(३४) परंतु जे लोक पश्चात्ताप करतील यापूर्वी की तुम्ही त्यांच्यावर प्रभुत्व प्रस्थापित करावे - तुम्हाला माहीत असावयास हवे की अल्लाह माफ करणारा व दया करणारा आहे.५७
(३५) हे श्रद्धावंतांनो! अल्लाहचे भय बाळगा आणि त्याच्या ठायी त्याची प्रसन्नता मिळविण्याचे साधन शोधा.५८ आणि त्याच्या मार्गात संघर्ष करा५९ कस्रfचत तुम्हाला यश प्राप्त होईल.
(३६) चांगले समजून असा की ज्या लोकांनी कुफ्र (इन्कार) वर्तन अंगीकारले आहे जर त्यांच्या ताब्यात पृथ्वीवरील सर्व संपत्ती असली आणि तितकीच पुनश्च, आणि ते इच्छा करतील की ती मोबदल्यात देऊन कयामतच्या दिवसाच्या यातनेपासून सुटका व्हावी तरी ती त्यांच्याकडून स्वीकारली जाणार नाही आणि त्यांना दु:खदायक शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही.
(३७) ते इच्छा करतील की नरकाच्या अग्नीमधून पळून जावे परंतु बाहेर निघू शकणार नाहीत आणि त्यांना चिरंतन शिक्षा दिली जाईल.
(३८) आणि चोर मग तो पुरुष असो अथवा स्त्री दोघांचे हात कापून टाका,६० हा त्यांच्या कर्माचा बदला आहे आणि अल्लाहकडून अद्दल घडविणारी शिक्षा अल्लाहचे सामर्थ्य सर्वांवर प्रभावी आहे आणि तो बुद्धिमान व द्रष्टा आहे.
५७) म्हणजे ते बिघाड करण्याच्या प्रयत्नापासून दूर राहिले आणि त्यांनी कल्याणकारी व्यवस्थेला अस्ताव्यस्त करण्याच्या कटाला सोडून दिले. त्यांची यानंतरच्या कार्यशैलीने सिद्ध झाले आहे की ते शांतीप्रिय कायद्याचे पालन करणारे आणि सदाचारी माणसे बनली आहेत. यानंतर जर त्यांच्या मागील अपराधांचा शोध लागला तर वरील शिक्षांपैकी कोणतीच शिक्षा त्यांना दिली जाणार नाही. होय! लोकांच्या हक्कांवर जर त्यांनी हात टाकलेला असेल तर मात्र ही जबाबदारी त्यांच्यावर बाकी राहील. उदा. एखाद्याला त्यांनी ठार केले असेल किंवा कोणाची संपत्ती हडप केली होती आणि एखादा अपराध मानवी वित्त व जीवाविरुद्ध केला तर मात्र त्याच्यावर फौजदारी दावा चालविला जाईल. परंतु विद्रोह, गद्दारी आणि अल्लाह व पैगंबराविरुद्धचा कोणताच दावा चालविला जाणार नाही.
५८) म्हणजे त्या प्रत्येक साधनांचे अभिलाषी आणि इच्छुक राहा ज्याने तुम्ही अल्लाहचे सान्निध्य प्राप्त् करू शकाल आणि अल्लाहची प्रसन्नता प्राप्त् करू शकाल.
५९) मूळ अरबी शब्द `जाहिदु' आहे. याचा अर्थ संघर्ष घेतला तर पूर्ण अर्थ निघत नाही. `मुजाहिदा' चा शब्द मुकाबल्याच्या अर्थाने येतो. त्याचा खरा अर्थ होतो की ज्या शक्तीं अल्लाहच्या मार्गात बाधक बनतात आणि त्या तुम्हाला अल्लाहच्या मार्गापासून रोखतात. अल्लाहच्या मार्गापासून दूर नेण्याचा प्रयत्न करतात आणि तुम्हाला पूर्णत: अल्लाहचा बंदा बनून राहू देत नाही. तुम्हाला स्वत:चा किंवा अल्लाहशिवाय इतरांचा बंदा (दास) बनण्यास मजबूर करतात. त्यांच्याविरुद्ध आपल्या सर्वशक्तीनिशी संघर्ष करा. याच संघर्षावर तुमचे कल्याण आणि सफलता अवलंबून आहे आणि अल्लाहचे सान्निध्य निर्भर आहे. अशाप्रकारे ही आयत मोमीन बंदा (अल्लाहच्या सच्च्या दासाला) प्रत्येक मोर्चावर चौमुखी लढाई लढण्यास मार्गदर्शन करते. एकीकडे धिक्कारित शैतान इब्लीस आणि त्याची शैतानी फौज आहे तर दुसरीकडे मनुष्याचे आपले मन आणि त्याची उच्छृंखल मनोकामना आहेत. तिसऱ्या बाजूला अल्लाहचे द्रोही लोक आहेत ज्यांच्याशी तुमचे सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक संबंध आहेत. चौथ्या बाजूला त्या चुकीच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि राजनैतिक व्यवस्था आहेत ज्या अल्लाहच्या विद्रोहावर स्थापित झाल्या आहेत. सत्याची उपासना व भक्तीऐवजी ते असत्याची भक्ती करण्यास मनुष्याला भाग पाडतात. या सर्वांचे मार्ग वेगवेगळे आहेत परंतु सर्वांचा एकच प्रयत्न असतो की मनुष्याला अल्लाहव्यतिरिक्त आपला आज्ञाधारक बनवावे. याविरुद्ध मनुष्याची उन्नती आणि अल्लाहची समिपताप्राप्तीचा आधार हाच आहे की त्याने पूर्णत: अल्लाहचा आज्ञापालक बनावे. तसेच आंतर्बाह्य विशुद्ध रूपाने अल्लाहचा दास बनून राहावे. आपल्या उद्देशप्राप्तीसाठी हे आवश्यक आहे की या मार्गात येणारी सर्व संकटे आणि विरोधी शक्तीविरुद्ध एकसाथ संघर्षरत राहावे. प्रत्येक वेळी, प्रत्येक स्थितीत त्यांच्याशी संघर्ष करीत राहावे. मार्गातील सर्व अडथळयांना दूर करीत अल्लाहच्या मार्गात पुढे चालत जावे.
६०) दोन्ही हात नाही तर एक हात. मुस्लिम समुदायाचे यावर एकमत आहे की पहिल्या चोरीसाठी उजवा हात कापला जाईल पैगंबर मुहम्मद (स.) यांनी स्पष्ट केले, `ला कतअअला खाइनिन' (खयानत (धोका) करणारे मनुष्याचे हात कापले जाऊ नये) यावरून हे माहीत होते की चोरीमध्ये धोकाधडी (खयानत) याचा समावेश नाही. चोरी म्हणजे मनुष्य एखाद्याच्या माला (धन) ला एखाद्याच्या कब्जातून काढून आपल्या कब्जात घेणे. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आदेश दिला की एका ढालीच्या किंमतीच्या कमी रकमेच्या चोरीसाठी हात कलम केले जात नाहीत. एका ढालीची किंमत पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या काळात अब्दुल्लाह बिन अब्बास यांच्या कथनानुसार दहा दिरहम, इब्ने उमर (रजि.) यांच्यानुसार तीन दिरहम, तर माननीय अनस बिन मलिक (रजि.) यांच्या कथनानुसार पाच दिरहम आणि माननीय आएशा (रजि.) यांच्या कथनानुसार एक चौथाई (एक चतुर्थांश) दिनार होती. याच मतभेदाच्या आधारावर धर्मशास्त्रींच्या मते चोरीची कमीतकमी मात्रेबद्दलसुद्धा मतभेद आहेत. इमाम अबू हनीफा (रह.) यांच्या मते चोरीची मात्रा दहा दिरहम आहे आणि इमाम मालिक, शाफई आणि अहमद यांचेनुसार एक चतुर्थांश दिनार आहे. अनेक अशा वस्तू आहेत ज्यांच्या चोरी बद्दल हात कापण्याची शिक्षा दिली जाऊ शकत नाही. पैगंबर मुहम्मद (स.) यांचा आदेश आहे की ``फळे आणि भाज्यांच्या चोरीत हात कापला जाऊ शकत नाही खाण्याच्या चोरीत हात कापण्याची शिक्षा नाही.'' माननीय आएशा (रजि.) यांचे कथन आहे की तुच्छ वस्तूंच्या चोरीत पैगंबर मुहम्मद (स) यांच्या काळात हात कापला जात नसे. माननीय अली आणि उस्मान (रजि.) यांचा निर्णय आहे आणि सहाबांचा याविषयी मतभेदसुद्धा नाही की पशुंच्या चोरीत हात कापण्याची शिक्षा नाही. तसेच माननीय उमर आणि अली (रजि.) यांनी कोषागारातून चोरी केलेल्यांचे कधीही हात कापले नाहीत. याविषयी सहाबांचे मतभेद नाहीत. या स्रोतांच्या आधारावर इस्लामी धर्मशास्त्रीनी अनेक वस्तूंना हात कापण्याच्या चोरीच्या शिक्षेतून वगळले आहे. इमाम अबू हनीफा (रह.) यांच्यामते फळभाज्या, मटण, धान्य, जेवण, खेळ आणि संगीत वाद्य, या वस्तूत हात कापण्याची शिक्षा नाही. तसेच जंगलात चरणारी जनावरे आणि बैतुल मालची (राजकोष) चोरी करण्यात हात कापण्याची शिक्षा नाही. अशाप्रकारे दुसऱ्या धर्मशास्त्रीनीसुद्धा काही वस्तूंच्या चोरीला हात कापण्याच्या शिक्षेतून वगळले आहे. परंतु याचा अर्थ असा होत नाही की या चोऱ्यांविषयी बिल्कुल काही शिक्षा दिलीच जाऊ शकत नाही. याचा अर्थ आहे की या अपराधांमध्ये हात कापला जाणार नाही परंतु योग्य शिक्षा अवश्य होईल.
Post a Comment