महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर झालेल्या बदलामुळे राजकारणाची पातळी नको तेवढी घसरलेली आपणास पहावयास मिळते आहे. राजकारणाबरोबरच सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात ही मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचे दिसून येत आहे. राज्यातील नव्या शिंदे गट व भाजपच्या सरकारने हिंदुत्व रक्षणाच्या नावाखाली सण,उत्सव दणक्यात साजरे करण्याचा फतवा जारी केला आणि परीणामी यंदाचा दहीहंडी तसेच गणेशोत्सव, दसरा महोत्सव ही मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. कोणत्याही प्रकारचे निर्बंध नसल्याने तरुणाई नको तेवढी उत्साही, आक्रमक व बेहोश झाल्याचे पहावयास मिळाले. वास्तविक सण-उत्सव मोठ्या धामधुमीत व उत्साहपूर्ण वातावरणात साजरे करायला कुणाचीही हरकत असण्याचे कारण नाही, मात्र या सणांचे, उत्सवाचे मांगल्य जपायला हवे, शिवाय अशा सण उत्सवाच्या काळात सामाजिक हित ही साधले जावे, अशी माफक अपेक्षा सर्वसामान्यांची असते. मात्र ते जपले जात नाही, हे वास्तव समोर आले आहे.
सर्वसामान्यांच्या जीवनात अगोदरच गगनाला भिडलेल्या सध्याच्या महागाईने दु:ख, व निराशा पसरलेली आहे,त्यातच मोठ्या प्रमाणात साजरे होणारे सण, उत्सव आले की, त्यांच्या मनात धडकी भरते. त्यांच्या अवतीभवती अशांतता,दु:ख व निराशेचे काळे ढग घोंघावत रहातात; हे वास्तव कुणालाही नाकारता येणार नाही. कोरोनाच्या अस्मानी संकटामुळे गत दोन वर्षाच्या काळात गणेशोत्सवासह सर्वच सण उत्सव साधेपणाने साजरे करतांना मर्यादा पडल्या होत्या. कोरोनाच्या कटु आठवणी अजूनही ताज्या आहेत. संपूर्ण जगाचे अस्तित्वच संपुष्टात येते की काय, अशी परिस्थिती कोरोनामुळे निर्माण झाली होती, ही आपत्ती इतकी भयानक व भयंकर होती की, सण, उत्सव दणक्यात साजरे करायला सर्वसामान्यांच्या अंगात बळच उरले नव्हते. खरं तर ही आपत्ती सुद्धा अनेकांना इष्टापत्ती वाटतं आहे, संपूर्ण जनजीवनावर जरी एका विशिष्ट भयगंडामुळे अवकळा पसरलेली होती. तरी सण, उत्सवामध्ये प्रतिवर्षी होणारी आर्थिक उधळपट्टी गेल्या दोन अडीच वर्षात थांबली होती, हे अनेकांनी मान्य केले आहे. गेल्या दोन वर्षांपासून समाजातील प्रत्येक सामान्य माणूस आर्थिक विवंचनेत व मानसिक दृष्ट्या भेदरलेल्या अवस्थेत वावरत आहे.आनंद व्यक्त करण्यासाठी मनापासून जो एकप्रकारे उत्साह असायला लागतो, तोच मुळी गळून पडला आहे, गगनाला भिडणारी महागाई, प्रचंड प्रमाणात वाढत चाललेली बेरोजगारी, दिवसेंदिवस राजकारणाची बिघडत चाललेली परिस्थिती, दहशतवादी कृत्ये तसेच आरोग्य विषयक वाढत जाणाऱ्या तक्रारी शिवाय वैद्यकीय सेवेबाबत सर्व सामान्य जणांमध्ये असणारी अविश्वसनीय परिस्थिती आदींमुळे संपूर्ण समाजावरच भयाचे साम्राज्य निर्माण झाले आहे,असे चित्र आहे.
सण उत्सव दणक्यात साजरे करण्यासाठी मराठी माणूस नेहमीच उत्सुक असतो. वास्तविक महाराष्ट्र राज्याला एक आदर्श आणि सुसंस्कृत अशी एक सामाजिक व सांस्कृतिक परंपरा आहे, शिवरायांच्या या भूमीला महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, सुधारक’कार गोपाळ गणेश आगरकर, महर्षी धोंडो केशव कर्वे, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे, प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे आदी महापुरुषांच्या पुरोगामी विचारांचा वारसा आहे. इतरांना कोणत्याही प्रकारचा त्रास न होता सण उत्सव साजरा करण्याची फार पूर्वीपासूनची मराठी माणसांची परंपरा आहे, ही परंपरा जपण्याचा खरं तरं राज्यकर्त्यांनीच प्रयत्न करायला हवा. मात्र स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी समाजविघातक निर्णय घेण्याची अलिकडच्या काळातील ही राजकारण्यांची होऊ घातलेली पध्दत निश्चितच निषेधार्ह म्हणावी लागेल. शिंदे फडणवीस सरकारने हिंदुत्व रक्षणाच्या नावाखाली महाराष्ट्राची संस्कृती संपवण्याचा विडा उचलला आहे की काय असे वाटते. ऋण काढून सण साजरे करणे ही म्हण आपल्या मराठी माणसांना फार पूर्वीपासूनची ज्ञात आहे. सध्याच्या काळात सर्वच ठिकाणी ती वास्तवात आलेली प्रकर्षाने पहायला मिळत आहे. कारण प्रचंड प्रमाणात वाढलेल्या महागाईमुळे सामान्यांचे महिन्याचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. बेसुमार महागाईमुळे सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. गणेशोत्सव, दसरा, दिवाळी हे सण म्हणजे अबालवृद्ध जनतेचा आनंदाचा व उत्साहाचा महोत्सव. भाद्रपद शुद्ध चतुर्थी - गणेश चतुर्थी ते भाद्रपद शुद्ध चतुर्दशी - अनंत चतुर्दशी हे दहा दिवस म्हणजे आनंदाची पर्वणी असायची. गणपती, गौरी आणि पाठोपाठ शंकरोबा यांच्या स्वागतासाठी हत्तीचे बळ अंगात संचरायचे. पूर्वीच्या काळी या सणासाठी सर्व थरात मोठी अपूर्वाई होती. श्रावण महिन्यातील नागपंचमीच्या सणादिवशीच गौरी गणपती सणाची चाहूल लागायची आणि महिनाभर अगोदर पासूनच महिला व मुली झिम्मा फुगड्या खेळताना गल्लोगल्ली दिसू लागायच्या. मात्र तो आनंद, तो उत्साह आता लोप पावला आहे. गौरीची गाणी आणि खेळ जणू कालबाह्य झाले आहेत अशी शंका येते. अलिकडच्या गणेशोत्सवाचे नवरात्र उत्सवाचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे, त्यामधले चैतन्यच जणू हरवले आहे. आजचे गणेशोत्सवाचे तसेच नवरात्र उत्सवाचे अवाढव्य स्वरूप पाहिल्यावर सर्वसामान्य माणसाची मती कुंठित झाल्याशिवाय राहत नाही. केवळ अवाढव्य प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्या, डोळ्याला त्रास देणाऱ्या विद्युत रोषणाई, धार्मिकतेच्या नावाखाली धामडधींगा त्यातही नव्याने भर पडलेली लेसर किरणे, कान खराब करणारी व बहिरेपणाला आमंत्रण देणारी डिजे साऊंड सिस्टीम या अनेक कारणांमुळे हे सण उत्सव जणू संकट वाटत आहेत. गणेशोत्सवाबाबत बोलायचे झाले तर लोकमान्य टिळकांनी काळाची गरज म्हणून तत्कालीन पारतंत्र्याच्या काळात सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला. अर्थात त्या काळातील समाजसुधारक या सार्वजनिक गणेशोत्सवाचे बाबतीत सुद्धा नाखूष होते. ’सुधारक’कार गोपाळ गणेश आगरकरांनी तर देवघरातील देव रस्त्यावर कशाला आणता, बळवंतराव? असा रोखठोक मार्मिक सवाल लोकमान्य टिळकांना थेट विचारला होता. आजचे गणेशोत्सवाचे स्वरूप पाहता आगरकरांचा सवाल किती महत्वाचा आणि दूरदृष्टीचा होता, याचे प्रत्यंतर आले आहे. त्या पार्श्वभूमीवर विचार केला तर आजच्या भव्य दिव्य आणि दिशाहीन गणेशोत्सवाचे व नवरात्र उत्सवाचे फलित काय,या प्रश्नाचे उत्तर भल्या भल्या विचारवंतांकडे ही नाही,ही वस्तुस्थिती आहे. वर्गणीच्या नावाखाली सर्वसामान्यांची जमेल तशी आणि जमेल तेवढी होणारी आर्थिक लूट आणि गुंड,पुंड, खंडणी बहाद्दर यांची वर्षासाठीची बक्कळ कमाई हे अलीकडच्या काळातील गणेशोत्सवाचे व नवरात्र उत्सवाचे फलित सर्वांनाच मान्य होत आहे. दहीहंडी, सार्वजनिक गणेशोत्सव, दसरा, नवरात्र उत्सव म्हणजे सर्वसामान्य जनतेला महाभयंकर संकट वाटत आहे, तरीही सर्वसामान्य जनतेच्या रक्षणासाठी कटीबद्ध असल्याची ग्वाही देणारे शिंदे सरकारच जेव्हा दहीहंडी, गणेशोत्सव याबाबतीत आपले धोरण नरमाईचे व शिथिल ठेवत असेल तर हतबल होण्याशिवाय सर्वसामान्यांच्या हातात काहीच उरत नाही.
नुकतेच शिवतीर्थावर तसेच बिसीजी वर यंदाच्या वर्षी दोन दसरा मेळावे पार पडले. हे खरं तर नवलच घडले आहे. या दोन्ही मेळाव्यात झालेली भाषणे ऐकली की, महाराष्ट्राचे आधुनिक शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी पाहिलेल्या पुरोगामी महाराष्ट्राचे स्वप्न जणू धुळीला मिळाले की काय अशी शंका येते. शिंदे सरकारच्या बंडखोर पन्नास आमदारांनी घेतलेल्या खोक्यांची गेली सात आठ महिन्यांपासून जाहिरपणे होत असलेल्या माध्यमांतील चर्चा म्हणजे राजकारण्यांनी कमरेचे सोडून डोक्याला बांधण्यातला प्रकार आहे. राजकारणाची इतकी मोठ्या प्रमाणात घसरलेली पातळी यापूर्वी कधीच पहायला मिळाली नाही. सर्वसामान्य शिवसैनिक वडापाव विकून, रिक्षा टॅक्सी चालवत आपला संसार चालवत आहे, आणि यांच्या जीवावर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी पन्नास पन्नास कोटींची खोकी घेऊन वर साळसूदपणे तुम्हाला हवेत का, असे निर्लज्जपणे बोलावे, याला काय म्हणावे?.
यंदाच्या शिंदेंच्या दसरा मेळाव्यात ठाकरे कुटुंबीयांचा घरगुती कलह चव्हाट्यावर आला, हे सुद्धा काही बरे झाले नाही. शिवाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांचे भाषण चालू असताना महाराष्ट्राची जनता उठून निघून गेली, आणि खुर्च्या रिकाम्या पडल्या, असे ही यापूर्वी कधीच पहायला मिळाले नव्हते, ते यंदा पहिल्यांदाच पहायला मिळाले. महाराष्ट्रातल्या मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी स्थापन झालेल्या शिवसेनेच्या दोन्ही दसरा मेळाव्यात मराठी माणसांना न्याय हक्क अजूनही का मिळत नाही,अडिच वर्ष सत्तेत असुनही मराठा आरक्षणावर आपण काय केले, आदींसह अनेक प्रश्नांची उत्तरे मिळालीच नाहीत, अशा अनेक न सुटलेल्या प्रश्नांची जंत्री मराठी माणसांच्या महागाई, बेरोजगारी या मुळच्या प्रश्नांत भर घालणारी ठरली आहे. मुंबईत येणाऱ्या बड्या उद्योगधंद्यांना गुजरातची वाट दाखवली गेली आहे, त्याबद्दल आपण काय करणार आहात, हे स्पष्टपणे दोन्ही मेळाव्यात कुणीही सांगितले नाही, हे ठळक वैशिष्ठ्ये म्हणावे लागेल.
कुणी काहीही म्हणो, मुंबईत शिवसेनेशिवाय गत्यंतर नाही, मुंबईचे लचके तोडण्यासाठी काही नतद्रष्ट मंडळी टपून बसलेले आहेत हे खरेच आहे. त्यामुळे मराठी माणसांच्या मनाचे खच्चीकरण न होऊ देता राजकारण काही काळासाठी बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या विकासासाठी आवश्यक ती पावले उचलली पाहिजेत, ही मराठी माणसांची मानसिकता समजून घेऊन शिंदे फडणवीस सरकारने मार्गत्कमण केले पाहिजे, नाही तर महाराष्ट्राचा मराठी बाणा वाकेल आणि मोडून ही पडेल, अशी शंका येते.
- सुनीलकुमार सरनाईक
भ्रमणध्वनी: 9420351352
Post a Comment