Halloween Costume ideas 2015

जातीय व्यवस्थेचा अंत कसा करावा?


ह्या जगात जितकी मानवजात, सभ्यता, तिचा इतिहास प्राचीन तितकाच मानवजातीमध्ये जातीय व्यवस्थेचा इतिहास प्राचीन. आणि जातपात, संप्रदाय, कबिले, टोळ्या ह्या कोणत्या एका विशिष्ट समाजाशी, धर्माशी, संप्रदायाशी संबंधित नाहीत. जगाच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक सभ्यतेमध्ये ती लहान असो की महान, राष्ट्रमध्ये, धार्मिक समाजामध्ये सदासर्वदा चालत आलेली आहे. ज्ञान-विज्ञान, सामाजिक प्रबोधन, समाजशास्त्र, समाजविज्ञान जसजसे प्रगत होत गेले तसतसे ह्या समस्येवर उपाय करण्याचे प्रयत्नही जगात सर्वत्र होऊ लागले, होत आहेत आणि होत राहतील. पण दुदैवाची गोष्ट अशी की जातीय व्यवस्था कोणत्या न् कोणत्या निकषांवर, कोणत्या न कोणत्या संस्कृतीच्या आधारे, कोणत्या न् कोणत्या मानसिकतेचा आधार घेऊन आपले बाहेरील रूप बदलत असताना आंतरिक स्वरुप कायम आहे. याचे कारण मुळात मानवच समतावादी नाही. त्याची वृत्ती व मानसिकता समतावादी नाही की काय असा प्रश्न निर्माण होतो. आधुनिक सामाजिक आणि राजकीय विचारांद्वारे जगात साम्यवादाचा उदय झाला, यात मानवी समानतेवर भर देण्यता आला, पण साम्यवादाने धर्माशी फारकत घेतल्याने धर्माच्या शिकवणींचा जरी त्याग केला, समाजाला विभागणाऱ्या धार्मिक निकषांना जरी नाकारले तरी इतर मापदंड उदयास आले. आर्थिक विषमता हा एक नवीन मापदंड निर्माण झाला. परिणामी पूर्वी जो समाज सांस्कृतिक, धार्मिक निकषांवर विभागला जायचा तो आता आर्थिक संपन्नता, आर्थिक प्रगती आणि दुर्बलता यावर आधारित निकषांवर विभागला जात आहे. पुन्हा ज्ञान-विज्ञानाच्या क्षेत्रात संपन्न आणि वंचिततेची दुफळी समाजात निर्माण झाली. सांगायचे तात्पर्य हे की जर समतावादी समाजाची रचना करायचीच नसेल तर समाजाला विभागण्याचे नवनवीन तर्कवितर्क व निकषांचा शोध घेतला जाईल आणि त्यावर आधारित समाज आपोआप उदयास येत राहील. कारण विचारवंत, राज्यकर्ते इत्यादी अभिजनवर्गाला समाजाला वाटण्याची  भीती वाटत असल्याने त्यांनी स्वतःहून कोणते समाजशास्त्राचे विचार जरी विकसित केले नसले तरी मानवांमध्ये दडलेली समताविरोधी मानसिकता स्वतःहून नवनवीन रूप धारण करत राहणार. याचे मूळ कारण हेच की मानवाला जेव्हा ईश्वराने साकारले, जन्म दिला तेव्हापासून कोण श्रेष्ठ मानवजाती की त्याला आव्हान देणाऱ्या इतर निर्मिती ज्याचा पवित्र कुरआनात इब्लिस या नावाने उल्लेख केला गेला आहे. आणि माणूस विरुद्ध इब्लिस दैवी शक्ती आणि सांस्कृतिक, नैतिक शिकवण एकीकडे तर दुसरीकडे विनाशकारी वृत्ती असा हा प्रकार.

सर्वांत दुःखाची गोष्ट अशी की जगभर प्रत्येक राष्ट्र, धर्म, संस्कृती, सभ्यतेमध्ये कोणत्या न् कोणत्या प्रकारची जातीय व्यवस्था स्थापलेली असताना आणि मानवजातीला विळखा घालून उच्चभ्रू शक्तीकडून दुर्बल, निर्धन मानवांची हालअपेष्टा कररत असताना या जातीय व्यवस्थेची कारणे कोणती? त्या जातीय व्यवस्था का असिततिवात आल्या? जगात कुठे कुठे कशा प्रकारची जातीय व्यवस्था आहे याचं इतकं सखोल विश्लेषण, अभ्यास आणि चर्चा केली जाते की त्याला सीमाच नाही. पण ही व्यवस्था संपवायची असेल तर त्यासाठी काय करावे लागणार यावर चर्चा होत नाही. याचे मूळ कारणच असे की ही व्यवस्था अबाधित राहावी असा गुप्त करार जणू प्रत्येक मानवी समूहामध्ये केलेला आहे. म्हणजेच वर्चस्ववादी मानवी माणसिकतेला कुणीही कोणतीही विचारधारा आव्हान देऊ नये ही या मागची भूमिका होय.

आपल्या देशात जी जातीय व्यवस्था आहे तिचा इतिहास हजारो वर्षे जुना आहे. ती कोणत्या निकषांवर आधारित आहे, त्याची कारणे सर्वश्रुत आहेत. त्यावर भलेमोठे साहित्य उपलब्ध आहे. ह्या व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या महापुरुषांचा भलामोठा इतिहास साहित्यात उपलब्ध आहे. हजारो वर्षांपासून जातिअंताचा लढा लढणाऱ्यांना आंशिक यश प्राप्त झाले असले तरी फारसे काही बदल भारतीय समाजमनात झालेले नाहीत. जातीय व्यवस्थेला कंटाळून धर्मपरिवर्तनही मोठ्या प्रमाणात झाले, पण या धर्मांतराचा त्या धर्मात त्यांना कितपत फायदा झाला हादेखील चर्चेचा विषय आहे.

सध्या संघाचे सरसंघचालक यांनी त्या समस्येवर वेळोवेळी आपले विचार व्यक्त केलेले आहेत. नुकतेच त्यांनी जातीय व्यवस्था कशी उदयास आली, तिला धार्मिक शिकवणी कितपत जबाबदार आहेत, चातुर्वर्ण्य व्यवस्थेचे मुलाधार काय यावर आपले विचार मांडले आहेत, पण यापलीकडे या व्यवस्थेला तिलांजली देण्यासाठी काय करावे लागेल याचा खुलासा त्यांच्याकडून आलेला नाही. म्हणजे तीच गोष्ट- जातीय व्यवस्थेवर चर्चा उदंड होत असते. त्याची कारणे शोधली जातात, पण तला नष्ट करण्यासाठी कोणती उपाययोजना आखली जात नाही. याचा अर्थ काय?

जर एखाद्या समुदायाची आर्थिक स्थितीत बदल केले गेले तर ती व्यक्तीसुद्धा इतर सवर्ण जातीबरोबर बसू शकते, असे म्हटले जाते. डॉ. बाबासाहेब आबेडकरांनीही अशा आशयाचे विचार व्यक्त केले होते, असे त्यांनी म्हटले आहे. आणि म्हणून वंचितांसाठी आर्थिक सोयीसुविधा देण्यात याव्यात असे ते सुचवत आहेत काय? माणसाला आर्थिक स्थितीत सुधार तेवढा महत्त्वाचा नसतो. जशी त्याची अब्रू, त्याचा सन्मान त्याबरोबर समतेने वागणे हे त्याला अधिक हवे असते. डॉ. बाबासाहेबांनी राजकीय आणि आर्थिक उद्धारासाठी बरेच काही केलेले आहे, पण त्यांना नैतिकतेची शिकवण देण्यात त्यांनी काही कसर केली.

इतिहासात प्रेषित मुहम्मद (स.) यांनी केवळ नैतिक मूल्यांवर आधारित समाजरचना केली आणि त्यांनी यशस्वीपणे तेथील जातीय व्यवस्था नष्ट केली. (म्हणजे गुलाम प्रथा) दुसरे उदाहरण कोणत्या महापुरुषाने अजून सादर केलेले नाही.

- सय्यद इफ्तेखार अहमद

संपादक, मो.: ९८२०१२१२०७


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget