली. हिंदुत्वाचा विचार नेत्यांच्या स्वार्थापोटी विभागला गेला. सत्ता, स्वार्थ, मानापमान आणि शासकीय संस्थांची भीती आणि भाजपाच्या कुटनितीने शिवसेना फुटली. कोणी ठाकरेंकडे तर कोणी शिंदे गटाकडे गेले. यात शिवसैनिक मनाने भरडला गेला आहे. मात्र त्याचा राग भाजपावर अधिक दिसून येतो. सगळ्यांना वाटतंय की भाजपाने हे घडवून आणले आहे. शिवाय, सेनेसोबत ठरलेली बोलणी तोडली. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन भाजपाच्या भूमीकेबद्दल ठणकाऊन सांगितले. उद्धव ठाकरेंची चूकही ते शिवसैनिक बोलून दाखवितात. मात्र त्यांचे म्हणणे आहे की, उद्धव ठाकरेंंच्या आजारीपणाचा फायदा घ्यायला नाही पाहिजे होता. एकनाथ शिंदे सारख्या निष्ठावंतांने दिलेला दगा हा शिवसैनिकांच्या जिव्हारी लागल्याचे दिसून येत आहे. मात्र एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्री बनण्याची अभिलाषा आणि त्यांना डावलले जात असल्याची जी खद्खद् होती, त्याबद्दलही शिवसैनिकांना वाटते की त्याच्यांसोबत काही प्रमाणात अन्याय झाला. मात्र ते पुन्हा म्हणतात, की घर फोडण्याऐवढी अभिलाष कोणाच्या मनात येवू नये. शिवसेना एक परिवार आहे आणि भविष्यात फुटीमुळे या परिवारातील किती जणांची डोकी फुटतील काही सांगता येत नाही. इतके दिवस शिवसेना आणि मनसे एकत्र यावेत असे वाटणारे लोक आता मनसे-शिवसेना-शिंदे एकत्र यावेत, असे बोलताना दिसतील. मात्र तो आवाज फार दबलेला असेल, कदाचित ते बोलणारही नाहीत.
विकासाचं काय?
महाराष्ट्रात परतीच्या पावसाने थैमान घातल्याने शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. मुलभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे. पशुधन लम्पी आजाराने ग्रासले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक आणि मानसिक संकटात अडकला आहे. विविध करांमुळे व्यापारी वर्ग त्रस्त आहे. तर महागाईमुळे जनतेचे कंबरडे मोडले आहे. गेल्या दहावर्षाखाली जो व्यक्ती दहा हजारात आपल्या कुटुंबाचा गाडा चालवित होता त्याला आता 20 ते 25 हजार कमवावे लागतात. महागाई, बेरोजगारी, शिक्षण आणि आजारपण यात हे पैसे पुरेनासे झाले आहेत. त्यामुळे राज्यकर्ते म्हणून भाजप आणि शिवसेना शिंदे गट महाराष्ट्रातील जनतेला दिलासा देण्यात अजून तरी यशस्वी झाल्याचे दिसत नाहीत. मुंबईवर सर्वांची नजर आहे मात्र उर्वरित महाराष्ट्र समस्यांनी ग्रासला आहे. यावर भाजप-शिवसेना शिंदे गटाने प्लान आखणे गरजेचे आहे.
केंद्रीय संस्था-राजकारणी-भ्रष्टाचार-जनता
केंद्रीय संस्थांचा गैरवापर होत आहे, हे सध्या सर्रासपणे बोलले जात आहे. मात्र हे काही प्रमाणात दिसूनही येत आहे. सत्ताधाऱ्यांना अभय आणि विरोधक जेलमध्ये, अशी स्थिती आहे. नगरसेवका पासून ते मंत्र्यांपर्यंत सर्वच जणांची कसून चौकशी केली तर अवैध पैशांचे मोजमाप करता येणार नाही एवढे पैसे सापडतील, असे जनतेला वाटते. मात्र सत्ताधारी भाजप विरोधकांचे कंबरडे मोडण्यासाठी विरोधीपक्षातील नेत्यांच्या चौकशी करून त्यांना जेलमध्ये पाठवित आहे, असा सूर आहे विरोधकांचा आणि जनतेचाही. त्यामुळे केंद्रीय संस्था येणाऱ्या काळात सरकारचे बाहुले बणूनच राहणार की आपल्या अधिकाराचा सत्याच्या मार्गाने वापर करणार हा येणारा काळच दाखवेल.
विरोधी पक्ष
महाराष्ट्रात विरोधी पक्ष पुरता खिळखिळा झाला आहे. विरोधी पक्षातील अनेक मातब्बर नेते भाजपात प्रवेश करून शुद्ध आणि सेफ झाले आहेत. जे उरलेले विरोधक आहेत त्यांच्यावरही ईडी आणि सीबीआय सोडल्याने त्यांच्या बोलण्यात धार नाही. त्यातच शिवसेना अंतर्गत कलहात फुटल्याने विरोधाची धार शमली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते रस्त्यावर उतरून विरोध करण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत. ते ही भाजप-शिवसेनेच्या चर्चेत सामील आहेत. शेती, व्यापार, उद्योगाची अधोगती होत असताना विरोधक शांत हे लोकशाहीला तारक नाही आणि राज्याच्या हिताचेही नाही. त्यामुळे राज्यातील जनतेच्या हितासाठी महाविकासआघाडीने राण उठवीत सत्ताधाऱ्यांना जनकल्याणाची कामे करण्यासाठी मजबूर करायला लावणे गरजेचे आहे.
Post a Comment