Halloween Costume ideas 2015

प्रवास : अंधारातून प्रकाशाचा

Quran

अल्लाहने मानवाला बुद्धी दिली आहे ज्याद्वारे तो ज्ञानप्राप्ती करतो. त्याला विचार करण्याची क्षमता आणि आकलनशक्ती बहाल केली आहे, ज्याद्वारे तो चांगल्या आणि वाईटाची पारख करू शकतो. खरे आणि खोटे ओळखण्याची जन्मजात कुव्वत माणसाला लाभलेली आहे. या साऱ्याबरोबरच त्यास इच्छा, योजना, अधिकार आणि स्वातंत्र्यही दिलेले आहे. विचार आणि विवेकाचा उपयोग करून निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मानवाला दिले गेले आहे. माणूस शिकला सवरलेला नसला तरी या सर्व उपजत गोष्टींमुळे चूक आणि बरोबर, खरे आणि खोटे, चांगले आणि बाईट याबद्दलची पारख त्याला आपसुकच येते. प्रत्येक माणसाला आयुष्यात कोणत्या न कोणत्या वळणावर त्याच्या निर्मितीबाबतचे प्रश्न पडतातच. त्याचबरोबर मरणोपरांत आपले काय होईल हाही प्रश्न अधूनमधून छळत असतो. प्रत्येक माणूस आपले ज्ञान, आपले विचार आणि विवेकानुसार या प्रश्नांचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो. माणूस अशिक्षित असला तरी त्याला त्याच्या निर्मात्याचा ध्यास असतो.

जगातील सारी विश्वविद्यालये अलिकडच्या काळात म्हणजे गेल्या आठ-दहा शतकांत प्रस्थापित झालेली आढळतात. मग त्यापूर्वी सारे लोक अज्ञानी होते काय? किंबहुना आधुनिक विज्ञान हे अलीकडच्या दोन-तीन शतकांत प्रस्थापित झाले आणि प्रगल्भ झाले असे म्हणता येईल. म्हणजेच मानवाच्या निर्मितीपासूनच अल्लाहने प्रत्येक मानवाला मग ती स्त्री असो की पुरुष बुद्धी, विवेक, आकलन, वैचारिक बैठक, निर्णयक्षमता त्याचबरोबर स्वातंत्र्यही दिले आहे.

आधीपासूनच श्रद्धावंत आणि नास्तिक यांचे आपले आपले हेवेदावे आणि विचार आहेत. आधुनिक विज्ञानवादी ही सारी सृष्टी कोणी निर्माण केली नसून ती स्व: निर्माण झालेली आहे असे मानतात. तर श्रद्धावंत या सृष्टीचा कोणीतरी निर्माता आहे असा दृढ विश्वास बाळगून आहेत. खरे पाहता विश्वातील प्रत्येक वस्तू नियमांच्या व बंधनांच्या अधीन आहे. सूर्य, चंद्र, ग्रह, तारे आपापल्या कक्षेत नियमबद्ध भ्रमण करीत असून ते आपला वेग तसूभरही कमीजास्त करू शकत नाहीत. वस्तु: अंतरिक्षातील सर्व लहानमोठ्या ग्रहापासून पृथ्वीतलावरील अगदी सूक्ष्म जीव-जंतू असो की अणु-रेणू असो सर्वांना त्यांना घालून दिलेल्या नियमातच रहावे लागते. खुद्द मानवदेखील निसर्गनियमांच्या अधीन आहे. विश्वातील प्रत्येक वस्तू, प्राणीमात्र, जीवजंतू, वनस्पती यांच्यासाठीही काही नियम घालून दिलेले आहेत. त्यानुसारच त्यांची उत्पत्ती होते आणि क्षतीही. ईश्वरी नियमानुसारच सारे सजीव त्यांना घालून दिलेल्या काळाच्या मर्यादेत जिवंत राहून जगतात आणि मरणही पावतात. साक्षात मानवाच्या जीवनाचा आढावा घेतल्यास तोसुद्धा या नियमांच्या अधीन आहे असे सिद्ध होते. किंबहुना जो माणूस स्व:च्या ताकदीवर आणि हिमतीवर गर्व करतो त्याच्या श्वासोच्छवास, हृदयाचे आकुंचन प्रसरण, चालत असताना हातांची होणारी लयबद्ध हालचाल, त्याची पचनसंस्था इतकेच काय त्याच्या पापण्यांची उघडझाप सुद्धा त्याच्या हातात नाही.

काय आहे अंधार?

एखादा इसम आपल्या जन्मदात्या मातापित्याच्या अस्तित्वालाच मानत नसेल तर अशा माणसास आपण काय म्हणाल? ही सारी सृष्टी अशीच किंवा आपोआपच निर्माण झालेली नसून या सृष्टीचा एक निर्माता आहे असा ठाम विश्वास श्रद्धावंताचा आहे. नास्तिक आणि आधुनिक विज्ञानवादी या सिद्धान्तांना मानत नसले तरी ते आपल्या दाव्यास सिद्धही करू शकलेले नाहीत. विश्वातील बहुतांशी लोक ईश्वराचे अस्तित्व मानतात, कारण श्रद्धा ही मानवी स्वभाव आहे. बहुतांशी लोक कोणा न् कोणावर श्रद्धा बाळगून असतात. काहींची श्रद्धा देवावर, गुरू, बुवा, बाबा, पीर, फकीर, ऋषीमुनी, देवी-देवता, प्राणिमात्र इतकेच नव्हे तर पंचमहाभुतातील अग्नी, वायू, जल, आकाश, ग्रह-तारे, चंद्र, सूर्य यापासून ते थेट सैतान, राक्षसावरही असते. जो तो आपल्या मर्जीनुसार, परंपरेनुसार किंवा त्याला झालेल्या साक्षात्कारानुसार आपली श्रद्धा ठेवतो. आपण ज्याला पूज्य मानतो तो खरोखरीच आपला निर्माता आहे काय? याचा आपला विवेक वापरून जो विचार करत नाही तो खरा अंधारात आहे. डोळे असून आंधळा आहे, ज्ञान असून अज्ञानी आहे, ऐकू येणारा असून बहिरा आहे. जगातील असे कोट्यावधी लोक अशा अंधाराच्या खाईत आपले जीवन व्यतीत करीत आहेत. खरा ईश्वर कोण, आपला निर्माता कोण, आपल्या निर्मितीचा उद्देश काय, मरणानंतर आपले काय होईल? असे प्रश्न या अंधारातल्या लोकांना पडत नसतील? मानवाच्या स्व:च्या मर्यादा आहेत. असे असूनसुद्धा माणूस ‘अश्रफुल मखलुकात’ म्हणजेच अल्लाहची सर्वश्रेष्ठ निर्मिती आहे. सृष्टीतील सर्व सजीवांपैकी केवळ मानवाला बुद्धी मिळाली आहे ज्याद्वारे तो विचार करू शकतो आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्याला स्व:चे निर्णय घेण्याची क्षमता प्राप्त झालेली आहे. आपल्या हिताचे आणि अहिताचेही निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य अल्लाहने मानवाला दिलेले आहे. अशी बुद्धिमत्ता, वैचारिक पातळी, निर्णयप्रक्रिया आणि स्वातंत्र्य हे मानवाशिवाय कोणत्याही प्राण्यास नाही, त्यामुळेच तर मरणोपरांत जीवनात ऐहिक जीवनातील पापपुण्यांचा हिशेब फक्त मानवाचाच घेतला जाईल, इतर प्राण्यांचा नाही. त्यामुळे आपण माणूस म्हणून जगताना आपल्या निर्मात्यास ओळखण्याची, त्याची उपासना करण्याची, त्याच्यावर श्रद्धा बाळगण्याची किंवा न बाळगण्याची मुभा अल्लाहने मानवाला दिली आहे. सृष्टीतल्या इतर सर्व गोष्टी जसे सूर्य, चंद्र, तारे, आकाश, धरणी, झाडेझुडपे इतकेच काय सर्व प्राणीसुद्धा अल्लाहचीच उपासना करतात. अल्लाहची उपासना करण्याचे व न करण्याचे स्वातंत्र्य अल्लाहने मानवाला दिलेले आहे.

खरे तर अल्लाहने मानवाची निर्मिती अल्लाहच्या उपासनेसाठीच केलेली आहे. कुरआन मजीदमध्ये अल्लाहने म्हटले आहे, ’’आणि आम्ही (अल्लाहने) जिन्न आणि मानव यांना आमच्या उपासनेसाठी निर्माण केले आहे.’’ (कुरआन, 51:56) याचा अर्थ मानवाची निर्मितीच मुळात अल्लाहच्या उपासनेसाठीच झालेली आहे. परंतु त्याचबरोबर आपली बुद्धिमत्ता आणि विवेक याचा वापर करून अल्लाहची उपासना करायची की नाही हे ठरवण्याचे स्वातंत्र्यदेखील दिलेले आहे. तसेच सृष्टीत अशी अनेक चिन्हेही दाखवलेली आहेत ज्यातून अल्लाहच्या अस्तित्वाचे प्रकटीकरण होते.

तुम्ही अल्लाहची उपासना करा किंवा न करा तो तुम्हाला तुम्ही जिवंत असेपर्यंत दाणापाणी देण्याची व्यवस्था करतो. त्याने तुमची निर्मिती केली आहे त्यामुळे तुम्हाला दाणापाणी देण्याची जबाबदारीही घेतली आहे. प्रथम मानवाच्या निर्मितीपासून अल्लाहने वेळोवेळी समस्त मानवजातीस विविध प्रकारे मार्गदर्शनही केलेले आहे. विश्वाच्या विविध स्थळी आणि वेळी आपले पैगंबर पाठवून मानवाला असे ठाम आणि स्पष्टपणे सांगितले की, ’’अल्लाहशिवाय उपासनेयोग्य कोणीच नाही.’’ हा एकमेव संदेश देण्यासाठी आणि मानवाला सन्मार्ग दाखविण्यासाठी विविध ग्रंथांचे वेळोवेळी अवतरणही केले. आता इतके सर्व स्पष्ट सांगितलेले असताना जर एखाद्या व्यक्तीने अल्लाहचा इन्कार केला अथवा त्याची उपासना नाकारली तर तो खरेच इतक्या लख्ख आणि स्वच्छ प्रकाशातही गडद अंधाराच्या अधिपत्याखाली नाही काय? त्यामुळे प्रत्येक माणसाने आपण ज्याची पूजा करतो, ज्यांची उपासना करतो तो खरोखरीच आपला निर्माता आहे की नाही याची तपासणी केली पाहिजे. अंधारातून प्रकाशाकडे येण्याचा प्रयत्न केला पाहिजे अन्यथा हा अंधार अधिकाधिक गडद होत जाऊन आपण त्यात सामावले जाऊ हे जाणून घेतले पाहिजे. हा जाणून घेण्याचा काळ केवळ आपल्या मृत्यूच्या काळापूर्वीची वेळ आहे. त्यानंतर मात्र या अंधारातून उजेडाकडे जाणे शक्य नाही. याचा अर्थ असा होतो की जे अल्लाहवर विश्वास ठेवतात, त्याची उपासना करतात, त्याला आपला निर्माता मानतात आणि प्रेषित मुहम्मद (स.) यांनी दाखविलेल्या सन्मार्गावर मार्गक्रमण करतात त्यांनाच मरणोपरान्त जीवनात जन्नत मिळणार आहे. यात महत्त्वाची अट अशी की, अल्लाहशिवाय इतर कोणाचीच उपासना त्यांनी करू नये आणि त्याच्या उपासनेत कोणासही भागीदार बनवू नये. त्याचबरोबर प्रेषित मुहम्मद (स.) हे अल्लाहचे अंतिम प्रेषित आहेत असे मानणे आणि सत्कार्य करणेही अत्यावश्यक आहे. नेमके हेच कलमा-ए-तौहीदमध्ये म्हटलेले आहे. ते असे- लाइलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलल्लाह अर्थात- अल्लाहशिवाय कोणीही ईश्वर नाही (उपासनेयोग्य) आणि मुहम्मद (स.) हे अल्लाहचे प्रेषित आहेत.

जो यावर विश्वास ठेवत नाही, अल्लाहची उपासना करीत नाही तो खऱ्या अंधारात आहे. आपण उच्च विद्याविभूषित असलो तरी धर्माच्या बाबतीत कधीच खोलवर जात नाही. वाडवडिलांपासून किंवा पारंपरिकदृष्ट्या जे धार्मिक संस्कार आपल्यावर होतात तेच आपण बरोबर मानून त्याचीच अंमबजावणी करतो आणि तसेच संस्कार आपण आपल्या पुढच्या पिढीवर करतो. हेच आपल्यावर केलेले संस्कार योग्य आणि बरोबर आहेत की नाही याची तपासणी करणे आपले कर्तव्य नाही काय? किंबहुना डोळस असून शुद्ध आंधळेपणाने आपण त्यावर आचरण करतो. खरे तर हा आपला बौद्धिक अंधार आहे. आपल्या ईश्वराला ओळखण्यासाठी आपण आपल्या बुद्धीचा कधीच वापर करत नाही. ही आपली बौद्धिक दिवाळखोरी नाही का?

जे अल्लाहची उपासना करणार नाहीत, त्यास आपला निर्माता मानणार नाहीत, अशा व्यक्ती जे त्रिवार सत्य आहे ते लपवतात अथवा त्याचा इन्कार करतात अशांनाच काफीर असे संबोधले जाते. हे त्रिवार सत्य म्हणजे अल्लाह हा या सृष्टीचा एकमेव निर्माता, मालक, पालनकर्ता आहे आणि केवळ तोच उपासनेच्या लायक आहे. किंबहुना साऱ्या सृष्टीने फक्त त्याची उपासना करणे हा त्याचा हक्क आहे. मरणोपरांत जीवनात अल्लाहची उपासना न केल्यामुळे, त्यास आपला निर्माता मानण्यास इन्कार करणारे तोट्यात राहतील. नरकाग्नीत त्यांना शिक्षा दिली जाईल आणि त्यातून ते बाहेर कधीच येणार नाहीत. कुरआन मजीदमध्ये असा उल्लेख आहे की, जे अल्लाहचा इन्कार करतात त्यांनी इहलोकी जीवनात कितीही सत्कार्य केले तरी पारलौकिक जीवनात ती सर्व सत्कार्ये मृगजळाप्रमाणे असतील. परंतु अल्लाह कोणावरही अन्याय कधीच करीत नाही. त्याचा इन्कार करणाऱ्यासही त्याच्या सत्कार्याचा योग्य तो मोबदला तो याच जीवनात देतो, मग तो मोबदला त्याच्या संपत्तीच्या स्वरूपात असेल, प्रसिद्धीच्या स्वरूपात असेल, आरोग्याच्या स्वरूपात असेल किंवा त्याच्या मुलांबाळांच्या स्वरूपात असेल.

‘कुफ्र’ या शब्दाचा खरा अर्थ लपवणे किंवा झाकणे असा आहे आणि जो मनुष्य अल्लाहच्या सत्याचा इन्कार करणारा आहे तो श्रद्धाहीन आहे. त्यालाच काफीर असे म्हटले जाते. कुफ्र हे एक घोर अज्ञान आहे आणि अल्लाहशी अनभिज्ञ असणे यापेक्षा मोठे अज्ञान काय असू शकते? खरे तर कुफ्र एक अत्याचार आहे. कृतघ्नता आहे. अल्लाहशी प्रतारणा, विद्रोह आहे. त्यामुळे मनुष्याने वेळीच या अंधारातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या सद्सद्विवेक बुद्धीचा वापर करून आपल्या निर्मात्यास अर्थात अल्लाहला ओळखून त्याच्या उपासनेच्या उजेडाकडे आपले पाऊल टाकले पाहिजे. तरच आपल्याला मरणोपरांत जीवनात खऱ्या अर्थाने यश प्राप्त होईल.

प्रकाशाच्या वाटा

कुरआन मजीदमध्ये अल्लाहने म्हटले आहे-

‘‘जे ईमानधारक आहेत त्यांचा मित्र अल्लाह आहे. तो त्यांना अंधारातून काढून प्रकाशाकडे आणतो.‘‘ (कुरआन, 2:257)

खरे तर अंधाराचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि या प्रकारांनाही वेगवेगळे पदर आहेत. या उलट प्रकाश हा एकमेवाद्वितीय आहे. एकदा प्रकाशाची किरणे आली की कोणत्याही प्रकारच्या अंधकाराला जागाच उरत नाही. परंतु हा उजेड प्राप्त करण्यासाठी सर्व प्रकारचे अडथळे मात्र दूर केले पाहिजेत. कारण अंधार करण्यासाठी वेगवेगळे प्रकार आहेत. उदा. तुम्ही डोळे बंद करा अंधार होईल, तुम्ही पडद्याआड व्हा अंधार होईल किंवा अशी कोणतीही गोष्ट करा ज्याद्वारे तुमच्यापर्यंत उजेड पोहचणार नाही. परंतु तुम्ही डोळे उघडले तर समोर उजेड दिसेल. उजेडाच्या साऱ्या वाटा केवळ अल्लाहपासून सुरू होतात, कारण तोच या सृष्टीचा निर्माता आहे आणि पालनकर्ताही. अल्लाहने म्हटले आहे,

’’अल्लाह श्रद्धावंताचा मित्र आहे आणि श्रद्धाहीनांचा कोणी वाली नाही.‘‘ (कुरआन, 47:11)

या संदेशाद्वारे अल्लाह हे सांगू इच्छितो की जे अल्लाहवर श्रद्धा ठेवून त्याची उपासना करून श्रद्धावंत झाले आहेत त्यांना त्याने त्याच्या खऱ्या उजेडात आणले आहे. त्यांच्या आयुष्यभर ते त्या प्रकाशाच्या झगमगाटात राहतील. हा प्रकाश ईमानाचा आहे, श्रद्धेचा आहे. हा उजेड दाखवण्यासाठी अल्लाहने वेळोवेळी समस्त मानवजातीसाठी वेगवेगळे पैगंबर पाठविले. वेगवेगळ्या धर्मग्रंथांचे अवतरण वेगवेगळ्या वेळी केले. कुरआन मजीद हा ग्रंथ अवतरित करून अल्लाहने कयामतपर्यंत सकल मानवजातीला उजेडाचा स्रोत निर्माण करून दिला आहे. म्हणून अल्लाह कुरआन मजीदमध्ये म्हणतो-

’’हा ग्रंथ आम्ही तुमच्याकडे पाठविला आहे जेणेकरून तुम्ही मानव समाजास अंधारातून प्रकाशाकडे आणाल हे अल्लाहच्या आज्ञेने आणि त्या सर्वशक्तिमान अल्लाहच्या मार्गाकडे.‘‘ (कुरआन, 14:1)

याचा अर्थ असा होतो की अल्लाह आपला निर्माता आहे आणि त्याने सर्व पैगंबरांना आज्ञा दिली की त्यांच्या अनुयायांना अंधारातून प्रकाशाकडे आणा. वरील आयतीत अल्लाहने दोन गोष्टींचा उहापोह केला आहे तो म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे आणि त्यानंतर अल्लाहच्या मार्गावर मार्गक्रमण. उजेडाकडील प्रवास म्हणजे अल्लाहवर श्रद्धा आणि सन्मार्ग होय. आणखी एका ठिकाणी कुरआन मजीदमध्ये अल्लाहने म्हटले आहे-

’’अल्लाह आकाशांचा आणि पृथ्वीचा प्रकाश आहे.‘‘ (कुरआन, 24:35)

या आयतीद्वारे अल्लाहने स्पष्ट केले आहे की तोच खऱ्या प्रकाशाचा स्रोत आहे. त्यामुळे जे अल्लाहची मर्जी प्राप्त करण्यासाठी शांततामय सन्मार्गावर चालतात त्यांना अल्लाहच श्रद्धाहीनतेच्या अत्यंत खोल आणि काळ्याकुट्ट अंधारातून प्रकाशाकडे आणण्यासाठी मदत करतो आणि त्यानुसार मार्गदर्शनही करतो.

उजेडाची ही वाट अत्यंत खडतर असली तरी ज्यास अल्लाहची मर्जी प्राप्त होते त्यास ती सहज साध्य होते. प्रकाशाची ही वाट त्याचे इहलोकातील जीवनच फक्त सुखी, समृद्ध, समाधानी करत नाही तर परलोकातही त्यास जन्नतच्या स्वरूपात कायमस्वरूपी उजेडप्राप्ती होते. हा प्रकाश त्यानंतर कधीही न संपणारा आहे. खरे तर या जीवनरूपी परीक्षेचे ते फलितच आहे. यासाठी आपल्या बुद्धीचा, सद्सद्विवेकाचा, विचारशक्तीचा वापर करून आपल्या अंतापूर्वी आपल्या निर्मात्यास ओळखले की तो सर्वशक्तिमान अल्लाह आपल्याला या जीवनातच वेढणाऱ्या काळ्याकुट्ट अंधारातून आणि मरणोपरांत नरकाग्नीच्या यातनेपासून वाचवेल. त्यामुळे आता आपणच ठरवायचे आहे की कायमस्वरूपी अंधारात आणि नरकाग्नीत राहण्यासाठी कोणाही ऐऱ्यागैऱ्याची पूजा उपासना करायची की सर्वशक्तिमान विश्वनिर्मात्याप्रती सश्रद्ध होऊन सन्मार्गावर चालून त्याची उपासना करून इहलोक आणि परलोकातही प्रकाशाचा मार्ग धरून यशाचे वाटेकरी व्हायचे.

बंधूभगिनीनो! आपण सारे एकाच आदम आणि हव्वाची लेकरे आहोत. आपले आयुष्य केवळ खाणेपिणे, उठणे-बसणे, झोपणे-जागणे, कमावणे-खाणे, चंगळमस्ती करणे यासाठी नसून आपल्या खऱ्या निर्मात्यास ओळखून त्याची उपासना करण्यासाठी आहे. जो अल्लाहला नाकारून इतरांना पूज्य मानतो तो खऱ्या अंधारात आहे आणि अशा स्थितीत त्याचा मृत्यू झाल्यास तो नरकाग्नीच्या खाईत लोटला जाईल आणि कायमस्वरूपी शिक्षा भोगेल. जो अल्लाहसाठी आपले सर्वस्व वाहील, फक्त त्याचीच उपासना करेल आणि त्याच्या प्रेषितांच्यामार्फत दाखविलेल्या मार्गावर चालेल तो अक्षय प्रकाशाच्या लखलखाटात राहील. त्यास जन्नत अर्थात स्वर्गप्राप्ती होऊन तिथला तो कायम निवासी राहील. आता आपण ठरवायचे की अंधारात गुरफटून राहायचे की प्रकाशाशी हातमिळवणी करायची. 



- डॉ. इकबाल मिन्ने

(लेखक : औरंगाबादचे रेडिओलॉजिस्ट असून, विख्यात साहित्यिक आहेत. संपर्क मो.- 7040791137)


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget