Halloween Costume ideas 2015

जी व्यक्ती व्याज घेऊन कमवलेली संपत्ती गोळा करते ती व्यक्ती शेवटी कंगाल होते : पैगंबरवाणी (हदीस)


हजरत सुफियान बिन सौरी (र.) म्हणतात की पूर्वी प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या काळात मालमत्तांकडे पसंतीच्या नजरेने पाहिले जात नव्हते. पण आमच्या आताच्या काळात मालमत्ता श्रद्धावंतांची ढाल आहे. जर आज हा रुपया-पैसा आमच्याकडे नसता तर राजे आणि धनवान आमचा रुमालासारखा उपयोग करतील. आज ज्या व्यक्तीकडे रुपया-पैसा असेल त्याची त्याने एखाद्या व्यवसायात गुंतवणूक करावी (जेणेकरून मालमत्ता वाढीस लागेल), कारण सध्याचा काळ असा आहे की जर माणूस वंचितावस्थेत गेला तर सर्वांत आधी तो आपला धर्म विकून टाकील. वैध मार्गानं संपत्ती कमवणे त्याला नकोसे वाटत आहे. (मिश्कात)

प्रेषित मुहम्मद (स.) यांनी म्हटले आहे, "कर्ज देणे दानधर्म करण्यासारखे आहे." (ह. अब्दुल्लाह इब्ने मसऊद, तरगीब व तरहीब)

प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, "जर एखाद्या मुस्लिमाने दुसऱ्या मुस्लिमाला कर्ज दिले असेल तर त्याचा त्याला असा मोलबदला मिळेल जसे त्याने अल्लाहच्या मार्गात खर्च केला असेल." (ह. अब्दुल्लाह इब्ने मसऊद, इब्ने माजा)

ह. बरीदाह (र.) म्हणतात की प्रेषित मुहम्मद (स.) यांना असे म्हणताना ऐकले आहे की "जर कुण्या माणसाने एखाद्या गरजुला एका ठराविक मुदतीसाठी कर्ज दिले असेल तर ती मुदत संपेपर्यंत कर्ज देणाऱ्या व्यक्तीला दररोज दानधर्माचा मोबदला दिला जात राहतो. आणि ठराविक मुदत संपली आणि कर्ज देणाऱ्याने कर्जदाराला पुन्हा सवलत दिली तर त्याला दोन दोन दानधर्म केल्याचा मोबदला दिला जातो. " (मुसनद अहमद)

प्रेषित मुहम्मद (स.) यांनी म्हटले आहे की "जी व्यक्ती व्याज घेऊन कमवलेली संपत्ती गोळा करते ती व्यक्ती शेवटी कंगाल होते. व्याजाद्वारे किती जरी संपत्ती कमवली असली तरी शेवटी ती व्यक्ती दिवाळखोरीला जाते." (तरगीब व तरहीब, इब्ने माजा, हाकिम)

माता ह. आयेशा (र.) यांचे विधान आहे की प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले, "माणसांच्या कर्मांमध्ये तीन प्रकारचे गुन्हे आहेत. एक असा गुन्हा जो अल्लाह कधीच माफ करणार नाही. तो गुन्हा अल्लाहचे भागीदार बनवून त्यांची उपासना करणे होय. दुसरा गुन्हा माणसांच्या हक्काधिकारांविषयी आहे. त्याला अल्लाह इथपर्यंत सवलत देईल की अत्याचारपीडित जोपर्यंत अत्याचारीपासून आपले हक्काधिकार परत मिळवून घेत नाही आणि तिसऱ्या गुन्ह्याचा संबंध अल्लाहशी आहे. हे अल्लाहच्या अधिकारात आहे. त्याला वाटेल तर ज्यांनी अल्लाहचे हक्काधिकार दिले नसतील त्यांना अल्लाह सोडून देईल, माफ करून टाकील किंवा त्यांना शिक्षा करील." (मिश्कात)

प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले, "जर एखादी व्यक्ती तुमच्याशी बोलताना इकडे तिकडे पाहत असेल तर हे जाणून घ्या की ती व्यक्ती तुमच्याशी जे काही बोलत होती ती गोष्ट तुमच्याकडे अमानत आहे (अर्थात ती गोष्ट दुसऱ्यांना सांगू नका)." (अबु दाऊद)

संकलन :

सय्यद इफ्तिखार अहमद


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget