Halloween Costume ideas 2015

आयडीया ऑफ इंडियाकडे आश्वासक वाटचाल


आयडिया ऑफ इंडियाचा मूळ विचार अबाधित ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमीका भारतीय सेनेने बजावली. सलाम आपल्या सैनिकांना ज्यांनी तटस्थ राहण्याची भूमीका घेतली. राजकीय घडामोडींपासून अलिप्त राहण्याची भूमीका घेतली. 

फाशीवर गेलेले पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फेकारअली भुट्टो यांनी ’इफ आय एम अ‍ॅसॅसिनेटेड’ या आपल्या आत्मचरित्रामध्ये लिहून ठेवलेले आहे की, ’’भारत हा सांस्कृतिकदृष्ट्या पाकिस्तानपेक्षा जास्त वैविध्याने नटलेला देश आहे. त्यात हुकूमशाही असती किंवा ते धर्माधिष्ठित राष्ट्र असते तर त्याचे कधीच तुकडे झालेले असते.’’ भुट्टोंचे हे वाक्य आठवण्याचे कारण असे की, गेल्या काही वर्षांपासून आपला देश विविधतेतून एकतेकडे जाण्याच्या मूळ आयडिया ऑफ इंडियाच्या विरूद्ध जात असून, त्याचा विविधतेतून एकतेकडे असा उलट प्रवास सुरू आहे. 

1947 साली जेव्हा देशाची फाळणी झाली ती दोन विचारांवर झाली. एक इस्लामवर आधारित आयडिया ऑफ पाकिस्तान व दूसरा धर्मनिरपेक्षतेवर आधारित आयडिया ऑफ इंडिया. आपल्या जन्मापासून लष्करी वर्चस्वाखाली राहिलेल्या पाकिस्तानमध्ये म्हणायला काही नागरी सरकारे आली मात्र ती सुद्धा लष्कराच्याच वर्चस्वाखाली राहिली. सुदैवाने भारतात मात्र गांधी, नेहरू, पटेल आणि आझाद यांनी व अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी मिळून धर्मनिरपेक्षतेच्या तत्वावर भारतीय लोकशाहीचा भक्कम पाया रचला. त्यामुळे गेल्या 75 वर्षात देशावर अनेक संकटे आली तरी देशाची पाकिस्तानसारखी शकले झाली नाहीत आणि देश दरिद्री झाला नाही. देशाने आणिबाणीचा काळही पाहिला. सातत्याने झालेल्या दंगलीही पाहिल्या. त्यात देशाची हानीही पाहिली. पण धर्मनिरपेक्षच्या तत्वामुळे देशाची प्रगती अविरतपणे सुरूच राहिली. ज्यात सर्वच जातीधर्मियांनी या प्रगतीत आपला वाटा उचलला. 

देशात आयडिया ऑफ इंडियाच्या मूळ संकल्पनेला बाधा न पोहोचविण्यासाठी दोन घटकांनी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमीका बजावली आहे. एक नागरी सरकारे आणि दूसरी भारतीय सेना. नागरी सरकारांनी टोकाचा भ्रष्टाचार केला असेल, दंगलींकडे काळाडोळा केला असेल, परंतु प्रत्यक्षात सरकारांनी दंगलीमध्ये कधीही सहभाग घेतला नाही. भारतीय सेनेनेही आपली तटस्थता कायम ठेवली. राजकारणापासून सेना दूर राहिली. तसेच धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाशीही एकनिष्ठ राहिली. या दोन कारणांमुळे आयडिया ऑफ इंडिया दिवसेंदिवस बलशाली होत गेला. मात्र या तत्त्वाला 2002 पासून उतरती कळा लागली. जेव्हा गुजरातमध्ये अल्पसंख्यांकांचा एकतर्फी वंशविच्छेद झाला. त्यात अनेक दोषींना न्यायालयापर्यंत नेऊन शिक्षा घडविण्यात मोठ्या प्रमाणात अपयश आले. ज्यांना शिक्षा झाल्या त्यांना सरकारांनी स्वतः मुक्त करण्यामध्ये महत्त्वाची भूमीका बजावली. गुजरातची तत्कालीन महिला मंत्री माया कोंडनानी आणि बिल्कीस बानो केसमधील दोषींना सोडविण्यामध्ये राज्य आणि केंद्र सरकारांनी बजावलेल्या भूमीकेकडे न्यायव्यवस्थेने सुद्धा असहाय्यपणे पाहण्याशिवाय काही केले नाही. यामुळे आयडिया ऑफ इंडिया कमकुवत झाला अशी म्हणण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. 

आयडिया ऑफ इंडियाच्या मूळ संकल्पनेला हानी पोहोचविण्याचे सर्वात मोठे पाप मीडिया हाऊसने केले. गेल्या काही वर्षांपासून अल्पसंख्यांकांना टार्गेट करत त्यांनी सातत्याने  त्यांना देशासाठी एक समस्या म्हणून प्रस्तूत केले. अल्पसंख्यांकांची बदनामी करणारी एकच बाजू सातत्याने समोर येत राहिल्यामुळे कालपर्यंत परिस्थिती अशी होती की, मीडियाचा प्रचार हाच खरा वाटू लागला होता. त्यात तबलिगी जमाअत सारखी निरागस जमाअत सुद्धा भरडून निघाली होती. त्यानंतर उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशामध्ये बुलडोजरचा खुलेआम वापर अल्पसंख्यांकांच्या घरांवर केला गेला. त्यांची दुकाने जमीनदोस्त केली गेली. हे सर्व बेकायदेशीररित्या केले गेले. तरीही न्यायालये गप्प राहिली. उत्तर प्रदेशाच्या निवडणुकींमध्ये अल्पसंख्यांकांविरूद्धची घृणा अगदी टोकावर पोहोचली होती. अल्पसंख्यांकाविरूद्ध वातावरण तापविण्यामध्ये भाजपच्या अनेक खासदार आणि मंत्र्यांनी सुद्धा महत्त्वपूर्ण भूमीका बजावली. ’गोलीमारो सालोंको’ सारख्या घोषणा दिल्या गेल्या. परिणामी मॉबलिंचिंगमध्ये मोठ्या प्रमाणात अल्पसंख्यांकांचा बळी गेला. फेब्रुवारी 2020 साली दिल्लीत दंगल झाली. त्यातही मुस्लिमांची मोठी हानी झाली. धर्मसंसदेचे आयोजन करण्यात आले. त्यात अल्पसंख्यांकाविरूद्ध उघड भूमिका घेत विखारी भाषणांची अविरत मालिकाच सुरू झाली. त्यात मुस्लिमांविरूद्ध हिंसा करण्याचे आवाहन केले गेले. साक्षी महाराज, प्रज्ञा ठाकूर, अनुराग ठाकूर, नंदकिशोर गुज्जर इत्यादींनी अल्पसंख्यांकाविरूद्ध सातत्याने वातावरण तापत राहील याची काळजी घेतली. 

नुपूर शर्मा यांच्या प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या संबंधीच्या टिप्पणीवरून  देशात तीव्र प्रतिक्रिया उमटली जिचा प्रतिध्वनी मध्यपुर्वेच्या देशात सुद्धा उमटला. विशेष म्हणजे सोशल मीडियावर अनेक बहुसंख्यांक बंधूंनी नुपूर शर्मा यांचा निषेध केला. मात्र तिच्या समर्थकांची संख्या ही विरोध करणाऱ्यांपेक्षा कितीतरी मोठी होती. हे असे सुरू राहील असे वाटत असताना भाजपाचे खासदार प्रवेश वर्मा यांच्या ताज्या वक्तव्याचा विरोध सुरू झाला आहे. या महाशयांचे म्हणणे असे की, भारतामध्ये मुस्लिम समुदायाचा पूर्णपणे आर्थिक बहिष्कार केला गेला पाहिजे.   हिंदूंनी मुस्लिमाच्या दुकानातून, टपऱ्यांवरून माल घेऊ नये. एवढेच न त्यांना कोणी मजूर म्हणूनही काम देऊ नये. घृणेचे हे कळस म्हणता येईल. याचा मात्र विरोध सुरू झाला. प्रख्यात मराठी विचारवंत सूरज सामंत यांनी या वक्तव्याचा खालील शब्दात समाचार घेतला. 

’’भाजपा खासदार परवेश वर्मा याने नुकतेच भाषणात, मुसलमानांचा बहिष्कार करा असे म्हटले. आता मोदीजी मनातल्या मनात त्याला माफ नाही करू शकले तरीही, भाजपने त्याच्या विरोधात आहोत हे दर्शवणारी कोणतीही कारवाई केलेली नाही.

त्यामुळे भाजपाचे या विधानाला समर्थन आहे असे समजायला हरकत नाही. मग काही प्रश्न. मुसलमानांचा बहिष्कार केल्यानंतर आता;   

1. मुस्लिम राष्ट्रांकडून तेल आयात करण्याचे थांबवणार का ? 

2. भारतीय उद्योग्यांची मुस्लिम राष्ट्रांना होणारी निर्यात थांबवणार का? (पतंजली सारख्या राष्ट्रवादी कंपन्या त्यासाठी हलाल सर्टिफिकेट सुद्धा घेतात)

3. पाकिस्तानात न बोलावता जाऊन बिर्याणी, केक खाणे बंद. आणि जाणाऱ्यांवर बहिष्कार ?

4. अरबी नेत्यांच्या गळ्यात पडणे बंद? 

5. बांगलादेशने नुकतेच अदानी ला कंत्राट दिले ते बंद ?

6. गावठी जेम्सबॉन्ड च्या मुलाचा व्यावसायिक भागीदार पाकिस्तानी नागरिक आहे, त्याच्यावर कारवाई ?

7. 2018 च्या आकडेवारीनुसार 3कोटी 20 लाख भारतीय परदेशात काम करत आहेत (भारतीय पासपोर्ट असणारे). त्या पैकी 1 कोटी 50 लाख मुस्लिम राष्ट्रांत आहेत. त्यांना परत बोलावणार ?

8. 2021 मधला मुस्लिम राष्ट्रातून भारतात आलेला रेमिटन्स आहे 3 लाख कोटी रुपये. भारताच्या एकूण इन्कम टॅक्सच्या 20% प्रमाण आहे हे. आता बंद ?

9. फक्त चार मुस्लिम देशांना होणारी भारताची निर्यात आहे 3 लाख कोटी रुपये थांबवायची ?

10. लाखभर कोटींची परदेशी गुंतवणूक मुस्लिम राष्ट्रातून येते. ... नकार द्यायचा ? (उदा : आरामको )

11. शहानवाज हुसेन, मुख्तर अब्बास नकवी....वगैरेंची हाकलपट्टी?

12. रुबीका लियाकत... सारख्या गोदी मीडिया चॅनेल बाहेर?

13. भागवत आत्ता च गेलेल्या मशिदीचं आणि त्यांना पितामह वगैरे समजणाऱ्यांचं काय?

14. फक्त लग्न करण्यासाठी दिलावर खान, आयशा बीबी (धर्मेंद्र, हेमा मालिनी) व कुटुंबीय यांना देशद्रोही घोषित करणार?

15. आणि भक्तांच्या पप्पांची पाकिस्तान मधे मानलेली बहीण आहे... त्याचं काय? 

सध्या तरी फक्त या 15 प्रश्नांची उत्तरं द्यावी.

ती मिळाली कि अजून प्रश्न आहेतच. 

एकत्र जास्त अभ्यास नको’’  

आयडिया ऑफ इंडियाचा मूळ विचार अबाधित ठेवण्यासाठी दूसरी महत्त्वाची भूमीका भारतीय सेनेने बजावली. ज्याचा ओझरता उल्लेख या लेखाच्या सुरूवातीलाच मी केलेला आहे. सलाम आपल्या सैनिकांना ज्यांनी तटस्थ राहण्याची भूमीका घेतली. राजकीय घडामोडींपासून अलिप्त राहण्याची भूमीका घेतली. अपवाद सीडीएस विपीन रावत यांचा. त्यांनी पदावर असतांना केंद्रीय सत्तेला सोयीची अशी अनेकवेळा भूमीका घेतली. त्यांच्या पूर्वी आणि त्यांच्या नंतरही कुठल्याच उच्च लष्करी अधिकाऱ्याने अशी भूमीका घेतलेली नव्हती. जनरल रावत हे हयात नाहीत म्हणून यावर चर्चा नको. एकूणच भारतीय लष्कर ही आपली विश्वासर्हता टिकवून आहे, ही समाधानाची बाब आहे. 

सूरज सामंत यांच्या विचारांची पुढची कडी ’द वायर’चा एक कार्यक्रम आहे. याच आठवड्यात द वायर या विश्वासहार्य यू ट्युब चॅनलने एक कार्यक्रम प्रसारित केला. ज्यात अँकर झीशान कासकर यांनी दिल्लीच्या कॉनॉट प्लेस या गर्दीच्या ठिकाणी लोकांशी बोलून प्रवेश वर्मा यांच्या वक्तव्याबद्दल लोकांच्या प्रतिक्रिया नोंदविल्या. समाधानाची बाब ही या प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या हिंदू बांधवांनी प्रवेश वर्मा यांच्या वक्तव्याचा कडाडून विरोध केला एवढेच नाही तर धर्मनिरपेक्षतेची पाठराखण केली. हा कार्यक्रम यू ट्यूबवर आजही उपलब्ध आहे.

तीसरी समाधानाची बाब ही काँग्रेसची ’भारत जोडो यात्रा’ आहे. या यात्रेला मिळत असलेला जनतेचा उदंड प्रतिसाद पाहता हा प्रतिसाद मूळच्या आयडिया ऑफ इंडियाच्या विचाराला बळ देणारा आहे, ही मोठी समाधानाची बाब आहे. 

शेवटी राहता राहिला प्रश्न या सर्वात मुस्लिमांची भूमिका काय? तर यात मुस्लिमांची भूमीका स्पष्ट आहे. ते पहिल्यापासूनच धर्मनिरपेक्ष भारताच्या आयडिया ऑफ इंडियाशी एकनिष्ठ राहिलेले आहेत. म्हणूनच त्यांनी आयडिया ऑफ पाकिस्तानचा पर्याय धुडकावून लावला. आपल्या नेतृत्वाचा गळा घोटून हिंदूं नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. त्यांनी कधीच स्वतंत्र असा मुसलमानांचा राजकीय पक्ष बनू दिला नाही. ज्यांनी तो बनविण्याचा प्रयत्न केला त्यांची साथ दिली नाही, मग ते मुस्लिम लीग असो का मजलीस. आजही मुस्लिम लीग केरळाच्या काही क्षेत्रापुरती मर्यादित असून, मजलिसबद्दल काही बोलणे व्यर्थ आहे. मुस्लिमांनी कधीही पोलीसांनी आतंकवादी म्हणून अटक केलेल्या आरोपींवर फुलांचा वर्षाव केला नाही. कधीही देशाची गुपित शत्रू राष्ट्रांना विकली नाहीत. कुठल्याही मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची हत्या केली नाही. कश्मीरमधील सशस्त्र लढा देणाऱ्यांविषयी सहानुभूती दाखविली नाही. उलट कसाबला फाशी झाल्यानंतर पेढे वाटून आनंद व्यक्त केला. बाबरी मस्जिद विषयी आपल्याविरूद्ध आलेला निर्णय चुकीचा आहे, हे कळत असतांनासुद्धा तो निमुटपणे स्विकारला.

भारतीय मुसलमान हा एकूणच आयडिया ऑफ इंडियाशी सुरूवातीपासूनच एकनिष्ठ राहिलेला आहे. प्रवेश वर्मा यांच्या वक्तव्याच्या तीव्र निषेधाने आयडिया ऑफ इंडियाचे पुनरूज्जीवन होत असून, भारत जोडो यात्रेेने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे, ही सर्व भारतीय लोकशाहीसाठी शुभ संकेत आहेत. माझा तर भारतीय हिंदू बांधवांवर सुरूवातीपासून विश्वास राहिलेला आहे, जो की मी माझ्या लेखनातून अनेकवेळा व्यक्त केलेला आहे. पुनरूक्तीचा दोष पत्करून आज पुन्हा सांगतोय की भारतात अल्पसंख्यांक धर्मनिरपेक्षतेच्या घटनात्मक तरतुदींमुळे सुरक्षित नाहीत तर येथील बहुसंख्य हिंदूंच्या सहिष्णु प्रवृत्तीमुळे सुरक्षित आहेत. जय हिंद.


- एम.आय. शेख


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget