Halloween Costume ideas 2015

मृत्यूची भीती कशी नष्ट करावी?


मृत्यू निश्चित आहे हे माहित असतांनासुद्धा माझे घर, माझी मुलं, माझी पत्नी, माझे मित्र, माझे नातेवाईक, माझ्या सभोवतालचे सुंदर वातावरण असे करत आपण या वातावरणाशी नकळत इतके एकरूप होऊन जातो की, त्यांच्यापासून आठ दिवस लांब गेलो तरी जीव कासावीस होतो. होमसिक झाल्यासारखे होते आणि कधी परत येऊ असे वाटते. असे का होते? हे जग खरे तर तात्पुरता पाडाव आहे, असे प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी स्पष्ट सुनावलेले आहे. तर मग मृत्यूची भीती अनाठाई नाही काय?


किताबे तकदीर से क्या शिकवा ऐ दिले नादां

जब हर चीज ने मिट जाना है तो फिर ख्वाहिशें कैसी

मृत्यूची एवढी भीती लोकांच्या मनामध्ये असते की अनेक कुटुंबात ’मृत्यू’ हा शब्द सुद्धा उच्चारणे पसंत केले जात नाही. कोरोना काळात आपण पाहिलेले आहे की, मृत्यूच्या याच भीतीतून कित्येक लोकांनी अगदी जवळच्या मृत नातेवाईकांचे प्रेत ताब्यात घेतले नाही. खरे तर मृत्यू ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे म्हणून नैसर्गिक घटनेची भीती बाळगणे हेच अनैसर्गिक आहे. जीवन जेवढे निश्चित आहे त्यापेक्षा जास्त निश्चित मृत्यू आहे. कारण अनेकवेळा असे घडते की, आईच्या उदरातच जीवन संपते, काही मुलं जन्मतःच मृत्यू पावतात, काही बाल्या अवस्थेमध्येच मरण पावतात, काही तरूण अवस्थेत मरण पावतात. थोडक्यात आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर मृत्यू येतो. वृद्धावस्थेत पोहोचल्यावरच मृत्यू येतो असा सृष्टीचा नियम नाही. मृत्यू स्वाभाविक आहे, हे आपल्याला माहित असते पण याची पुरेशी जाणीव नसते, म्हणून मृत्यूची भीती वाटते. 

आपल्या जीवंत शरिराची, आपल्या मनाशी एवढी जबरदस्त बाँडिंग झालेली असते की आपण आपले शरीर कधी मरून जाईल हे सत्य माहित असूनही त्याचा विचार सुद्धा दैनंदिन जीवनामध्ये करत नाही. म्हणून मृत्यूची भीती वाटते. 

आपल्या शरीराविषयी आपल्या मनामध्ये अशी एक धारणा घेऊन आपण जगत असतो की, जणू आपण या शरिरासह पृथ्वीवर अवतरित झालो आहोत. आपल्या लक्षातच येत नाही की आपण आईच्या गर्भात एका टिंबा एवढ्या अस्तित्वातून विकसित होत ही सहाफुटी काया मिळविलेली आहे व या प्रक्रियेदरम्यान अनेक दुर्दैवी जीव असे होते जे ही प्रक्रिया पूर्ण न करू शकल्यामुळे मध्येच मरण पावलेले आहेत. याचीही पुरेशी जाणीव आपल्याला नसल्यामुळे मृत्यूची भीती वाटते.

शरीराविषयी एक आणखीन सुक्ष्म फरक आपण लक्षात घेत नाही तो म्हणजे शरीर आणि आत्मा यांच्यातील फरक. हे शरीर माझे आहे हे म्हणणे तसेच आहे जसे हे घर माझे आहे, परंतु हे शरीर म्हणजे मीच आहे हे म्हणणे असे आहे जणू हे घर मीच आहे. हा फरक एवढा सूक्ष्म आहे की, जवळ-जवळ सर्वच माणसे हा फरक ओळखू शकत नाहीत. म्हणून मृत्यूची भीती वाटते. 

मित्रानों ! विचार करा, आपले वजन कमी झाले तर आपण त्याला मृत्यू म्हणतो का? मग पूर्ण शरीराचं विघटन झाले तर मृत्यू का म्हणावे? याला अरबी भाषेत ’इंतकाल’ अर्थात स्थलांतर म्हटले जाते. हे सत्य लक्षात न आल्यामुळे सुद्धा मृत्यूची भीती वाटते. जसे खाऊन-खाऊन वजन वाढले तेव्हा कष्टाने ते कमी केले तर आपण आनंदी होतो. तसेच मृत्यूच्या बाबतीत व्हायला हवे. जीर्ण झालेले शरीर टाकून परलोकात आत्मा नवीन शरीर धारण करणार असेल तर त्यात दुःख कसले? खर तर माणसाकडे मृत्यूला पर्यायच नाही मग रडत-रडत शरीर परत करा की हसत-हसत परत करा.

ईश्वराने जगाची रचना एवढी आकर्षक केलेली आहे की, रोज अवती भोवती शेकडो माणसं मरतांना प्रत्यक्ष पाहून देखील माणसाला हा पुसटसा विचारही मनात येत नाही की आपण सुद्धा कुठल्याही क्षणी मरू शकतो. स्मशानभूमी असो का दफनभूमी.अनेकवेळा असे पाहण्यात आले की, एकीकडे प्रेतावर अंतिम संस्कार सुरू असतात तर दुसरीकडे काही महाभाग व्यापार-धंद्याच्या गप्पा मारत असतात. खरे पाहता दाद द्यावी लागेल सृष्टीच्या त्या रचियताची, तो इतका महान आहे की, त्याने जगाची रचनाच मूळी अशी केली आहे की, प्रत्येकाचा असा ठाम विश्वास असतो की अजून माझं वयच काय आहे? मला मृत्यू येण्यासाठी अजून अवकाश आहे. रोजच्या अपघाताच्या व त्यात मरणाऱ्या तरूणांची नावं पाहून सुद्धा कुठल्याही वेळी आपल्याला मृत्यू येऊ शकतो हा विचार सुद्धा मनात येत नाही आणि आला तरी आपण तो गंभीरपणे घेत नाही. केवढी ही किमया? म्हणून अचानक मृत्यू डोळ्यासमोर दिसत असला की माणूस प्रचंड घाबरतो. कारण या क्षणाला तोंड देण्याची त्याने मानसिक तयारीच केलेली नसते. ज्याने ती केलेली असते त्याला मृत्यूची भीती वाटत नाही. या संबंधी एक उदाहरण जाणीवपूर्वक पाच वेळेस नमाज अदा करणाऱ्यांचे देता येईल. अशा लोकांना मृत्यूची कसलीच भीती वाटत नसते. कारण त्यांच्या डोक्यामध्ये हा विचार पक्का बसलेला असतो की, दिवसातून पाच वेळेस नमाजच्या माध्यमातून आपली अल्लाहशी जी दुरून भेट असते ती मृत्यूनंतर जवळून होईल आणि त्या सृष्टीच्या रचियतेला पाहण्याचा योग येईल, मग ही तर आनंदाची बाब आहे म्हणून असे लोक मृत्यूला भीत नाहीत. 

मृत्यूची भीती कशी नष्ट करावी

मृत्यूच्या भीतीचे सर्वात मोठे कारण हे चमकदार जग आहे. यातील आनंद देणाऱ्या भौतिक गोष्टी उदा. डोळ्याला मोहणारे नैसर्गिक दृश्य, जीभेचे लाड पुरविणारे चविष्ट पदार्थ, दऱ्या, खोरे, बर्फाच्छादित पर्वत, सुगंधित फुले, बागा, प्रशस्त रस्ते, उंच-उंच इमारती, स्त्री- पुरूषांना मोहवणारा एकमेकाचा सहवास, लुभावणारे समुद्र किनारे या सगळ्या गोष्टींचा आनंद घेण्यासाठी उपलब्ध असणारी भौतिक संसाधने, अमाप पैसा या सर्व गोष्टी माणसाला या जगाशी इतक्या बांधून ठेवतात की त्याला मृत्यूपासून गाफिल करतात. पण जाणीवपूर्वक जग आणि त्यातील वस्तूंचा अतिमोह ज्याला टाळता आला, त्याला मृत्यूची भीती वाटत नाही. ईश्वराने आपल्या ग्रंथात असा मोह टाळण्याची लिखित सूचना देऊन ठेवलेली आहे. 

1. ‘’आणि नजरदेखील देऊ नकोस लौकिक जीवनातील त्या वैभवाकडे जे आम्ही यापैकी विविध प्रकारच्या लोकांना देऊन ठेवले आहे, ते तर आम्ही त्यांची परीक्षा पाहण्यासाठी दिले आहे, आणि तुझ्या पालनकर्त्याने दिलेली वैध उपजीविकाच उत्तम आणि चिरस्थायी आहे.‘‘  (संदर्भ : सुरे ताहा 20: आयत नं. 131)

2. ‘‘चांगल्याप्रकारे जाणून असा की हे दुनियेतील जीवन याशिवाय अन्य काहीच नाही की एक खेळ आणि मनोरंजन व बाह्य टापटीप आणि तुमचे आपापसात एकमेकाविरूद्ध बडेजाव करणे आणि संपत्ती व संततीमध्ये एक दुसऱ्यावर मात करण्याचा प्रयत्न करणे होय. याची उपमा अशी आहे जणू एक पाऊस पडला तर त्याने उत्पन्न होणाऱ्या वनस्पतींना पाहून शेतकरी आनंदित झाले, मग तीच शेती पिकते आणि ती पिवळी पडल्याचे तुम्ही पाहता, मग ती भुसा बनून राहते.’’ ( सुरे हदीद 57 : आयत नं. 20)

या आयातीमध्ये निसर्गचक्राची नितांत सुंदर मांडणी केलेली आहे. मात्र कुरआनच्या उपदेशांच्या बाबतीत जे लोक अनभिज्ञ आहेत मग ते मुस्लिम का असेनात त्यांना मृत्यूसंबंधीचे हे ईश्वरीय निर्देश माहित नसतात. म्हणून अशा लोकांना मृत्यूची भीती वाटते. आपल्यालाच नव्हे तर सर्व सजीवांनाच निश्चितपणे मृत्यू येणार आहे याची घोषणा दुसऱ्या ठिकाणी कुरआनने केलेली आहे ती अशी- 

’’सरतेशेवटी प्रत्येकाला मृत्यू आहे आणि तुम्ही सर्वजण आपापले पुरेपूर मोबदले कयामतच्या दिवशी प्राप्त करणार आहात. यशस्वी खऱ्या अर्थी तोच आहे जो तेथे नरकाग्नीपासून वाचेल व स्वर्गामध्ये दाखल केला जाईल. उरले हे जग, तर ही केवळ एक भुरळ पाडणारी बाब आहे.’’  ( सुरे आलेइमरान 3: आयत नं. 185)

‘‘हे लोकहो ज्यांनी श्रद्धा ठेवली आहे, तुमची मालमत्ता आणि तुमची संतती तुम्हाला अल्लाहच्या स्मरणापासून गाफिल करून टाकू नये. जे लोक असे करतील तेच तोट्यात राहणारे आहेत.‘‘  (सुरे अलमुनाफिकून 63:9)

मृत्यू निश्चित आहे हे माहित असतांनासुद्धा माझे घर, माझी मुलं, माझी पत्नी, माझे मित्र, माझे नातेवाईक, माझ्या सभोवतालचे सुंदर वातावरण असे करत आपण या वातावरणाशी नकळत इतके एकरूप होऊन जातो की, त्यांच्यापासून आठ दिवस लांब गेलो तरी जीव कासावीस होतो. होमसिक झाल्यासारखे होते आणि कधी परत येऊ असे वाटते. असे का होते? हे जग खरे तर तात्पुरता पाडाव आहे, असे प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी स्पष्ट सुनावलेले आहे. तर मग मृत्यूची भीती अनाठाई नाही काय? हे वाचकांनी स्वतः ठरवावे. शेवटी राहिला प्रश्न प्रेताची भीती वाटण्याचा, अनेक लोक प्रेताच्या भीतीपोटी अंत्यसंस्कारालाही जाणे टाळतात. तर याबाबतीत स्पष्टपणे म्हणता येईल की, ही भीती अंधश्रद्धेतून येते. यासंबंधी जनजागरण करून ही भीती घालविणे हाच याच्यावर एकमात्र उपाय आहे. 


भावार्थ : एम.आय. शेख


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget