Halloween Costume ideas 2015

सांप्रदायिक तणाव आणि राजकारण

इंग्रजांना देशातून हुसकावून लावण्यासाठी हिंदू आणि मुस्लिमांनी मिळून स्वातंत्र्याचा जो लढा उभा केला होता व त्यात जो एकोपा त्यावेळी या दोन्ही समाजांमध्ये होता तो स्वातंत्र्यानंतर राहिला नाही. स्वातंत्र्य नजरेच्या टप्प्यात येत असल्याचे पाहून अनेक हिंदू-मुस्लिम संघटनांनी स्वातंत्र्याचा लाभ आपल्यालाच कसा होईल, यासाठीचे प्रयत्न सुरू केले होते. याच मानसिकतेतून देशाची फाळणी झाली होती.
    फाळणीनंतर जरी पाकिस्तान एक मुस्लिम राष्ट्र म्हणून जगाच्या नकाशावर उदयास आले तरी गेल्या 73 वर्षात तेथे इस्लामी म्हणावे असे फारसे काही झालेले नाही. उलट भारत धर्मनिरपेक्ष राहिल्यामुळे भारताची चौफेर प्रगती झाली. आज आपल्या देशाकडे उगवती महासत्ता म्हणून अवघे जग पाहत आहे. काँग्रेसच्या साठएक वर्षाच्या सत्तेमध्ये हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही प्रमुख समाजामधील जातीय तणाव बर्‍याचपैकी नियंत्रणात होता. लोकांच्या मनातील जातीय भावनेचा उपयोग कम्युनिस्ट वगळता देशातील प्रत्येक राष्ट्रीय आणि प्रादेशिक राजकीय पक्षांनी वेळोवेळी करून घेतलेला आहे.
    मागच्या काही वर्षांपासून तर मुद्दामहून मतांचे ध्रुवीकरण व्हावे यासाठी हिंदू-मुस्लिमांमध्ये तणाव वाढेल, यासाठीचे प्रयत्न विशिष्ट पक्ष आणि त्यांच्या समर्थकांकडून केले जात आहेत. मीडियानेही या प्रकरणात आगीत तेल ओतण्याचे काम केलेले आहे. सोशल मीडियावर मात्र अलिकडे या तणावाला निर्माण करणार्‍या कारणांच्या पलिकडे जावून विचार करण्याचा ट्रेंड सुरू झालेला दिसून येत आहे. मुस्लिमच नव्हे तर हिंदू बांधवांमध्येसुद्धा एवढी राजकीय प्रगल्भता नक्कीच निर्माण झालेली आहे की, आता ते जातीय राजकारणाच्या पलिकडे जावून विचार करू लागलेले आहेत. त्यांना हिंदू-मुस्लिम प्रश्‍नांपेक्षा जास्त बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या, स्त्री अत्याचार, शैक्षणिक व आरोग्य सुविधांची दुरवस्था इत्यादी प्रश्‍नांमध्ये रस निर्माण झालेला आहे. राजकीय पक्ष जातीय भावना भडकावून स्वतःचा फायदा कसा करून घेत आहेत, हे ही त्यांच्या लक्षात आलेले आहे.      हिंदू-मुस्लिम संबंधांना जातीय रंग देऊन प्राईम टाईममध्ये पुन्हा-पुन्हा लोकांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करणार्‍या वाहिन्यांकडे सुद्धा लोकांनी पाठ फिरवायला सुरूवात केलेली आहे. हे चांगले लक्षण आहे. आपल्या लोकशाहीला प्रगल्भ करायचे असेल आणि देशाला प्रगतीपथावर न्यायचे असेल तर अशा जातीयवादी लोक, संघटना आणि पक्षांना जनतेनी त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय हे काम शक्य होणार नाही.

- फेरोजा तस्बीह
मिरजोळी, 9764210789

Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget