Halloween Costume ideas 2015

अंधारातून प्रकाशाकडे


अंधार म्हणजे नेमके काय? अंधाराला आपण काळोख ही म्हणतो. ही एक अशी स्थिती असते ज्यात प्रकाश नसतो. अंधारात नेमके काय घडते? हे बघण्यासाठी प्रकाश लागतो. माणसाचे डोळे त्याच्या निर्मात्यानं अशा पद्धतीने बनविलेले आहेत की ते प्रकाशातच बघू शकतात. प्रकाशाचे किरण त्यांच्या डोळ्यात पडणे आवश्यक आहे अन्यथा तेे बघूच शकत नाहीत.

अंधार कोणाला आवडतो का? नाही ना? का बरं? लहानपणी लाईटी गेल्यावर खूप भिती वाटायची. आज ही लाईटस गेल्यावर जीव कासावीस होतो, असे का? मानव हा अंधाराला पसंत करत नाही म्हणून असे घडते.  हे त्याच्या प्रवृत्तीमध्ये सामील आहे. तो प्रकाशाला पसंत करतो म्हणून आपण बघतो. अंधार किंवा अंधकार असं नाव कोणी आपल्या बाळाचा ठेवत नाही, उलट प्रकाश नावाचे कितीतरी व्यक्ती आपणास भेटतील. 

अंधारामध्ये वस्तू असतात पण त्यांना बघू शकत नाही. आपण डोळे असून आंधळ्या सारख त्यांना हात लावून फक्त चाचपडू शकतो आणि ह्या चाचपडण्यात आपल्या हाती जे काही लागते त्याची ओळख चुकू शकते. आपण सगळे नऊ महिने आईच्या पोटात अंधारातच राहून आलो आहोत पण त्या निर्माणकर्त्याची किमया बघा हे आपल्याला कळालं सुद्धा नाही, नाही तर तेथेही कोण राहिले नसते. 

एक गोष्ट सांगते, एक लहानसा मुलगा असतोे, तो घराच्या दाराला वडील आणि भिंतीला आई असे समजून त्यांना पुजायला लागतो. त्याचा दृष्टिकोण हा की भींत नसती तर घराचे अस्तित्व नसते आणि दार नसते तर घरात शिरताच आले नसते. आई-वडिल त्याला खूप समजवितात की अरे आम्ही तुला जन्माला घातलो, तुला लहानाचे मोठे केले. तू आजारी पडला तरी आम्ही तुझी काळजी घेतली आणि तू आम्हाला सोडून ह्या निर्जिव वस्तूंना आई-वडिल का मानतो? पण व्यर्थ! त्याच्या लहानशा डोक्यामध्ये ही बाब येत नाही. आई-वडिल आपला मुलगा लहान आहे आज न उद्या जेव्हा त्याची बुद्धी परिपक्व होईल तेव्हा त्याला सत्य कळेल असे म्हणत त्याचे खानपिने बंद करत नाहीत किंवा त्याच्या सुखसुविधांमध्येही काही फरक करत नाही. उलट त्याला आठवण रहावी म्हणून त्याच्यावर अधिक प्रेम करतात. त्याला अधिकच्या सवलती देतात. आता सांगा तो मुलगा अंधारात आहे का प्रकाशात? बरोबर! तो त्याच्या स्वतःच्या निर्माण केलेल्या विचारांच्या अंधारात आहे आणि म्हणून सत्याला बघू शकत नाही. अशीच व्यथा मानवजातीची आहे, जगात कित्येक माणसे स्वयंनिर्मित विचारांच्या अंधारात आहेत. अंधार हा अमर्याद आहे पण प्रकाश एकच असतो. 

आपण कोण? एक प्राणीच! पण मानवाला त्याच्या निर्माणकर्त्याने उत्कृष्ट बुद्धी दिली, दुसर्‍या प्राण्यासारखं फक्त खावून पिवून आपले कुटुंब वाढवून मरून जाण्यासाठी नव्हे तर ही बुद्धी दिली त्याला आपल्या निर्मात्याला ओळखण्यासाठी, माणसांशी माणुसकीनेे वागण्यासाठी, आई-वडिल नातेवाईक, शेजार्‍यांचे हक्क अदा करण्यासाठी, आपल्या अवतीभोवती पसरलेल्या निसर्गाचे परीक्षण करण्यासाठी, वेगवेगळे शोध लावण्यासाठी. पण माणूस आजपर्यंत आपल्या निर्मात्याला ओळखण्यात चूक करत आला आहे. कोणी सूर्याला, कोणी झाडांना तर कोणी इतर प्राण्यांना, कोणी निर्जीव वस्तूंना तर कोणी आपल्यासारख्या माणसालाच निर्माणकर्ता मानतो, पण का खरचं ते आपले निर्माणकर्ते आहेत का? 

खरे पाहता समस्त सौरमंडळाला निर्माण करणारा एकच ईश्‍वर आहे. पुरावा हा की आपले डोळे, कान, नाक, हात-पाय सारखेच, आपल्या शरिराची रचना अ‍ॅनॉटॉमी एकच, फिजीओलॉजी (शरीराचे कार्य) एकसारखे चालते, शरीरामधल्या पेशीही सारख्याच. जन्माला येण्याची प्रक्रिया (प्रोसेस)ही सारखी च. मग आपला ईश्‍वर का बरं वेगवेगळे? 

माणसाने आपल्या बुद्धीचा वापर करत चांगले शोध लावले, त्याच्या शोधांना एकविसाव्या शतकात तर जणू पंखच लागले, विमानाचा शोध, कॉम्प्युटर सेटेलाईट, अ‍ॅन्ड्रॉईड फोन वगैरे. माणसांने माहिती आणि तंत्रज्ञानात उच्चांक गाठला पण सभ्यतेमध्ये निच्चांक (उदा. हातरस कांड, बदायुकांड वगैरे.)

माणूस आपला निर्मितीचा उद्देश विसरला. त्याने आपल्या अवतीभोवतीच्या वस्तूंचे तर खोल परीक्षण केले पण स्वतःला विसरून गेला. मी कोण आहे? कोठून आलो? माझा निर्माण करणारा कोण? त्याने मला ह्या दुनियेत का पाठविले? मला इथे किती वर्ष रहायचे? मरून मी कोठे जाणार? मेल्यानंतर ही जीवन आहे का? स्वर्ग आणि नर्क अस्तित्वात आहेत का? असे कितीतरी प्रश्‍न असतील आणि त्यांची उत्तरे प्रत्येकजन वेगवेगळे देतो. कारण? माणसाचा स्वयंविचाराचा अंधार त्याच्या बुद्धीला सिमीत करून ठेवतो आणि ते त्यापलीकडे काही विचार करू शकत नाही.

निर्माणकर्त्याला शोधण्याचा प्रयत्नही काही बुद्धीजीवींनी केला. बिगबँगचा प्रयोग करून गॉड पार्टिकल चा शोध लावण्यासाठीपण प्रयत्न केले. माणसाला वाटलं गॉड एक प्रकाशाचा कण आहे आणि आपण त्याला कॅप्चर करू शकू, पण समस्त विश्‍वाचा निर्माणकर्ता आपण कितीही प्रयत्न केले तरी आपल्याला या जगात पहायला मिळणार नाही का? तो स्वतः सांगतो की मी तुम्हाला या दुनियेत नाही दिसणार. मरणोत्तर जीवनामध्येच माणसाला ईश्‍वराचे दर्शन होईल. तो एकच असेल यातही वाद नाही. त्याने माणसांना दुनियेत सांगितलेल्या सत्यमार्गावर आपले जीवन व्यतित केेले तर माणसाला स्वर्ग मिळेल. त्याला एक कारण हे ही आहे की, आपले इवलुशे डोळे ईश्‍वराला पाहण्यास सक्षम नाहीत. भर दुपारी उन्हात सूर्याला पाहू शकत नाही तर सूर्याच्या निर्माणकर्त्याला कसे पाहू शकतो?

आपली बुद्धी इतकी कमी की आपण तो कसा असेल यासंबंधीचे विचारही करू शकत नाही. तो आपला ईश्‍वर (समस्त विश्‍वाचा) एकमेव आहे. आदीपासून आहे, नेहमी राहणारा आहे, त्याला न आई न वडिल, न भावंड न पत्नी, न मुलगा न मुलगी न कोणी नातेवाईक. आपली बुद्धी विचारते हे कसे शक्य? सांगा बरं सूर्याला आई आहे का? वडिल आहे का? लेकरं का? नातेवाईक आहेत का? मग त्याच्या निर्माणकर्त्याला ही नाही आणि त्याला गरजही नाही आणि त्या निर्माणकर्त्याने फक्त निर्माण करून सोडले नाही तर शिस्तही लावली. सूर्य ठरावीक वेळेवर निघतो, ठरावीक वेळेवर मावळतो, चंद्र ही वेळेचे पालन करतो, रात्रं-दिवस बरोबर एकमेकांच्या मागे येतात. 

कितीही मोठे पीर असो किंवा महाराज, ते सूर्याला तासभर उशीरा काढू शकत नाहीत किंवा त्याला एक दिवस सुट्टी देऊ शकत नाहीत, मग आपण पीरांना किंवा महाराजांना का बरे मानतो? माणूस काय निर्माण करू शकतो? आपण डासांना मारू शकतो, प्लास्टिकचा डास निर्माण करू शकतो पण खरोखरचा नाही. एक मुंगीही आपण निर्माण करू शकत नाही, माणसासारखे दिसणारे आणि काम करणारे रोबोट आपण तयार केलेत पण अजूनही आपण खूप मागे आहोत. आपल्याकडे त्याने निर्माण केलेल्या अनंत जीवांना मोजण्यासाठी आपण सक्षम नाही. इनफिनाईट म्हणून आपण सोडून देतो. 

एकाच जमीनीतून गोड-गोड आंबे, कडू-कडू कारले येतात. आंब्याच्या झाडाखाली साखर कोणी टाकली, फुलांना वेगवेगळे रंग कोण देतो? मनमोहक वास कोण देतो? मधमाशीला मध निर्माण करण्याचे तंत्र कोणी शिकविले? पशुंना आपल्या  आधीन कोण केले? (उदा. बैल, घोडे वगैरे). वेगवेगळ्या फळांना बघा प्रत्येकाची चव निराळी, डाळींबाचे दाने, मक्याच्या कणसातले दाणे कसे बरोबर ओळीने सजवलेले. ही पॅकिंग करणारा कोण? एका बियाचे 100 हून अधिक दाणे देणारा कोण?

आपण स्वतः त्याच्या निर्मितीचे उत्कृष्ट उदाहरण आहोत. कधी विचार केलात! अशुद्धपाण्याच्या थेंबापासून माणसाची निर्मिती करणारा, त्याला आईच्या पोटात नऊ महिने ठेवून पोसणारा, ठराविक वेळेवर जन्माला घालणारा. त्याबाबत ठामपणे एखादा स्त्रीरोग तज्ज्ञ किंवा सोनोग्राफी मशीन सांगू शकत नाही की, एवढं वाजून एवढ्या मिनिटाला एवढ्या सेकंदाला हे बाळ जन्म घेईल. या जन्माचा वेळ माहित न मृत्यूचा, न जीवनाचा उद्देश मग हे जगणे कशासाठी? फक्त जास्तीत जास्त पैसे कमवून मोठमोठे बंगले बांधून विश्‍वभ्रमण करून आत्महत्या करून मरून जाण्यासाठी? लोक जगातल्या सर्व सुखसुविधांचा उपयोग करून ही आत्महत्या का करतात? त्यांना समाधान का नसते त्याचे उत्तर निर्माणकर्त्याचा नकार, जीवनाचा स्पष्ट उद्देश माहित नसणे, पारलौकिक जीवनाचा इन्कार इ. होऊ शकते. 

त्या एकमेव निर्माणकर्त्याने आपल्याला निर्माण करून आपल्यासाठी एक मॅन्युअल ही दिले. ग्रंथाच्या रूपात आणि ते ग्रंथ शिकविण्यासाठी वेळोवेळी संदेशवाहकही पाठविले. हे जीवन एक परीक्षागृह आहे. येथे कोणी सुखी राहण्यासाठी आलेले नाही . प्रत्येकाच्या जीवनात काही न काही परीक्षेचे क्षण आहेतच. गरज आहे त्या परीक्षेला हसत-खेळत सामोरे जाण्याची. यशस्वी कोण? जे न बघता आपल्या निर्मात्याला मानतील. कुरआनचे वाचन करून, समजून, प्रत्यक्षात आपले जीवन व्यतीत करतील. अंतिम संदेशट्याने सांगितलेल्या संदेशावर आचरण करतील आणि अत्यंत अल्पजीवनानंतर येणार्‍या कायमच्या वास्तव्याच्या  ठिकाणासाठी कष्ट करतील. तेच खरे यशस्वी आणि हुशार व्यक्ती होत. 

हा एक मार्ग आहे आपल्याला स्वैराचाराच्या अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारा. सांगा कोण आहे तयार अंधारातून प्रकाशाकडे येण्यासाठी?


- डॉ. सीमीन शहापूरे 

8788327935


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget