माननीय बुरीदा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘मी तुला अगोदर कब्रस्तानात येण्यापासून रोखले होते (जेणेकरून एकेश्वरत्वाची धर्मनिष्ठा पूर्णत: हृदयात सामावली जावी.) आता तू दृढत्वाचा अवलंब कर.’’ मुस्लिमच्या दुसऱ्या हदीसमध्ये म्हटले आहे, ‘‘आता तू हवे तर जा कारण कबरी पारलौकिक जीवनाच्या स्मृती जागृत करतात.’’ (हदीस : मुस्लिम)
माननीय बुरीदा (रजि.) यांच्या कथनानुसार, जे लोक कब्रस्तानात जातात त्यांना पैगंबर मुहम्मद (स.) सांगतात, ‘‘तेथे पोहोचून म्हणा की ‘अस्सलामु अलैकुम...’ (अर्थात) तुम्हाला शांतता लाभो, हे वस्तीतील ईशपरायण आज्ञाधारकांनो! आम्हीदेखील अल्लाहने इच्छिले तर तुम्हाला भेटणार आहोत, आम्ही स्वत:साठी आणि तुमच्यासाठी अल्लाहच्या शिक्षा व क्रोधापासून वाचण्याची प्रार्थना करीत आहोत.’’ (हदीस : मुस्लिम)
माननीय मुआज बिन जबल (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी जेव्हा त्यांना यमनचे न्यायाधीश अथवा गव्हर्नर बनवून पाठविले तेव्हा म्हणाले, ‘‘हे मुआ़ज! स्वत:ला विलासीपणापासून अलिप्त ठेवा कारण अल्लाहचे दास विलासी नसतात.’’ (हदीस : मिश्कात)
स्पष्टीकरण : तुम्ही एका मोठ्या पदावर जात आहात. तेथे जीवनाच्या स्वादापासून लाभ घेण्याची आणि हात साफ करण्याची खूप संधी मिळू शकते. परंतु तुम्ही जगाच्या प्रेमात अडकू नका आणि जगाला पसंत करणाऱ्या शासकांसारखा स्वत:चा स्वभाव बनवू नका कारण तो अल्लाहच्या दासत्वाशी मेळ खात नाही. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आपल्या अनुयायींना सांगितले, ‘‘माझ्या जनसमुदायावर ती वेळ येणार आहे जेव्हा दुसरे जनसमुदाय त्याच्यावर अशाप्रकारे तुटून पडतील जसे खाणारे लोक वाढलेल्या अन्नावर तुटून पडतात.’’ मग एका विचारणाऱ्याने म्हटले, ‘‘ज्या कालखंडाचे आपण वक्तव्य करीत आहात त्या काळात आम्ही मुस्लिम लोक इतक्या कमी संख्येत असू की आम्हाला गिळंकृत करण्यासाठी इतर जनसमुदाय एकत्रितपणे तुटून पडतील?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘नाही, त्या काळात तुमची संख्या कमी असणार नाही तर तुमची संख्या मोठी असेल, परंतु तुम्ही महापुरातील लाटेसारखे व्हाल आणि तुमच्या शत्रूंच्या उरातील तुमची भीती नष्ट होईल आणि तुमच्या हृदयात भित्रेपणा घर करील.’’ मग एका मनुष्याने विचारले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! हा भित्रेपणा कोणत्या कारणामुळे येईल?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘त्याचे कारण असे असेल की तुम्ही (परलोकावर प्रेम करण्याऐवजी) जगावर प्रेम करू लागाल आणि (अल्लाहच्या मार्गात प्राण देण्याच्या इच्छेऐवजी) मृत्यूपासून पळ काढू आणि द्वेष करू लागाल.’’ (हदीस : अबू दाऊद)
माननीय अबू मूसा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जगावर प्रेम करणारा मनुष्य आपले पारलौकिक जीवन उद्ध्वस्त करील आणि पारलौकिक जीवनावर प्रेम करणारा मनुष्य या जगातील आपल्या जीवनाचे नुकसान करून घेईल. हे लोकहो! तुम्ही मागे उरणाऱ्या जीवनाला नष्ट होणाऱ्या जीवनावर प्राधान्य द्या.’’ (हदीस : मिश्कात)
स्पष्टीकरण : हे जग आणि परलोक यापैकी एकाची निवड करणे आवश्यक आहे. एकतर जगाला आपले ध्येय बनवा अथवा परलोकाला. जर जगाला आपला आपले ध्येय निश्चित करीत असाल तर पारलौकिक सुख व खुशी लाभणार नाही आणि परलोकाला
आपले ध्येय बनविले तर त्याच्या परिणामस्वरूप कदाचित तुमचे जग नष्ट होऊ शकते, परंतु त्याच्या बदल्यात पारलौकिक बक्षीस मिळेल जे निरंतर राहणारे आहे. जी गोष्ट परलोकाच्या मार्गावर चालण्याने नष्ट होईल ती समाप्त होणारी आहे आणि जीवनदेखील नष्ट होणारे आहे. या नष्ट होणाऱ्या गोष्टीचे बलिदान देण्याने जर निरंतर राहणारे बक्षीस मिळाले तर हा तोट्याचा सौदा नाही, पुरेपूर नफ्याचा सौदा आहे. माननीय शद्दाद बिन औस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘खरा विद्वान तो आहे ज्याने आपल्या वासनेवर नियंत्रण ठेवले आणि मृत्यूनंतर येणारे जीवन अलंकृत करू लागला. मूर्ख तो आहे ज्याने स्वत:ला वासनेच्या अवैध इच्छांच्या मागे लावले आणि अल्लाहकडून चुकीची अपेक्षा बाळगली.’’ (हदीस : तिर्मिजी)
स्पष्टीकरण : म्हणजे सत्याला सोडून आपल्या मनाचे म्हणणे ऐकतो आणि अपेक्षा करतो की अल्लाह त्याला नंदनवनात (जन्नतमध्ये) स्थान देईल. अशाप्रकारच्या चुकीच्या आकांक्षांमध्ये कुरआन अवतरणकाळातील ज्यू आणि खिस्ती पडलेले होते आणि आज आमचे अनेक मुस्लिम बंधुदेखील अशाच चुकीच्या आकांक्षांवर जीवन व्यतीत करीत आहेत.
Post a Comment