(२२) त्यांनी उत्तर दिले, ‘‘हे मूसा! तेथे तर मोठे शक्तिशाली लोक राहतात. आम्ही तेथे कदापि जाणार नाही जोपर्यंत ते तेथून निघून जात नाहीत. परंतु होय, जर ते निघून गेले तर आम्ही दाखल होण्यास तयार आहोत.’’
(२३) त्या भिणाऱ्यांपैकी दोन माणसे अशीदेखील होती४५ ज्यांना अल्लाहने आपल्या कृपेने उपकृत केले होते. त्यांनी सांगितले, ‘‘या शक्तिशाली लोकांच्या मुकाबल्यासाठी दरवाजात प्रवेश करा, जेव्हा तुम्ही आत दाखल व्हाल तेव्हा तुम्हासच वर्चस्व प्राप्त होईल. अल्लाहवर भरवसा ठेवा जर तुम्ही श्रद्धावंत असाल.’’
(२४) परंतु त्यांनी पुन्हा तेच सांगितले की, ‘‘हे मूसा! आम्ही तर तेथे कदापि जाणार नाही जोपर्यंत ते तेथे आहेत. तुम्ही आणि तुमचा पालनकर्ता दोघे जा आणि लढा. आम्ही येथेच बसलो आहोत.’’
(२५) यावर मूसा (अ.) ने सांगितले, ‘‘हे माझ्या पालनकत्र्या! माझ्या अखत्यारीत कोणी नाही परंतु एक तर मी स्वत: अथवा माझा भाऊ, तर तू आम्हाला या अवज्ञा करणाऱ्या लोकांपासून वेगळे करून सोड.’’
(२६) अल्लाहने उत्तर दिले, ‘‘बरे तर, तो प्रदेश चाळीस वर्षांपर्यंत यांच्याकरिता निषिद्ध आहे. हे भूतलावर वणवण भटकत राहतील,४६ या अवज्ञाकारींच्या स्थितीवर मुळीच दया दाखवू नका.’’४७ (२७) आणि जरा यांना आदम (अ.) च्या दोन मुलांची गोष्टदेखील पूर्णपणे ऐकवा, जेव्हा त्या दोघांनी कुर्बानी दिली तेव्हा त्यांच्यापैकी एकाची कुर्बानी स्वीकारली गेली आणि दुसऱ्याची स्वीकारली गेली नाही. त्याने सांगितले, ‘‘मी तुला ठार मारीन.’’ त्याने उत्तर दिले, ‘‘अल्लाह तर पापभीरू लोकांच्याच भेटी स्वीकारतो.४८
(२८) जरी तू मला ठार मारण्यासाठी हात उचलशील तरी मी तुला मारण्याकरिता हात उचलणार नाही.४९ मी सर्व विश्वांचा स्वामी अल्लाहच्या प्रकोपाला भितो.
४५) ``काल रजुलानि मिनल्ल जीन यखाफून'' (त्या भिणाऱ्यांपैकी दोन असेही लोक होते) याचे दोन अर्थ होऊ शकतात. एक म्हणजे क्रूर लोकांशी जे लोक भीत होते त्यांच्यामधून दोन माणसे म्हणाली. दुसरा अर्थ म्हणजे जे लोक अल्लाहशी भीत होते, त्यांच्यापैकी दोघांनी हे सांगितले. त्या दोन महापुरुषांपैकी एक माननीय युशअ बिननून होते. ते आदरणीय पैगंबर मूसा (अ.) यांच्यानंतर उत्तराधिकारी झाले होते. दुसरे माननीय कालीब होते जे माननीय युशअचे सहयोगी होते. चाळीस वर्षापर्यंत भटकंती केल्यानंतर जेव्हा बनीइस्राईल पॅलेस्टाईनमध्ये दाखल झाले होते, त्या वेळी आदरणीय पैगंबर मूसा (अ.) यांच्या साथीदारांपैकी केवळ हेच दोन महापुरुष जिवंत होते.
४६) या ऐतिहासिक घटनेचे विवरण बायबलचा ग्रंथ गिनती, व्यवस्था विवरण आणि यहोशुमध्ये मिळते. सारांश, पैगंबर मूसा (अ.) यांनी फारानच्या जंगलातून बनीइस्राईलच्या बारा सरदारांना पॅलेस्टाईनचा दौरा करण्यासाठी पाठविले की तिथल्या परिस्थितीची माहीती घेऊन यावी. हे लोक चाळीस दीवस दौरा करून परतले आणि जनतेच्या आमसभेत माहीती दिली, ``तिथे तर दूध आणि मधाचे झरे वाहतात परंतु त्या देशाचे निवासी बलवान आहेत. आम्ही याची क्षमता ठेवत नाही की या लोकांवर हल्ला करावा. तिथे जितकी माणसं आम्ही पाहिलीत ते सर्व मजबूत शरीरयष्टीचे होते. आम्ही तिथे बनी उनाक जातीला पाहिले जे क्रूर आहेत व त्यांचा वंश नपीली आहे. आम्ही तिथे किड्यामकोड्यासारखे वाटत होतो आणि त्या लोकांच्या नजरेतसुद्धा अगदी क्षुल्लक होतो.'' हे सर्व ऐकून पूर्ण जनसमुदाय एक आवाजात ओरडला, ``होय! आम्ही इजिप्त्मध्येच राहून मरून जाऊ किंवा याच जंगलात मरावे. खुदावंद! तू आम्हाला त्या देशात नेऊन तलवारीने का मारु इच्छितो? मग आमच्या स्त्रिया आणि मुलबाळं सर्व युद्धलुटीत जातील. काय आमच्यासाठी हे उत्तम नाही की आम्ही इजिप्त्ला परत जावे.'' मग ते आपसात म्हणू लागले की, ``आपण एखाद्याला आपला सरदार बनवू या आणि इजिप्त्ला परत जाऊया.'' यावर बारा सरदारांपैकी दोन सरदार यहोशू आणि कालेब उठून उभे राहिले आणि या भीतरेपणाबद्दल लोकांची निंदा केली. कलिब म्हणाला, ``चला आपण अचानक जाऊन त्या देशावर कब्जा करू या कारण आमची क्षमता तितकी आहे.'' मग दोघांनी एका स्वरात म्हटले, ``खुदा आमच्याशी राजी असेल तर तोच आम्हाला त्या देशात पोहचवील, केवळ हे झाले पाहिजे की तुम्ही खुदावंदशी विद्रोह करू नका आणि त्या देशाच्या लोकांशी भिऊ नका आणि आमच्याबरोबर खुदावंद आहे म्हणून त्या लोकांची भीती बाळगू नका.'' परंतु लोकांनी त्याचे उत्तर दिले, ``यांना दगडाने ठेचून मारा.'' शेवटी अल्लाहचा प्रकोप भडकला आणि अल्लाहचा निर्णय झाला की आता यहोशु आणि कालेबशिवाय या समुदायातील प्रौढ पुरुषांपैकी कोणीही त्या भूमीत जाऊ नये. हा लोकसमुदाय अशाप्रकारे चाळीस वर्षापर्यंत घरदार नसलेल्या स्थितीत भटकत राहील. जेव्हा त्यांच्यातील २० पॅलेस्टाईन देश जिंकण्याची संधी दिली जाईल. म्हणून अल्लाहच्या या निर्णयानुसार बनीइस्रार्इंलींना फारानच्या या जंगलापासून
पूर्वीकडे जॉर्डनपर्यंत पोहचतांना पूर्ण ३८ वर्ष लागले. या कालावधीत ते सर्व लोक मृत्यू पावले जे तरूणपणात इजिप्त्हून निघाले होते. पूर्वी जॉर्डनच्या विजयानंतर आदरणीय पैगंबर मूसा (अ.) यांचेसुध्दा देहांत झाले. यानंतर माननीय युशअ बिननून यांच्या शासनकाळात बनीइस्राईल पॅलेस्टाईन विजय प्राप्त् करण्या योग्य बनले.
४७) येथे या ऐतिहासिक घटनेचा उल्लेख करण्याचा उद्देश पूर्ण वार्ताक्रमावर नजर टाकल्यास कळतो. कथाशैलीनुसार बनीइस्त्राईल लोकांना ताकीद देणे अपेक्षित आहे की मूसा (अ.) यांच्या काळात अवज्ञा, विमुखता आणि निरूत्साहितपणाने काम घेऊन तुम्हाला कडक शिक्षा मिळाली होती; आता त्यापेक्षाही जास्त कडक शिक्षा तुम्हाला पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याशी विद्रोहपूर्ण वर्तन आत्मसात केल्याने मिळणार आहे.
४८) म्हणजे तुझी कुर्बानी (बलिदान) जर स्वीकृत झाली नाही तर हा माझा दोष नाही. दोष तुझाच आहे कारण तुला अल्लाहचे भय नाही. म्हणून माझा जीव घेण्याऐवजी तू तुझ्या स्वत:मध्ये अल्लाहचे भय बाळगले पाहिजे.
४९) याचा हा अर्थ नाही की तू मला ठार करण्यासाठी आला तर मी हात बांधून तुझ्यासमोर मान कापून घेण्यासाठी उभा राहीन आणि आपला बचाव करणार नाही. याचा हा अर्थ आहे की तू मला ठार करण्यास तयार होतोस तर हो परंतु मी तुला ठार करण्यासाठी तयार नाही. तुला तो अधिकार आहे. मला तुझ्या या तयारीविषयी माहीत असूनसुद्धा मी हा प्रयत्न करणार नाही की मी तुला प्रथम ठार करावे. येथे हे समजून घ्यावे लागेल की एखाद्याने स्वत:ला मारेकऱ्याच्या हवाली करणे आणि अत्याचारी हल्ल्यापासून स्वत:चा बचाव न करणे सदाचार मुळीच नाही. सदाचार तर हा आहे की एखादा मनुष्य मला ठार करण्याचा प्रयत्न करतो आणि मला हे माहीत आहे तरीसुद्धा मी त्याला ठार करण्याचा विचारसुद्धा करू नये. तसेच हे अत्याचार त्याच्याकडून घडावे माझ्याकडून नव्हे. हाच अर्थ होता जो आदम (अ.) यांच्या त्या सदाचारी पुत्राने सांगितले होते.
Post a Comment