नऊ नोव्हेंबर २०१९ रोजी बाबरी मस्जिद प्रकरणाचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. कोणत्याही न्यायप्रविष्ट प्रकरणाबाबत दोन्ही पक्षांचे समाधान होईल असा निकाल येणे नेहमीच शक्य नसले तरी न्यायसंगत निवाड्याची पूर्तता व्हावी अशी प्रामाणिक अपेक्षा असते. एखादा विशिष्ट पक्ष दुखावला जाईल किंवा त्यांच्या आस्थेला वा श्रद्धेला बाधा पोहोचेल म्हणून एखाद्याच्या बाजून निकाल येणे काहीसे निराशाजनकच वाटते. हे सर्व मध्यममार्गाच्या दृष्टीने योग्य वाटत असले तरी बहुसंख्याक समाजाला झुकते माप मिळणे हे लोकशाहीला बाधक ठरू शकते. कारण बाबरी मस्जिद प्रकरणातच्या निकालानुसार बाबरी मस्जिद पाडणाऱ्यांनाच त्याच जागी मंदिर निर्माणासाठी परवानगी मिळाली आहे. मात्र या निकालाचा कोण कसा अर्थ लावतो यावर बरेच काही अवलंबून आहे. कारण या निकालाला आधारभूत मानून काशी-मथुरासारख्या विवाचाही असाच सोक्षमोक्ष लावला गेला तर लोकशाहीतील भारताचे चित्र वेगळे दिसेल हे मात्र निश्चित! प्रा. फैजान मुस्तफा यांच्या मते, ‘बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्यामध्ये आरएसएस, विश्व हिंदू परिषद आणि राज्य-केंद्र सरकार जबाबदार आहे, तितकीच किंवा त्याच्याहून जास्त जबाबदारी सुप्रीम कोर्टाची आहे. कोर्टाला वारंवार माहिती देऊनही कोर्टाने वेळेवर कोणतीच हालचाल केली नाही. कोर्टाच्या निर्णयाची अवहेलना होत आहे हे स्पष्ट समोर दिसत असतानाही कोर्टाने काहीएक भूमिका घेतली नाही.’ मस्जिदीचे जे काही बरे वाईट व्हायचे होते ते झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाला जाग आली. ६ डिसेंबरला पुन्हा कोर्ट भरले तेव्हा सुप्रीम कोर्टाचे तत्कालीन न्यायमूर्ती वेंकटचल्लईय्या म्हणतात, ‘दुर्दैवाने, या प्रश्नाचे गांभीर्य कोर्टाच्या लक्षात यायला वेळ लागला. आता आपण एकच गोष्ट करू शकतो आणि ती म्हणजे लवकरात लवकर मस्जिदीचे तीन कळस होते तसे परत बांधून देणे.’ पुन्हा वेंकटचल्लईय्या यांच्या वक्तव्यावर तत्कालीन प्रधानमंत्री पी. व्ही. नरसिंहराव म्हणतात, असे करणे बरोबर नाही. असे केल्याने देशात असंतोष आणखी पसरेल. सदर निकालात अशा प्रकरणांबाबत स्पष्ट करायला हवे होते. न्यायालयाने निर्मोही आखाड्यासह, शिया-सुन्नींचे दावे निकालात काढले, मात्र पुरातत्व विभागाचे पुरावे प्रमाण मानले. हे प्रमाण मानताना मस्जिदीखाली हिंदू मंदिर होते हे सिद्ध होते, हे मान्य करताना असेही म्हटले की, पण ही मंदिरे तोडूनच मस्जिद बांधली हे सिद्ध होत नाही! जमिनीखाली जे मिळते त्या सर्वांचाच काळ निश्चित करता येत नाही, हेही न्यायालय मान्य करते तरी तेच पुरावेही मानते! मस्जिद पाडणे हे बेकायदेशीर आहे तर मग ती पाडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत की नाही यावर भाष्य नाही. मुस्लिम समुदायाच्या दृष्टिकोनातून हा निकाल निराशाजनक असला तरी काही अपवाद वगळता त्याचा स्वीकार करून एकूणच विवादावर पडदा टाकला आहे. अशा स्थितीत मंदिर-मस्जिदसारखे विवादास्पद मुद्द्यांना यापुढे पुन्हा खतपाणी मिळणार नाही याची खबरदारी केंद्र व राज्य सरकारांनी घेतली पाहिजे. सन १९९१ मध्ये संसदेत पास करण्यात आलेल्या कायद्यांतर्गत अशी गॅरंटी देण्यात आली होती की १५ ऑगस्ट १९४७ रोजी जे धार्मिक स्थळ ज्या स्थितीत असेल त्यास यथास्थिती ठेवण्यात येईल. मात्र बाबरी मस्जिद प्रकरण या कायद्यातून वगळण्यात आले होते. याच कारणास्तव विविध मुस्लिम संघटनांनी सध्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मान्य केला असल्याचे म्हटले जाते. म्हणूनच मुस्लिम समुदायाचा विश्वास प्राप्त करण्यासाठी बाबरी प्रकरणानंतर देशातील कोणत्याही मस्जिदीवर हिंदू संघटनांकडून दावा करता कामा नये, याची जबाबदारी केंद्र सरकारने पार पाडायला हवी. या प्रकरणाचा सरतेसेवटी निकाल जरी लागला असला तरी यामधून निर्माण होणारे अनेक प्रश्न अनुत्तरीत राहतात. सुमारे पाचशे वर्षांपासून ज्यांच्या अधिकारात ही मस्जिद होती त्यांना त्यांचा ताबा न मिळाल्याचे दु:ख त्या समाजाच्या मनात असणे साहजिकच आहे. मात्र महत्त्वाच्या प्रसंगी संयम बाळगण्याची इस्लामची शिकवण असल्याकारणाने मुस्लिमांनी या निकालाला विरोध दर्शविला नाही. मात्र येथील अनेक शहरांची नावे का बदलली गेली? वेळोवेळी औरंगजेब आणि टिपू सुलतान यांच्या नावाने का ओरड केली जाते? संसदेत जय श्रीरामचा जयघोष का केला जातो? धर्मनिरपेक्ष भारतात अशा प्रकारच्या अनेक घटना का घडतात? एनआरसीच्या बाबतीत अमित शाह जाहीरपणे सांगतात की हिंदू, शीख आणि खिश्चनांना भिण्याचे काहीही कारण नाही. त्यांनी इस्लाम सोडून सर्व धर्मांची नावे घेतली. मग बाबरी मस्जिद प्रकरणाचा अंत झाल्यानंतर यापुढे कोणताही विवाद निर्माण होणार नाही याची खात्री कोण देणार? झुंडीद्वारे अल्पसंख्यकांची हत्या जगाने पाहिल्या नाहीत? बहुसंख्यकवादाचे राजकारण संपूर्ण जगात मोठ्या जोमाने सुरू आहे, लोकशाहीचे हेच खरे दुर्दैव आहे. म्हणूनच बाबरी मस्जिद प्रकरणाचा निकाल म्हणजे मुस्लिमांच्या संयम व सौहार्दाचाच विजय म्हणावा लागेल.
-शाहजहान मगदुम
मो.:८९७६५३३४०४
-शाहजहान मगदुम
मो.:८९७६५३३४०४
Post a Comment