गेल्या अनेक दिवसांपासून बनारस हिंदू विद्यापीठामध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आलेले आणि राष्ट्रीय संस्कृत संस्थानात शिकलेले डॉ. फिरोज खान यांच्या संस्कृतचे प्राध्यापक म्हणून झालेल्या नियुक्तीवरून आंदोलन सुरू आहे. एक मुस्लिम व्यक्ती आम्हाला संस्कृत कसे शिकवू शकतो, असा प्रश्न उपस्थित करत विद्यार्थी संघटनांनी त्यांच्या नियुक्तीविरोधात धरणे आंदोलन सुरू केले. फिरोज त्या विविधतेत एकतेच्या आपल्या संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतात, जी आपल्या समाजाचा कणा राहिलेली आहे आणि गेली काही वर्षे त्याच संस्कृतीला धक्क्यांवर धक्के सहन करावे लागले आहेत. संस्कृतमध्ये एक शब्द आहे - कूपमंडूक. दुर्दैवाने याच वृत्तीमुळे ही भाषा व्याकरण आणि साहित्याच्या दृष्टीने एकाकी पडली आणि जातीयतेला बळी पडली. ज्या लोकांमुळे संस्कृतला जागतिक स्तरावर मान मिळाला ते फक्त हिंदू किंवा ब्राह्मण नव्हते तर जर्मन, इंग्रज आणि मुसलमान विद्वान होते, याचा आंदोलकांना विसर पडलेला दिसतो आहे. या सगळ्या लोकांनी विविध भाषांमध्ये देवाणघेवाण आणि संवाद निर्माण करणार पूल उभे केले होते. १९५३-५४ साली मोहम्मद मुस्तफा खान - 'मद्दाह' यांनी एका ऊर्दू-हिंदी शब्दकोशाचं संपादन केले. उत्तर प्रदेश हिंदी संस्थेने हा शब्दकोश प्रकाशित केला होता. खरंतर आपल्या देशात भाषा आणि विद्वत्तेमध्ये संस्कृत, फारसी, हिंदी आण उर्दू यांचा मिलाफ होण्याची, एकमेकांत विलीन होण्याची दीर्घ परंपरा आहे. खरेतर यामुळे एकात्मकता वाढायला मदतच झाली. प्रेमचंद, रतननाथ सरशार, ब्रजनारायण चकबस्त, फिराक गोरखपुरी,कृष्ण चंदर, राजेंद्र सिंह बेदी आणि उपेंद्रनाथ अश्क यांच्यासारख्या मोठ्या लेखकांनी उर्दूमध्ये लिखाण केले. पण ते उर्दूत का लिहितात, असा प्रश्न कधीही विचारण्यात आला नाही. जास्त वाचकांपर्यंत पोहोचता यावे म्हणून प्रेमचंद हिंदीत लिहू लागले. पण म्हणून त्यांनी उर्दूची कास कधी सोडली नाही. त्यांची शेवटची गोष्ट - 'कफन' ही मूळ उर्दूतच लिहिण्यात आली होती. हिंदू कुटुंबात जन्मलेले अनेक ऊर्दू शायर आजही उत्तम लेखन करत आहेत. शीन काफ निजाम, जयंत परमार आण चंद्रभान खयाल यांच्यासारखी कितीतरी नावे उदाहरणार्थ घेता येतील. संस्कृत भाषा अगोदरच ब्राह्मणांच्या व्रूâर संकीर्णतेला बळी पडून लोकांपर्यंत पोहोचली नाही. मुस्लिमांनाच नव्हे तर दलितांनादेखील संस्कृतपर्यंत पोहोचण्यासाठी किती संघर्ष करावा लागला होता हे कुमुद पवाडे यांच्या आत्मकथेवरून आपल्या लक्षात येईल. भारतीय संविधानामुळेच आज संस्कृत विभागांमध्ये उच्चवर्णीयांव्यतिरिक्त अन्य लोक आपणास दिसून येतात. डॉ. फिरोज खान संस्कृतचे पहिले विद्वान नाहीत. ‘शोधन’चे प्रशंसक आणि मार्गदर्शक पंडित ८५ वर्षांचे गुलाम दस्तगीर बिराजदार यांचा येथे मी आवर्जून उल्लेख करू इच्छितो. ते संस्कृतचे पंडित आहेत. मूळचे ता. अक्कलकोट जि. सोलापूर येथील पंडित बिराजदार यांचे सध्या मुंबईत वास्तव्य आहे. बिराजदार यांनी पवित्र कुरआनचे संस्कृतमध्ये भाषांतर केले आहे. ‘वेस्रfद-शोधबोध’ या पुस्तकाचे त्यांनी संपादनही केले आहे. परशुरामश्री, वाचस्पती, विद्यापारंगत, महापण्डित आणि पण्डितेंद्र, संस्कृतरत्नम् इ. असे त्यांना आजपर्यंत १८हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत. पंडित बिराजदार हे औरंगाबाद येथे जानेवारी १९९८ मध्ये झालेल्या तीन दिवसीय वैदिक संमेलनाचे खास निमंत्रित होते. वेदाचे अभ्यासक व संस्कृत पंडित म्हणून तेथे २१-१-२०१८ रोजी झालेल्या समारोप कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला होता. माजी राष्ट्रपती डॉ. के. आर. नारायणन यांच्याकडून त्यांना प्रशस्तीपत्रदेखील मिळाले आहे. असे अनेक संस्कृतचे मुस्लिम विद्वान व पंडित आपणास सांगता येतील. राजकारणाने भाषा एक हत्यार म्हणून वापरायला सुरुवात केली की ती भाषा खिळखिळी होते. जर्मनीमध्ये हिटलरच्या हुकुमशाहीदरम्यान लाखो ज्यूंची हत्या करण्यात आली. संस्कृत शिकणाऱ्या आणि शिकवणाऱ्या लोकांनी ही भाषा नवीन काळाशी-पिढीशी जुळवून घेण्यासाठी फारसे प्रयत्न केले नाहीत. खरेतर संस्कृत हा भाषाच मूलत: इतकी लवचिक आहे की ती नवीन वातावरण वा अभिव्यक्तीशी जुळवून घेऊ शकते. दुर्दैवाने भाषेतली ही लवचिकता तिच्या शिक्षणपद्धतीमध्ये आली नाही आणि या भाषेतले कामकाज त्याच जुनाट, संकुचित आणि सामंती पद्धतीने सुरू राहिले. परिणामी ही महान भाषा बदलांपासून दूर राहिली आणि परिस्थितीशी विसंगत झाली. भारत हा जातिव्यवस्था, विषमतेवर आधारित देश असल्याने इथेही जनतेची स्वत्वशोधाची प्रक्रिया वेगवेगळी असणे स्वाभाविक होते. जातिवर्चस्वाच्या समर्थनात समाधान मानणाऱ्या लोकांच्या आत्मशोधाच्या प्रक्रियेत आणि जातिस्त्रीदास्यान्तामध्ये स्वत्व शोधणाऱ्यांमध्ये फरक असल्याचे महात्मा फुलेंनी याआधीच सांगून ठेवले आहे. एकूणच सध्या भारतात कमालीची असहिष्णुता आणि कमालीचा विघटनवाद, एकमेकांशी संवाद साधण्याच्या शक्यतांचा दिवसेंदिवस आकसत जाणारा अवकाश असा सगळा माहोल आहे. गेल्या पाच वर्षांपासून अनेक हत्या, मारहाणीचे प्रसंग, गुंडगिरी, धाकधपटशा आणि राष्ट्रवाद आणि धर्माच्या नावाखाली आगजाळपणाचा धिंगाणा सुरू आहे. या सांस्कृतिक दहशतवादाला वेळीच आळा घाण्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे.
-शाहजहान मगदुम
मो.:८९७६५३३४०४
Post a Comment