Halloween Costume ideas 2015

‘धर्माच्या नावावर अधर्म’

‘अमन व इन्साफ मोर्चाचे चर्चासत्र : सर्वधर्मीय प्रतिनिधींची उपस्थिती


मुंबई (प्रतिनिधी) 

गेल्या काही वर्षांपासून द्वेष आणि धर्मांधतेच्या अतिरेकी भावनांद्वारे आपल्या देशाला अंतर्गतरित्या नष्ट करण्याचा पद्धतशीर प्रयत्न सुरू असल्याचे आपले निरीक्षण आहे. यामुळे नापाक हेतू आणि क्षुद्र महत्त्वाकांक्षा असलेल्या लोकांकडून धर्मांधतेच्या कार्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. ते राजकारणासाठी देशातील सौहार्द संपवू पाहत आहेत. यापेक्षाही अधिक भयावह गोष्ट ही आहे की सगळी नकारात्मकता धर्माच्या नावाने पसरवली जात आहे. हे पूर्णपणे धर्माच्या विरूद्ध आहे. आज आम्हाला ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ती म्हणजे, कट्टरता आणि घृणास्पद प्रचार आणि प्रसाराचा प्रतिकार करणे. जे लोकांना धर्म पालनाच्या नावाखाली धोका देत आहेत. त्यांना खोटा विश्वास देत आहेत आणि म्हणताहेत की आम्ही धर्माची सेवा करत आहोत. याला रोखायचे असेल तर धार्मिक बुद्धीजीवी आणि विद्वानांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचा सूर 

’अमन व इन्साफ मोर्चा’ मुंबईच्या वतीने मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित ’धर्माच्या नावावर अधर्म’ चर्चासत्रात निघाला. 

यावेळी देशातील सर्व प्रमुख धार्मिक संप्रदायांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली सर्वधर्मीय बैठक झाली. यावेळी आयोजित चर्चासत्रात जैन गुरूदेव वरागसार, जमाअते इस्लामी हिंदचे सचिव शाकीर शेख, तपस्विनी ब्रह्माकुमारी, डॉ. सलीम खान, शील बोधी, मुंबई इस्कॉनचे उपाध्यक्ष मुकूंद माधवदास, रविकुमार स्टिफन, मौलाना अनिस अशरफी, बाबा सत्यनाम दास यांची प्रमुख उपस्थिती होती. 

’’आपण कोणत्याही धर्माचे असोत, परंतु मानवतेच्या आधारावर आपण त्यांच्याशी आदराने वागणे अत्यंत आवश्यक आहे. या पृथ्वीतलावर शांततेत जगणे हाच खरा संदेश आहे. ज्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे.सर्वप्रथम आपण एक चांगले माणूस बनूया आणि मानवतेची शिकवण पसरवूया. देशात प्रचलित असलेला ’अधर्म’ संपवून समाजात ’धर्म’ पुनरुज्जीवित करायचा असेल तर शांतता आणि बंधुता, न्याय आणि प्रेम, एकता आणि आत्मत्यागाची वृत्ती अंगीकारली पाहिजे, असे आवाहन क्रांतीकारी जैन गुरुदेव वरागसागर महाराज (श्री आडेश्वर जैन मंदिर पायधोनी) यांनी केले.

यावेळी शाकीर शेख (जमात-ए-इस्लामी हिंद मुंबई शहर सेक्रेटरी) यांनी चर्चासत्रा आयोजनाची भूमीका विशद केली. ते म्हणाले, जग एक परिवार आहे आणि परिवाराचा निर्माता एकच ईश्वर आहे. या परिवाराला आपण सर्वांनी मिळून चांगले बनविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तो मार्ग जो माणसाला असत्यातून बाहेर काढून सत्याकडे नेतो. तो अंगीकारला पाहिजे. यामध्ये जनकल्याणाचे हित आहे. 

तपस्विनी ब्रह्मा कुमारी (वले पार्ले) म्हणाल्या की, धर्म म्हणजे ’धारणा’ म्हणजेच अंमलबजावणी करणे आचरण करणे. आपण सर्वांनी स्वतःचा विचार करूया, आपण आपल्या वतीने लोकांशी (उर्वरित आतील पान 7 वर)

कसे वागतो, आपण कोणाला दुःख तर देत नाही ना, काय आपण कोणाला सुखाची परिकल्पना शिकवतो का? जर धर्माचे पालन करायचे असेल, तर मनाला योग्य मार्ग देण्यासाठी आतून चांगले असणे अत्यंत आवश्यक आहे.

डॉ. सलीम खान (उपाध्यक्ष, जमात-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्र) यांच्या मते, धर्म एक अनुशासनता आहे. तो एक कायदा आहे. ज्याच्या अंमलबजावणीद्वारे श्रेष्ठ समाजाची उभारणी करता येते. यामुळे सत्य आणि असत्य, धर्म आणि अधर्म यातील फरक कळतो. अन्यायाचा तिरस्कार करून वंचितांना त्यांचा हक्क दिला पाहिजे. कोणालाही  धर्माची बदनामी करण्याचा अधिकार नाही. धर्मगुरूंची विशेष गोष्ट म्हणजे त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात कोणताही विरोधाभास नसतो. इतर धर्मगुरुंनीही नमूद केले की, आता उघड तिरस्काराच्या भूमीकेतून लोकांना एकत्र जमवले जात आहे आणि त्यातून अधर्माचे डोस पाजले जात आहेत.  त्याचे उदाहरण म्हणजे समाजात फूट पाडणारे धर्मगुरू नोएल किशोर आहेत. जे समाजाला विभाजित करण्याच्या गोष्टी बोलतात.

श्री शील बोधी (पवई आश्रम) यांनी सर्वांना सांगितले की, आज लोक खूप त्रासलेले आहेत, विविध समस्यांमध्ये अडकलेले आहेत. स्वार्थ आणि एकमेकांची उपेक्षा या सर्व गोष्टी आपण धर्माच्या विरोधात करत आहोत. यात आपण खूप दुःख भोगत आहोत. धर्म आपल्याला जगण्याचा योग्य मार्ग दाखवतो. मात्र अनुयायांच्या भ्रष्ट आणि चुकीच्या वागण्याने लोक धर्मालाच नावे ठेवतात. अब्बास रिझवी (शिया धर्मशास्त्रज्ञ) यांनी स्पष्ट रणनीती अंगीकारून वाईटाला चांगल्यातून दूर करण्याचे मार्गदर्शन केले.

डॉ. मुकंद माधव दास (उपाध्यक्ष इस्कॉन मुंबई) म्हणाले की, सर्वप्रथम धर्म आणि अधर्म या दोन्हींचा अर्थ जाणून घेणे महत्त्वाचे आहे. धर्माला ’कर्तव्य’ म्हटले जाते आणि तो नेहमीच नैसर्गिक अवस्थेत असतो. निस्वार्थ राहणे, मोठ्या मनाचा भाव अंगीकारणे ही धर्माची शिकवण आहे.त्याचे पालन करण्यासाठी आत्मत्यागाची भूमिका पार पाडणे आवश्यक आहे. बाबा सत्यनाम दास (उदासीन आश्रम गोरे गाव) म्हणाले, आम्ही सर्व एका ईश्वराची मुले आहोत.  पण आम्ही परस्पर द्वेषाने दूर फेकले जात आहोत. आपला देश अहिंसेची सर्वात जास्त शिकवण देतो, त्यामुळे समाजात राहून एकता दाखवून फूट पाडा आणि राज्य करा हे धोरण संपवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. पुन्हा-पुन्हा भेटत राहा आणि द्वेष दूर करण्यासाठी प्रयत्न करा, असेही ते म्हणाले. 

रविकुमार स्टीफन यांच्या मते, धर्माचे पालन करण्यासाठी व्यक्तीने नेहमी सक्रिय असले पाहिजे. स्वतःला स्वतःच्या निर्मात्याच्या आज्ञेत ठेवणे ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. जर मी महान गोष्टी करू शकतो पण जर मी प्रेम शेअर करू शकत नाही तर मी काहीही करू शकत नाही. 

मौलाना अनीस अशरफी म्हणाले की, आज माणुसकी आणि शालीनता मागे गेली आहे आणि त्याची जागा अधर्माने घेतली आहे. प्रेषित मुहम्मद पैगंबर यांचे उदाहरण देत त्यांनी प्रेम, करुणा आणि माणुसकीचा दृष्टीकोन अंगीकारून या बिघडत चाललेल्या समाजाला चांगल्या दिशेने नेण्यासाठी प्रगती करता येते हे स्पष्ट केले. समारोपाच्या मुख्य भाषणात मौलाना महमूद दरियाबादी (ऑल इंडिया उलेमा कौन्सिलचे सरचिटणीस) म्हणाले की, आम्ही गावा-गावात जाऊन लोकांच्या सुधारणेचे आणि त्यांना शिक्षित करण्याचे काम करू. आजचा कार्यक्रम येणाऱ्या काळात मोठ्या क्रांतीची चिन्हे पेरणारा आहे.  

चर्चासत्रात आलेल्या पाहुण्यांचे आभार फरीद शेख (शांतता समिती) यांनी मानले.शाकीर शेख (शांतता व न्याय आघाडी) यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. 


Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget