Halloween Costume ideas 2015

बनावट वेबसाइट वरून ऑनलाइन खरेदीने ग्राहकांची फसवणूक


आजच्या डिजिटल युगात जिथे बहुतेक कामे ऑनलाईन केली जातात, प्रत्येकाकडे स्मार्ट मोबाईल, संगणक, संसाधने आहेत. एका क्षणात आपण जगाच्या कोणत्याही भागात संपर्क साधू शकतो, व्यवहार करू शकतो, यामुळे जीवन सोपे झाले आहे. आता ई-कॉमर्सच्या रूपात प्रत्येक प्रकारचा व्यवसायचा वस्तु आपल्यासाठी उपलब्ध आहेत, जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा आपण ऑनलाईन खरेदी करू शकतो. परंतु त्याच्या फायद्यांसह, काही खबरदारी लक्षात ठेवणे देखील आवश्यक आहे. प्रत्येक क्षेत्राप्रमाणे या भागातही फसवणुकीचा व्यवसाय वाढत चालला आहे.  सुशिक्षित ग्राहकांची देखील ऑनलाईन फसवणूक मोठ्या प्रमाणात होत आहे. हा फसवणुकीचा व्यवसाय दरवर्षी वेगाने वाढत आहे, काहीचे 500-800, काहीचे 2-4 हजार, आणि काहीचे 15-20 हजार हुन जास्त पैशाने फसवणूक होत आहे परंतु बहुतेक लोक यावर कारवाई करीत नाहीत आणि गप्प बसतात. या फसवणूकीवर कारवाई करण्यासाठी शंभरातुन एकाद पुढे येतो.

फर्जी वेबसाइटचे जाळे सर्वत्र पसरले :- आज, आम्हाला इंटरनेट द्वारे एका क्लिकवर जगभरातील माहिती मिळते. परंतु यापैकी बर्‍याच वेबसाइट्स केवळ आर्कषण, देखावा आणि फसवणूकीसाठी आहेत जे फक्त चांगल्या पणाचा आव आणून खोटा देखावा करतात, जेव्हा की वास्तविक तसे काहीच घडत नसते. आजकाल, कोणीही बनावट वेबसाइट बनवून त्यावर अतीआर्कषक उत्पादनाच्या विक्रीचे आमिष दाखवतात. ते मोठे-मोठे दावे करतात. दहा-दहा हजार रुपयांची नामवंत कंपनीच्या वस्तु फक्त पाचशे रुपयात विक्रीचे सांगतात. 95% पर्यंत सवलतीच्या ऑफर दाखवितात, पण त्याच ब्रांडची ओरिजिनल वस्तु प्रत्यक्षात 500 रुपयांमध्ये मिळते का? या आठवड्यात मी अश्याच 8-10 ई-कॉमर्स वेबसाइट सर्च केल्यात जे घरगुती वस्तू विकतात, त्या वस्तूंच्या किंमतीही अगदी कमी असल्याचे दर्शविल्यास गेले. पण जेव्हा मी त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी दिलेल्या नंबरवर कॉल केला तर त्या सगळ्या वेबसाइट वर दाखविण्यात आलेले संपर्क क्रमांक बंद होते आणि त्यानी मी केलेल्या ई-मेल ला सुद्धा प्रतिसाद दिला नाही, तर त्यातील काही ईमेल आयडी चुकीचे दिले होते. आता यावरून समजून येते की सत्य परिस्थिती काय असणार. तरीही हजारो ग्राहक दररोज अशा वेबसाईटवर खरेदी करतात आणि त्यांची फसवणूक होते. मागील महिन्यात, माझ्या एका मित्राने अशाच एका बनावट वेबसाइट वरून नामांकित कंपनीचे घड्याळ अगदी स्वस्त किंमतीत विकत घेतले पण जेव्हा ती वस्तू घरी आली तेव्हा त्या घड्याळाऐवजी वॉचबॉक्स मध्ये कचरा सापडला, बर्‍याचदा अनेक ग्राहकांसोबत असेच घडते परंतु लोक या फसवणूकी विरूद्ध कारवाईच करत नाहीत म्हणूनच हा फसवणुकीचा व्यवसाय इतका चालला आहे.

विचार करा, समजून घ्या आणि मग खरेदी करा :- हे नेहमी लक्षात ठेवा की आपल्या चुकीचा परिणामच आपल्यावर फसवणूक आहे, म्हणून ऑनलाइन खरेदी करताना सावधगिरी बाळगा, नेहमी शॉपिंगकरीता नामांकित ई-कॉमर्स वेबसाइटवरूनच खरेदी करा, दिशाभूल करणार्‍या जाहिराती पासून दूर रहा, विचार न करता कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका, विशेषतः ते लिंक जे सोशल मीडियावर व्हायरल होतात. एखादे उत्पाद खूपच सूट किंवा खूपच स्वस्त असण्याचे रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न करा कारण कोणतीही कंपनी कमवायला बसली आहे, तेव्हा ती स्वतःचे नुकसान करून वस्तू कशाला विकेल. कोणालाही वैयक्तिक बँकिंग माहिती सामायिक करू नका, सोशल मीडियावर आपली वैयक्तिक माहिती सामायिक करणे टाळा, ऑनलाईन वस्तू खरेदी करताना धोरण अटी आणि शर्ती जाणून घ्या, त्यांचा ईमेल आयडी, संपर्क क्रमांक तपासा सोबतच ऑनलाईन मैपद्वारे दिलेला पत्ता सत्यापित करून बघा आणि नवीन अज्ञात वेबसाइटवरील उत्पादने खरेदी करणे शक्यतो टाळावे.

      दिलेला वेब पत्ता यूआरएल काळजीपूर्वक पहा, सुरक्षित इंटरनेट कनेक्शन तपासा, पेमेंट करण्याचे सर्व पर्याय बघून घ्या. आजकाल नामांकित कंपनी, बँक किंवा सरकारी वेबसाइटची कॉपी करुन हुबेहूब बनावट वेबसाइट बनवून ग्राहकांची फसवणूक केली जाते, नवनवीन स्किम अंतर्गत पैसे, प्रचंड सूट किंवा बक्षीस देण्याचे लोभ दाखवून बनावट वेबसाइट द्वारे लिंक, ईमेल किंवा संदेश पाठविला जातो. लोभ ही एक वाईट गोष्ट आहे, ऑनलाइन खरेदी करताना विशेष काळजी घ्या. ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी नेहमी अधिकृत वेबसाइट किंवा बँकिंग मोबाइल अ‍ॅपचाच वापर करावा, इंटरनेटशी कनेक्ट होण्यासाठी एक सुरक्षित माध्यम वापरा, उत्कृष्ट सुरक्षित गुणवत्तापुर्ण ब्राउझरचा वापर करावा. अशा प्रकारच्या सावधगिरी नंतरही आपली फसवणूक झाल्यास त्वरित तक्रार नोंदवा.

जबाबदार बना आणि जागरूक रहा :- जेव्हा कधी आपण ऑनलाइन फसवणुकीचा सामना करता तर लक्षात ठेवा की प्रशासन आणि बर्‍याच समर्थक संस्था आपल्या न्यायासाठी सज्ज आहेत, प्रथम, आपल्या देशाच्या गृह मंत्रालयाचे नेशनल सायबर क्राइम रिपोर्टींग पोर्टल https://cybercrime.gov.in/ हेल्पलाइन नंबर 155260 ला भेट द्या, दिलेल्या सूचनांनुसार आपली तक्रार ऑनलाईन दाखल करा. येथे प्रत्येक राज्याचे नोडल सायबर सेल अधिकारी आणि तक्रार अधिकारी यांचे नाव, संपर्क क्रमांक, ईमेल आयडी दिले आहेत याव्यतिरिक्त, प्रत्येक शहरात पोलिस विभागांतर्गत सायबर सेल असतात जिथे आपल्याला मदत मिळू शकेल. प्रत्येक ग्राहकांना त्यांच्या हक्कांची माहिती असणे महत्वाचे आहे.

ग्राहकांनी त्यांचे हक्क मिळवण्यासाठी तक्रार नोंदविण्याकरीता संपर्क साधावा :- देशातील कोणत्याही नागरिकांची कोणत्याही प्रकारच्या ग्राहकांच्या स्वरूपात फसवणूक होते, तर कृपया न्यायासाठी संपर्क साधावे. राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोग, केंद्र सरकारची वेबसाइट :- http://www.ncdrc.nic.in/   ईमेल आईडी :- ncdrc@nic.in संपर्क क्रमांक :- 01124608801. देशातील सर्व जिल्हास्तरीय ग्राहक फोरमची लिस्ट:- http://www.ncdrc.nic.in/districtlist.html या लिंकवर मिळते आणि आपण आपल्या जिल्हाच्या फोरमशी संपर्क साधू शकतो.

राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन (भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय अंतर्गत) वेबसाईट:- http://nationalconsumerhelpline.in/  टोल फ्री क्रमांक:- 1800114000 किंवा 14404 वर संपर्क करावा याचा व्यतिरिक्त शासनाचे मोबाईल अॅप सुद्धा आहे किंवा मैसेज द्वारे सुद्धा सेवा पुरविली जाते. राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, महाराष्ट्र वेबसाईटः-https://grahak.maharashtra.gov.in हेल्पलाईन नंबर:- 022 40293000   ई-मेल आयडी:-  mah-sforum@nic.in यावर ग्राहक संपर्क करू शकतात. जागो ग्राहक जागो वेबसाईटः-http://www.jagograhakjago.com/ टोल फ्री क्रमांक:- 1800114424 आणि ईमेल आयडी:-jagograhakjagohelpline@gmail.com आहे.  कॉन्फोनेट (देशातील ग्राहक मंचचे संगणकीकरण आणि नेटवर्किंग):- www.cms.nic.in ऑनलाईन साईटवर ग्राहक संबंधित सर्व केसेसची अपडेट माहिती मिळते.

आपण ग्राहक म्हणून जागरूक असणे खूपच गरजेचे आहे आणि ह्यासाठीच शासनाने ग्राहकांचा हक्क संरक्षणा करीता कायदे तयार केले आहेत सोबतच अनेक संस्था, परिषद, मंच/फोरम सुद्धा स्थानिक ते आंतरराष्ट्रिय स्तरावर ग्राहकांचा हक्कांसाठी काम करतात. ग्राहक संरक्षण कायदा, 1986, ग्राहक संरक्षण नियम, 1987, राज्य शासनाचे महाराष्ट्र ग्राहक संरक्षण नियम 1987, भारतीय मानक नियम ब्यूरो, 1991, ग्राहक कल्याण निधी नियम, 1992, राज्य शासनाचे महाराष्ट्र ग्राहक संरक्षण नियम 2000, ग्राहक संरक्षण विनिमय, 2005, ग्राहक संरक्षण विनिमय, 2018, ग्राहक संरक्षण कायदा, 2019 हे आहेत. वस्तु घेतांना किंमत, वस्तु निर्मितीची व समाप्तीची तारीख, अटी व नियम, वस्तु निर्मिती तील सामग्री, वजन व इतर गोष्टी काळजीपुर्वक निरखुन बघावे. प्रत्येक वस्तु स्वस्त असेल म्हणून ती निकृष्ट दर्जाचे असेल असे नसते आणि महाग असेल म्हणजे चांगलेच असेल असेही नसते याचे सर्वात चांगले उदाहरण म्हणजे जेनेरीक औषधी आहे म्हणून फक्त पैशाचा किमती वरूनच वस्तुचा दर्जा ओळखू नये. फक्त जागरूक व्हा आणि एक जबाबदार ग्राहक बना.

-डॉ. प्रितम भि. गेडाम

भ्रमणध्वनी क्र. 08237417041

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget