Halloween Costume ideas 2015

...तर निश्चितच शहरे अतिक्रमणमुक्त होतील

शहर वाहतूक कोंडी मुक्त होण्यासाठी अतिक्रमण हटाव सह रस्त्यावरील अडथळे दूर करण्यासाठी अधूनमधून  सामान्य नागरिक  वृत्तपत्रातून सातत्याने आवाज उठवत असतात, मात्र त्याची दखल घेतलेली दिसत नाही. यापूर्वी वृत्तपत्रातून अशा प्रकारे सामान्य नागरिकांनी उठवलेल्या आवाजाची दखल घेऊन तातडीने शहर वाहतूक नियंत्रण शाखेला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या जात होत्या. पण अलिकडे मुद्रीत माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या तक्रारींना केराच्या टोपल्या दाखवल्या जातात,असा सार्वत्रिक अनुभव आहे.

सर्वसामान्य नागरिकांच्या द्रूष्टीने ही अतिक्रमणे नेहमीच अडचणीची व त्रासदायक ठरणारी आहेत. ही अतिक्रमणे हटविल्यामुळे रस्त्यावरून पायी चालत जाणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळतो. यातील काही अतिक्रमणे ही वर्षानुवर्षे जणू आपल्या मालकीची जागा असल्याच्या अविर्भावात ठाण मांडून बसलेली आहेत. या संदर्भात व्यापारी व फेरीवाले हे नेहमीच उध्दटपणाने वागतांना दिसतात. अशा बऱ्याच शहरातील नागरिकांच्या तक्रारी आहेत, त्यामुळे सातत्याने अतिक्रमण हटाव मोहीमेच्या धडक कारवाईची नितांत आवश्यकता आहे, त्यामुळे बाजारपेठेतील भररस्त्यात अतिक्रमण करणारे व्यापारी,तसेच पदपथावर अतिक्रमण करणारे फळ विक्रेते, तसेच शहरातील अनेक भागात सार्वजनिक ठिकाणी बिंधास्तपणे विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांना चांगलाच चाप बसेल असे वाटते.

सध्या मोठ्या शहरापासून ते तालुक्याच्या लहान गावात ही रस्त्यावरील रहदारीचे प्रमाणात भयंकर वाढ झालेली आहे. त्याला कारण वाहनांची संख्या भरमसाठ वाढलेली आहे हे जसे आहे, तसे रस्त्यावर केलेली बेसुमार व बेकायदेशीर अतिक्रमणे हे देखील आहे. वाहनांच्या संख्येत वाढ झाली की वाहतूकीच्या शिस्तीचे बारा वाजतात, या नियमानुसार शहरातील रहदारीचा व वाहतूक शिस्तीचा प्रश्न जटील झाला आहे. अनेक शहरातील बहुसंख्य रस्ते अरूंद आहेत, त्यातच रस्त्याच्या कडेला असलेल्या घरमालकांनी व व्यावसायिकांनी आपल्या घराच्या व दुकानाच्या पुढची जास्तीत जास्त जागा अडवून तिथे काही ना काही माल ठेवून त्यावर कब्जा केला आहे. अर्थात तो करतो मी का नाही असे म्हणत सगळेच अतिक्रमण करत आहेत.

वाहनांची संख्याही प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे, रस्ते पूर्वीपासून आहेत तेवढेच व तसेच आहेत, साहजिकच रस्त्यावरील वाहनांचा ताण वाढला आहे, रहदारीच्या रस्त्यावर वाहनांची कोंडी होणे हे नित्याचे झाले आहे, त्यामुळे अपघाताची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरात महानगरपालिकेच्या भरमसाठ उत्पन्नामुळे रस्ते प्रशस्त झाले आहेत, रस्ते रूंद व चौपदरी झाले आहेत. आधुनिक रस्ते बांधणीमुळे रहदारीत नियम व शिस्त निर्माण झाली आहे, चौकाचौकात सिग्नलची सोय झाली आहे, आतातर जपानच्या तोडीचे ओव्हर फ्लाय, ओव्हर ब्रिज तसेच अंडरग्राऊंड रस्ते झाले आहेत, बहुतेक महानगरपालिका रहदारीला शिस्त लागावी म्हणून रस्ते विकासासाठी भरपूर निधी खर्च करून अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून देत आहेत, ही गोष्ट स्वागतार्ह आहे.

वर उल्लेख केल्याप्रमाणे जुन्या काळातील रस्त्यांचे रूंदीकरण तर होत नाहीच,मात्र आता आहे तेच रस्ते अतिक्रमणामुळे अरुंद होत आहेत, त्याशिवाय वाहनांची संख्या वाढली असल्याने पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालतांना कसरत करावी लागते. खरंतर बहुतेक शहरातील रस्ते व पदपथ नागरीकांच्यासाठी आहेत की फेरीवाल्यांच्यासाठी,असा प्रश्न नागरिकांना पडतो. गजबजलेल्या रस्त्यावर फेरीवाल्यांसह, पदपथावर मालविक्री करणारे तसेच विनापरवाना डिजिटल फलकांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केलेचे दिसून येते आहे. काही रस्त्यावर निम्म्या पेक्षा जास्त जागा फेरीवाल्यांसह व्यावसायिकांनी जणू आरक्षितच केलीय असे भासवले जात आहे. अर्थात या सर्वांमुळे शहरातील रहदारी खूपच धोकादायक झाली आहे. अपघाताच्या प्रमाणात मोठी वाढ तर झाली आहेच, शिवाय गुन्हेगारी सुद्धा फोफावते आहे.

अनेक शहरातील नागरिकांना रस्त्यावरून पायी चालत असताना अक्षरशः जीव मुठीत धरून चालावे लागते. शाळेतील लहान लहान मुलांचे तर हाल बघवत नाहीत. त्यातच बेकायदेशीर प्रवासी वाहतूक बिनदिक्कतपणे सुरु आहे. वाहतूक पोलिसांच्या नजरेसमोरून एका रिक्षात पाच- पाच ,सहा-सहा प्रवासी कोंबून वाहतूक सुरू असते. एकाच दुचाकी वाहनांवर तिघे चौघे बसून रस्त्यावरून जाताना दिसतात. कायद्याची भितीच नाही, अशी मानसिकता तयार झाली आहे.

महापालिकेने विविध विकास कामासाठी ज्या जागा आरक्षित केलेल्या आहेत त्या जागांवर बेकायदेशीर धंदे करणारे, वाहनांची खरेदी विक्री करणारे तसेच खाद्य पदार्थ विकण्याचा व्यवसाय करणारे शिवाय रात्रीच्या वेळी दारू पिणाऱ्या लोकांना सेवा पुरविणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे गुंडागर्दी सुध्दा वाढत आहे. त्यातूनच मोठी गून्हेगारी वाढतांना दिसत आहे.

रस्त्यावरून चालत जाणाऱ्या महिला व शाळकरी मुलामुलींची तारांबळ वर्णनच करता येत नाही. सकाळी घरातून बाहेर पडलेली व्यक्ती संध्याकाळी घरी सुखरूप परतेलच, याची शाश्वती देता येत नाही. या रहदारीमुळे तसेच अतिक्रमणामुळे नागरिकांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागतो. संख्यात्मक वाढ झाली असलीतरी गुणवत्ता वाढविणे अशक्य नाही.

रस्त्यावर केलेली अतिक्रमणे काढणे जेवढे महत्त्वाचे तेवढेच ती पुन्हा होऊ नयेत यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे, अन्यथा "ये रे माझ्या मागल्या..." होते. या दृष्टीने प्रत्येक महापालिकेच्या आयुक्तांनी या बाबींवर लक्ष दिले पाहिजे. पोलिस यंत्रणेचे सहकार्य घेऊन शहर अतिक्रमणमुक्त करणे सहज शक्य आहे.

अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण निर्मूलनासाठी धडक कारवाई केली की, त्याच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर लोकप्रतिनिधी दबाव आणू पहातात, कारण अनेकदा लोकप्रतिनिधींचे हीतसंबंधच अतिक्रमणाची कारवाई करण्यात अडसर ठरतात. कारण कोल्हापूर येथील संभाजीनगर एस.टी. स्टॅंडशेजारी हमरस्त्यावर तसेच आरक्षित जागेवर चार चाकी व सहा चाकी, तसेच अवजड वाहने उभी करून विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या व्यावसायिकांस इथल्या नगरसेविकेच्या मुलांचा वरदहस्त होता, हे ओपनसिक्रेट महापालिकेच्या वर्तुळात चर्चिले जात होते. शेवटी एका सामान्य कार्यकर्त्यांने याविरोधात आवाज उठवला, अनेक अर्ज तक्रारी केल्यानंतर हा अवैध व्यवसाय करणाऱ्यांला महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला दखल घ्यावी लागली,इतकेच नाही तर हा व्यावसायिक तब्बल पंधरा वर्षै महापालिकेच्या सुमारे एक एकर जागेवर विनापरवाना व्यवसाय करीत असल्याचे महापालिकेच्या यंत्रणेच्या लक्षात आले, वास्तविक अशा अवैध व्यवसायांना विरोध करुन आसपासच्या नागरिकांनी सुध्दा कायद्याचा आदर करून प्रशासनाचे मनोबल वाढविण्यासाठी पुढे आले पाहिजे. व अशा समाजविघातक कृत्याविरूध्द आवाज उठवला पाहिजे. तरच  शहरे सुंदर व अतिक्रमणमुक्त  ही संकल्पना साकार होईल, असे वाटते.

रस्त्यावर किंवा रस्त्याच्या कडेला उभे राहणाऱ्या तरुणांच्या घोळक्यामुळे बऱ्याचवेळा कायदा व सुव्यवस्था याचा प्रश्न निर्माण झाले आहेत, रस्त्याचे जे नियम आहेत, डाव्या बाजूने जाणे, रस्त्यावर मधोमध वाहने उभी न करणे, टोळ्यांनी रस्त्यावर बोलत उभा न राहणे, यासाठी पोलिसांनी सुध्दा प्रबोधन करणे गरजेचे आहे. वाहतूकीला शिस्त लावणे हे काम पोलिस खात्याचे आहे, ते त्यांनी चोख बजवायला हवे. त्यासाठी कर्तव्य कठोर होणे आवश्यक आहे. शहर वाहतूक पोलीस निरीक्षक यांनी  सुध्दा आठवड्यातून एकदा बेकायदेशीर वाहतूक विरोधात मोहीम उघडायला हवी, म्हणजे रहदारीला चांगली शिस्त लागेल. रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांना व फेरीवाल्यांसह अतिक्रमण करणाऱ्यांना एकदा दोनदा सांगितल्यावर सुद्धा ऐकत नसतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी कारवाई नेहमीच व सर्वांवरच करण्याची गरज भासणार नाही, काही नमुण्यादाखल अशा कारवाया करा,मग बघा, अतिक्रमणावर चाप बसेल, तसेच रहदारीला शिस्त ही लागेल. शहरे सुंदर करण्याबरोबरच ते  नागरिकांना सुरक्षित वाटणं, हे महत्त्वाचे व अगत्याचे आहे.

महापालिकेचे अधिकारी व पोलीस यंत्रणेने हातात हात घालून काम केले तर निश्चितच महाराष्ट्र राज्यातील अनेक शहरे अतिक्रमणमुक्त व्हायला वेळ लागणार नाही.

- सुनीलकुमार सरनाईक

भ्रमणध्वनी: ९४२०३५१३५२

कोल्हापूर.


Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget