- एम.आय. शेख
9764000737
खष्त-ए-अव्वल चूं रेवद मेअमार-ए-कज
ता सुरैय्या मी रवद दीवार-ए-कज
वर उल्लेखित फारसी भाषेतील या ओळींचा अर्थ असा आहे की, समजा एखाद्या गवंड्याने बांधकाम करतांना पहिलीच वीट जर का वाकडी लावली तर मग त्याने त्यावर ता-सुरैय्या म्हणजे तारांगणा पर्यंत जरी उंच भिंत बांधली, तरी ती वाकडीच जाणार. बलात्काराच्या बाबतीत आपल्या देशात ही म्हण तंतोतंत लागू पडते. ती कशी यावर या आठवड्यात चर्चा करूया.
जागतिक पातळीवरील सर्व व्यवस्थांमध्ये स्त्रीचे समाजातील स्थान निश्चित करतानाच वीट वाकडी लागलेली आहे. आपल्या देशातही जेव्हा स्त्रीला तिच्या परंपरागत भूमिकेतून काढून पाश्चिमात्यांनी प्रदान केलेल्या भूमिकेत ठेवण्याचा जेव्हा निर्णय घेतला गेला तेव्हापासूनच देशात व्याभिचार आणि बलात्कार दोन्ही वाढलेले आहेत. व्याभिचार आणि बलात्कार दोघांना वेगवेगळे करून विचार करण्याची जी पद्धत आधुनिक लोकशाहीमध्ये रूढ झालेली आहे. तीच मुदलात चुकीची आहे. ह्या दोन्ही गोष्टी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आज देशात अल्पवयीन मुलांपासून वृद्धांपर्यंत अनेक लोक बलात्कार सारख्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या गुन्ह्यांमध्ये अडकतांना दिसत आहेत. या लिंगपिसाटांच्या तावडीतून सहा महिन्याच्या मुलीपासून ते स्वत:ला जन्म दिलेल्या आईपर्यंतच्या महिला सुद्धा सुटलेल्या नाहीत.
बलात्काराचे बिजारोपन अगदी बाल्याअवस्थेतच मुलांमध्ये होते. सहशिक्षणातून मुलं-मुली नको तितक्या जवळ येतात. नोट्सच्या देवाणघेवाणीपासून सुरू झालेली ओळख वार्षिक स्नेहसंमेलातून भिकार चित्रपट गीतांच्या तालावर केल्या जाणाऱ्या तथाकथित ’परफॉर्मन्स’ पर्यंत येता-येता त्यांच्यामध्ये परस्परांविषयी नको तेवढी जवळीक झालेली असते. पुण्यातील यशदामध्ये मागे महाराष्ट्राच्या निवडक मुख्याध्यापकांचे एक प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्या दरम्यान, अनेक मुख्याध्यापक/ मुख्याध्यापिकांनी तक्रार केली होती की, त्यांच्या शाळेतील आठव्या, नववी वर्गातील मुलं-मुली मोबाईल फोनवर अश्लिल क्लिप्स पाहतात.
पूर्वी योग्य वयात लग्न होत होती. आता उच्च शिक्षण आणि करिअरच्या नावाखाली लग्नाचे वय 30 ते 35 वर्षांपर्यंत पुढे ढकलले गेले आहे. त्यात उच्च शिक्षणाच्या सोयी शहरांमध्ये जास्त असल्यामुळे ग्रामीण भागातील तरूण-तरूणी शहराकडे वळतात. तेथे त्यांना निरंकुश स्वातंत्र्य मिळते. निरंकुश स्वातंत्र्याचा दुरूपयोग करण्याकडे बहुतेक माणसांचा कल असतो. त्यातूनच महाविद्यालय व विद्यापीठे हे स्वैराचाराच्या केंद्रस्थानी आल्याचे जरा डोळसपणे पाहिल्यास लक्षात येते. मग यातून प्रेम, ब्रेकअप, तणाव, चिडचिड, राग, द्वेष, मत्सर, वैफल्यासारखे मनोविकार वाढिस लागतात. एकतर्फी प्रेमातून मुलींवर ऍसिड अटॅक, ब्लेड अटॅक आणि खुनासारखे प्रकार वाढतात.
तुम अगर मुझको न चाहो तो कोई बात नहीं
तुम किसी और को चाहोगी तो मुश्किल होगी
ही प्रवृत्ती वाढीस लागते. अगदी अलिकडेच औरंगाबादसारख्या सभ्य शहरात, अजय तिडके व संकेत कुलकर्णी नावाच्या दोन तरूण विद्यार्थ्यांच्या हत्या एकाच मुलीवर दोघांनी प्रेम केल्यावरून करण्यात आल्या. झाड जसे मुळापासून दूर झाले तर सुकून जाते तसेच तरूण मुलं-मुली परिवारापासून दूर झाले की (अपवाद खेरीज करून) स्वैराचारी बनत जातात. याच प्रक्रियेतून काही तरूण बलात्कार करण्यासाठी प्रवृत्त होतात. आश्चर्य तर या गोष्टीचे आहे की, जवळ-जवळ प्रत्येक शहरात वेश्या उपलब्ध आहेत. तसेच संमत्तीने संबंध करण्यासाठी हॉटेल/ लॉजेस उपलब्ध आहेत तर ही परिस्थिती आहे. कल्पना करा वेश्या व्यवसाय आणि व्याभिचारावर बंदी असती तर आपल्या देशातील महिलांची काय अवस्था झाली असती?
महिलांना पुन्हा-पुन्हा आई होण्याच्या त्यांच्या अधिकारापासून वंचित करून व पुन्हा-पुन्हा आई होणे किती मागासलेपणाचे व अन्यायकारक आहे, हे त्यांच्या मनावर बिंबवून पाश्चात्य पुरूषांनी महिलांना प्रगतीच्या नावावर अनावश्यकरित्या घराबाहेर काढलेले आहे. तसेच त्यांची निकड कार्पोरेट कंपन्यांमध्ये, मालिका, सिनेमा, संगीत, नृत्य, फॅशन, पॉर्न, लष्कर, उद्योग इत्यादी क्षेत्रामध्ये किती गरजेची आहे हे त्यांना पटवून देण्यात पाश्चिमात्य पुरूषप्रधान व्यवस्थेला यश आलेले आहे. त्यातूनच मग जागतिक स्तरावर अनेक अनुत्पादक उद्योगांमध्ये महिलांची गुंतवणूक करण्यात आलेली आहे. त्यात अब्जावधी डॉलरची गुंतवणूक करण्यात आलेली आहे. जगातील सर्व महिला फक्त गृहिणी बनून राहिल्या तर या सर्व गुंतवणुकीचे काय होणार? या विचाराणेच अशा उद्योगपतींच्या पोटात भितीचा गोळा उत्पन्न होतो व आपली गुंतवणूक बुडू नये म्हणून ते महिलांना सातत्याने गृहिणी पदाच्या जबाबदारीतून मुक्त करून मुक्त बाजारपेठेत आणण्यासाठी प्रयत्नशील असतात.
याच भितीतून ते इस्लामसारख्या नीति अधिष्ठीत धर्माची बदनामी करतात. इस्लाममध्ये महिलांना कसे डांबून ठेवले जाते, याचे कपोलकल्पीत किस्से जनतेच्या मनावर बिंबविले जातात. कारण की त्यांना माहित आहे की, इस्लामच त्यांच्या या ढोंगीपणाचा पर्दाफाश करू शकतो. इस्लाममध्ये महिलेचे कार्यक्षेत्र मुख्यत्वेकरून घरापर्यंत सीमित केलेले आहे. इस्लामच्या मते गृहिणी हीच तिची प्रमुख भूमिका आहे. देशासाठी उत्कृष्ट संस्कारी नागरिक घडविणे ही तिची प्रमुख जबाबदारी आहे व ही जबाबदारी सर्वात महत्त्वाची जबाबदारी आहे. एकाग्र चित्ताने ही जबाबदारी पार पडण्यासाठी तिला अर्थप्राप्तीच्या संकटातून मुक्त करून घरातील सुरक्षित वातावरण प्रदान करण्यात आलेले आहे. असे असतांनाही प्रत्येक काळामध्ये समाजातील काही महिलांना काम करणे गरजेचे असते. त्याची व्यवस्था त्यांच्या स्त्रीत्त्वाच्या आदर राखला जाईल अशा पद्धतीने करण्याचे निर्देष इस्लाम शासनाला देतो.
बलात्कार होण्याच्या मोठ्या कारणांपैकी एक कारण पॉर्न (अश्लिल चित्रफिती) आहे. इंटरनेटचा मोठ्या प्रमाणावर वापर पॉर्न साईट्स सर्च करण्यासाठी केला जातो. इंटरनेटरची सर्वाधिक कमाई ही याच वेबसाईटच्या माध्यमातून होते. लाखो स्त्री-पुरूष या व्यवसायात गुंतलेले आहेत. अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक यात केलेली आहे. कोट्यावधी लोक नियमितपणे ह्या क्लिप्स पाहतात. भूकेनंतर सर्वाधिक प्रबळ गरज ही लैंगिक गरज असते. याची कल्पना या व्यवसायात गुंतलेल्या लोकांना आहे. म्हणून तर याचा प्रचार जास्तीत जास्त व्हावा यासाठी सर्वजन प्रयत्नशील आहेत, असा माझा दावा आहे. यास पुरावा असा की, प्रत्येक वस्तू महाग होत असतांना, ” डेटा” कसा काय स्वस्त होत आहे? याचे उत्तर अश्लिलता सार्वजनिक करणे हे आहे.
जेव्हा कोणतीही वस्तू आपल्याला मोफत मिळते तेव्हा त्याचा अर्थ विकणारे लोक आपली खरेदी करीत असतात एवढे निश्चित. मोफत/स्वस्त डेटाच्या मोबदल्यात जनतेचा बहुमुल्य वेळ व नैतिकतेची खरेदी या कंपन्या करीत आहेत. मोबाईल फोनच्या स्क्रीनवर एक क्लिक करण्याचा उशीर, अश्लिल चित्रफितींची गटार तात्काळ वहायला लागते व त्यात भले-भले लोक वाहून जातात. मग ते सरकारी कार्यालयात काम करणारे असोत, कार्पोरेट सेक्टरमध्ये काम करणारे असोत, महिला असोत, पुरूष असोत किंवा कोणतेही क्षेत्र असो. विधानसभेमध्ये सुद्धा पॉर्न पाहिल्या गेल्याचा इतिहास ताजा आहे. काही लोक तर स्मार्ट फोनचा उपयोग फक्त अश्लिल क्लिप्स पाहण्यासाठी करतात, बाकी ऑप्शनन्स त्यांना वापरताच येत नाहीत. अशा क्लिप्स सतत पाहिल्याने त्याचे त्यांना व्यसन जडते. माणूस ज्या गोष्टीत रमतो त्याची मानसिकता त्याच गोष्टीसारखी होत जाते. पॉर्न ऍडिक्ट व्यक्तिंची मानसिकता विकृत व्हायला वेळ लागत नाही. अशा लोकांचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टीकोण पार बदलून जातो. पॉर्नमधील महिला जशा लैंगिक संबंधासाठी सहज तयार होतात तशा समाजातील महिलाही तयार होतील, असा त्यांच्यापैकी काहींचा समज होवून जातो. यातूनसुद्धा बलात्कार होतात. घर विस्कटून जाते, समाज नासून जातो, स्त्रीया आणि मुली असुरक्षित होऊन जातात, पुरूषांकडून विकृत लैंगिक संबंधांची मागणी वाढते, नैतिकदृष्ट्या समाज दिवाळखोर होवून जातो, इतका की जवळच्या रक्ताच्या नात्याच्या संबंधानांही बऱ्याच वेळेस काळीमा फासली जाते. गेल्या तीन वर्षामध्ये महाराष्ट्रात पंधरा हजारहून अधिक अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार घडले. (संदर्भ : लोकसत्ता 28 एप्रिल 2018 पान क्र. 1) महाराष्ट्रासारख्या राज्यासाठी हे भूषणावह नाही. आश्चर्य म्हणजे यापैकी बहुतेक अपराध करणारे लोक ओळखीचे/जवळचे होते.
इंदौरचे एक वकील कमलेश वासवाणी यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये पॉर्न साईटवर बंधी घालावी म्हणून एक जनहित याचिका दाखल केली होती. मात्र केंद्र सरकारने शपथपत्र देवून सर्वोच्च न्यायालयाला सदरच्या वेबसाईटवर बंदी घालण्यास आपण असमर्थ असल्याचे कळविले आहे. यावरून या व्यवसायातील लोकांच्या ताकदीचा अंदाज येतो. सतत पॉर्न पाहिल्यामुळे भावनात्मक विकृती येते. विशेषकरून मुलांच्या मनोविज्ञानावर याचा अतिशय वाईट परिणाम होतो.
एकंदरित या वातावरणातूनच लोक अनेकवेळा बलात्कार करण्यासाठी प्रवृत्त होतात. यात खरे तर पुरूष सुद्धा पीडित आहेत. कारण की, बलात्कार करणारे सर्वसाधारण लोक असतात. ते काही व्यावसायिक अपराधी नसतात. मालिका, चित्रपट, पॉर्न सातत्याने पाहून त्यातून आलेल्या उत्तेजनेला आवर न घालता आल्यामुळे असे लोक बलात्कार करून, एक तर फाशीला जात आहेत किंवा जन्मठेप भोगत आहेत. 2012 साली निर्भयाची घटना झाल्यानंतर 2013 मध्ये या संदर्भात कायद्यात सुधारणा करून बलात्काऱ्यांना फाशीची तरतूद करण्यात आलेली आहे.
कठुआच्या घटनेनंतर राज ठाकरेंनी परत शरई कायद्यासारख्या कठोर कायद्याची मागणी केलेली आहे. देशभर प्रदर्शन झालेले आहे. शेकडो टन कागद या विषयावर लिहून व शेकडो तास या विषयावर चर्चा करून वाहिन्यांनी खर्ची घातलेली आहेत. अनेकांनी डिपीचा रंग काळा केला, मात्र पंधरा दिवसांनी सर्वकाही सुरळीत झाले. डीप्या पुन्हा बहरल्या, भंपक शायरी आणि एकमेकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छांचा कृत्रीम वर्षाव समाजमाध्यमांवर पुन्हा सुरू झाला.
जगातील प्रत्येक व्यवस्था लोकांना कायद्यात पकडते मात्र इस्लाम नैतिकतेत पकडतो. म्हणून अनैतिक गोष्टींसाठी प्रवृत्त करणाऱ्या तसेच पती आणि पत्नी यांच्यातील नात्याला कमकुवत करणाऱ्या प्रत्येक लहान-सहान गोष्टी उदा. संगीत, दारू, नाच, गाणे, अश्लिल मालिका, चित्रपट, स्त्री-पुरूषांचा संयुक्त वावर, सहशिक्षा या सर्व गोष्टी तो प्रतिबंधित करतो. परद्याची व्यवस्था लागू करतो. एवढेच नव्हे तर पाच वेळेसच्या नमाज व वर्षाला 30 दिवसांच्या रोजाच्या माध्यमातून घरा-घरात व समाजात पवित्र वातावरण तयार करतो. अशा वातावरणात बलात्कार तर दूर विनयभंगाचा सुद्धा विचार नागरिकांच्या मनामध्ये उत्पन्न होणार नाही, याची अगोदर पक्की व्यवस्था करतो. एवढी प्रतिबंधक उपाययोजना करूनही एखादा दुराचारी जेव्हा बलात्कार करतो तेव्हा त्याचे ते कृत्य ज्या महिलेच्या विरूद्ध झाले असे गृहित न धरता त्या कृत्याला व्यवस्थेविरूद्ध बंड मानतो आणि मग मात्र त्याच्या चुकीला माफी नाही. त्याला भर चौकात असा मृत्यू दंड देण्यात येतो की, पाहणाऱ्यांच्या जीवाचा थरकाप उडावा. आपल्याकडे अशी कुठलीही प्रतिबंधक उपाययोजना न करता फक्त फाशीची मागणी केली जाते, जी की, बलात्काऱ्यांना कधीही रोखू शकत नाही.
आपल्याकडे बलात्कार/ व्याभिचाऱ्याकडे नेणाऱ्या सर्व गोष्टी नुसत्या खुल्याच नाहीत तर त्यांना सरकारी संरक्षणसुद्धा प्राप्त आहे. एकीकडे वाम मार्गाची दारे सताड उघडी ठेवायची, लोकांना वाम मार्गाकडे जाण्यासाठी पोषक असे वातावरण तयार करायचे व पुन्हा त्यांच्याकडून अपेक्षा ठेवायची की त्यांनी बलात्कार करू नये, ही अशक्य बाब आहे. सरकारने अगोदर या सर्व वाईट गोष्टींवर प्रतिबंध लावावा मग फाशीची तरतूद करावी. केवळ फाशी दिल्याने बलात्कार थांबणार नाहीत त्यासाठी व्यवस्था बदलावी लागेल.
सरकारवर नमूद बाबी बंद करणार नाही, कारण तेच तर सरकारच्या प्रमुख उत्पादनाचे स्त्रोत आहेत. म्हणून आपल्या व्यवस्थेमध्ये बलात्कार होत राहतील व लोक फाशीवर जात राहतील हे असेच सुरू राहणार आहे. आशेची एकमेव किरण शऊरी मुस्लिम आहेत. मात्र मुस्लिमांमधील हा गट फार छोटा आहे. दुर्देवाने काही मुस्लिमसुद्धा वाम मार्गाला लागलेले आहेत. याचा पुरावा रमजानमध्ये पॉर्न पाहणाऱ्यांची कमी होते व रमजाननंतर ती पूर्ववत होते हा गुगलच्या मागच्याच वर्षाचा अहवाल आहे. दर्शकांमधील हा उतार-चढाव कोणाचा आहे, हे सुजान वाचकांना समजून सांगण्याची गरज नाही.
ज्याप्रमाणे काट्यांमध्ये राहून सुद्धा गुलाब फुलतो त्याच प्रमाणे वाईट वातावरणात राहूनसुद्धा शरिया आधारित जीवन जगून नैतिकतेचे गुलाब फुलविता येते. हे प्रत्यक्षात दाखवून देण्याचे मोठे आवाहन प्रत्येक सुजान हिंदू-मुस्लिम नागरिकांवर आहे. विशेषत: ही जबाबदारी कुरआनने मुस्लिमांवर टाकलेली आहे. आता कोणीही प्रेषित येणार नाहीत. समाजाच्या सुधारणेचे काम आपल्यालाच करावे लागणार आहे. हे आव्हान पेलण्यासाठी तरूणांनी एस.आय.ओ. तर स्त्री-पुरूषांनी जमाअते इस्लामीच्या स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधून तणावरहित स्वच्छ व नैतिक जीवन जगण्याचा मूलमंत्र प्राप्त करावा. स्वत:ला व आपल्या पुढच्या पीढिला बलात्कारासारख्या कलंकापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत. शेवटी अल्लाहकडे दुआ करतो की आपल्या सर्वांना सद्बुद्धी मिळो. आमीन.
Post a Comment