Halloween Costume ideas 2015

प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांच्या शिकवणीचा संक्षिप्त खुलासा

ख्वाब टूटे मगर हौंसले तो जिंदा है
हम वो कौम हैं जहां मुश्किलें शर्मिंदा हैं
प्रेषितपूर्व काळात अरबी लोक इतके वाईट होते की कोणी त्यांच्यावर राज्य सुद्धा करू इच्छित नव्हते. मूर्ती पूजा करणारा, टोळ्या करून राहणारा, उंट आणि बकर्‍या पाळणारा, त्यांच्या चार्‍यासाठी वणवण भटकणारा, खजूर खाणारा, उंट आणि बकरीचे दूध पिणारा, काटक आणि राकट अरबी समाजामध्ये अंधश्रद्धा प्रचंड प्रमाणात व्यापलेली होती. दारू, जुगार आणि व्याभिचार हे त्या काळी प्रचलित असलेले सर्वच अवगुण त्यांच्यात होते. गुलामगिरीची पद्धत अस्तित्वात होती. गुलाम आणि स्त्रीया या दोन समाज घटकांवर जे अत्याचार होत होते त्याचे वर्णन एका लेखात करणे केवळ अशक्य.
    वाचकांच्या लक्षात यावे यासाठी सांगतो की, स्त्रीयांना त्या काळात काडीची किमत नव्हती. कोणी किती स्त्रीयांशी विवाह करावेत याला सीमा नव्हती, वडिलांच्या मृत्यूनंतर सख्खी आई वगळता मोठ्या मुलाच्या ताब्यात वारसा हक्काने बापाच्या सर्व बायका येत होत्या एवढा अनैतिक हा समाज होता. मुलींचा जन्म ही तिरस्करणीय बाब होती, म्हणून मुलगी झाली तर तात्काळ जीवंत गाढून मृत बालिका जन्माला आली असा संदेश देण्यासाठी सुईनींना मोठमोठे नजराने अगोदरच देऊन ठेवले जात. व्यापारी काफिल्यांना लुटण्याचा प्रकार त्यांच्या इतका अंगवळणी पडला होता की, इस्लाम स्विकारल्यानंतर अनेक बेदुईन (भटक्या) अरबांना हेच कळत नव्हते की, दुसर्‍यांच्या काफिल्याला लुटण्यामध्ये वाईट ते काय?
    मात्र त्यांच्या या सर्व दुर्गुुणांसह अनेक सद्गुणही त्यांच्यात होते.          - (उर्वरित पान 2 वर)
त्यासंदर्भात शोधनचे माजी संपादक सय्यद इफ्तेखार अहेमद यांनी लिहिले आहे की,  ”बेदुईन (भटक्या) अरबाला जगात कुणाचीही भीती वाटत नसे. मानवाची नाही की संकटाची नाही. एक भय मात्र त्याला लागून होतं ते म्हणजे मरणोत्तर आपलं काय होणार? या जगी ते सदैव आनंदी जीवन जगायचे. भुकेवर त्यांचं नियंत्रण होतं. अधिकाची त्यांना इच्छा नव्हती. ते सुखी-समाधानी असायचे. उद्याचा विचार ते करीत नसत. या जगातल्या धनसंपत्तीनं वंचित असण्याचं त्यांना काहीच वाटत नसे. ते फार संयमी होते. प्रत्येक अरब आपल्या कबिल्याच्या शिष्टाचारांचं पालन करीत, परंपरा, चालीरीतींचा आदर करीत. सोपवलेली जबाबदारी आनंदानं पार पाडीत. मुक्त जीवन त्यांच्या अत्यंत आवडीचं. तसेच ते व्यावहारिक जीवनदेखील जगत. आपल्या बेदुईन जगण्यावर त्यांना कमालीचा गर्व, आनंद आणि समाधान वाटायचं. अशा प्रत्येक शक्तीशी ते संघर्ष करीत असत जी त्यांना गुलाम बनवून त्यांचा अपमान करू पाहत असे. (प्रेषित मुहम्मद सल्ल. नवयुवगाचे प्रणेते पान क्र. 3)
    त्यांच्या याच अंगभुत गुणांचा प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी भरपूर उपयोग करून घेतला. त्यांनी सांगितले की, ” जो जहालत (अज्ञान काळात) मध्ये चांगला तोच इस्लाममध्येही चांगला ठरेल.” आणि नेमकं तसच झालं. बघता-बघता अरबांचा मेकओव्हर झाला. ते जेवढे असभ्य होते तेवढे सभ्य झाले. इतके की शंभर वर्षाच्या आत पृथ्वीच्या एक तृतीयांश पृष्ठभागावर त्यांनी कल्याणकारी इस्लामी राज्यव्यवस्था कायम केली. अज्ञानता, अंधश्रद्धा, मूर्तीपूजा, विषमता, अन्याय आणि अत्याचाराला कंटाळलेल्या जनतेने ज्या-ज्या ठिकाणी मुस्लिम गेले त्या-त्या ठिकाणी त्यांचे स्वागत केले.
    आपल्याकडेच पाहना! मुस्लिम आक्रमकांमुळे भारतात इस्लाम पसरला असा व्यापक गैरसमज आज 21 व्या शतकातही बहुसंख्य लोकांमध्ये पसरलेला आहे. वास्तविक पाहता दक्षिण भारतात इस्लाम मलबारच्या मार्गे मुस्लिम व्यापार्‍यांसोबत आला, तर उत्तर भारतात सुफी संतांसोबत आला. या दोघांच्याही समता मुलक वागण्याने वर्णव्यवस्थेचे चटके सहण करणारा समाज त्यांच्याकडे आकर्षित झाला. मध्ययुगीन काळात मुस्लिम आक्रमकांच्या तलवारीच्या जोरावर भारतात इस्लामचा प्रसार झाला, हे गृहितक मुदलातच चूक आहे, कारण तलवार असो का एके 47, शक्तीच्या बळावर कोणीही कोणाचे विचार बदलू शकत नाही, श्रद्धा बदलणे तर लांबच राहिले. असे करणे शक्य असते तर आज प्रत्येक देशात आधुनिक हत्यार आहेत, त्या बळावर लोकांच्या श्रद्धा सहज बदलता आल्या असत्या. त्या बदलता येत नाहीत यातच सर्व काही आले.
    प्रेषित सल्ल. यांनी 23 वर्षाच्या आपल्या प्रेषितत्वाच्या काळात जे युद्ध केले ते बहुतांशी रक्षात्मक होते. ज्या ठिकाणी आक्रमण केले असेल तेही स्वरक्षणार्थ घेतलेल्या पुढाकाराचे युद्ध होते. आणि आश्‍चर्य म्हणजे या 23 वर्षात झालेल्या युद्धांमध्ये फक्त 1 हजार 18 लोक मारले गेले. त्यात 250 मुस्लिम तर 750 विरोधक होते. यात बनू कुरैजा नावाच्या एका कबिल्याच्या 400 लोकांना जो मृत्यूदंड दिलेला होता त्यांचाही या आकडेवारीत समावेश आहे. म्हणजे ती आकडेवारी जर सोडली तर या सर्व युद्धात विरोधी पक्षांचे फक्त 350 लोकच मारले गेले. कल्याणकारी इस्लामी व्यवस्था स्थापन करण्यासाठी ही युद्धे मानवी इतिहासावर उपकारकच म्हणावे लागले. कारण एवढे लोक तर आपल्या देशात एका आठवड्यात रस्ते अपघातात मरण पावतात.
    इस्लामच्या प्रचार आणि प्रसारामध्ये प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे त्यांनी खरी समता, खरा न्याय आणि खर्‍या करूणेची अमलबजावणी समाजामध्ये करून दाखविली. त्यांनी जमीन नव्हे मने जिंकली. लोकांना असभ्यतेकडून सभ्यतेकडे बोलाविले, प्रेमाने बोलाविले, त्यांच्यावर करूणेचा वर्षाव केला, त्यांना सोबत घेऊन जेवण केले, त्यांच्यावर विश्‍वास ठेवला, त्यांच्यामध्ये खरी-खुरी समता प्रस्थापित केली.
    फतेह मक्कानंतर जेव्हा काबागृहावर चढून अजान देण्याची वेळ आली तेव्हा शिडी नसल्यामुळे कधीकाळी गुलाम राहिलेल्या काळ्याकुट्ट हबशी आदिवासी व्यक्ती ज्यांचे नाव हजरत बिलाल रजि. होते. प्रेषित सल्ल. यांनी आपल्या पवित्र खांद्यावर त्यांना पाय ठेवून काबागृहावर चढविले. हे दृश्य पाहणार्‍या हजारो लोकांच्या किंचाळ्या निघाल्या. या दृश्याने भारावून जावून कित्येक लोक रडू लागले. या दर्जाच्या समतेचा त्यांनी कधी विचारसुद्धा केला नव्हता. जे मुस्लिम लोक प्रेषित सल्ल. यांच्या पवित्र हाताला स्पर्श करण्यासाठी आसूसलेले असत त्या पवित्र प्रेषितांच्या पवित्र खांद्यावर पाय ठेऊन पवित्र काबागृहावर चढण्याचा मान कुठल्या कुलीन अरबी सरदाराला न मिळता हजरत बिलाल रजि. यांच्यासारख्या आदिवाशाला मिळाला. हे दृश्य पाहून लोकांना बिलाल रजि. यांच्या नशीबाचा हेवा वाटू लागला.
    प्रेषित सल्ल. यांच्या शिकवणीचा सार संक्षिप्तरित्या सांगायचा झाल्यास तो त्यांनी हज्जतुल विदाच्या दिवशी अराफातच्या मैदानात जे भाषण दिले होते तो होय. हा एका प्रकारचा मानवी हक्काचा पहिला जाहीरनामाच म्हणायला हवा.
    सय्यद इफ्तेखार अहेमद यांनी प्रेषित सल्ल. यांचे भाषण त्यांच्या भाषेत खालीलप्रमाणे नमूद केलेले आहे. ते लिहितात, प्रेषित सल्ल. म्हणाले की, ”अल्लाहशिवाय कोणी ईश्‍वर नाही, तो एकमेव असून त्याचा कोणी भागीदार नाही. अल्लाहनं आपलं वचन पूर्ण केलं. त्यानं आपल्या भक्तास मदत केली आणि एकट्यानं एकत्रित आलेल्या सगळ्या खोट्या शक्तींना पराभूत केलं.
    हे लोकहोे ! मी सांगतो ते ऐका. मला नाही वाटत आपण पुन्हा एकत्रित येऊ. मला एक वर्ष लाभेल असेही मला वाटत नाही.
    आजचा हा दिवस, हा महिना, हे ठिकाण पवित्र आहे. तसचं लोकहो! सर्वांचं जीवन (रक्त) आणि मालमत्तेचा आदर करा, ते पवित्र आहेत. लक्षात ठेवा, तुम्हा सर्वांना अल्लाह समोर एक दिवस हजर व्हायचंय. तुमच्या कर्मांची मग तिथं विचारपूस होईल. कुणाचं नाहक रक्त सांडू नका. घरादारांचा नाश करू नका. तिथं सर्व कर्माची झडती द्यावी लागेल.
    अज्ञानकाळात झालेल्या खुनांचा सूड घेणं आता रद्द होतंय. सर्वप्रथम मी आपल्या परिवाराच्या खुनाचा बदला माफ करून टाकतो. हारिसचा मुलगा रबीआच्या खुनाचा सूड घेतला जाणार नाही.
    हे लोकहो ! अल्लाहनं तुम्हाला एकच स्त्री-पुरूषा पासून जन्म दिलाय. तुमच्या जमाती आणि टोळ्या बनवल्या त्या एकमेकांच्या ओळखीसाठी. पण अल्लाहपाशी तुमच्यापैकी तोच प्रतिष्ठित आहे जो सदाचारी असेल.
    सारे मानव आदमची संतती आहे. आदम यांना चिखलमातीपासून निर्माण केलंय. कुणा अरबास अरबेतरावर प्रतिष्ठा नाही की अरबेत्तरांना अरबांवर प्रतिष्ठा नाही. तसंच काळ्या माणसाला गोर्‍या माणसावर आणि गोर्‍या माणसाला काळ्या माणसावर प्रतिष्ठा नाही. अज्ञानकाळातल्या सगळ्या प्रतिष्ठा मी माझ्या पायाखाली तुडवित आहे. कुरैशच्या लोकांनो! अल्लाहनं तुमच्या छोट्या अहंकारास नष्ट करून टाकलं. तुमच्या बापजाद्यांच्या पराक्रमांवर घमेंड करण्याला काही अर्थ नाही.
    सावकारी निषिद्ध झाली. व्याजबट्टयाचा व्यवहार निषिद्ध झाला. सर्वप्रथम मी माझे चुलते अब्बास यांचं व्याज रद्द करतो.
    लोकहो ! तुमच्या पत्नींचे तुमच्यावर काही अधिकार आहेत, तसेच तुमचे त्यांच्यावर अधिकार आहेत. आपल्या पत्नीबाबत अल्लाहचं भय बाळगा. अल्लाहस वचन देऊन तुम्ही त्यांना आपल्या भार्या (पत्नी) म्हणून स्वीकारल्या आहेत. त्यांच्याशी सहानुभूतीनं, नरमाई आणि दयेनं वागा.
    कुणा स्त्रीनं आपल्या पतीच्या संपत्तीतून त्याच्या अनुमतीशिवाय काही देणं हे वैध नाही. तुमच्या पत्नीवर तुमचा हा अधिकार आहे की त्यांनी अशा कुणा व्यक्तीस घरी बोलवू नये ज्यास तुम्ही पसंत करीत नाही. त्यांनी आपल्या शीलाचं रक्षण करावं. जर त्यांनी तसं केलं नाही तर तुम्ही त्यांना शिक्षा करू शकता; पण सौम्य प्रकारची. त्यांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था करा.
    पाहा ! माझ्यानंतर तुम्ही परत भरकटू नका. आपसांत रक्त सांडू नका. कुरैशच्या लोकांनो! तुमच्या मनांवर या जगाचं ओझं घेऊन तुम्ही अल्लाहसमक्ष उभं राहावं आणि दुसर्‍यांनी सत्कर्म घेऊन यावं असं होऊ नये. तसं झालं तर मी तुमच्या काही कामी येणार नाही.
    कोणी विश्‍वास करून तुमच्याकडे अमानत ठेवली तर विश्‍वासघात करू नका. दिलेलं वचन पाळा. सारे मुस्लिम एकमेकांचे भाऊ आहेत. दुसर्‍यानं तुम्हाला काही राजीखुशीनं दिलं तर ते घ्या. त्याच्या मर्जीशिवाय त्याच्या मालाला हात लावू नका. अन्याय करू नका.
    अल्लाहनं ज्याचे त्याला हक्क दिलेत. आता कोणी कुणाच्या बाबतीत मृत्यूपत्र करू नये.
    ज्याच्या बिछान्यावर बाळानं जन्म घेतला असेल ते बाळ त्याचंच. ज्यानं व्याभिचार केला त्यास दगडानं ठेचून मृत्यूदंड दिला जाईल. त्यांचा हिशेब अल्लाहपाशी होईल.
    कोणी आपलं कुळ बदलू नये, दुसर्‍यास आपला पिता मानू नये. कोणी असं केल्यास त्याचा अल्लाह धिक्कार करील. कर्ज घेतल्यात ते परत करा. कोणी भेटवस्तू दिल्यास तुम्हीही द्या.
    मी तुमच्या दरम्यान एक वस्तू सोडून जातोय. तिला घट्ट धरल्यास तुम्ही कधी मार्गभ्रष्ट होणार नाही. ती ’कुरआन’ आहे ! धर्माच्या बाबतीत अतिरेक करू नका. तुमच्या पूर्वीच्या लोकांचा यामुळेच विनाश झाला, हे लक्षात ठेवा.
    लोकहो ऐका ! आकाश आणि पृथ्वीची निर्मिती झाली त्याला बराच काळ लोटून गेलाय. अल्लाहनं ज्या वेळी आकाश आणि पृथ्वी निर्माण केली त्याचवेळी वर्षाचे बारा महिने ठरवले आहेत. यात चार महिने आदरणीय आहेत. हा (इस्लाम) धर्म कायमस्वरूपी आहे. लक्षात ठेवा माझ्यानंतर नाकारणारे होऊ नका. एकमेकांचं रक्त सांडू नका. सैतान आता निराश झालाय. प्रार्थना करणारे (नमाज अदा करणारे) त्याची पूजा करणार नाहीत; पण तो तुम्हाला एकमेकांविरूद्ध उभं करील.
    तुमचे जे गुलाम, सेवक आहेत त्यांच्याशी चांगलं वागा. तुम्ही खाता तेच त्यांना द्या. तुम्ही घालता तसेच कपडे त्यांना द्या. त्यांनी चूक केल्यास माफ करा.
    ऐका ! तुमच्यावर जर एखाद्या काळ्या अ‍ॅबिसीनियन (निग्रो)  गुलामाला जरी प्रमुख नेमलं गेलं तर त्याच्या आदेशाचं पालन करा. जर तो अल्लाहच्या ग्रंथानुसार निर्णय घेत असेल तर !
    लोकहो ! आपल्या विधात्याची उपासना करा. पाच वेळा नमाज अदा करा. महिनाभर रोजे ठेवा. आपल्या संपत्तीतून जकात अदा करा, खूश दिलानं. अल्लाहच्या घराची हजयात्रा करा. आपल्या प्रमुखाचं पालन करा. तुम्ही जन्नतमध्ये प्रवेश कराल. आणि पाहा, एकाने केलेल्या गुन्ह्यासाठी दुसर्‍याला जबाबदार धरलं जाणार नाही. बापानं केलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्याच्या मुलाला की मुलानं केलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्याच्या बापाला दिली जाणार नाही. लोकहो ! माझ्याविषयी तुम्हाला विचारलं जाईल (अल्लाहपाशी) तेव्हा तुम्ही काय उत्तर द्याल?”
    लोक म्हणाले, ”तुम्ही अल्लाहचा धर्म आम्हास पोचता केला याची आम्ही साक्ष देऊ. आपण प्रेषित्वाची जबाबदारी पार पाडली, आमचं भलं केलं.”
    लोकांचं हे बोलणं ऐकूण प्रेषितांनी आपलं बोट आकाशाकडे उंच केलं आणि तीन वेळा उच्चारलं, ” अल्लाह! तू साक्षी आहेस. अल्लाह तू साक्षी आहेस. अल्लाह तू साक्षी आहेस.”
    येणेप्रमाणे एका उम्मी (निरक्षर) प्रेषित सल्ल. यांच्या तर्फे अल्लाहने आपला धर्म पृथ्वीतलावरील सर्व लोकांसाठी पोहोचवला. आता जे या शिकवणीच्या विरूद्ध जगण्याचा प्रयत्न करतील ते अपयशी ठरतील आणि जे प्रेषित सल्ल. यांच्या या शिकवणीनुसार जगतील ते यशस्वी होतील. हाच प्रेषित सल्ल. यांच्या शिकवणीचा सार आहे.

- एम.आय.शेख

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget