8 वी वार्षिक सर्वसाधारण सभा : जेआयचचे केंद्रीय सदस्य तौफिक असलम खान यांचे प्रतिपादन
लातूर (प्रतिनिधी)
लातूर जिल्ह्यातील शुन्य दरावर कर्ज देणारी एकमात्र संस्था युनिटी अर्बन को-ऑपरेटीव्ह सोसायटी आहे. या सोसायटीमार्फत आतापर्यंत 3 हजारांहून अधिक नागरिकांना कर्ज देऊन त्यांच्या आयुष्यात संजीवनी आणण्याचे कार्य केले आहे. अशा हजारो संस्था उभारण्याची गरज आहे, जी गरीबीला दूर करतात आणि देशाच्या विकासात हातभार लावतात. बिनव्याजी कर्जाद्वारे खरी आर्थिक क्रांती येवू शकते. व्याजाधारित व्यवस्थेत शोषण होण्याच्या घटना आपण वाचतच असतो. श्रीमंत लोक, मोठमोठे व्यापारी भरमसाठ कर्ज बँकेद्वारे घेतात आणि ते बुडवितात, ते पळून जातात. मात्र अडचणी आणि व्याजाच्या तगाद्याला कंटाळून गरीब, मजूर शेतकऱ्यांसमोर आत्महत्या करणे किंवा घरदार सोडून जाण्याशिवाय पर्याय राहत नाही. त्यामुळे देशात शुन्य दरावर कर्ज देणाऱ्या सोसायट्या उभारल्या पाहिजेत. त्या समाजाने टिकविल्या पाहिजेत. तरच देशाची खरी प्रगती शक्य असल्याचे जमाअते इस्लामी हिंदचे केंद्रीय सदस्य तौफिक असलम खान येथे म्हणाले.
लातूर येथील गांधी मैदानात 24 सप्टेंबर रोजी युनिटी को ऑपरेटीव्ह सोसायटीची 8 वी वार्षीक सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. मंचावर सोसायटीचे अध्यक्ष अबरार मोहसीन, सचिव इक्राम शेख, संचालक सोहेल काझी, मुफ्ती अब्दुल्लाह, मुफ्ती इब्राहीम उपस्थित होेते. पुढे बोलताना खान म्हणाले, युनिटीमुळे अनेक छोटे व्यापारी, शेतकरी, महिलांच्या जीवनात क्रांती घडवून आली आहे. बिनव्याजी अर्थव्यवस्था उभारणे अवघड आहे मात्र अशक्य नाही. जनकल्याण साधू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी एकत्र येवून हे काम हाती घेतले पाहिजे, असेही ते म्हणाले.
यावेळी सोसायटीचे अध्यक्ष अबरार मोहसीन यांनी म्हटले की, सोसायटीचा यंदा 4341668.77 पैसे टर्नओव्हर झाला आहे. सोसायटीने विविध योजनाही सुरू केल्या आहेत. आज घडीला 70 हजारांपर्यंत कर्ज दिले जाते. व्हेईकल लोनही सुरू आहे.सचिव इक्राम शेख यांनी वार्षिक अहवाल वाचन केले.
यावेळी मुफ्ती अब्दुल्लाह म्हणाले, खरे तर व्याज देणे आणि घेणे हराम आहे. त्यामुळे व्याजविरहित सोसायट्या, बँका उभारल्या पाहिजेत. पैशाची गरज सर्वांनाच पडते. त्यामुळे गरजवंत व्याजाधारित व्यवस्थेत अडकून अनंत अडचणीचा सामना करतो. वेळप्रसंगी आत्महत्याही करतो. मात्र या युनिटीमुळे लोकांना बिनव्याजी अर्थात शुन्य दरावर कर्ज भेटते. कसलाही तगादा नसतो. लोक व्याज देणे लागत नसल्याने वेळोवेळी परत फेडही करतात. मुफ्ती इब्राहीम म्हणाले, युनिटीने सुरू केलेल्या महिला बचतगटांमुळे महिला स्वावलंबी बनत आहेत. अन्यथा आम्ही समाजात पाहत होतो मायक्रोफान्सींगच्या बचत गटात अडकून अनेक महिलांचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या उध्वस्त झाली आहेत. मात्र युनिटीमुळे आज आमच्या परिसरात आर्थिक स्थैर्य निर्माण झाले आहे. यावेळी सभासदांनी आपले मनोगतही व्यक्त केले. सूत्रसंचालन साबेर काझी तर आभार सय्यद मुकर्रमअली यांनी व्यक्त केले.
Post a Comment