Halloween Costume ideas 2015

मुली अन् पत्नी दोहोंच्या सुरक्षेची जबाबदारी पुरूषाची

महेका करते हैं फूल काटों की ही हिफाजत में
वर्ना फुलों में महेकने की जुर्रत ना होती
मुलींचे संगोपन हे फुलांच्या संगोपनासारखेच असते. अल्लाहने त्यांच्या आजूबाजूला एक मजबूत सुरक्षा कवच तयार केलेले आहे. लग्नाअगोदर वडिल तिच्या सुरक्षेकडे प्राणपणाने लक्ष देतात आणि लग्नानंतर ही जबाबदारी पतीवर येते. आजकाल लग्नाअगोदर ज्या मुली वाममार्गाला जात आहेत त्यांच्यामध्ये अश्‍लिलता आणि अर्धनग्न राहून आपल्या स्त्रित्वाची ओळख स्वतःहून विसण्याची प्रवृत्ती वाढत असल्याचे दिसून येत आहे. पुरूषांसारखे कपडे घालणे, त्यांच्यासारखे बोलणे-वागणे, अपरिचित पुरूषांशी धाडसाने बेधडक संबंध स्थापित करणे, शृंगार करून कमी कपड्यात सार्वजनिक ठिकाणी व पार्ट्यांमध्ये वावरणे, आपल्या नखर्‍याने मुलांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करणे हा सारा निर्लज्जपणा आज  समाजातील अनेक महिला/तरूणींमध्ये वाढलेला आहे. त्याचा वाईट परिणाम रोज कुठल्या ना कुठल्या वाईट बातमीच्या स्वरूपाने समाजासमोर येत आहे. तरी परंतू बहुतांशी लोक या बातम्यांपासून काही बोध घेत असल्याचे दिसून येत नाही. आपल्या किंवा अन्य जातीच्या मुलांबरोबर मुस्लिम मुलींचे पळून जाण्याचे प्रकार अलिकडे वाढलेले आहेत. हे याचसाठी होत आहे की, संबंधित मुलींचे वडील हे आपल्या मुलींच्या सर्वांगीण सुरक्षिततेबाबत पुरेसे लक्ष देत नाहीयेत. त्यांनीही बदलत्या काळाप्रमाणे आपल्या मुलींना आवश्यकतपेक्षा जास्त स्वातंत्र्य दिलेले आहे. असेही शक्य आहे की मुलींच्या उच्चशिक्षणाला नजरेसमोर ठेउन त्यांच्याकडून मुलींच्या समजूतदारपणावर विश्‍वास ठेवला जात असेल. असेही शक्य आहे की मुली उच्चशिक्षित झाल्याने त्यांच्यामध्ये पुरेसा आत्मविश्‍वासही निर्माण होतो. स्वतःच्या भविष्याबद्दल त्या स्वतः योग्य निर्णय घेऊ शकतात. या भावनेतूनही ते आपल्या मुलींच्या सुरक्षिततेची जास्त काळजी करत नसावेत, ती अबला नसून सबला आहे, आधुनिक मुलगी आहे, स्वतःचे रक्षण स्वतः करू शकते म्हणून तिच्या सुरक्षिततेबद्दल वडिल फारसे लक्ष देत नसावेत आणि इथेच ही वडिलधारी मंडळी चुकत आहे. त्यांचा निष्काळजीपणा आणि जबाबदारी न उचलण्याची प्रवृत्ती आणि या सर्वांपेक्षा जास्त शरीयतने स्त्रीयांबाबत दिलेल्या आचारसंहितेची अवहेलना करण्याची हिम्मत या सर्व गोष्टींचे एकत्रित परिणाम अनेक मुलींना भोगावे लागत आहेत. सभ्यपणाच्या मुखवट्याआड टपून बसलेल्या लांडग्यांच्या तावडीत अशा बर्‍याच मुली सापडत आहेत. अनेक मुलींचे भौतिक शिक्षण जरी उच्च दर्जाचे होत असले तरी धार्मिक शिक्षण मात्र जेमतेमच असल्यामुळे ज्या गोष्टी लग्नानंतर करावयाचे निर्देष शरियतने दिलेले आहेत, त्याचे पालनही बर्‍याच मुलींकडून केले जात नाही. त्या प्रेमामध्ये आंधळ्या होवून मुलांच्या भूलथापांना बळी पडून शरियतने घालून दिलेल्या मर्यादांचे लग्नापूर्वीच उल्लंघन करीत आहेत.
    समाजात अशाही घटना दृष्टीगोचर होत आहेत की, अनेक तरूण लग्नकरून आपल्या तरूण पत्नीची सुरक्षा करण्याची जबाबदारी विसरून लग्नानंतर काही दिवस सोबत राहून कमाई करण्याच्या नादात विदेशात निघून जात आहेत व तेथून फक्त मोबाईलवर बोलून पत्नीचे समाधान करण्याचा अयशस्वी प्रयत्न करतांना दिसून येत आहेत. अशा परिस्थितीत पत्नी आपल्या सासुरवाडीतच राहत असेल तर ती आपल्या सासू-सासर्‍यांचे फारसे ऐकत नाही. त्यांच्याशी पटत नसल्याचे कारण सांगून स्वतःच्या माहेरी किंवा स्वतंत्र राहते. नवर्‍याकडून येत असलेला पैसा आणि नको तेवढे स्वातंत्र्य मिळाल्यामुळे अनेक महिला त्या स्वातंत्र्याचा दुरूपयोग करून वाममार्गाला लागत असल्याचे एकंदरित चित्र आहे. त्यातल्या त्यात धार्मिक शिक्षणाचा जर अभाव असेल तर अशा महिलांचे पाय चुकीच्या मार्गाकडे वळण्याची जास्त शक्यता असते. शिवाय वाममार्गासाठी समाजामध्ये आधिपासूनच पोषक असे वातावरण असल्यामुळे अशा घटनांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. स्पष्ट आहे यात चूक पतीची आहे. लग्न झाल्याबरोबर पत्नीच्या संरक्षणाची सर्वांगीण जबाबदारी आपल्यावर येते, हीच गोष्ट अनेक तरूण विसरतांना दिसून येत आहेत. त्यातूनच अशा चुकीच्या घटना घडत आहेत.
    शेवटी एक गोष्ट स्पष्ट आहे की, या सर्व परिस्थितीचा अंतिमतः वाईट परिणाम स्त्रीवरच होतो. अनेकवेळा गुंतागुंत निर्माण होऊन स्त्रीयांंचा एक तर बळी जातो किंवा त्या आत्महत्या करतात. जी मुलगी फुलासारखी होती. लग्नानंतर केवळ तिचे योग्य संरक्षण न केल्या गेल्यामुळे तिची अवस्था बिना काट्याच्या गुलाबासारखी होवून जाते, जिच्यापर्यंत कोणाचाही हात सहज पोहोचतो. एकंदरित कमाई करण्यासाठी जातांना एकतर लग्न करू नये किंवा केल्यास विदेशात जाण्याचा विचार सोडून आपल्याच देशात जे काही उपजिविका मिळेल त्यावर समाधान मानावे. यातच त्यांचे स्वतःचे, त्यांच्या कुटुंबाचे आणि समाजाचे हित निहित आहे.

- फेरोजा तस्बीह
मिरजोळी, 9764210789

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget